Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण


 

नमस्कार !

मी सर्वप्रथम , या तीन युवकांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने, सादरीकरण केले ज्यात  विचार देखील होते, वक्तृत्व कला देखील होती, धारा प्रवाह, विचार प्रवाह, अतिशय योग्य पद्धतीने मांडले होते. आत्‍मविश्‍वासाने ठासून भरलेले त्यांचे व्यक्तिमत्व होते. हे तीन साथीदार , आपले  युवा मित्र  विजेते ठरल्याबद्दल मी त्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. लोकसभेचे सभापती ओम बिरला , शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक , क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री किरण रिजिजू  आणि देशभरातील माझे युवा मित्र, तुम्हा सर्वाना राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा .

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा हा दिवस आपणा सर्वांना नवी  प्रेरणा देतो. आजचा दिवस यासाठी देखील  विशेष आहे , कारण यावेळी युवा संसद, देशाच्या संसदेतील मध्यवर्ती सभागृहात होत आहे. हा सेंट्रल  हॉल आपल्या संविधान निर्मितीचा साक्षीदार आहे. देशातील अनेक महान व्यक्तींनी इथे स्वतंत्र भारतासाठी निर्णय घेतले, भारताच्या भविष्यासाठी चिंतन केले. भविष्यातील भारताबाबत त्यांचे स्वप्न, त्यांचे समर्पण, त्यांचे  साहस, त्यांचे सामर्थ्‍य, त्यांचे प्रयत्न,याची जाणीव आजही या सेंट्रल हॉल मध्ये होते. आणि मित्रानो, तुम्ही जिथे बसला आहात, त्याच जागेवर जेव्हा संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू होती, या देशातील कुणी ना कुणी मान्यवर महापुरुष तिथे बसले असतील, आज तुम्ही त्या जागेवर बसला आहात . मनात  कल्‍पना करा की ज्या जागेवर देशाचे ते महापुरुष बसले होते आज तिथे तुम्ही बसला आहात. देशाला तुमच्याकडून किती अपेक्षा आहेत. मला विश्वास आहे, हा अनुभव यावेळी  सेंट्रल हॉलमध्ये बसलेल्या सर्व युवा मित्रांना देखील येत असेल.

तुम्ही सर्वानी इथे जो संवाद साधला, मंथन केले, ते देखील खूप  महत्वपूर्ण आहे. या दरम्यान जे विजेते ठरले त्यांचे मी अभिनंदन करतो, माझ्याकडून शुभेच्छा देतो. आणि इथे जेव्हा मी तुमचे म्हणणे ऐकत होतो तेव्हा माझ्या मनात विचार आला आणि म्हणून मी मनातल्या मनात ठरवले की तुमची जी भाषणे आहेत ती मी आज  माझ्या ट्विटर हॅण्डलवरून  ट्वीट करेन. आणि तुमच्या तिघांचेच करेन असे नाही, जर ध्वनिमुद्रित भाषण उपलब्ध असेल तर मी काल जे अंतिम पॅनलमध्ये होते त्यांच्यासाठी देखील त्यांचे भाषण  ट्वीट करेन जेणेकरून देशाला समजेल की संसदेच्या या परिसरात आपला भावी भारत कसा  आकार घेत आहे. माझ्यासाठी ही खूप अभिमानाची बाब असेल की मी आज तुमचे भाषण ट्वीट करेन .

 

