Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातमधल्या कच्छ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध विकास कामांचा शिलान्यास केला; याप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

गुजरातमधल्या कच्छ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध विकास कामांचा शिलान्यास केला; याप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


 

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी जी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल जी, गुजरातचे मंत्री, खासदार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ‘‘ की अयो कच्छी माडुओ? शी केडो आय? शियारो अने कोरोना, बोय मे ध्यान रखजा! अज कच्छ अची, मुके बेवडी खुशी थई रही आय, बेवडी ऐटले आय, के कच्छडों मुझे धिल जे बोरो वटे आय, ब्यो एतरे के, अज, कच्छ गुजरात,ज न, पण देश जी ओडख मे पण, हकडो तारो जोडेलाय वेने तो!!’’

 

मित्रांनो,

आज गुजरात आणि देशाचे महान सुपुत्र सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथीही आहे. नर्मदा मातेच्या जलाने गुजरातचा कायाकल्प करण्याचे स्वप्न पाहणा-या सरदार साहेबांचे स्वप्न आता वेगाने पूर्ण होत आहे. केवडियामध्ये असलेला त्यांचा जगातला सर्वात उंच पुतळा, आपल्याला एकजूट होऊन देशासाठी रात्रंदिवस काम करण्याची प्रेरणा देत आहे. सरदारसाहेबांचे स्मरण करताना आपण अशाच पद्धतीने देश आणि गुजरातचा गौरव, गुजरातचा मान वाढवत रहायचे आहे.

 

मित्रांनो,

आज कच्छमध्ये नवीन चैतन्याचा, नव्या उर्जेचा संचार होत आहे. विचार करा, आपल्या कच्छमध्ये, जगातला सर्वात मोठा हायब्रिड नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प होत आहे. आणि हा किती मोठा आहे? जितका मोठा सिंगापूर देश आहे, बहरीन देश आहे, जवळपास तितक्याच मोठ्या क्षेत्रामध्ये कच्छचा हा नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प होणार आहे. आता आपल्याला अंदाज आला असेल की, हा एकूणच प्रकल्प किती महाविशाल असणार आहे. 70 हजार हेक्टर, म्हणजेच भारतातल्या मोठ -मोठ्या शहरांपेक्षाही मोठा हा कच्छचा नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प तयार होणार आहे. हे ज्यावेळी ऐकायला मिळते, हे शब्द ज्यावेळी कानावर पडतात, त्यावेळी कितीतरी छान वाटते. असे वाटते की, कच्छवाल्यांचे मन किती अभिमानाने, गर्वाने भरून जात असेल.

 

मित्रांनो,

आज कच्छने नव्या युगाचे तंत्रज्ञान आणि नव्या युगाचे अर्थकारण अशा दोन्हीही दिशांना मोठे पाऊल उचलले आहे. खावडामध्ये नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प असो, मांडवीमध्ये डिसेलिनेशन प्रकल्प असो आणि अंजारमध्ये सरहद दुग्धालयाचा नवीन स्वयंचलित प्रकल्पाचे शिलान्यास असो, या तीनही प्रकल्पांमुळे कच्छची विकास यात्रेमध्ये नवीन आयाम लिहिले जाणार आहेत. आणि त्याचा खूप मोठा लाभ इथल्या माझ्या शेतकरी  बंधू-भगिनींना, पशुपालक बंधू-भगिनींना, इथल्या सामान्य नागरिकांना आणि विशेष करून माता भगिनींना होणार आहे.

