नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2021
भगवान महादेवाचे अवतार असलेल्या गोरक्षनाथाच्या भूमीला सर्वात प्रथम वंदन करतो. देवरहा बाबांच्या आशीर्वादामुळे या भागाचा खूप चांगला विकास होत आहे. देवरहा बाबांच्या या भूमीवर आपण चौरी-चौराच्या महान लोकांचे स्वागत करून तुम्हा सर्वांना नमस्कार करतो.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल जी, यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री, कार्यक्रमाला उपस्थित असलेले खासदार, आमदार आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, चौरी-चौराच्या पवित्र भूमीवर देशासाठी बलिदान देणा-या, देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाला एक नवीन दिशा देणा-या, वीर हुतात्म्यांच्या चरणांना मी मस्तक लवून वंदन करतो. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हुतात्मा झालेल्यांचे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईकही उपस्थित आहेत. अनेक स्वांतत्र्य सैनिकांच्या परिवारांचे सदस्य आज ऑनलाइनही जोडले गेले आहेत. तुम्हा सर्वांचेही मी अभिनंदन करतो, सर्वांविषयी आदर व्यक्त करतो.
मित्रांनो,
शंभर वर्षांपूर्वी चौरी-चौरामध्ये जे काही झाले होते, ती फक्त आगीची घटना होती किंवा एक ठाण्याला आग लावून देण्याची घटना नव्हती. चौरी-चौराच्या घटनेने खूप मोठा संदेश दिला होता. तो संदेश अतिशय व्यापक होता. अनेक कारणांमुळे यापूर्वी ही ज्यावेळी चौरी-चौराविषयी चर्चा केली गेली, त्यामध्ये एक किरकोळ आगीची घटना असा संदर्भ दिला गेल्याचे पाहिले आहे. मात्र आग कोणत्या परिस्थितीमध्ये लागली, त्या आगीमागचे कारण काय होते, हे पाहणेही तितकेच महत्वपूर्ण आहे. ही आग काही ठाण्याला लागली नव्हती तर ती आग, जन-जनाच्या मनामध्ये प्रज्वलित झाली होती. चौरी-चौराच्या ऐतिहासिक संग्रामाला आज देशाच्या इतिहासामध्ये जे स्थान आहे, त्याच्याशी जोडले गेलेले प्रत्येक कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. आज चौरी-चौरा शताब्दी वर्षानिमित्त एक टपाल तिकीटही काढण्यात येत आहे, त्याबद्दल मी योगी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा आणि धन्यवाद देतो.
आज सुरू होत असलेल्या चौरी-चौरा घटनेच्या शताब्दी वर्षामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. या काळामध्ये चौरी-चौराबरोबरच प्रत्येक गाव, प्रत्येक क्षेत्रातल्या बलिदान देणा-या वीरांचेही स्मरण करण्यात येईल. यावर्षात ज्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करीत आहे, त्यावेळी अशा प्रकारचे कार्यक्रम होणे अधिक प्रासंगिक, औचित्यूपर्ण ठरतात.
मित्रांनो,
चौरी-चौरा, देशातल्या सामान्य माणसांनी केलेला एक उत्स्फूर्त संग्राम होता. चौरी-चौरामध्ये ज्यांना हौतात्म्य पत्करावे लागले, त्या हुतात्म्यांविषयी अधिक चर्चा होऊ शकली नाही, हे दुर्भाग्य आहे.
या संग्रामातल्या हुतात्म्यांना, क्रांतिकारींना इतिहासातल्या पानांमध्ये भलेही प्रमुख स्थान दिले गेले नसेल, मात्र स्वातंत्र्यासाठी त्यांचे रक्त या भूमीच्या मातीमध्ये नक्कीच मिसळले गेले आहे. ही गोष्ट आपल्याला सदोदित प्रेरणा देत आहे. वेगवेगळी गावे, वेगवेगळ्या वयोगटातील युवक आणि वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीतून आलेले सर्वजण असतानाही एकजूट होऊन कार्य करणारे सगळे भारत मातेचे पुत्र होते. एका घटनेसाठी 19 स्वातंत्र्य सैनिकांना फासांवर लटकविण्यात आले, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये कदाचित अशा घटना खूप कमी घडल्या असतील.
