Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोविड-19 परिस्थितीबाबत पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण

कोविड-19 परिस्थितीबाबत पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण


नवी दिल्ली, 20 एप्रिल 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड-19 परिस्थितीबाबत देशाला उद्देशून मार्गदर्शन केले. या महामारीमध्ये अलीकडच्या काळात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी सहभागी आहे. हे आव्हान खूप मोठे आहे आणि आपल्याला त्यावर निर्धाराने, धैर्याने आणि पूर्ण सज्जतेने एकत्रितपणे मात करायची आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, निमवैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, सुरक्षा दले आणि पोलिस दले यांनी कोरोनाविरोधातील लढाईत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना अभिवादन केले.

देशाच्या विविध भागात ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार अतिशय गतीने आणि संवेदनशीलतेने काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक गरजू व्यक्तीला ऑक्सिजन मिळावा यासाठी केंद्र, राज्य सरकार आणि खाजगी क्षेत्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. ऑक्सिजनच्या उत्पादनात आणि पुरवठ्यात वाढ करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. नव्या ऑक्सिजन प्लांटची उभारणी, एक लाख नवे सिलिंडर पुरवणे, औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्राकडे वळवणे, ऑक्सिजन रेल्वे यांसारखे उपाय हाती घेण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

आपल्या शास्त्रज्ञांना अतिशय कमी कालावधीत लस तयार करण्यात यश मिळाले आणि सध्या भारताकडे जगातील सर्वात स्वस्त लस  असून भारतात उपलब्ध असणाऱ्या शीत-साखळीला अनुरुप अशी ही लस असल्याचे त्यांनी सांगितले. या सांघिक प्रयत्नांमुळेच जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात भारताने दोन भारतीय बनावटीच्या लसींच्या मदतीने केली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यापासूनच जास्तीत जास्त भागांपर्यत लसी पोहोचवण्यावर आणि त्यांची सर्वात जास्त गरज असलेल्या लोकांना त्या देण्यावर भर दिला जात आहे. भारताने पहिल्या 10 कोटी, 11 कोटी आणि 12 कोटी मात्रा जगात सर्वात कमी कालावधीत दिल्या. लसीकरणाबाबत काल घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती देताना पंतप्रधान म्हणाले की 1 मे नंतर 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करणे शक्य होणार आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या लसींपैकी निम्म्या लसी थेट राज्यांकडे आणि रुग्णालयांकडे पाठवण्यात येणार आहेत.

पंतप्रधानांनी जीवन वाचवण्याबरोबरच, आर्थिक गतिविधी आणि जनतेच्या उपजिविकेवर विपरीत परिणाम होऊ नये यावर भर दिला. 18 वर्षे आणि त्यावरील लोकसंख्येसाठी लसीकरणामुळे शहरांतील मनुष्यबळाला तातडीने लस उपलब्ध होईल. पंतप्रधानांनी राज्य सरकारांना विनंती केली की, त्यांनी श्रमिकांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करावा आणि ते ज्याठिकाणी आहेत त्याठिकाणीच थांबवण्यासाठी त्यांना राजी करावे. राज्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे कामगार आणि मजुरांना मोठी मदत होईल आणि त्यांना त्याठिकाणीच लस मिळेल जेणेकरुन त्यांच्या कामावर परिणाम होणार नाही. 

पंतप्रधान म्हणाले, आपल्याकडे आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पहिल्या लाटेपेक्षा अधिक चांगले ज्ञान आणि स्रोत उपलब्ध आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांना चांगल्या आणि संयमी लढाईचे श्रेय दिले. ते म्हणाले, जनसहभागाने आपण या कोरोना लाटेचाही पराभव करु. लोकांच्या गरजेसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली, आणि ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले.

पंतप्रधानांनी युवकांना आपल्या परिसरात आणि शेजारी कोविड अनुरुप वर्तनासाठी मदत करण्याचे आवाहन केले. यामुळे प्रतिबंधित क्षेत्र, संचारंबदी किंवा टाळेबंदी टाळण्यास मदत होईल. त्यांनी मुलांना सांगितले की, कुटुंबांत असे वातावरण निर्माण करा की, कुटुंबातील सदस्य अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडणार नाहीत.

पंतप्रधान म्हणाले, आजच्या परिस्थितीत, आपल्याला देशाला टाळेबंदीपासून वाचवले पाहिजे. राज्य सरकारांनीसुद्धा टाळेबंदी शेवटचा पर्याय ठेवावा, असे त्यांनी सांगितले. सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करुन लॉकडाऊन टाळता आले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

* * *

S.Thakur/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com