 

मित्रांनो,

मी ज्यावेळी कच्छच्या विकासाविषयी बोलतो त्यावेळी मनामध्ये अनेक जुन्या गोष्टींची सर्व छायाचित्रे एकाचवेळी नजरेसमोर यायला लागतात. एकेकाळी असे म्हणत होते की, कच्छ किती दूर आहे, तिथे विकासाचे नामोनिशाण नाही. कनेक्टिव्हिटी नाही. वीज-पाणी-रस्ते म्हणजे आव्हानांचे दुसरे एक नाव होते. सरकारी नोकरीमध्ये जर कुणाला काही शिक्षा द्यायची असेल तर त्याची बदली कच्छला करावी. कच्छला जाणे म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा झाली, असे सरकारमध्ये म्हटले जात होते. आज स्थिती आता अशी निर्माण झाली आहे की, आपल्याला काही दिवस तरी कच्छमध्ये काम करण्याची संधी मिळावी, अशी लोक शिफारस करायला सांगतात. या क्षेत्राचा कधी विकास होऊच शकणार नाही, असेही काही लोक  म्हणायचे. अशाच अवघड परिस्थितीमध्येच भूकंपाचे संकटही आले. जे काही वाचले होते, जे काही इथे होते, ते सगळे काही भूकंपामध्ये उद्ध्वस्त झाले. मात्र एकीकडे माता आशापुरा देवी आणि कोटेश्वर महादेवाचा आशीर्वाद आणि दुसरीकडे कच्छच्या माझ्या ज्ञानवंत लोकांचे धैर्य, त्यांचे परिश्रम, त्यांची कमालीची इच्छाशक्ती. अवघ्या काही वर्षामध्येच या भागातल्या लोकांनी कोणी कल्पनाही करू शकणार नाही, अशा गोष्टी करून दाखवल्या आहे. कच्छच्या लोकांनी निराशेला आशेमध्ये परिवर्तित केले आहे. मला तर हा एक माता आशापुरा देवीचा आशीर्वाद असला पाहिजे, असे वाटते. इथे निराशा नावालाही नाही आणि फक्त आशाच आशा आहे. भूकंपामुळे भलेही अनेकांची घरे पडली असू दे, परंतु इतक्या प्रलंयकारी भूकंपाने कच्छच्या लोकांचे मनोबल काही कमी झाले नाही. कच्छचे माझे बंधू-भगिनी पुन्हा ठामपणे उभे राहिले आहेत. आणि आज पहा, या क्षेत्राला त्यांनी कुठल्या कुठे नेले आहे.

 

मित्रांनो,

आज कच्छची ओळख बदलली आहे. आज कच्छची शान अधिक वेगाने वाढतेय. आज कच्छ देशात वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रांपैकी एक महत्वाचे क्षेत्र बनले आहे. इथली कनेक्टिव्हिटी दिवसांगणिक सुधारत आहे. या सीमावर्ती गावांमध्ये सातत्याने पलायन होत असे. सर्वात आधी लोकसंख्येचे गणित तुम्ही जरूर पहावे. इथे ऋण-वृद्धी’  म्हणजे लोकसंख्‍येच्या वजावटीत वाढ होत असे. लोकसंख्या कमी होणारा हा भाग म्हणून ओळखला जात होता. इतर कोणत्याही ठिकाणी लोकसंख्या नेहमी वाढते मात्र कच्छची लोकसंख्या कमी होत होती. कारण लोक इथं रहातच नव्हते, निघून जात होते. सीमावर्ती भागातले लोक तर अगदी पलायन करीत होते. याच कारणाने सुरक्षेचा धोकाही निर्माण होणे स्वाभाविक होते. आता पलायन तर पूर्ण थांबले आहे, त्याचबरोबर जी गावे  याआधी मोकळे होत होती, त्यामध्ये राहण्यासाठी अनेकजण आता परत आले आहेत. याचा खूप मोठा सकारात्मक प्रभाव राष्ट्रीय सुरक्षेवरही पडला आहे.

