Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

PM's Message


प्रिय नागरिकहो,

आपल्या भारतीय संस्कृतीत सेवा हे सर्वोच्च कर्तव्य मानलं गेलं आहे. सेवा परमो धर्मा. एक वर्षापूर्वी तुम्ही माझ्यावर प्रधानसेवक या नात्यानं तुमची सेवा करण्याची जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी प्रामाणिकपणानं निभावण्यासाठी कायावाचामने मी प्रत्येक दिवसाचा क्षण वेचला.

भारतात विश्वास खालावला होता त्यावेळी मी पदभार स्वीकारला. भ्रष्टाचार आणि निर्णय क्षमतेच्या अभावामुळे सरकार हतबल झाले होते. वाढती महागाई आणि आर्थिक असुरक्षिततेमुळे लोकांमध्ये हताश असल्याची भावना निर्माण झाली होती. तातडीच्या आणि निर्णायक कृतीची गरज होती.

या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आम्ही पध्दतशीरपणे वाटचाल सुरू केली. सतत वाढणाऱ्या किमती आम्ही ताबडतोब आटोक्यात आणल्या. मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला स्थिर, धोरणात्मक आणि कार्यतत्पर प्रशासनाद्वारे नवी ऊर्जा दिली. मोजक्या काही जणांना आपल्या मौल्यवान साधनसंपत्तीच्या केल्या गेलेल्या मनमानी वितरणाऐवजी पारदर्शी लिलावपध्दती आणली. काळ्या पैशांविरोधात कडक पावलं उचलली. यासंदर्भात विशेष तपास पथक स्थापन करणे, काळ्या पैशाबाबत कठोर कायदा संमत करणे आणि या संदर्भात आंतरराष्ट्रीय मतैक्य निर्माण करण्याचा यात समावेश आहे. शुध्दतेचा तत्वत: आणि कृतीतही अंगीकार आणि त्याबाबत कोणतीही तडजोड न स्वीकारणे यामुळे भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची खात्री मिळाली. व्यावसायिकता आणि भावना जाणून घेण्याची क्षमता यांची सांगड घालत कार्य संस्कृतीतही महत्त्वाचे बदल केले गेले. टीम इंडियाची भावना दृढ करण्यासाठी, राष्ट्रीय विकासात राज्य सरकारांनाही महत्त्वाचा भागीदार बनविले गेले. महत्त्वाचे म्हणजे सरकारवरचा विश्वास पुन्हा स्थापित केला.

अंत्योदयाच्या तत्वानुसार आमचे सरकार गरिबांसाठी, विकासात मागे राहिलेल्यांसाठी, त्यांच्या विकासासाठी कटिबध्द आहे. दारिद्रयविरुध्दच्या लढाईत त्यांनी सैनिक म्हणून लढा द्यावा यासाठी आम्ही त्यांना सक्षम करण्यासाठी कार्य करत आहोत. शाळेत स्वच्छतागृह बांधण्यापासून ते आयआयटी, आयआयएम आणि एम्स उभारण्यापर्यंत मुलांसाठी लसीकरणापासून ते स्वच्छ भारत अभियानासाठी जनतेच्या पुढाकारापर्यंत, कामगारांना किमान निवृत्तीवेतन पुरविण्यापासून ते सर्वसामान्यांना सामाजिक सुरक्षा पुरविण्यापर्यंत, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यापासून ते जागतिक व्यापार संघटनेत शेतकऱ्यांचं हितरक्षण करण्यापर्यंत, स्वसाक्षांकनापासून ते अनुदान थेट लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यापर्यंत अखंड वीजपुरवठ्यापासून ते रस्ते आणि रेल्वेद्वारे राष्ट्राला जोडण्यापर्यंत, बेघरांसाठी घरं बांधण्यापासून ते स्मार्ट सिटी उभारण्यापर्यंत. ईशान्येकडच्या राज्यांना मुख्य प्रवाहात आणण्यापासून ते देशाच्या पूर्व भागांच्या विकासाला प्राधान्य देण्यापर्यंत अगणित पावलं उचलली आणि योजना आखल्या गेल्या.

मित्रांनो, ही केवळ सुरुवात आहे. जीवनमान पायाभूत सुविधा आणि सेवांचा स्तर उंचावण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आपण सगळे मिळून तुमच्या स्वप्नातला, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नातला भारत निर्माण करू शकतो. यासाठी मला तुमचे आशिर्वाद आणि सातत्यपूर्ण सहकार्याची आवश्यकता आहे.

सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर.

जय हिंद

नरेंद्र मोदी

 
नरेंद्र मोदी
PM's Message