मात्र बाबा राघवदास आणि माननीय मालवीय जी यांच्या प्रयत्नांमुळे जवळजवळ 150 लोकांना फाशीच्या शिक्षेपासून वाचविण्यात आले होते.
म्हणूनच आजच्या दिवशी विशेष रूपाने बाबा राघवदास आणि माननीय मदन मोहन मालवीय जी यांनाही वंदन केले पाहिजे, आज त्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे.
मित्रांनो,
या संपूर्ण अभियानामध्ये आमचे विद्यार्थी, युवकांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धांच्या माध्यमातून जोडले जात आहेत, याचा मला विशेष आनंद होत आहे.
आमचे युवक ज्यावेळी इतिहासातल्या घटनांचा अभ्यास करतील, त्यावेळी त्यांना अनेक पैलूंची माहिती होईल. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयानेही स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल स्वातंत्र्य सेनानींविषयी ग्रंथलेखन करणे, त्या काळातल्या घटनांविषयी लेखन करणे, शोधनिबंध लिहिणे, यासाठी आमंत्रित केले आहे. चौरी-चौरा संग्रामातल्या अशा किती वीर सेनानींचे जीवनकार्य आपण देशासमोर आणू शकणार आहोत . चौरी-चौरा संग्राम शताब्दीच्या या कार्यक्रमामध्ये स्थानिक कला संस्कृती आणि आत्मनिर्भरता यांनाही जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रयत्न म्हणजे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना जणू आपण वाहिलेली श्रद्धांजली ठरणार आहे. या आयोजनासाठी मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश सरकारचेही कौतुक करतो.
मित्रांनो,
सामूहिकतेच्या ज्या शक्तीने गुलामगिरीच्या बेड्या तोडून टाकल्या होत्या, तीच शक्ती भारताला जगात सर्वात शक्तिशाली देश बनविणार आहे. सामूहिकतेची ही शक्तीच, आत्मनिर्भर भारत अभियानाचा मूलभूत आधार आहे. आपण 130 कोटी देशवासियांसाठी आपल्या देशाला आत्मनिर्भर बनवित आहोत आणि संपूर्ण वैश्विक परिवारासाठीही हे करण्याची गरज आहे.
या कोरोना काळामध्ये ज्यावेळी भारताने 150 पेक्षा जास्त देशांमधल्या नागरिकांना मदत म्हणून आवश्यक औषधांचा पुरवठा केला, ज्यावेळी भारताने जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या आपल्या 50 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना मायदेशी आणण्याचे काम केले, ज्यावेळी भारताने अनेक देशांच्या हजारों नागरिकांना त्यांच्या त्यांच्या देशात सुरक्षित पोहोचवले आणि आता ज्यावेळी भारत स्वतःच कोरोना लस निर्माण करीत आहे, दुनियेतल्या मोठ-मोठ्या देशांपेक्षाही अतिशय वेगाने भारतामध्ये लसीकरण होत आहे, हे किती मोठे काम केले, याची तुम्ही कल्पना करावी. ज्यावेळी भारत मानवी जीवनाचे रक्षण करण्याचे महत्व लक्षात घेऊन जगभरामध्ये लस देत आहे, या सगळ्या गोष्टी पाहून जिथे कुठे आपले स्वातंत्र्य सेनानी असतील, जिथे त्यांचा आत्मा असेल, त्यांना नक्कीच आपल्या देशाविषयी गर्व, अभिमान वाटत असेल.
मित्रांनो,
या अभियानाला यशस्वी बनविण्यासाठी अभूतपूर्व प्रयत्नांचीही आवश्यकता असते.
या भगीरथ प्रयत्नांची तर एक झलक यावेळच्या अर्थसंकल्पामध्येही पहायला मिळते. कोरोनाकाळामध्ये देशासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली, त्यांच्यावर मात करण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना या अर्थसंकल्पामुळे नव्याने वेग मिळणार आहे.