 

मित्रांनो,

जो कच्छ कधीकाळी उजाड  बनला होता, तोच कच्छ देश आणि दुनियेतल्या पर्यटकांचे आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनत आहे. कोरोनामुळे नक्कीच काही अडचणी निर्माण केल्या आहेत, परंतु कच्छचे श्वेत रण, कच्छचा रणोत्सव संपूर्ण दुनियेला आकर्षित करीत आहे. सरासरी 4 ते 5 लाख पर्यटक रण-उत्सवाच्या काळात इथे येतात. शुभ्र वाळवंट आणि नीळे आकाश यांचा आनंद घेतात. याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम, कच्छच्या स्थानिक वस्तू-सामानांची इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारी विक्री, इथल्या पारंपरिक भोजनाची, पक्वानांची लोकप्रियता, हे सगळे असे होईल, असा काही वर्षापूर्वी कुणी विचार तरी केला होता का? आज मला काही माझ्या जुन्या परिचितांबरोबर गप्पा-गोष्टी करण्याची संधी मिळाली. त्यावेळी ते सांगत होते की, आता आमची मुलं इंग्रजी बोलायला शिकली आहेत. मी विचारलं, कशी काय इंग्रजी बोलायला लागली? तर म्हणाले, आम्ही पर्यटकांसाठी होम स्टेची सुविधा देतो. आम्ही घरांची रचनाच अशी केली आहे, त्यामुळे पर्यटक होम स्टेकरतात. त्यांच्याबरोबर बोलता बोलता आमची मुलेही इंग्रजी शिकली. आपल्याकडे असलेल्या साधन संपत्तीच्या जोरावर, आपल्या सामर्थ्‍यावर भरवसा करून कशा पद्धतीने आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जाता येते, हे कच्छने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. दुनियेतल्या विकास तज्ज्ञांनी, विद्यापीठातल्या संशोधकांनी, आणि अशा संबंधित अभ्यासकांनी भूकंपानंतर कच्छचा जो चोहोबाजूंनी विकास झाला आहे, त्याचा एक केस स्टडी म्हणून जरूर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीने काम करणारे मॉडेल कसे आहे, हे समजून घेतले पाहिजे. महाप्रलयंकारी भूकंपाच्या धक्क्यानंतर दोन दशकांच्या आतच या क्षेत्रामध्ये इतका, अगदी सर्वांगीण विकास होणे, हे अचंबित करणारे आहे. विशेष म्हणजे, इथे भूमी म्हणजे फक्त आणि फक्त वाळवंट आहे. अशा वाळवंटी प्रदेशात झालेला विकास खरोखरीच अभ्यासाचा विषय आहे.

 