मित्रांनो,

स्वामीजींनी जे देश आणि समाजाला दिले आहे , ते काळ आणि स्थानाच्या पलिकडे , प्रत्येक पिढीला प्रेरित करणारे आहे, मार्ग दाखवणारे आहे. तुम्ही बघत असाल की भारतातील एखादेच असे गाव असेल , एखादे शहर असेल, एखादी व्यक्ती असेल, जी स्वतःला स्वामीजींशी जोडून घेतलेली नसेल, त्यांच्यापासून प्रेरित झाली नसेल.  स्वामीजींच्या प्रेरणेने स्वातंत्र्याच्या लढ्याला नवी  ऊर्जा दिली होती. गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडाने भारताला हजारो वर्षांची आपली ताकद आणि सामर्थ्याच्या जाणीवेपासून दूर केले होते.  स्वामी विवेकानंदयांनी भारताला त्याच्या त्या सामर्थ्याची आठवण करून दिली, जाणीव करून दिली, त्यांचे सामर्थ्य, त्यांचे  मन-मष्तिष्‍क याना पुनर्जीवित केले, राष्ट्रीय चेतना जागृत केली. तुम्ही  हे ऐकून हैराण व्हाल की त्यावेळी क्रांतीचा मार्ग आणि शांतीचा मार्ग अशा दोन्ही मार्गाने स्वातंत्र्यासाठी जे युद्ध सुरु होते, स्वातंत्र्याची लढाई लढत होते ते ते कुठे ना कुठे स्वामीजींच्या प्रेरणेने प्रेरित होते. त्यांच्या अटकेच्या वेळी, फाशीच्या वेळी स्वामीजींशी निगडित साहित्य नक्कीच पोलिसांच्या हाती लागले असेल.

तेव्हा याचे कायदेशीर अध्ययन करण्यात आले होते की स्वामी विवेकानंद यांच्या विचारांमध्ये असे काय आहे जे लोकांना देशभक्तीसाठी राष्ट्रनिर्माणासाठी , स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देण्याची  प्रेरणा देते, प्रत्येक युवकाला इतके प्रभावित करते. काळ सरत गेला, देश स्वतंत्र झाला, मात्र आपण आजही पाहत आहोत स्वामीजी आपल्यामध्ये असतात, प्रत्येक क्षणाला आपल्याला प्रेरणा देतात, त्यांचा  प्रभाव आपल्या  चिंतनधारेत कुठे ना कुठे नजरेस पडतो. अध्यात्माच्या बाबतीत ते जे म्हणाले , राष्ट्रवाद-राष्ट्रनिर्माण-राष्‍ट्रहित संबंधी त्यांनी जे म्हटले , जनसेवा ते जगसेवा संदर्भातील त्यांचे  विचार आजही आपल्या मनमंदिरात तेवढ्याच तीव्रतेने  प्रवाहित होतात. मला विश्वास आहे , तुम्ही युवा मित्र देखील नक्कीच याची अनुभूती घेत असाल. कुठेही   विवेकानन्‍द यांचे छायाचित्र दिसले , तुम्हाला कल्पना देखील येणार नाही, मनोमन तुमच्या मनात  एक श्रद्धेची भावना जागृत होत असेल, त्यांच्यापुढे नतमस्तक होत असाल, हे नक्कीच होत असेल.

 

मित्रांनो,

स्वामी विवेकानंद यांनी आणखी  एक अनमोल भेट दिली आहे. ही भेट आहे, व्यक्तींच्या जडणघडणाची, संस्थांच्या निर्मितीची. यांची चर्चा खूपच कमी होते. मात्र जर आपण अभ्यास केला तर आढळेल की स्वामी विवेकानंद यांनी अशा संस्थांना देखील पुढे नेले ज्या आजही व्यक्तिमत्व घडवण्याचे काम योग्य प्रकारे करत आहेत. त्यांचे  संस्‍कार, त्यांचा सेवाभाव, त्यांची समर्पण भावना निरंतर जागवत आहे. व्यक्तीतून संस्थेची निर्मिती आणि संस्थेतून अनेक व्यक्तींची घडण हे  एक  अनवरत-अविलम्‍ब-अबाधित चक्र आहे , जे चालतच आले आहे. लोक स्वामीजींच्या प्रभावाखाली येतात, संस्था निर्माण करण्याची प्रेरणा घेतातसंस्‍था निर्माण करतात , नंतर त्या संस्थांमधून त्याच्या व्‍यवस्थेतून , प्रेरणा , विचार , आदर यातून असे लोक बाहेर पडतात जे स्वामीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालताना नव्या लोकांना आपल्याबरोबर जोडतात.  व्यक्तीतून संस्था आणि संस्थेतून पुन्हा व्यक्ती हे चक्र आज भारताची खूप मोठी ताकद आहे. तुम्ही लोक उद्यमशीलतेबाबत खूप ऐकता. ते देखील असेच आहे. एक हुशार व्यक्तीएक मोठी  कंपनी उभारतो. नंतर त्या कंपनीत जी परिसंस्था निर्माण होते त्यामुळे तिथे अनेक हुशार व्यक्ती तयार होतात. या व्यक्ती पुढे जाऊन आणखी नव्या कंपन्या निर्माण करतात. व्यक्ती आणि संस्थांचे हे चक्र  देश आणि समाजाचे प्रत्येक क्षेत्र,प्रत्येक स्तरासाठी तेवढेच महत्वपूर्ण आहे.

