Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोविड 19 परिस्थितीबद्दल राज्ये आणि  जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला

कोविड 19 परिस्थितीबद्दल राज्ये आणि  जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्य आणि जिल्ह्यातल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी कोविड 19 साथीच्या नियंत्रणाचा त्यांच्या अनुभवाबाबत संवाद साधला.  

कोविडच्या दुसऱ्या लाटेत आघाडीवर राहून नेतृत्व करत असल्याबद्दल अधिकाऱ्यांनी  संवादादरम्यान पंतप्रधानांचे आभार मानले.  अधिकाऱ्यांनी आपले अनुभव सांगितले आणि वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्ववभूमीवर व्यवस्थापनासाठी उचललेल्या नावीन्यपूर्ण पावलांबाबत पंतप्रधानांना सांगितले. ग्रामीण भागात वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि क्षमतावृद्धीत वाढ करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली. या सर्वोत्तम पद्धतींचे आणि अभिनव पावलांचे संकलन करावे, जेणेकरून देशाच्या इतर जिल्ह्यात ते उपयोगात आणता येतील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

संवादानंतर पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना  संबोधित केले.  या कठीण परिस्थितीत देशातील आरोग्यसेवेतले कर्मचारी, आघाडीचे कार्यकर्ते  आणि प्रशासकांनी दाखविलेल्या समर्पण आणि चिकाटीचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि पुढे जाण्यासाठी अशाच उत्साहाने काम सुरू ठेवण्याचे आवाहन केले.  देशातील प्रत्येक जिल्हा तितकाच वेगळा आहे आणि प्रत्येक जिल्ह्याची स्वतःची वैशिष्ठयपूर्ण  आव्हाने आहेत, असे ते म्हणाले.  त्यांनी जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना सांगितले, तुमच्या जिल्ह्यातील आव्हाने तुम्हाला अधिक चांगल्याप्रकारे समजतात. म्हणूनच  जेव्हा तुमचा  जिल्हा जिंकतो, तेव्हा देश जिंकतो. जेव्हा तुमचा जिल्हा कोरोनाला पराभूत करतो, तेव्हा देश कोरोनाला  पराभूत करतो. रजा न घेता काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. या व्यक्ती  अनेकांचे  प्रेरणास्थान असून त्यांनी केलेल्या त्यागाची आपल्याला  जाणीव आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

कोरोनाविरूद्धच्या  युद्धात सर्व अधिकाऱ्यांची  फील्ड कमांडरप्रमाणे महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.  स्थानिक प्रतिबंध क्षेत्रे, अधिकाधिक चाचण्या  आणि लोकांना अचूक व संपूर्ण माहिती देणे ही विषाणूविरोधातली  शस्त्रे आहेत, असे त्यांनी नमूद केले.  सध्या , काही राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण  कमी होत आहे तर  इतर अनेक राज्यांमध्येही ते  वाढत आहे. म्हणूनच  घटत्या संसर्गाच्या परिस्थितीतही  अधिक जागरूक राहण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. हा लढा प्रत्येक जीव वाचविण्यासाठी आहे आणि ग्रामीण आणि दुर्गम भागात लक्ष केंद्रित   केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. ग्रामीण भागातील लोकांसाठी मदत सामग्री सहज उपलब्ध व्हावी, असे आवाहन  त्यांनी अधिकाऱ्यांना केले.

आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे जीवन सुकर होईल याची  काळजी घेण्याचा सल्ला पंतप्रधानांनी जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना  दिला.  संसर्ग रोखण्याचे  आणि त्याचवेळी आवश्यक वस्तूंचा निरंतर प्रवाह सुनिश्चित करण्याची गरज यावर त्यांनी जोर दिला. पीएम केअर्स  फंडच्या माध्यमातून देशातील प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये  ऑक्सिजन संयंत्र  बसविण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे आणि अनेक रुग्णालयांमध्ये या संयंत्रांचे काम सुरू झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

आजाराची तीव्रता कमी करण्यास तसेच रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या बाधितांचे प्रमाण  आणि मृत्यू कमी करण्यासाठी लसीकरण हे कसे साधन आहे ते पंतप्रधानांनी सांगितले .  कोरोना लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.  आरोग्य मंत्रालय लसीकरणाची यंत्रणा आणि प्रक्रिया सुव्यवस्थित करत आहे. पुढील 15 दिवसांचे वेळापत्रक राज्यांना आगाऊ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी लसीचा अपव्यय रोखण्याच्या गरजेवर भर दिला.   खाटांची  आणि लसीची उपलब्धता याबाबत माहिती जेव्हा  सहज उपलब्ध होते तेव्हा लोकांची सोय होते, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे काळ्या बाजारावर  अंकुश ठेवला पाहिजे आणि असे करणार्‍यांवर कडक कारवाई केली जावी. आघाडीवरील कर्मचाऱ्यांचे  मनोबल कायम उंचावून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.

गावकरी त्यांच्या शेतात सामाजिक अंतर कसे टिकवत आहेत याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.  गावे माहिती समजून घेतात आणि त्यांच्या गरजेनुसार त्यात सुधारणा करतात.  ही खेड्यांची ताकद आहे, असे त्यांनी नमूद केले. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी उत्तम पद्धती  आपण अवलंबल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.  यासाठी अभिनव प्रयोग करण्याची , धोरणात सुधारणा सुचवण्याची मोकळीक तुम्हाला  असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

या बैठकीस गृहमंत्री , संरक्षणमंत्री, आरोग्यमंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य),   आरोग्य सचिव, औषधनिर्माण सचिव, पंतप्रधान कार्यालय व  मंत्रालये आणि केंद्र सरकारच्या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

****

Jaydevi PS/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com