मित्रांनो,

माझ्यावर ईश्वराची अनेक प्रकारे कृपा आहे, असे मला नेहमीच वाटते आणि ईश्वराच्या या कृपेमुळेच कदाचित मलाही त्या भूकंपाच्यावेळी विशेष रूपाने कच्छच्या लोकांची सेवा करण्याची संधी ईश्वराने दिली असावी. भूकंप झाल्यानंतरच्या वर्षातच राज्यात निवडणुका झाल्या आणि निवडणुकीचे निकाल आले ती तारीख होती 15 डिसेंबर! आजही 15 डिसेंबरच आहे, याला योगायोग म्हणता येईल. इतक्या महाभयंकर भूकंपानंतर आमच्या पक्षाला लोकांचा  आशीर्वाद मिळेल, याची कोणीही कल्पना केली नव्हती. सर्वत्र अतिशय नकारात्मक चर्चा सुरू होती. त्या निवडणुकीचा 15 डिसेंबरला ज्यावेळी निकाल आला त्यावेळी पाहिले, कच्छने आमच्यावर प्रेमाचा वर्षावच केला होता. आशीर्वाद दिला होता, आजही हीच परंपरा सुरू आहे. आजही पहा, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने सगळे चांगले सुरू आहे. तसे पाहिले तर, मित्रांनो, आज 15 डिसेंबर या तारखेबरोबर आणखी एक योगायोग जोडला गेला आहे. कदाचित अनेक लोकांना हे जाणल्यावर सुखद धक्का बसणार आहे. आपले पूर्वज किती दीर्घकाळापर्यंतचा विचार करीत होते, किती दूरदृष्टी त्यांच्या विचार करण्यामागे होती; हे पहा.  आजकाल कधी कधी नव्या पिढीप्रमाणे विचार करणारे लोक, जुने म्हणजे सर्व काही बेकार, काही कामाचे नाही, असे बोलत असतात. मी एक घटना तुम्हाला सांगतो. आजपासून 118 वर्षापूर्वी, आजच्या दिवशी म्हणजे 15 डिसेंबर रोजीच अहमदाबादमध्ये एका औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले होते. या प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण होते- भानुताप यंत्र ! म्हणजेच सूर्यापासून मिळणा-या उष्णतेचा वापर करणारे सूर्यताप यंत्र सर्वांमध्‍ये आकर्षणाचा विषय बनला होता. हे भानुताप यंत्र सूर्याच्या उष्णतेवर चालत होते. तो एक प्रकारचा सौर कुकर होता. अशाच पद्धतीने ते विकसित करण्यात आले होते. आज 118 वर्षांनंतर 15 डिसेंबर रोजीच सूर्याच्या उष्णतेवर चालणा-या इतक्या प्रचंड नवीकरणीय प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे. या प्रकल्पामध्ये सौरबरोबरच पवन ऊर्जाही तयार करण्यात येणार आहे. दोन्ही मिळून जवळपास 30 हजार मेगावॅट वीज निर्मिती करण्याची क्षमता असणार आहे. या नवीकरणीय ऊर्जा पार्कमध्ये जवळ-जवळ दीड लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. विचार करा, वाळवंटी प्रदेशातल्या किती मोठ्या भूमीचा सदुपयोग होणार आहे. पवनचक्क्या लागल्यामुळे सीमा सुरक्षा अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकणार आहे. सर्वसामान्य लोकांचे विजेचे बिल कमी करण्याचे लक्ष्य निश्चित करून देश पुढे जात आहे. त्यालाही खूप चांगली मदत मिळणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी आणि उद्योग दोन्हीलाही खूप मोठा लाभ होणार आहे. आणि सर्वात मोठी तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकल्पामुळे प्रदूषण कमी होणार आहे. आपल्या पर्यावरणालाही या प्रकल्पामुळे  लाभ होणार आहे. या नवीकरणीय प्रकल्पामध्ये जी काही वीज बनेल, ती प्रतिवर्षी पाच कोटी टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन रोखण्यास मदत करणार आहे. आता जे काम होणार आहे, त्याकडे जर पर्यावरणाच्या हिशेबाने पाहिले तर हे काम जवळ-जवळ 9 कोटी झाडे लावण्याबरोबरीचे आहे. या ऊर्जा प्रकल्पामुळे भारतामध्ये प्रतिव्यक्ती-दरडोई  कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी करण्यामध्ये खूप मोठे योगदान मिळणार आहे. या प्रकल्पामुळे जवळपास एक लाख लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. याचा सर्वात जास्त लाभ कच्छच्या माझ्या युवकांना होणार आहे.

 

मित्रांनो,

एक काळ असा होता की, गुजरातच्या लोकांची मागणी होती की, कमीत कमी रात्रीच्या भोजनाच्यावेळी तरी अगदी थोड्या वेळासाठी वीज यावी, घरातले दिवे लागावेत. देशातल्या ज्या शहर आणि गावांमध्ये दिवसाचे 24 तास वीज पुरवठा सुनिश्चित केला जातो, त्यामध्ये आज गुजरात राज्याची गणना केली जाते. आज जो युवक 20 वर्षांचा आहे, त्याला माहितीही नाही, वीज पुरवठा कधी बंद असे, त्यावेळी लोकांचे किती हाल व्हायचे. आता इतके मोठे परिवर्तन घडून आले आहे की, वीज नसते आणि त्यामुळे समस्या होतात, हे तर आजच्या युवकाला माहितीच नाही. हे परिवर्तन गुजरातच्या लोकांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे शक्य झाले आहे. आता तर शेतकरी बांधवांसाठी शेतकरी सूर्योदय योजने अंतर्गत, एक वेगळे नेटवर्कही तयार करण्यात येत आहे. शेतक-यांना रात्री शेतात जाऊन पिकांना पाणी देण्याची आवश्यकता पडू नये, यासाठी विशेष वाहिन्या टाकण्यात येत आहेत.