 

मित्रांनो,

आज देशात जे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे, त्याचाही भर उत्तम व्यक्ती घडवण्यावर आहे.  व्‍यक्ति निर्माण ते राष्‍ट्र निर्माण असे हे धोरण  युवकांच्या इच्छा, युवकांचे कौशल्य, युवकांची समज, युवकांचे निर्णय यांना  सर्वोच्च प्राधान्य देते. आता तुम्ही हवा तो विषय निवडा, हवे ते  कॉम्बिनेशन निवडा , हवी ती शाखा निवडा . एक अभ्यासक्रम सोडून तुम्हाला जर दुसरा अभ्यासक्रम सुरु करायचा असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. आता असे होणार नाही की आधीच्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही जी मेहनत घेतली होती , ती वाया जाईल. तुम्हाला तेव्हढ्या अभ्यासाचे प्रमाणपत्र मिळेल, जे पुढे नेईल .

 

मित्रांनो,

आज देशात एक अशी परिसंस्था विकसित केली जात आहे , जिच्या शोधात बऱ्याचदा आपले युवक परदेशाचा मार्ग स्वीकारायचे. तिथले आधुनिक शिक्षण , उत्तम संधी, गुणवत्ता ओळखणारी, सन्मान देणारी व्यवस्था त्यांना स्वाभाविकपणे  आकर्षित करायची. आता देशातच अशी व्यवस्था आपल्या  युवा मित्रांना मिळावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आम्ही प्रयत्नरत देखील आहोत. आपले युवक मोकळेपणाने आपली  प्रतिभा, आपल्या स्वप्नांप्रमाणे स्वतःला विकसित करू शकतील यासाठी आज एक वातावरण तयार केले जात आहे , परिसंस्था तयार केली जात आहे , शिक्षण व्यवस्था असेलसमाज व्यवस्था असेल, कायदेशीर बाबी असतील, प्रत्येक गोष्टीत या सर्व बाबी केंद्रस्थानी ठेवल्या जात आहेत स्वामीजींचा विशेष भर त्या गोष्टीवर देखील होता जी आपण कधीही विसरता कामा नये.  स्वामीजी नेहमी म्हणायचे आणि ते यावर भर द्यायचे , ते शारीरिक ताकदीवर देखील भर द्यायचे, मानसिक सामर्थ्यावर देखील भर द्यायचे. ते म्हणायचे कठीण परिस्थितीतही शांत राहावे. त्यांच्या प्रेरणेतून आज भारताच्या युवकांच्या शारीरिक आणि  मानसिक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. फिट इंडिया चळवळ असेल, योगप्रति जागरूकता असेल किंवा मग खेळांसंदर्भातील पायाभूत सुविधांची निर्मिती, या सर्व गोष्टी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ करत आहेत.  

