Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रिलायन्स फाऊंडेशन यूथ स्पोर्ट्स च्या उदघाटन प्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी केलेले भाषण

रिलायन्स फाऊंडेशन यूथ स्पोर्ट्स च्या उदघाटन प्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

                                                                 पंतप्रधानांनी केलेले भाषण


तुम्हा सर्वाना माझ्या खूप शुभेच्छा . खेळ हा सामान्य व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य घटक असायला हवा आणि जर आपण खेळाला आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवले नाही तर जीवन विकसित होणार नाही . काही लोकांच्या डोक्यात पक्के बसले आहे की , शारीरिक आरोग्यासाठी खेळ आवश्यक आहे . हा खूपच संकुचित विचार आहे . व्यक्तिमत्वाच्या संपूर्ण विकासासाठी , सर्वांगीण विकासासाठी खेळ हा जीवनाचा भाग असणे अनिवार्य आहे . खेळामुळे समाज -जीवन देखील विकसित होते आणि राष्ट्र-जीवन देखील विकसित होते .

भारतासारख्या देशात जिथे सुमारे १०० भाषा आहेत , १७०० बोली आहेत , वेगवेगळ्या पद्धतीची वेशभूषा आहे, विभिन्न प्रकारचे खाणे-पिणे आहे. आपल्या देशात एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जिल्हा पातळीवरचे संघ जर सतत खेळत राहिले , १२ महिने खेळत राहिले तर खेळच नाही हा एक राष्ट्रीय एकात्मतेचा सर्वात मोठा आधार बनू शकेल . आणि म्हणूनच भारतात खेळ व्यक्तिमत्व विकासाबरोबरच ,समाजामध्ये एक वंगण म्हणून काम करते . कारण खेळ म्हटलं की, खिलाडूवृत्ती येते आणि जेव्हा खिलाडूवृत्ती असते तेव्हा एक प्रकारे कौटुंबिक जीवनात , सामाजिक जीवनात , राष्ट्र जीवनात ती वंगणाचे काम करते , मोकळेपणा आणते , दुसऱ्यांना स्वीकारण्याचे सामर्थ्य देते. खेळामध्ये जिंकण्याचा जेवढा आनंद होतो, त्यापेक्षा जास्त पराभव पचवण्याची एक खूप मोठी ताकद खेळामुळे मिळते. जी व्यक्ती आयुष्यात खेळत राहते, कधी पाय घसरतो तर कधी उठून उभी राहते , ती कधीही आयुष्यात अन्य प्रसंगी हार मानत नाही . खेळ जीवनात अशा गुणांचा विकास करतो , ज्यामुळे आयुष्यभर लढण्याचे सामर्थ्य मिळते. खेळाडू कधी हार मानत नाही. जो खेळाडू केवळ शारीरिक खेळ खेळतो ,त्याच्याबद्दल मी बोलत नाहीये. जो शरीराने आणि मनाने खेळाशी जोडलेला असतो , तो हे मिळवू शकतो. आणि म्हणूनच खेळाचे आपल्या जीवनात, राष्ट्राच्या जीवनात महत्व असायला हवे.

तुम्ही सर्वजण आज फुटबॉल खेळायला सुरुवात करत आहात सामने खेळत आहात यासाठी मी रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशनचे अभिनंदन करतो , कारण त्यांनी देशाच्या तरुण पिढीबरोबर एकत्र येऊन खेळाला महत्व देण्याचा प्रयत्न केला आहे . गुणवत्ता शोधणे हे खूप मोठे काम असते आणि जोपर्यंत व्यापक स्तरावर आपल्या बालमित्रांना संधी मिळत नाही , गुणवत्तेचा शोध लागत नाही आणि आज खेळाबरोबर प्रसिद्धी देखील मिळते आणि त्यामुळे कधी-कधी कुटुंबातील लोक देखील मुलांना खेळाडू बनवू इच्छितात. मात्र पहाटे ४ वाजता मेहनत करण्याचा मुद्दा येतो तेव्हा थोडे मागे राहतात . जरी प्रसिद्धी मिळाली , भले त्यात सेलिब्रिटींचा दर्जा मिळाला तरी खेळ कठोर परिश्रमाशिवाय पुढे वाढू शकत नाही.

मला खात्री आहे की , रिलायन्स फाउंडेशनद्वारे नियमितपणे खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी तळागाळातील स्तरावर अनेक वेगवेगळ्या स्पर्धा खेळवल्या जातील . आणि या स्पर्धांमधून गुणवत्ता समोर येईल आणि जेवढी स्पर्धेतून गुणवत्ता समोर येईल , तेवढा अधिक लाभ होईल . माझ्या रिलायन्स फाउंडेशनला , नीता ताईंना खूप -खूप शुभेच्छा. आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना , तुम्हा बालमित्रांना . खेळाच्या जीवनात पराभवाला नेहमी संधी माना , पराभवामुळे कधी खचून जाऊ नका. पराभव शिकवतो , खूप काही शिकवतो आणि जो खेळत नाही तो जिंकतही नाही आणि पराभूत देखील होत नाही . जिंकतोही तोच आणि हरतोही तोच जो खेळतो , आणि फुलतोही तोच जो खेळतो.

जो खेळेल तो फुलेल . जर तुम्ही खेळलाच नाहीत तर फुलू देखील शकणार नाही. आणि म्हणूनच व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे, स्वतःला फुलताना पाहायचे आहे . जसे कमळाचे फूल फुलते , जसे एक रोप फुलते , तसेच आयुष्य देखील फुलते आणि खेळ हा फुलण्याचे एक सर्वात मोठे औषध आहे , सर्वात मोठी संधी आहे , सर्वात मोठे आव्हान देखील आहे . आणि म्हणूनच आज मी तुम्हा सर्व बालमित्रांच्या माध्यमातून क्रीडा जगताशी जोडलेल्या सर्वाना शुभेच्छा देतो . ‘स्पोर्ट्स’ शब्द , या एका शब्दामुळे आपण क्रीडा जगताची दिशा काय असावी, क्रीडा जगताचा दृष्टिकोन कसा असायला हवा याची व्यवस्थित व्याख्या करू शकतो . जेव्हा आपण स्पोर्ट्स म्हणतो : एस म्हणजे स्किल (कौशल्य), पी म्हणजे पेरसीवरन्स (चिकाटी ), ओ म्हणजे ऑप्टिमिझम (आशावादी), आर म्हणजे रेसिलिअन्स (लवचिकपणा), टी म्हणजे टेनॅसिटी (पकड ), एस म्हणजे स्टॅमिना (क्षमता), या सर्व गोष्टींसह आपण आपली रचना केली तर आपल्याला खूप यश मिळेल आणि आज या प्रसंगी मी तुम्हा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा देतो.