 

बंधू आणि भगिनींनो,

गुजरात देशातले पहिले राज्य आहे, ज्या राज्यात सौर ऊर्जेचा विचार करून धोरणे तयार करण्याचा निर्णय घेतला. आम्ही कालव्यांपर्यंत सौर पॅनल लावले आहेत, त्याविषयी चर्चा विदेशातही केली गेली. ज्यावेळी गुजरातमध्ये सौर ऊर्जेला प्रोत्साहन द्यायला प्रारंभ केला होता, त्यावेळी अनेकजण असेही म्हणत होते की, इतकी महाग वीज घेऊन काय करणार, हे मला चांगले आठवतेय. कारण ज्यावेळी गुजरातने इतके मोठे पाऊल उचलले, त्यावेळी सौर ऊर्जेपासून मिळत असलेल्या या वीजेचा दर 16 रूपये अथवा 17 रुपये प्रति युनिट पडत होता. मात्र भविष्यातल्या शक्यतांचा विचार करून गुजरातने या क्षेत्रात काम करणे सुरू ठेवले. आज हीच वीज गुजरातच नाही तर संपूर्ण देशामध्ये 2रुपये, 3 रुपये प्रति युनिट या दराने विकली जात आहे. गुजरातने त्यावेळी जे काम केले, त्याचा आता लाभ मिळत असल्याचा अनुभव आज देशाला मिळत आहे. गुजरात आज देशाला दिशा देण्याचे काम करत आहे. आज भारत नवीकरणीय ऊर्जा उत्पादनाच्या बाबतीत जगातली चौथी मोठी शक्ती बनला आहे. प्रत्येक हिंदुस्तानीला अभिमान वाटला पाहिजे, मित्रांनो, गेल्या सहा वर्षांमध्ये सौर ऊर्जा, या क्षेत्रातली आमची क्षमता 16 पटींनी वाढली आहे. अलिकडेच एक स्वच्छ ऊर्जा गुंतवणूक क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या स्वच्छ ऊर्जा गुंतवणूक क्रमवारीमध्ये 104 देशांचे मूल्यांकन झाले आहे. आणि त्याचा निकालही आला आहे. जगातल्या 104 देशांच्या सूचीमध्ये पहिल्या तीन देशांमध्ये भारताने स्थान प्राप्त केले आहे. हवामान बदलाच्या विरोधातल्या लढाईमध्ये आता भारत, संपूर्ण दुनियेला दिशा दाखवत असून, या लढाईचे नेतृत्व करीत आहे.

 

