Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोविड परिस्थितीसंबंधी पूर्वोत्तर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद

कोविड परिस्थितीसंबंधी पूर्वोत्तर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद


नवी दिल्ली, 13 जुलै 2021

 

सर्वांना नमस्कार! आपल्या सोयीसाठी, सर्वात आधी नवीन जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या ज्या व्यक्ती येथे आहेत त्यांचा मी परिचय करून देतो.

श्री मनसुखभाई मांडवीय हे आता आपले नवीन आरोग्य मंत्री आहेत. त्यांच्याबरोबर राज्यमंत्री म्हणून  जबाबदारी असलेल्या डॉक्टर भारती पवार या बसलेल्या आहेत. त्या आपल्या आरोग्य मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम करत आहेत. आणखी दोन व्यक्तींबरोबर तुमचा सतत संबंध येणार आहे. ते आहेत DONER मंत्रालयाचे नवीन मंत्री किशन रेड्डी जी, आणि त्यांच्याबरोबर बसले आहेत ते राज्यमंत्री बी. एल. वर्मा जी.  यांचा परिचय करून घेणेसुद्धा आपल्याला आवश्यक आहे.

मित्रहो.

नॉर्थ इस्ट भागातून करोना समूळ नष्ट करण्यासाठी आपण काही innovative ideas लढवून जी मेहनत करत आहात, ज्या योजना आखल्या आहेत तसेच ज्या योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत त्याचं सविस्तर वर्णन आपण केलंत. आपण सर्व,  एकंदरीतच संपूर्ण देश आणि विशेषतः आमचे हेल्थ वर्कर्स यातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी निभावण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने कष्ट उपसले आहेत. नॉर्थ ईस्ट भागातील भौगोलिक आव्हानांना तोंड देत, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट यापासून ते व्हॅक्सिनेशनपर्यंतचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले गेले. खास करून  ज्याप्रकारे हे केले गेले आहे ते उत्तम आहे हे मी आज बघितले. अर्थात चार राज्यांना अजून improve करायला  वाव आहे. तसेच इतरांनीही  wastageला  मोठ्या प्रमाणावर आळा घालण्याची मोठी सेन्सिटिव्हिटी दाखवून दिली. एवढेच नाही तर आपण प्रत्येक vial मधून maximum utility  साध्य करून एक प्रकारे जास्तीचे काम पार पाडले आहे. हे कौशल्यपूर्वक साध्य करण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांबद्दल आपले, विशेषत: जे medical field मधील आहेत  त्या टीमचे मी खूप खूप अभिनंदन करतो. कारण यामुळे वॅक्‍सिनेशनमध्ये महत्वाचे असलेले वॅक्‍सिन संपूर्णतः सेन्सिटिव्हिटीने हाताळले गेले. म्हणूनच  health sectorमध्ये  काम करणाऱ्या  आपल्या सर्व साथीदारांचे मी अभिनंदन करतो आणि ज्या चार राज्यांमध्ये सध्या काही त्रुटी जाणवत आहेत तिथेही अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम पार पाडले जाईल असा विश्वास व्यक्त करतो.

मित्रहो,

सध्याची परिस्थिती आपल्याला व्यवस्थित माहिती आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये वेगवेगळ्या सरकारांनी मिळून जे सामूहिक प्रयत्न केले त्यांचा परिणामही दिसून येत आहे. परंतु, नॉर्थ इस्ट मधील काही जिल्ह्यांमध्ये संसर्गाच्या प्रमाणात वाढ नोंदवली जात आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी. आपल्याला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे त्याचप्रमाणे लोकांनाही सतत सावध करत रहाणे भाग आहे. संसर्गप्रसाराला आळा घालण्यासाठी आपल्याला मायक्रो लेव्हलवर अधिक कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. आत्ता हेमंतजी सांगत होते की त्यांनी लॉकडाऊनचा मार्ग निवडण्याऐवजी मायक्रो कंटेनमेंट झोनचा मार्ग स्वीकारला आणि सहा हजारांहून अधिक मायक्रो कंटेनमेंट झोन तयार केले.

त्यामुळे जबाबदारी ठरवता येते. मायक्रो कंटेनमेंट झोनच्या इन्चार्जला  विचारता येते की, ही गडबड कशी झाली? अमुक एक गोष्ट का झाली नाही? किंवा अमुक एक  चांगली गोष्ट कश्यामुळे झाली?  म्हणून आपण पण जेवढा भर मायक्रो कंटेनमेंट झोनवर देऊ तेवढे लवकर या परिस्थितीतून बाहेर पडू शकू आणि गेल्या दीड वर्षात जे अनुभव आपल्याला आले आहेत , ज्या बेस्ट प्रॉक्टिसेस आपण पाहिल्या आहेत त्यांचा पुरेपूर वापर  करून घेऊन शकू. देशातील वेगवेगळ्या राज्यांनीही नवीन नवीन innovative पद्धती वापरल्या. आपल्या या राज्यात सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये, काही गावांमध्ये किंवा तेथील काही अधिकाऱ्यांनी या गोष्टी नावीन्यपूर्ण पद्धतीने हँडल केल्या असतील. या  सर्वोत्तम पद्धती ओळखून त्यांना जेवढी जास्त प्रसिद्धी देऊ तेवढे आपल्याला सोयीचे जाईल.

मित्रहो,

आपल्याला कोरोनाच्या प्रत्येक नवीन व्हेरिएंटवर नजर ठेवणे भाग आहे. म्युटेशननंतर हा किती त्रास देईल याबाबतीत एक्सपर्ट्स सातत्याने अभ्यास करत आहेत. संपूर्ण टीम  बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. यामध्ये प्रतिबंध आणि उपचार  दोन्ही आवश्यक आहेत. या दोन्ही गोष्टी अंतर्भूत असलेल्या उपायांवर आपण पूर्ण शक्ती केंद्रित करायला हवी. या गोष्टींवर संपूर्ण फोकस करायला हवा. दोन हातांचे अंतर , मास्क आणि आणि वॅक्सिनचे कवच या समोर वायरसचा प्रभाव कमी होईल. आणि हे आपण गेल्या दीड वर्षापासून अनुभवले आहे. त्याच प्रमाणे टेस्टिंग , ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट ही जी आपली रणनीती आहे, जे आपलं इन्फ्रास्ट्रक्‍चर आहे , ते अधिक चांगले असेल तेव्हा  जास्तीत जास्त प्राण वाचवण्यात आपण  यश मिळवू. संपूर्ण जगातील अनुभवाने यावर मोहोर उठवली आहे आहे. म्हणूनच  प्रत्येक नागरिकाला  कोरोनापासून बचावासाठी बनवलेल्या नियमांच्या पालनासाठी सातत्याने प्रोत्साहित करत राहणे आपल्याला भाग आहे. समाजातील सिव्हिल सोसायटी मधील व्यक्ती, धार्मिक जीवनात प्रमुख असणाऱ्या व्यक्ती या सर्वांकडून गोष्ट वारंवार ठसवली गेली पाहिजे यासाठी प्रयत्न करायला हवेत.

