Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि स्वीडन यांच्यातील आभासी शिखर परिषदेत पंतप्रधानांचे सुरुवातीचे भाषण

भारत आणि स्वीडन यांच्यातील आभासी शिखर परिषदेत पंतप्रधानांचे सुरुवातीचे भाषण


नमस्कार महोदय!

सर्वात प्रथम, स्वीडनमध्ये कोविड-19 संसर्गामुळे जीव गमावलेल्या व्यक्तींबाबत माझ्याकडून तसेच सर्व भारतीयांकडून हृदयाच्या तळापासून शोक संवेदना व्यक्त करतो. स्वीडन येथे परवा झालेल्या हिंसक हल्ल्याबाबत मी सर्व भारतीय नागरिकांकडून स्वीडनच्या लोकांप्रती सहभावना व्यक्त करतो. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्ती लवकर बऱ्या होवोत अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करतो.

महोदय,

सन 2018 मध्ये स्वीडनने पहिल्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेचे आयोजन केले. त्या वेळेस, मला स्टॉकहोमला येण्याची संधी प्राप्त झाली. दुसऱ्या भारत- नॉर्डिक शिखर परिषदेदरम्यान आपली पुन्हा भेट घेण्याची संधी मिळेल अशी आशा मी व्यक्त करतो. स्वीडनचे राजे आणि महाराणी यांनी 2019 मध्ये भारताला भेट दिली हे आम्ही आमचे मोठे भाग्य समजतो. अनेक विषयांवर माझी त्यांच्याशी अत्यंत उत्तम चर्चा झाली. मला हे स्पष्टपणे आठवते की आम्ही त्यावेळी पीक काढणीनंतर उरलेले खुंट वापरून उर्जा प्रकल्पांसाठी वापरता येणाऱ्या लहान विटा तयार करण्याबाबत सहकार्याच्या शक्यतेचा  आढावा घेतला होता. या कामाचा प्रायोगिक प्रकल्प उत्तम काम करीत आहे हे जाणून तुम्हांला आनंद होईल. आता आम्ही हा प्रकल्प बायोमास पासून कोळसा तयार करण्यासाठी वापरू शकतो आणि हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर वाढवू शकतो.

महोदय,

कोविड-19 च्या काळादरम्यान आपण प्रादेशिक आणि जागतिक अशा दोन्ही पातळ्यांवरील सहकार्याचे महत्त्व जाणले आहे. कोवीड-19 महामारीशी लढा देण्याच्या जागतिक प्रयत्नांना पाठींबा देण्यासाठी भारताने 150 पेक्षा जास्त देशांना औषधे तसेच इतर अत्यावश्यक साधनांचा पुरवठा केला. आशिया, आग्नेय आशिया आणि आफ्रिकेतील आघाडीवरचे आरोग्य कर्मचारी आणि धोरणकर्ते यांना ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आम्ही आमचे अनुभव देखील सांगितले. आतापर्यंत जगातील सुमारे 50 देशांना आम्ही ‘भारतात तयार झालेल्या’ कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली आहे. येत्या काही दिवसांत आम्ही आणखी काही देशांना लस पुरविण्यासाठी कटीबद्ध आहोत.

महोदय,

आजच्या वातावरणात, सर्व समविचारी देशांनी समन्वय, सहकार्य आणि सहभागाद्वारे एकत्र काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकशाही, मानवी हक्क, कायद्याचे राज्य, समता, स्वातंत्र्य तसेच न्याय यासारखी सामायिक मूल्ये आपल्यातील नातेसंबंध आणि परस्पर सहकार्य यांना मजबूत करतात. हवामान बदल हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्या दोन्ही देशांसाठी प्राधान्याचा विषय आहे आणि तुमच्यासोबत या समस्येवर काम करायला आम्हांला आवडेल. भारतीय संस्कृतीने पर्यावरणाचे जतन आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगणे यांना नेहमीच महत्त्व दिले आहे.

पॅरीस करारातील वचनांच्या मार्गाने आपण निश्चयाने मार्गक्रमण करीत आहोत. आपण ती उद्दिष्ट्ये नक्कीच साध्य करू, इतकेच नव्हे तर त्याही पुढे जाऊन काम करू. जी-20 देशांचा विचार करता, त्यापैकी कदाचित भारताने वचनांची पूर्तता करण्याच्या दिशेने चांगली प्रगती केली आहे. गेल्या 5 वर्षांच्या काळात, आमची पुनर्नवीकरणीय उर्जा क्षमता 162% ने वाढली आहे. सन 2030 पर्यंत 450 गिगावॅट पुनर्नवीकरणीय उर्जेचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. एलईडी दिव्यांच्या वापराला प्रोत्साहन देऊन, आम्ही 3 कोटी टन कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जित होण्यापासून रोखत आहोत. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी व्हायच्या स्वीडनच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आपत्ती विरोधक पायाभूत सुविधाविषयक युतीमध्ये लवकरच सहभागी होण्याचे आमंत्रण देखील आम्ही देत आहोत.

महोदय,

कोविड-पश्चात काळातील स्थैर्यासाठी आणि पूर्वस्थितीला येण्यासाठी भारत-स्वीडन भागीदारी अत्यंत महत्वाची भूमिका निभावू शकेल. अभिनव संशोधन, तंत्रज्ञान,गुंतवणूक, स्टार्ट-अप्स आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये आपण आपले सहकार्य आणखी वाढवू शकतो. स्मार्ट शहरे, जल प्रक्रिया, कचरा व्यवस्थापन, चक्रीय अर्थव्यवस्था, स्मार्ट ग्रीडस, ई-प्रवास आणि डिजिटल परिवर्तन यांच्यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यास मोठा वाव आहे. आपल्या आजच्या शिखर परिषदेमुळे  आपल्या सहकार्याला आणखी नवे आयाम मिळतील असा विश्वास मला वाटतो.

महोदय,

मी पुन्हा एकदा स्वीडनच्या नागरिकांप्रती भारताच्या उत्तम मैत्रीच्या प्रवासाची आठवण करून देतो आणि तुम्हांला तुमचे विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो.