देशातील तरुणांनी निःस्वार्थ भावनेने आणि विधायक दृष्टीने राजकारणात कार्य करावे, असे वाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते आज बोलत होते. देशात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी राजकारण हे महत्वाचे माध्यम असून इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच राजकारणातही युवकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. राजकारण भ्रष्ट लोकांचा अड्डा असतो ही जुनी समजूत आता बदलली गेली असून आज प्रामाणिक लोकांनाही राजकारणाच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळू शकते, अशी ग्वाही पंतप्रधानांनी युवकांना दिली. प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता हे गुण आज काळाची गरज बनले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
याच संदर्भात, पंतप्रधानांनी राजकारणातील घराणेशाहीवर मार्मिक भाष्य केले. ज्या नेत्यांचा भष्ट्राचाराचा वारसा होता, त्यांच्या वारसदारांना आता त्या भष्ट्राचाराचेही ओझे झाले आहे. आज लोक अशा कौटुंबिक वारशापेक्षा प्रामाणिकपणाला पसंती देत आहेत. उमेदवारांनाही हे लक्षात आले आहे की केवळ त्यांचे सत्कर्मच त्यांच्या कामी येणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
अशा घराणेशाहीच्या व्यवस्थेला समूळ नष्ट करावे, असे आवाहन त्यांनी युवकांना केले. घराणेशाहीच्या राजकारणातून लोकशाही व्यवस्थेतही, अकार्यक्षमता आणि हुकूमशाहीला खतपाणी घातले जाते कारण घराणेशाहीतले नेते त्यांच्या कुटुंबातील राजकारण आणि राजकारणात कुटुंब यांचेच भले करण्यात व्यस्त असतात, अशी टीका मोदी यांनी केली. “आज आडनावाच्या कुबड्या घेऊन, निवडणुका जिंकण्याचे दिवस संपले असले तरीही घराणेशाहीच्या राजकारणातून अद्याप भारताची सुटका झालेली नाही. राजकीय घराणेशाहीमुळे मी आणि माझे कुटुंब यांना देशापेक्षा अधिक महत्व देण्याची वृत्ती बळावत जाते, असे राजकारण हेच भारतातील सामाजिक भ्रष्टाचाराचे महत्वाचे कारण आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी युवकांना अधिकधिक संख्येने राजकारणात येण्याचे आवाहन केले. त्यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे घराणेशाहीला आळा बसेल, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली. “आपली लोकशाही वाचवण्यासाठी युवकांनी राजकारणात येणे अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या समोर स्वामी विवेकानंद यांच्यासारखे मार्गदर्शक आहेत, आणि जर त्यांच्यापासून प्रेरणा घेत आपले युवक राजकारणात सहभागी झाले तर, आपला देश निश्चितच अधिक बळकट होईल” असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
***
Jaydevi P.S/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com