 

मित्रांनो,

आजकाल तुम्ही लोक काही शब्द वारंवार ऐकत असाल, तुमच्या कानावर येत असतील. व्यक्तिमत्व विकास आणि संघ व्यवस्थापन  यातील बारकावे देखील तुम्ही  स्वामी विवेकानंद यांचे अध्ययन केल्यानंतर आणखी सोप्या मार्गाने समजू शकाल. व्यक्तिमत्व विकासाचा त्यांचा मंत्र होता,  ‘Believe in Yourself’ स्वतःवर विश्वास ठेवा. नेतृत्वाचा त्यांचा मंत्र होता-  सर्वांवर विश्वास ठेवा. l’ ते म्हणायचे -“प्राचीन धर्मानुसार तो नास्तिक आहे ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही.  मात्र नवीन  धर्म सांगतो नास्तिक तो आहे जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही. ” आणि जेव्हा नेतृत्वाची गोष्ट येते तेव्हा ते स्वतःच्याही आधी आपल्या चमूवर विश्वास दाखवायचे. मी कुठेतरी वाचले होते, तो किस्सा मला तुम्हालाही सांगायचा  आहे.एकदा  स्वामीजी आपले सहकारी स्वामी शारदानंद यांच्याबरोबर लंडनमध्ये एका सार्वजनिक व्याख्यानासाठी गेले होते. सगळी तयारी झाली होती, ऐकणारे एकत्र जमले होते आणि स्वाभाविक आहे, प्रत्येकजण स्वामी विवेकानन्द यांना ऐकण्यासाठी आकर्षित होऊन आला होता. मात्र जेव्हा त्यांच्या भाषणाचा नंबर आला तेव्हा स्वामीजी म्हणाले की आज भाषण मी नाही तर माझे सहकारी शारदानंद जी देतील. शारदानंद यांनी तर विचारच केला नव्हता कि अचानक त्यांच्यावर ही जबाबदारी येऊन पडली. ते यासाठी तयार देखील नव्हते. मात्र जेव्हा  शारदानंद यांनी भाषणाला सुरुवात केली तेव्हा प्रत्येकजण चकित झाला, त्यांच्या भाषणाने प्रभावित झाला. असे असते नेतृत्व, आणि आपल्या चमूवर भरवसा ठेवण्याची ताकद. ! आज आपल्याला जितके स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल माहित आहे, त्यात खूप मोठे  योगदान स्वामी शारदानंद जी यांचेच आहे.

 

मित्रांनो,

ते  स्वामीजीच होते ज्यांनी त्या काळात म्हटले होते की निडर, स्पष्ट विचार आणि स्वच्छ मनाचा , साहसी आणि आकांक्षी युवा हाच तो पाया आहे ज्याच्यावर राष्ट्राच्या भविष्याची निर्मिती होते. त्यांचा युवकांवरयुवा शक्तीवर इतका विश्वास होता. आता तुम्हाला त्यांच्या या विश्वासाच्या कसोटीवर खरे उतरायचे आहे. भारताला आता नव्या उंचीवर नेण्याचे काम , देशाला आत्मनिर्भर बनवण्याचे काम तुम्हा सर्व युवकांनाच करायचे आहे. आता तुमच्यातील काही युवक विचार करतील कीअजून आमचे इतके वयदेखील झालेले नाही. आता तर हसणे, खेळणे, आयुष्याची मजा लुटण्याचे वय आहे. मित्रानो, जेव्हा ध्येय स्पष्ट असेल, इच्छाशक्ति असेल, तेव्हा वय हें कधीही अडचण ठरत नाही. वयाला इतके महत्व नसते. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व युवा पिढीनेच सांभाळले होते. तुम्हाला माहित आहे  शहीद खुदीराम बोस जेव्हा फाशीवर गेले तेव्हा त्यांचे वय काय होते? केवळ 18-19 वर्ष. भगत सिंह यांना फाशी दिली गेली तेव्हा त्यांचे वय किती होते? केवळ 24 वर्षे. भगवान बिरसा मुंडा जेव्हा शहीद झाले तेव्हा त्यांचे वय काय होते ? 25 वर्ष . त्या पिढीने निश्चय केला होता कि देशाच्या स्वातंत्र्यासाठीच जगायचे आहे, देशाच्या स्वातंत्र्यासाठीच बलिदान द्यायचे आहे.  वकीलडॉक्टर्स, प्राध्यापकबैंकर्स, विविध व्यवसायातील तरुण पिढीतील लोक एकत्र आले आणि सर्वानी मिळून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले.