मित्रहो,

कोरोनामुळे पर्यटन, व्यापार -व्यवसाय यांच्यावर खूप मोठा  परिणाम झाला आहे, हे बरोबर आहे. मात्र आज मी एका गोष्टीवर भर देऊन सांगू इच्छितो की, पर्वतीय स्थानांवर, बाजारपेठेमध्ये मास्कशिवाय लोक फिरतात. कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन केले जात नाही. अशा डोंगराळ भागामध्ये फिरायला येणा-यांची प्रचंड गर्दी होणे, हा चिंतेचा विषय बनला आहे, हे मी समजू शकतो. मात्र असे होणे योग्य नाही. अनेकदा आपण एक तर्क ऐकतो, आणि काही लोक तर अगदी छाती पुढे करून, बोलतात, ‘‘अरे बाबा, आता तिसरी लाट येण्याआधी आम्ही आनंद लुटू इच्छितो, मौजमस्ती करू इच्छितो.’’ अशावेळी एक सांगावेसे वाटते, ते म्हणजे, तिसरी लाट काही अशी आपोआप येणार नाही, याला आपणच जबाबदार असणार आहोत, ही गोष्ट लोकांनी समजून, जाणून घेणे अतिशय गरजेचे आहे. कधी-कधी लोक विचारतात की, तिस-या लाटेसाठी काय तयारी केली आहे? तिसरी लाट आल्यानंतर तुम्ही काय करणार? मला असे वाटते की, तिसरी लाट येवूच नये, अशी लाट रोखण्यासाठी आपण केले पाहिजे, असा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला पाहिजे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी आम्ही ज्या गोष्टींसाठी नियम, कार्यपद्धती निश्चित केली आहे, त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी कशी करता येईल? आणि हा कोरोना म्हणजे अशी गोष्ट आहे की, तो काही आपणहून आपोआप  येत नाही , किंवा कोणीतरी जावून त्याला आणत नाही. आणि म्हणूनच आपण जर या विशिष्ट गोष्टींची काळजी घेतली, संपूर्ण दक्षता बाळगली तर आपण तिसरी लाटही रोखू शकणार आहे. अशी लाट आलीच तर त्यावेळी काय करायचे, हा एक वेगळा विषय आहे. मात्र अशी लाट येवूच नये, ती लाट रोखण, हा एक प्रमुख विषय आहे. आणि यासाठी आपल्या नागरिकांमध्ये सजगता, सतर्कता, कोविड योग्य वर्तणूक त्रिसूत्रीचे पालन करणे, याविषयी आपण थोडीशीही  तडजोड करू नये. आणि तज्ञही वारंवार याविषयी धोक्याचा इशारा देत आहेत. निष्काळजीपणा दाखवणे, दक्षता न घेणे, बाजारपेठा आणि इतर ठिकाणी गर्दी करणे, या कारणांमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू शकते. आणि म्हणूनच सर्वांच्या सुरक्षेसाठी आपण संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून गांभीर्याने प्रत्येक स्तरावर, एक एक पाऊल टाकले पाहिजे. ज्याठिकाणी अधिक गर्दी होवू शकते, अशा कार्यक्रमांचे आयोजन काही काळ थांबवले पाहिजे. असे कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मित्रहो,

केंद्र सरकारच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या ‘सर्वांना मोफत लस’ अभियान ईशान्येकडील भागात तितकेच महत्वाचे आहे. तिस-या लाटेच्या संकटाचा सामना करताना आपल्याला लसीकरणाची प्रक्रिया अधिक वेगवान बनवली पाहिजे. लस घेण्याविषयी काही जणांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे, त्या शंकांचे निरसन करण्याचे, लसीविषयीचे गैरसमज, भ्रम दूर करण्याचे कामही आपल्याला करायचे आहे. यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातले जितके लोक आहेत, सेलिब्रिटी असतील तर त्यांना लसीकरणाच्या अभियानामध्ये सहभागी करून घ्यायचे आहे. प्रत्येकाच्या तोंडून लसीचे महत्व, ती घेतल्यामुळे होणारे लाभ याची माहिती जास्तीत जास्त प्रसारित केली पाहिजे. सध्या ईशान्येकडील काही राज्यांमध्ये लसीकरणाचे प्रशंसनीय काम झाले आहे. याविषयी मी प्रांरभीच सांगितले आहे. ज्या भागामध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त होण्याचा, प्रसार वेगाने होण्याचा धोका आहे, त्या भागामध्ये लसीकरणावर अधिकाधिक भर दिला पाहिजे.

