Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रिटोरिया येथे भारत-दक्षिण आफ्रिका व्यापार बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण

प्रिटोरिया येथे भारत-दक्षिण आफ्रिका व्यापार बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण

प्रिटोरिया येथे भारत-दक्षिण आफ्रिका व्यापार बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण


दक्षिण आफ्रिकेचे महामहीम राष्ट्रपती जॅकोब झुमा,

माननीय आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्य मंत्री,

माननीय व्यापार आणि उद्योग मंत्री,

दक्षिण आफ्रिका आणि भारतीय उद्योगांचे प्रमुख,

स्त्री आणि पुरुषगण,

आज तुमच्यासमवेत मला खूप आनंद होत आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संबंध हे इतिहासाच्या मजबूत पायावर स्थापन झालेले आहेत.

नियतीने आपल्याला एकत्र आणले आहे.

स्वप्नांच्या साथीने आपण एकत्रितपणे वाटचाल करत आहोत. आपल्या इतिहासात अनेक समान अध्याय आहेत. लढा आणि त्यागाच्या साथीने आपण इतिहासाची दिशा बदलली. सुदैवाने, या प्रक्रियेमध्ये आपल्याला महान नेत्यांचे मार्गदर्शन लाभले जे लोकांनी पाहिले.

मित्रांनो,

नेल्सन मंडेला आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या आपल्या नेत्यांनी आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळवून दिले.

आता, वेळ आहे आर्थिक स्वातंत्र्यासाठी काम करण्याची.

अशा प्रकारे, आपले संबंध आपल्या जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या आपल्या समान इच्छेवर आधारित आहेत.

प्रतिकूल परिस्थितीत आपण मित्र होतो.

आता आपण एकमेकांना संधी पुरवूया.

आपल्या महान नेत्यांच्या आशीर्वादासह, दोन्ही देश विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहेत.

ब्रिक्स अर्थव्यवस्थांमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत हे दोन्ही देश महत्त्वाचे घटक आहेत.

आपल्या देशातील जनता आणि हे संपूर्ण जग आपल्याकडे मोठ्या अपेक्षांसह पाहत आहेत. v
या दोन्हीकडील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र येऊ शकतो. शक्य त्या सर्व आघाड्यांवर आपली अतिशय सक्रिय आणि फलदायी चर्चा झाली आहे. v
आज इथे उपस्थित जनसमुदाय याच प्रक्रियेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
मित्रांनो,

मी हे कबूल करतो की, या महान देशाचा दौरा करण्यास मी थोडा विलंब केला.
मात्र, राष्ट्रपती झुमा आणि मी गेल्या दोन वर्षांत अनेकदा भेटलो आहोत. दक्षिण आफ्रिका हा भारताचा प्रमुख व्यापार आणि गुंतवणूक भागीदार आहे.

गेल्या दहा वर्षांत, द्विपक्षीय व्यापार जवळपास 380 टक्के वाढला आहे.

यापुढेही मोठी गुंतवणूक होतच राहील.

दोन्ही दिशेने गुंतवणुकीचा निरंतर प्रवाह सुरू आहे.

150 हून अधिक भारतीय कंपन्या दक्षिण आफ्रिकेत कार्यरत आहेत. तसेच, दक्षिण आफ्रिकेच्या अनेक कंपन्या भारतामध्ये उत्तम कामगिरी करत आहेत.

मात्र, भरपूर वाव आहे.

दिवसेंदिवस क्षमता वाढत आहेत.

ते यामुळे कारण दोन्ही देश त्यांचा आर्थिक पाया मजबूत करत आहेत. म्हणूनच आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी आपल्या व्यापारात वैविध्य आणायला हवे.

आपली वैविध्यपूर्ण सक्रिय भागीदारी साक्ष देते की, हे होऊ शकते.