 

मित्रांनो,

आपण त्या कालखंडामध्ये जन्माला आलो आहोत, मी देखील स्वतंत्र भारतात जन्माला आलो. मी पारतंत्र्य पाहिले नाही आणि माझ्यासमोर बसलेले तुम्ही सगळे देखील स्वतंत्र भारतात जन्माला आला आहात. आपल्याला देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी प्राणांची आहुती देण्याची संधी मिळाली नाही परंतु आपल्याला स्वतंत्र भारताला पुढे घेऊन जाण्याची संधी नक्की मिळाली आहे. ही संधी आपल्याला वाया घालवून चालणार नाही. देशातील माझ्या तरुण मित्रांनो, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर स्वातंत्र्याची शताब्दी लवकरच पूर्ण होईल, आगामी 25-26 वर्षाचा प्रवास खूपच महत्वाचा आहे.

 

मित्रांनो,

आपण देखील विचार करा, आज आपण ज्या वयाचे आहात, आतापासून सुरू होणारा काळ हा आपल्या जीवनाचा सुवर्णकाळ आहे, हा सर्वोत्तम काळ आहे आणि तो काळ भारताला स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षांच्या दिशेने घेऊन जात आहे. म्हणजे तुमच्या विकासाची उंची, स्वातंत्र्याच्या 100 वर्षाचे कर्तृत्व, दोन्ही एकत्र चालत आहेत, याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील 25-26 वर्षे, देशाची पुढील 25-26 वर्षे यांच्यात बराच ताळमेळ आहेखूप महत्त्वाचे आहे. आपल्या आयुष्याच्या या वर्षांत देशाला सर्वोच्च प्राधान्य द्या, देशसेवा करा. हे शतक भारताचे आहे असे विवेकानंद म्हणायचे. तुम्हालाच हे शतक भारताचे शतक बनवावे लागेल. तुम्ही जे काही कराल, जो काही निर्णय घ्याल ते करताना एकदा हा नक्की विचार करा की, यामध्ये देशाचे हित काय आहे ?

 

मित्रांनो,

आपल्या तरुणांनी पुढे येऊन राष्ट्राचे भाग्य बनले पाहिजे असे स्वामी विवेकानंद सांगायचे. म्हणूनच, भारताच्या भविष्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तुमची  आहे. आणि देशाच्या राजकारणाविषयीही देखील तुमची जबाबदारी  आहे. कारण राजकारण हे देशात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहे. प्रत्येक क्षेत्राप्रमाणे राजकारणालाही तरूणांची मोठी आवश्यकता आहे. नवीन विचार, नवीन ऊर्जा, नवीन स्वप्ने, नवीन उत्साह देशाच्या राजकारणाला याची खूप गरज आहे.

 