मित्रांनो, अर्थसंकल्पाच्या आधी अनेक दिग्गज म्हणत होते की, देशाने इतक्या मोठ्या संकटाचा सामना केला आहे, त्यामुळे सरकारला कर वाढवावेच लागतील, देशाच्या सर्वसामान्य नागरिकांवर ओझे टाकावेच लागणार, नवनवीन कर लावावे लागतील. परंतु या अंदाज पत्रकामध्ये देशवासियांवर कोणत्याही प्रकारचे ओझे टाकण्यात आलेले नाही की वाढविण्यात आले नाही. उलटपक्षी देशाला वेगाने पुढे जाण्यासाठी सरकारने जास्तीत जास्त खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी देशामधल्या रस्ता रूंदीकरणासाठी खर्च होणार आहे. हा खर्च आपल्या गावांना शहरांमधल्या बाजारापर्यंत, मंडईपर्यंत जोडण्यासाठी खर्च होणार आहे. या खर्चातून पूल बनणार आहेत, रेल्वेचे रूळ टाकण्यात येणार आहेत, नवीन मार्गांवर रेल गाड्या सुरू करण्यात येणार आहेत, नवीन बसगाड्याही सुरू करण्यात येणार आहेत.
शिक्षण, अभ्यास, लेखन यांची खूप चांगली व्यवस्था असावी, आपल्या युवकांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठीही अंदाजपत्रकामध्ये अनेक निर्णय घेतले गेले आहेत.
आणि मित्रांनो, या सर्व कामांसाठी, काम करणा-या लोकांचीही आवश्यकता भासणार आहे.
ज्यावेळी सरकार, निर्माणावर जास्त खर्च करेल त्यावेळी देशातल्या लाखो नवयुवकांना रोजगारही मिळणार आहे. उत्पन्न कमविण्याचे नवीन मार्ग खुले होणार आहेत.
मित्रांनो,
आपल्या देशात अनेक दशकांपासून अर्थसंकल्पाचा अर्थ, कोणाच्या नावाने काय घोषणा करणार इतकाच होता. अर्थसंकल्पाला मतपेट्यांचा लेखाजोखा बनवले होते. तुम्ही विचार करा, तुम्ही देखील तुमच्या घरातील बजेट वर्तमान आणि भविष्यातील जबाबदारीचा विचार करूनच तयार करता ना. परंतु, आधीच्या सरकारने अर्थसंकल्पाला जाहिरनाम्यांचे एक माध्यमच बनवले होते, अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा सरकार कधीच पूर्ण करू शकले नाही. आता देशाने तो विचार बदलला आहे, दृष्टीकोन बदलला आहे.
मित्रांनो,
कोरोना काळात सरकारने या महामारी विरुद्धची लढाई ज्याप्रकारे लढली आहे त्याची आज संपूर्ण जगात प्रशंसा होत आहे. आमच्या लसीकरण मोहिमेतून देखील अनेक देश शिकत आहेत. लोकांना छोट्या-मोठ्या आजारावरील उपचारासाठी शहरात जायला लागू नये म्हणून प्रत्येक गावात, खेड्यात उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याचा आता देशाचा प्रयत्न आहे. एवढेच नाहीतर, शहरांमध्ये देखील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी कोणत्या अडचणी येऊ नये म्हणून मोठे निर्णय घेतले आहेत. तुम्हाला अगदी आतापर्यंत, जर एखादी मोठी चाचणी किंवा उपचार करायचे असतील तर तुमच्या गावापासून लांब गोरखपूरला जावे लागते किंवा कधीतरी तुम्हाला अगदी लखनऊ किंवा वाराणसीला देखील जावे लागते. यासर्व अडचणीतून तुमची सुटका करण्यासाठी आता सर्व जिल्ह्यांमध्ये आधुनिक चाचणी प्रयोगशाळा उभारली जाईल, जिल्ह्यातचा चाचणीची व्यवस्था होईल. म्हणूनच, देशाने अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी पूर्वीपेक्षा अधिक जास्त खर्चाची तरतूद केली आहे.
मित्रांनो,
आपल्या देशाच्या विकासाचा सर्वात मोठा आधार हा आपला शेतकरी आहे. चौरी-चौरा संग्रामात शेतकऱ्यांनी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, ते स्वावलंबी व्हावेत यासाठी मागील 6 वर्षात शेतकऱ्यांसाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. याचा परिणाम देशाने कोरोना काळात पाहिला आहे. संपूर्ण देशात साथीच्या रोगाचे आव्हान असताना देखील कृषी क्षेत्र मजबुतीने पुढे मार्गक्रमण करत होते आणि याकाळात शेतकऱ्यांनी अन्नधान्याचे विक्रमी उत्पन्न काढले. आमचा शेतकरी जा अजून सशक्त झाला तर कृषी क्षेत्राचा विकास अधिक जोमाने होईल. यासाठी या अर्थसंकल्पात अनेक पावले उचलली आहते. बाजारपेठा या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असाव्यात यासाठी आणखी 1000 बाजारपेठांना ई-नाम शी जोडले आहे. आता शेतकरी अधिक सुलभरीत्या आपला शेतमाल बाजारपेठेत विकू शकतो. तो आपला शेतमाल आता देशात कुठेही विकू शकतो.