मित्रांनो,

भारतीय कंपन्यांसाठी, या खंडात दक्षिण आफ्रिका हे घर आहे. अनेक प्रमुख भारतीय कंपन्यांनी इथे पाय रोवले आहेत. अनेक प्रकारच्या उपक्रमांमध्ये त्या सहभागी आहेत. अनेक भारतीय मुख्य कार्यकारी अधिकारी आज इथे आपल्याबरोबर उपस्थित आहेत.

माझा त्यांना सल्ला आहे की, त्यांच्या उद्योगांमुळे या महान देशाच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनास हातभार लागेल याकडे त्यांनी लक्ष द्यावे. भारतासाठी मी तीन ‘पी’ चा पुरस्कार करत आहे. (पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर आणि पीपल्स पार्टनरशिप)
मी पर्सनल सेक्टर यावर देखील भर देत आहे.

ते इथेही लागू होते.

कौशल्य विकास आणि समाज सक्षमीकरण हे तुमच्‍या व्यापार योजनांच्या केंद्रस्थानी असायला हवे.

उबुंटू ही आफ्रिकन मानवतेची भावना तुमच्या व्यापाराच्या नीतिमूल्यात प्रतिबिंबित व्हायला हवी.

“सर्वे भवन्तु सुखिन:” या आपल्या तत्वज्ञानाशी याचे साधर्म्य आहे. महात्मा गांधी यांना हेच अभिप्रेत होते.

आपण नेहमीच संगोपन आणि संवर्धन यामध्ये विश्वास ठेवला आहे, शोषणामध्ये नाही.

उत्साहवर्धक बाब म्हणजे, आपले व्यापारी संबंध एकमार्गी नाहीत. दक्षिण आफ्रिकन कंपन्या देखील भारतात सक्रिय आहेत. त्यापैकी अनेकांनी आपले अस्तित्व सिध्द केले आहे. तुमच्या ज्ञानातून आम्हाला शिकायला मिळाले तसेच तुमच्या अभिनव उत्पादनांमधून आम्हाला लाभ झाला.

दक्षिण आफ्रिकेच्या व्यापारातील सर्वोत्कृष्टता आणि भारतीय क्षमता उभय देशांमधील वृध्दी आणि विकासासाठी एकमेकांना पूरक असायला हव्यात.

मित्रांनो,

गेल्या दोन वर्षात, अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आम्ही सर्व आघाड्यांवर खूप परिश्रम घेतले.

आम्हाला आमच्या प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाचे उत्साहवर्धक परिणाम दिसून आले.

आज, भारत जागतिक अर्थव्यवस्थेतील तळपता तारा आहे. आमच्याकडे जागतिक वृध्दीचे इंजिन म्हणून पाहिले जाते. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.

जागतिक मंदीच्या काळात, आम्ही स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 7.6 टक्के वाढ नोंदवली.

जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि अन्य संस्थांनी, आगामी काळात यापेक्षा चांगला विकासदराचा अंदाज वर्तवला आहे.

एवढेच नाही तर 2014-15 या वर्षात भारताने जागतिक विकासात 12.5 टक्के योगदान दिले आहे. भारताचे जागतिक विकासातील योगदान हे त्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेतील हिश्श्यापेक्षा 68 टक्के अधिक आहे.

या वर्षातील थेट परदेशी गुंतवणूक ही आतापर्यंतची सर्वोच्च आहे. ‘मूडीज’ या मानांकन संस्थेने म्हटले आहे की, 2016 मधील थेट परदेशी गुंतवणूक ही सर्वकालीन उच्चांक आहे. यातून आमच्या ‘मेक इन इंडिया’ हा भारताचा आजवरचा सर्वात मोठा ब्रॅण्ड बनला आहे.

देशात तसेच देशाबाहेर या उपक्रमाने जनतेच्या, संस्थांच्या उद्योगांच्या, व्यापारांच्या, माध्यमांच्या आणि राजकीय नेतृत्वाच्या कल्पकतेला गवसणी घातली.

“मेक इन इंडिया” उपक्रमाचा भाग म्हणून आम्ही व्यापार करण्यातील सुलभतेवर भर दिला आहे.