मित्रांनो,

पूर्वी देशात अशी समजूत होती की जर एखादा तरुण जर राजकारणाकडे वळला तर घरातील लोक म्हणायचे की आता हा मुलगा वाया गेला. कारण राजकारण म्हणजे भांडण, लूट, भ्रष्टाचार असाच झाला होता. किती प्रकारचे शिक्के  लागले  होते  याची तर गिनतीच नाही. प्रत्येक गोष्ट बदलू शकते पण राजकारण बदलू शकत नाही असे लोक म्हणायचे. पण आज तुम्ही बघतायदेशातील जनता, देशातील नागरिक आज इतके जागरूक झाले आहेत की राजकारणात ते प्रामाणिक लोकांसोबत उभे आहेत. प्रामाणिक लोकांना संधी देतात. राजकारणात प्रामाणिकपणा, समर्पणसेवा-भावनेने आलेल्या लोकांच्या मागे देशातील सर्वसामान्य खंबीरपणे उभी राहते. प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता ही आजच्या राजकारणाची पहिली अनिवार्य अट आहे. आणि देशात निर्माण झालेल्या जागरूकतेमुळे हा दबाव निर्माण झाला आहे. भ्रष्टाचार हा ज्यांचा वारसा होता आज तोच त्यांच्यावर ओझे बनला आहे. आणि लाख प्रयत्न करून देखील ते यातून बाहेर येऊ शकत नाहीत हीच देशातील सामान्य नागरिकांच्या जागृतीची शक्ती आहे. देश आता प्रामाणीक व्यक्तींना आपले प्रेम देत आहे, विश्वासू लोकांना आपला आशीर्वाद देत आहे, प्रामाणिक व्यक्तींच्या मागे आपल्या सर्व शक्तीसह उभा राहत आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवत आहे. आता लोकप्रतिनिधी देखील समजून चुकले आहे  की जर त्यांना पुढच्या निवडणुकांमध्ये जायचे असेल तर त्यांना त्यांचा सीव्ही मजबूत बनवावा लागेल, कामांचा हिशोब चोख ठेवावा लागेल. परंतु, मित्रांनो, अजूनही काही बदल बाकी आहेत आणि हे बदल देशातील तरूणांनी करायला हवे, तुम्ही करायला हवे.  राजकीय घराणेशाही हा लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू आहे. राजकीय घराणेशाही ही देशासमोरील खूप मोठे आव्हान आहे ज्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे.  केवळ आपल्या आडनावाच्या मदतीने निवडणुका जिंकण्याचे दिवस आता संपले आहेत. परंतु  राजकारणातील घराणेशाहीचा हा आजार बरा झालेला नाही. अजूनही असे लोक आहेत, ज्यांचे विचार, ज्यांची वर्तणूक, ज्यांचे लक्ष्य, सर्वकाही आपल्या कुटुंबाचे राजकारण आणि राजकारणात आपले कुटुंब वाचविण्यासाठीच आहेत. 

 

मित्रांनो,

लोकशाहीमध्ये हुकूमशाहीच्या नव्या प्रकारासोबतच ही राजकीय घराणेशाही देखील देशावर अकार्यक्षमतेचे अधिक ओझे  टाकते. राजकीय घराणेशाही प्रथम देश या भावनेऐवजी मी आणि माझे कुटुंब या भावनांना बळकटी देते. देशातील राजकीय आणि सामाजिक भ्रष्टाचाराचे हे देखील एक मोठे कारण आहे. घराणेशाहीमुळे राजकारणात मोठ्या पदावर पोहोचलेल्या लोकांना वाटते की, जर त्यांच्या आधीच्या पिढ्यांचा भ्रष्टाचाराचा हिशेब झाला नाही तर त्यांचे देखील कोणीही काहीही नुकसान करू शकत नाही. ते त्यांच्या घरातच अशी विकृत उदाहरणे बघतात. म्हणून, अशी लोकं कायद्याचा आदर करत नाहीत आणि त्यांना कायद्याची भीती देखील वाटत नाही.

 