यासोबतच, ग्रामीण क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा निधी वाढवून 40 हजार कोटी रुपये करण्यात आला आहे. याचा देखील थेट लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. या सर्व निर्णयांमुळे आपले शेतकरी स्वावलंबी होतील आणि शेती हा किफायतशीर व्यवसाय होईल. येथे उत्तप्रदेशात केंद्र सरकारने सुरु केलेली पंतप्रधान स्वामित्व योजना देखील देशातील गावांच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. या योजनेंतर्गत गावातील भूमी, गावातील घरांची कागदपत्रे गावातील लोकांना देण्यात येत आहेत. जेव्हा आपल्याकडे आपल्या जमिनींचे, आपल्या घरांची योग्य कागदपत्रे असतील तेव्हा त्याचे मूल्य तर वाढणारच आणि त्यामुळे अगदी सुलभपणे बँकांकडून कर्ज देखील उपलब्ध होईल. गावातील लोकांचे घर आणि जमिनीचा कोणीही गैरफायदा घेणार नाही. याचा सर्वाधिक फायदा गावातील छोटे शेतकरी आणि गरीब कुटुंबाना होईल.
मित्रांनो,
या साऱ्या प्रयत्नांमुळे देशाचा चेहरामोहरा कसा बदलत आहे याचे गोरखपूर हे खूप मोठे उदाहरण आहे. ही भूमी क्रांतीकारकांची आहे, हे क्षेत्र कितीतरी बलिदानांचे साक्षीदार आहे, परंतु आधी इथले चित्र कसे होते? इथले कारखाने बंद होत होते. रस्त्यांची दुर्दशा झाली होती, रुग्णालये तर स्वतःच आजारी होती. परंतु आता गोरखपूर खत कारखाना पुन्हा सुरु होत आहे. याचा शेतकऱ्यांना देखील फायदा होईल आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील. आज गोरखपूरमध्ये एम्सची स्थपना होत आहे, येथील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये हजारो मुलांचे प्राण वाचवत आहे. आताच योगीजींनी उल्लेख केलेल्या मस्तिष्कशोथ या आजारामुळे मागील अनेक दशकांपासून इथल्या मुलांचा मृत्यू झाला आहे. परंतु, योगीजींच्या नेतृत्वाखाली इथल्या लोकांनी जे काम केले आहे, त्यांची प्रशंसा आता जगातील मोठ्या-मोठ्या संस्था करत आहेत. आतातर, देवरिया, कुशीनगर, बस्ती, महारगंज आणि सिद्धार्थनगर येथे देखील नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जात आहेत.
मित्रांनो,
पूर्वी पूर्वांचल ही आणखी एक मोठी समस्या होती. तुम्हाला लक्षात असेल, पूर्वी जर एखाद्याला 50 किलोमीटरचा देखील प्रवास करायचा असेल तर त्या व्यक्तीला तीन ते चार तास आधी निघावे लागायचे. परंतु आज येथे चार पदरी आणि सहा पदरी रस्ते बनत आहेत. एवढेच नाहीतर गोरखपूरहून 8 शहरांसाठी विमान सेवा देखील सुरु झाली आहे. कुशीनगरमध्ये उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे येथे पर्यटन क्षेत्राला देखील चालना मिळेल.