परवाना प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणि मंजुऱ्या, विवरणपत्रे आणि पाहणी संदर्भातील तरतुदींमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आम्ही निर्णायक पावले उचलली.

आणखी काही गोष्टींबाबत सांगायचे तर,

अनेक जागतिक एजन्सीज आणि संस्थांनी सातत्याने भारताला सर्वात आकर्षक गुंतवणूक केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.

व्यापार करण्यातील सुलभतेसाठी जागतिक बँकेने अलिकडेच प्रसिद्ध केलेल्या जागतिक मानांकनांमध्ये आम्ही 12 स्थानांनी झेप घेतली आहे.

भारताने गुंतवणूक आकर्षणातील आपले यूएनसीटीएडी मानांकन देखील सुधारले आहे.

आतापर्यंत 15 व्या स्थानावर होतो, आता नवव्या स्थानावर आहोत.

जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक स्पर्धात्मक सूचकांकामध्ये भारताने 16 स्थानांनी झेप घेतली आहे.

आमची धोरणे व पध्दतींच्या सकारात्मक परिणामांमुळे, आमचा आत्मविश्वास वाढला आहे.

व्यापार करण्याचे सुलभ ठिकाण बनण्यासाठी आमच्या प्रक्रिया अधिक सोप्या करण्यासाठी यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल.

सर्जनशील कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी अभिनव स्टार्ट-अप भारत कार्यक्रम देखील सुरू करण्यात आला आहे. या सगळ्याचा रोजगार बाजारपेठ विस्तारण्यावर आणि लोकांची क्रयशक्ती वाढण्यावर चांगला परिणाम झाला आहे. यामुळे भारत उत्तम राहणीमान आणि जीवनशैली असलेले स्थान बनेल. आपला विकास सर्वसमावेशक असेल आणि शहरी व ग्रामीण समुदायाला सामावून घेतले जाईल याकडे आम्ही लक्ष दिले आहे. प्रमुख क्षेत्रे आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये नवीन पिढीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आम्ही जोमाने पावले उचलत आहोत.

मित्रांनो,

आपल्या दोन्ही देशांची सामाजिक-आर्थिक आव्हाने थोड्याफार प्रमाणात समान आहेत.

माझा सल्ला आहे की, विकासाच्या चाकांचा नव्याने शोध लावू नये. आपल्या दोन्ही देशांचे भौगोलिक स्थान एकमेकांना पूरक आहे.

उदा. निसर्गाची आपणा दोघांवर कृपा आहे.

आपल्याकडे अमाप नैसर्गिक संपत्ती आहे.

गरज आहे ती त्यांचा योग्य मेळ घालून सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी निरंतर त्यांचा वापर करण्याची.

यासंदर्भात आपण परस्परांकडून खूप काही शिकू शकतो. विशेषत: तुमच्या जागतिक दर्जाच्या खाण कंपन्यांबरोबर आम्हाला काम करायचे आहे. त्यापैकी काही याआधीच भारतात सक्रिय आहेत. परंतु यामध्ये आम्हाला धोरणात्मक सहभाग हवा आहे. या क्षेत्रातील आमचे हित एकपक्षी नाही. दुसरे, आपणा दोघांसमोर हवामान बदल आणि जलद विकासाच्या गरजेची आव्हाने आहेत. आपण दोघेही प्रगतीच्या स्वच्छ आणि हरित मार्गाप्रती कटिबध्द आहोत.

त्याचबरोबर, आपल्याला ऊर्जा संसाधनांची गरज आहे. काही देशांच्या मदतीने आम्ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन केली आहे.

मला आशा आहे की, आपण या मंचाचा लाभ घेऊ आणि समृध्द होऊ.

आपल्या दोन्ही देशांना परस्परविरोधी हवामानाची वैशिष्ट्यपूर्ण देणगी आहे.
जेव्हा भारतात उन्हाळा किंवा आंब्याचा हंगाम असतो, तेव्हा इथे हिवाळा असतो.