मित्रहो,

कोरोनाची चाचणी करणे आणि कोरोनाच्या रूग्णावर औषधोपचार करणे, याविषयी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामामध्ये सातत्याने सुधारणा करीत आपल्याला पुढे जायचे आहे. यासाठी अलिकडेच मंत्रिमंडळाने 23 हजार कोटी रूपयांचे एक नवीन पॅकेजही मंजूर केले आहे. ईशान्येकडील प्रत्येक राज्यांना या पॅकेजमधून आपल्या आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी खूप मदत मिळणार आहे. या पॅकेजमुळे ईशान्येमध्ये चाचणी, निदान, जीनोम सीक्वेसिंग, यासाठी प्रोत्साहन मिळेल. ज्या भागामध्ये संक्रमण वाढते आहे, तिथे ताबडतोब अति दक्षता विभागाची क्षमता वाढविण्यासाठी मदत मिळेल. विशेष म्हणजे, आपल्याला ऑक्सिजन आणि लहान मुलांची, बालकांची दक्षता घेण्यासाठी आवश्यक  पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वेगाने काम केले पाहिजे. पीएम केअर्सच्या माध्यमातून देशभरामध्ये शेकडो ऑक्सिजन प्रकल्प सुरू केले जात आहेत. आणि मला आनंद वाटतो, तुम्ही सर्व मुख्यमंत्रीही हे काम वेगाने व्हावे, यासाठी प्रयत्न करीत आहात. ईशान्येकडील राज्यांसाठी जवळपास दीडशे प्रकल्पांना मान्यता दिली आहे. माझा तुम्हा  सर्वांना आग्रह आहे की, हे ऑक्सिजन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत, त्यांच्या निर्माणाच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारे बाधा, अडथळा उत्पन्न होवू नये , यावर बारिक लक्ष ठेवले जावे. यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ असेल, कुशल मनुष्यबळ असेल, त्यांनाही या कामाशी जोडून, बरोबर घ्यावे. असे केले तर पुढे जावून कोणतीही समस्या उत्पन्न होणार नाही. ईशान्येकडील भौगोलिक स्थिती लक्षात घेवून, तात्पुरत्या स्वरूपामध्ये रूग्णालये सुरू करणे अतिशय गरजेचे आहे. आणखी एका महत्वाच्या विषयाचा मी प्रारंभीच उल्लेख केला होता, आत्ता पुन्हा एकदा करतो, तो विषय म्हणजे- प्रशिक्षित मनुष्यबळाचा आहे. अनेक ठिकाणी जे ऑक्सिजन प्रकल्प सुरू केले जात आहेत, अति दक्षता विभाग तयार केले जात आहेत, नवीन यंत्रसामुग्री ब्लॉक स्तरावरील रूग्णालयांमध्ये पोहोचवण्यात येत आहे, या सर्व गोष्टी सुयोग्य पद्धतीने कार्यरत रहाव्यात, चालविल्या जाव्यात यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची अतिशय आवश्यकता आहे. या संदर्भात जी काही मदत तुम्हाला हवी  आहे, ती सगळी मदत केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे.

मित्रहो,

आज आपण संपूर्ण देशामध्ये दररोज 20 लाखांपेक्षा जास्त चाचण्या करीत आहोत. आपली क्षमता प्रतिदिनी 20 लाख चाचण्या करण्यापर्यंत वाढली आहे. ईशान्येकडील राज्यांमधल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, विशेषत्वाने  ज्या जिल्ह्यात प्रसाराचा वेग वाढला आहे, अशा ठिकाणी चाचणी करण्याच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज आहे. इतकेच नाही तर, एकदम मधूनच, रँडम पद्धतीने चाचणी करण्याबरोबरच आपण क्लस्टरवाल्या ब्लॉकमध्ये चाचणीची धडक मोहीम राबवावी. या संदर्भात आपल्याला ठोस पावले उचलण्याची गरज आहे. आपण सर्वजण मिळून सामूहिक प्रयत्नाने, देशाच्या जनतेच्या सहकार्याने कोरोनाचे संक्रमण रोखण्यात नक्की यशस्वी होवू, असा मला पूर्ण विश्वास आहे. आज मी पुन्हा एकदा ईशान्येकडील राज्यांबरोबर  अगदी विशिष्ट आणि प्रत्येक आवश्‍यक  विषयांवर विस्ताराने चर्चा केली आहे. या चर्चेचा लाभ आता आपल्याला दिसून येईल, असा माझा विश्वास आहे. आगामी काही दिवसांमध्ये ईशान्य भागामध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्याचे दिसून येत आहे; ती कमी होतील. अशा संक्रमणाला रोखून धरण्यासाठी आपली सर्व टीम काम करेल आणि या कामामध्ये सर्वांना यश मिळेल, असा माझा विश्वास आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप- खूप धन्यवाद! तुम्हा  सर्वांना माझ्या खूप शुभेच्छा. आता लवकरच माझे ईशान्येकडील बंधू-भगिनी कोरोना मुक्तीचा आनंदही घेतील अशी अपेक्षा करतो.

 

* * *

M.Chopade/V.Sahajrao/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com