मित्रांनो,
हा विकास, स्वावलंबनासाठी केलेला बदल हा आज प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाला देशाने वाहिलेली श्रद्धांजली आहे. आज आपण चौरी-चौरा शताब्दी वर्ष साजरे करत असताना, या परिवर्तनाला सामुहिक भागीदारीतून पुढे नेण्याचा संकल्प करूया. देशाची एकता ही आमच्यासाठी सर्वप्रथम आहे, देशाचा सन्मान आमच्यासाठी सर्वात मोठा आहे आज आपल्याला देखील हा संकल्प करायचा आहे. याच भावनेने आपल्याला प्रत्येक देशवासियाला सोबत घेऊन पुढे जायचे आहे. आपण जो हा प्रवास सुरु केला आहे, तो आपण नव भारताच्या निर्मितीसोबतच पूर्ण करू याचा मला विश्वास आहे.
हे शताब्दी वर्ष साजरे करताना एक गोष्ट वर्षभर विसरू नका की ते देशासाठी शहीद झाले होते. ते देशासाठी शहीद झाले म्हणूनच आज आपण हे स्वत्रांत्र्य उपभोगत आहोत, त्यांनी देशासाठी बलिदान दिले, आपल्या प्राणांची आहुती दिली, आपल्या स्वप्नांना तिलांजली दिली, आपल्याला इतके सगळे करण्याची वेळ येणार नाही परंतु देशासाठी जगण्याचा संकल्प नक्की करा. त्यांना देशासाठी बलिदान करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले होते, आपल्याला देशासाठी जगण्याचे सौभाग्य मिळाले आहे. हे शतक चौरी चौराच्या शहिदांच्या स्मरणार्थ देशासाठी संकल्प करण्याचे वर्ष असले पाहिजे. आपल्या स्वप्नांना साकार करण्याचे वर्ष बनले पाहिजे. लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे वर्ष झाले पाहिजे. तरच हौतात्म्याची ही 100 वर्षे आपल्याला नव्या उंचीवर नेण्याची संधी प्रदान करतील आणि त्यांचे हौतात्म्य आपल्याला प्रेरणा देईल.
याच भावनेसह मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो.
* * *
Jaydevi PS/S.Bedekar/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
Centenary celebrations of Chauri Chaura incident. https://t.co/X9yixxmrIX
— Narendra Modi (@narendramodi) February 4, 2021
यह दुर्भाग्य है कि चौरी चौरा के शहीदों की जितनी चर्चा होनी चाहिए थी, उतनी नहीं हो पाई।
— Narendra Modi (@narendramodi) February 4, 2021
इस संग्राम के शहीदों को, क्रांतिकारियों को इतिहास के पन्नों में भले ही प्रमुखता से जगह न दी गई हो, लेकिन आजादी के लिए उनका खून देश की माटी में जरूर मिला हुआ है, जो हमेशा प्रेरणा देता रहता है। pic.twitter.com/UKA5urPlZp
सामूहिकता की जिस शक्ति ने गुलामी की बेड़ियों को तोड़ा था, वही शक्ति भारत को दुनिया की बड़ी ताकत भी बनाएगी।
— Narendra Modi (@narendramodi) February 4, 2021
सामूहिकता की यही शक्ति, आत्मनिर्भर भारत अभियान का मूलभूत आधार है। pic.twitter.com/JUnurd6L2M
पहले की सरकारों ने बजट को ऐसी घोषणाओं का माध्यम बना दिया था, जिन्हें वे पूरी ही नहीं कर पाती थीं। अब देश ने वह सोच बदल दी है, अप्रोच बदल दी है। pic.twitter.com/yNhN6blRLc
— Narendra Modi (@narendramodi) February 4, 2021
हमारा किसान अगर और सशक्त होगा, तो कृषि क्षेत्र में प्रगति और तेज होगी। इसके लिए इस बजट में कई कदम उठाए गए हैं।
— Narendra Modi (@narendramodi) February 4, 2021
मंडियां किसानों के फायदे का बाजार बनें, इसके लिए एक हजार और मंडियों को e-NAM से जोड़ा जाएगा।
यानि, किसान अपनी फसल कहीं भी बेच सकेगा। pic.twitter.com/mVOyioXfeg
आज जब हम चौरी चौरा शताब्दी वर्ष मना रहे हैं, तो हमें यह संकल्प लेना है कि देश की एकता हमारे लिए सबसे पहले है, देश का सम्मान हमारे लिए सबसे बड़ा है।
— Narendra Modi (@narendramodi) February 4, 2021
इसी भावना के साथ हमें हर देशवासी को साथ लेकर आगे बढ़ना है। pic.twitter.com/tZk8k5zhqd