नवी दिल्ली, 23 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील आघाडीच्या ऑक्सिजन उत्पादकांशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, ही वेळ केवळ आव्हानांवर मात करण्याची नाही तर अत्यंत कमी कालावधीत तोडगा उपलब्ध करून देण्याची आहे. सरकार आणि ऑक्सिजन उत्पादकांमध्ये उत्तम समन्वय असण्याच्या गरजेवर पंतप्रधान मोदींनी भर दिला.
ऑक्सिजन उत्पादकांनी गेल्या काही आठवड्यांत त्यांच्या उत्पादनात वाढ केल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. द्रवरूप ऑक्सीजनचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने उचललेली अनेक पावले त्यांनी जाणून घेतली. देशातील वैद्यकीय आवश्यकता पूर्ण करण्यासाठी औद्योगिक ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्रासाठी वळवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी उद्योगांचे आभार मानले.
परिस्थितीत आणखी सुधारणा होण्यासाठी, आगामी काळात ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने उद्योग क्षेत्राचा पूर्ण क्षमतेने उपयोग केला जाईल असे पंतप्रधानांनी या बैठकीत सांगितले. ऑक्सिजन सिलिंडरच्या उप्लब्धतेसह ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी रसद पुरवण्याची सुविधा यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी नमूद केली. इतर वायूची वाहतूक करणाऱ्या टॅंकरचा वापर ऑक्सिजन पुरवठ्यासाठी करावा अशी आग्रही विनंती त्यांनी उद्योग क्षेत्राला केली.
राज्यांची ऑक्सिजन संबंधित आवश्यकता लक्षात घेता , उत्पादन केंद्रात टँकर्स लवकरात लवकर पोहोचतील या दृष्टीने सरकार रेल्वे आणि हवाई दलाच्या प्रभावी वापरासाठी कार्यरत आहे , असे पंतप्रधान म्हणाले.
सरकार, राज्य, उद्योग क्षेत्र वाहतूकदार आणि सर्व रुग्णालयांनी एकत्र येऊन एकत्र काम करण्याची गरज आहे.ताळमेळ आणि समन्वय चांगला राहिल्यास आव्हानावर मात करणे सोपे जाईल, अशी टिपण्णी पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधान मोदी यांनी ऑक्सीजन उत्पादकांचे कौतुक करत त्यांना सरकारचा पूर्ण पाठिंबा दर्शवला आणि आशा व्यक्त केली की, देश लवकरच या संकटावर मात करण्यात यशस्वी होईल.
आरआयएल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. मुकेश अंबानी, एसएआयएल च्या अध्यक्षा श्रीमती सोमा मंडल , जेएसडब्लूचे श्री सज्जन जिंदाल , टाटा स्टीलचे नरेंद्रन, जेएसपीएल चे श्री . नवीन जिंदाल, एएमएनएसचे श्री. दिलीप ओमेन, एलआयएनडी चे श्री. एम . बॅनर्जी, आयनॉक्सचे श्री, सिद्धार्थ जैन, एअर वॉटर जमशेदपूरचे व्यवस्थापकीय संचालक श्री . नोरियो शिबुया, नॅशनल ऑक्सीजन लिमिटेडचे श्री. राजेशकुमार सराफ आणि अखिल भारतीय औद्योगिक वायू उत्पादक संघटनेचे अध्यक्ष श्री. संकेत टिकू या बैठकीला उपस्थित होते.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
Earlier today, met leading oxygen manufacturers of our country and discussed the efforts to scale up oxygen supply in the wake of the prevailing COVID-19 situation. https://t.co/ioYGRza8fp
— Narendra Modi (@narendramodi) April 23, 2021