मित्रांनो,

देशाच्या जागरुकतेवर, देशाच्या तरुण पिढीवर ही परिस्थितीत बदल घडवून आणण्याची जबाबदारी आहे आणि राष्ट्रयाम जागृयाम वयं, या मंत्रासह जगायचे आहे. तुम्ही मोठ्या संख्येने राजकारणात या, अधिक जोमाने सहभागी व्हा. काहीतरी हवे आहे, काहीतरी बनायचे आहे या उद्देशाने नव्हे तर काहीतरी भरीव कार्य करण्याच्या उद्देशाने या. तुम्ही तुमचे विचार, तुमचा दृष्टीकोन घेऊन पुढे मार्गक्रमण करायला हवे. एकत्र काम करा, कठोर परिश्रम करा. जोपर्यंत देशातील सामान्य तरुण राजकारणात येत नाही तोपर्यंत घराणेशाहीचे हे विष आपल्या लोकशाहीला कमजोर करत राहील हे लक्षात ठेवा. या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हाला राजकारणात यावेच लागेल आणि हे आमच्या युवा विभागाद्वारे जे सतत मॉक संसद कार्यक्रम चालवित आहेत. तरुण मित्रांनी देशाच्या विषयांवर एकत्र चर्चा केली पाहिजे. देशातील तरुणांना भारताच्या सेंट्रल हॉल मध्ये आणले पाहिजे. आगामी काळात देशातील नवीन तरुण पिढी आमच्यासोबत देशाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येऊ शकेल याकरिता देशातील नवीन तरुण पिढी तयार केली पाहिजे, हाच यामागील हेतू आहे. तुमच्यासमोर स्वामी विवेकानंदांसारखा उत्तम मार्गदर्शक आहे. त्यांच्या प्रेरणेने, तुमच्यासारखे तरुण राजकारणात आले, तर देश अधिक बळकट होईल.

 

मित्रांनो,

स्वामी विवेकानंदांनी तरुणांना आणखी एक महत्त्वाचा मंत्र दिला होता. “कोणत्याही आपत्ती किंवा संकटापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या आपत्तीतून घेतलेले शिक्षण.” त्यातून आपण काय शिकलात? आपत्तीकाळात संयम देखील आवश्यक आहे, धैर्य देखील आवश्यक आहे. जे बिघडले आहे ते पुन्हा जसे होते तसे उभारायचे की सुरवातीपासूनच नव्या बांधकामाचा पाया घालायचा? आपत्तीमुळे आपल्याला हा विचार करण्याची संधी देखील मिळते.  बर्‍याच वेळा आपण एखादे संकट, आपत्तीनंतर काहीतरी नवीन विचार करतो आणि मग आपल्याला लक्षात येते की त्या नवीन विचारसरणीने आपले संपूर्ण भविष्य बदलले आहे. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात असा अनुभव आला असेल. मला वाटते की आज मी एक अनुभव तुमच्यासमोर ठेवलाच पाहिजे. 2001 मध्ये गुजरातच्या कच्छ भागात जेव्हा  भूकंप झाला तेव्हा काही क्षणातच सर्व काही नष्ट झाले. संपूर्ण कच्छ मृत्युच्या दाढेत झोपी गेले होते, सगळ्या इमारती भुईसपाट झाल्या होत्या. जी परिस्थिती निर्माण झाली होती ती पाहून लोक म्हणायचे की आता कच्छ कायमचे उध्वस्त झाले. या भूकंपानंतर काही महिन्यांनंतरच गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर आली. आजूबाजूला एकच आवाज ऐकू येत होता, आता तर गुजरात गेले, आता गुजरात उध्वस्त झाले, हेच ऐकू येत होते. आम्ही नवीन दृष्टीकोनासह काम केले, नवीन धोरणासह काम केले. आम्ही केवळ इमारतींची पुनर्बांधणी केली नाही तर कच्छला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे देखील ठरवले. त्यावेळी तेथे रस्ते नव्हते, वीज व्यवस्था चांगली नव्हती, पाणीही सहज उपलब्ध नव्हते. आम्ही प्रत्येक व्यवस्था सुधारली. आम्ही शेकडो किलोमीटर लांब कालव्यांमधून कच्छला पाणी नेले, पाइपलाइनमधून पाणी घेऊन गेलो. कच्छची जी स्थिती झाली होती ती बघता तिथल्या पर्यटनाचा कोणी विचार देखील करता नव्हते. उलट कच्छ येथून दरवर्षी हजारो लोक स्थलांतर करत होते.  कित्येक वर्षांपूर्वी कच्छ सोडून गेलेली लोकं आज परत येऊ लागले आहेत आता ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आज लाखो पर्यटक रण महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी कच्छला येतात. आम्ही आपत्तीत पुढे जाण्याची संधी शोधली.