परस्परांची फळे, भाज्या आणि अन्य नाशवंत वस्तूंचे विपणन करण्यासाठी या भौगोलिक लाभाचा आपण वापर करू शकतो. तुमच्या अन्न प्रक्रिया उद्योगासाठी प्रचंड स्थानिक बाजारपेठ असलेल्या भारतात विपूल संधी आहेत.

या क्षेत्रातील आपल्या सहकार्यामुळे आमच्‍या गावांना आणि आमच्या शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळेल.

आम्ही भारतामध्ये पायाभूत विकासाच्या महत्त्वपूर्ण योजनांवर काम करत आहोत.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रलंबित असलेले हे कार्य आता वेगाने पूर्ण करायचे आहे.

ही दरी भरून काढण्यासाठी आपण एकत्रितपणे खूप काही करू शकतो.

भारत तुम्हाला तंत्रज्ञान व कौशल्य यामध्ये मदत करू शकतो.

या क्षेत्रांमध्ये याआधीच प्रयत्न सुरू आहेत.

नवी दिल्ली येथे गेल्या वर्षी झालेल्या भारत-आफ्रिका मंचाच्या शिखर परिषदेत आम्ही भारतात पुढल्या पाच वर्षांमध्ये 50 हजार आफ्रिकन लोकांना शिक्षित आणि प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला.

ही काही थोडी उदाहरणे आहेत.

आपण अनेक क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम करू शकतो.

संरक्षणापासून दुग्धव्यवसायापर्यंत

हार्डवेअरपासून सॉफ्टवेअरपर्यंत

औषधांपासून ते वैद्यकीय पर्यटनापर्यंत

कौशल्यापासून विज्ञान आणि तंत्रज्ञानापर्यंत

आपल्याकडे संधी आहेत.

भारत आज सर्वात खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.

आम्ही बहुतांश क्षेत्रांमध्ये आणि शक्य त्या सर्व मार्गाने थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा शिथिल केली आहे.

मित्रांनो,

शेवटी मी इतकेच म्हणेन की ,आम्ही आपल्या भागीदारीमध्ये संस्थात्मक वाढ केली आहे.

आपल्या ब्रिक्स व्यापार बैठका आणि सीईओ फोरममुळे आपल्या भागीदारीचा विस्तार होण्यास आणि समृध्द होण्यास मदत झाली आहे.

आज आपल्या भारत-दक्षिण आफ्रिका सीईओ मंचाची बैठक यशस्वीपणे पार पडली.

तुमच्या शिफारशींचा आम्ही आदर करतो आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी उत्सुक आहोत.

नियमितपणे प्रवास करणाऱ्या उद्योजकांसाठी 10 वर्षांचा ब्रिक्स व्हिसा उपलबध करून दिल्याबद्दल आम्ही दक्षिण आफ्रिका सरकारचे आभार मानतो.

या निर्णयामुळे भारतीय उद्योग प्रफुल्लित झाला आहे.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आम्ही दक्षिण आफ्रिकेसाठी ई-व्हिसा कार्यक्रम सुरू केला.

अल्प काळासाठी प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी आणि प्रवास करणाऱ्या उद्योजकांसाठी हा व्हिसा वैध आहे.

तुम्हाला आता घरबसल्या तुमच्या ई-मेलवर भारताचा व्हिसा मिळेल आणि तो देखील मोफत.

मित्रांनो,

चला, पुन्हा एकदा हात हातात घेऊया.

पुन्हा एकदा आपण कटिबध्द होऊया.

गरीबीच्या शत्रूचा सामना करण्यासाठी हे आवश्यक आहे.

बहुधा हे अधिक आव्हानात्मक आहे.

परंतु आपल्याला यशस्वी व्हायचे आहे.

आणि हीच आपली आपल्या महान नेत्यांना खरी मानवंदना असेल.

धन्यवाद!

B.Gokhale/S.Kane