 

मित्रांनो,

त्या वेळी, भूकंपांदरम्यान, आणखी एक मोठे काम केले होते, ज्याची फार चर्चा होत नाही. आजकाल कोरोनाच्या या काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्याविषयी तुम्ही बर्‍याच गोष्टी ऐकत असाल.  यावेळी, या कायद्याच्या आधारे सर्व प्रकारचे आदेश देण्यात आले. पण या कायद्याची देखील एक कथा आहे, कच्छच्या  भूकंपासोबत याचा संबंध आहे आणि मी जर तुम्हाला सांगितले तर तुम्हाला देखील आनंद होईल.

 

मित्रांनो,

यापूर्वी आपल्या देशात आपत्ती व्यवस्थापन हा केवळ कृषी विभागाचा भाग आहे असे मानले जायचे. कारण आपल्या येथे आपत्ती म्हणजे पूर किंवा दुष्काळ. जर खूप पाऊस पडला तर आपत्ती, आणि जर कमी पाऊस पडला तर ती देखील आपत्ती, पूर वगैरे वगैरे आल्यानंतर शेतीला झालेली नुकसान भरपाई देणे हेच मुख्य आपत्ती व्यवस्थापन. पण कच्छ भूकंपातून धडा घेत गुजरातने 2003 मध्ये गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन कायदा तयार केला. त्यानंतर देशात प्रथमच आपत्ती व्यवस्थापन कृषी विभागातून काढून गृह गृह विभागाअंतर्गत त्याचा समावेश करण्यात आला.  नंतर 2005 मध्ये केंद्र सरकारने गुजरातच्या कायद्याप्रमाणेच  संपूर्ण देशासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा तयार केला. आज याच कायद्याच्या मदतीने, सामर्थ्याने देशाने साथीच्या आजारा विरूद्ध इतका मोठा लढा दिला आहे. आज या कायद्याने आपल्या कोट्यावधी लोकांचे प्राण वाचविण्यात मदत केलीअशा मोठ्या संकटातून वाचण्यासाठी आज हाच कायदा मुख्य आधार बनला. एवढेच नव्हे, तर एकेकाळी आपत्ती व्यवस्थापन हे केवळ नुकसानभरपाई आणि मदत सामग्रीपुरतेच मर्यादित होते, आज भारताच्या आपत्ती व्यवस्थापनातून जग शिक्षण घेत आहे.

 

मित्रांनो,

जो समाज संकटांतूनही प्रगतीचा मार्ग साध्य करतो, तो समाज स्वतःचे भविष्य स्वतःचे हाताने लिहितो. त्यामुळेच आज भारत आणि 130 कोटी भारतीय स्वतःचे भविष्य ते देखील उत्तम भविष्य  नागरिक स्वतःच्या हाताने घडवीत आहेत. आपण केलेले प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक सेवा कार्य, प्रत्येक नवोन्मेष आणि प्रत्येक प्रामाणिक संकल्प भविष्यातील पायाभरणी करण्यासाठी एक मजबूत दगड आहे. तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी व्हा याच शुभेच्छासह मी पुन्हा एकदा देशभरातील कोट्यवधी तरुण ज्यांनी कोरोनाच्या या काळात कुठे प्रत्यक्षात, कुठे आभासी पद्धतीने ही चळवळ पुढे नेली, विभातील सर्व लोकं अभिनंदनास पात्र आहेत. यात भाग घेणारे तरुणदेखील अभिनंदनास पात्र आहेत, आणि विजेत्यांना अनेक शुभेच्छा देण्यासह ज्या गोष्टी बोलल्या आहेत त्या समाजाच्या मुळापर्यंत गेल्या पाहिजेत. यासाठी  यशस्वीरित्या पुढे जाण्यासाठी माझ्या त्यांना अनेकानेक शुभेच्छा  संसदेच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मी अध्यक्षांचे आभार मानतो आणि माझे भाषण संपवतो. 

खूप-खूप धन्यवाद!

***

Jaydevi P.S/S.Kane/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com