मित्रांनो,

एकविसाव्या शतकात ज्याप्रमाणे भारतासाठी ऊर्जा सुरक्षितता महत्वाची आहे, त्याचप्रमाणे, जलसुरक्षाही महत्वाची आहे. आणि मी सुरुवातीपासूनच याबाबतीत कटिबद्धतेने काम करतो आहे की पाण्याच्या अभावामुळे लोकांचा विकास थांबायला नको, ना कोणत्याही क्षेत्राची प्रगती थांबावी. पाण्याबाबत गुजरातमध्ये जे काम झालं आहे, ते आज संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरलं आहे. एक काळ होता, जेव्हा कच्छमध्ये नर्मदा मातेचे पाणी पोचवण्याबाबत बोलले की काही लोक याची खिल्ली उडवायचे. ते असेच म्हणायचे की या तर राजकारणाच्या गप्पा आहेत,असे काही होणार नाही. कधी कधी लोक असेही म्हणत की 600-700 किलोमीटर दूर नर्मदा मातेचं पाणी कसे पोहचू शकेल? असे कधी होऊ शकणार नाही. आज कच्छमध्ये नर्मदेचे पाणीही पोचले आहे आणि नर्मदा मातेचा आशीर्वाद तिथल्या लोकांना मिळतो आहे. कच्छचा शेतकरी असो किंवा मग सीमेवर उभा असलेला जवान, दोघांचीही पाण्याची चिंता दूर झाली आहे. मी इथल्या लोकांचे विशेष कौतुक करेन, ज्यांनी जलसंरक्षणाच्या चळवळीला जन आंदोलनात परीवर्तीत केले. गावागावातून लोक पुढे आलेत, पाणी समित्या तयार झाल्या. महिलांनी देखील मोर्चा सांभाळला, बंधारे बांधले, पाण्याच्या टाक्या बांधल्या, कालवे बनवायला मदत केली. तो दिवस मी कधीही विसरू शकणार नाही, जेव्हा नर्मदा मातेचे पाणी इथे पोचले होते. मला अजूनही नीट लक्षात आहे तो दिवस ! कदचित जगात कच्छ हे एकमेव वाळवंट असेल,जिथे असे नदीचे पाणी पोचले होते. प्रत्येकाच्या डोळ्यांत त्यावेळी आनंदाश्रू  होते! काय दृश्य होते ते ! पाण्याचं महत्त्व काय आहे, हे जेवढं कच्छ मधल्या लोकांना समजू शकतं, तेवढं कदाचितच इतर कोणाला समजू शकेल. गुजरातमध्ये पाण्यासाठी जे विशेष ग्रीड बनवण्यात आले, कालव्यांचे जाळे विणले गेले, त्याचा लाभ आता कोट्यवधी लोकांना होतो आहे.

इथल्या लोकांचे हे प्रयत्न, राष्ट्रीय पातळीवर जल जीवन अभियानाचाही आधार बनले आहेत. देशातल्या प्रत्येक घरात पाईपने पाणीपुरवठा करण्याचे अभियानही जलद गतीने राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत केवळ सव्वा वर्षात सुमारे तीन कोटी घरांपर्यंत पाण्याची पाईपलाईन पोहोचवली गेली. इथे गुजरातमध्येही 80 टक्क्यांपेक्षा जास्त घरांमध्ये नळातून पाणीपुरवठ्याची सुविधा पोहोचली आहे. मला असं सांगण्यात आलं आहे की येत्या काही काळात गुजरातच्या प्रत्येक घरात, पाईपने पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध होऊ शकेल.

 

बंधू आणि भगिनींनो,

पाणी लोकांच्या घरोघरी पोचवण्यासोबतच, पाण्याचे नवे स्त्रोत तयार करणेही अत्यंत आवश्यक आहे. हाच उद्देश घेऊन, समुद्राच्या खाऱ्या पाण्याला शुध्द करून त्याचा वापर करण्याच्या व्यापक योजनेवरही काम सुरु आहे. मांडवी इथे तयार होत असलेला खारे पाणी गोडे करणारा- डीसलायनेशन प्रकल्प, नर्मदा ग्रीड, सौनी नेटवर्क आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, अशा उपक्रमांची व्याप्ती आणि विस्तार वाढवेल. जलस्वच्छतेचा हा प्रकल्प जेव्हा तयर होईल, तेव्हा त्यातून मांडवी शिवाय, मुंद्रा, नखातराना, लखपत आणि अबदासा या भागातल्या लाखो कुटुंबांना लाभ मिळेल. या प्रकल्पामुळे या क्षेत्रात, सुमारे 8 लाख लोकांना दररोज एकूण 10 कोटी लिटर स्वच्छ पाण्याचा पुरवठा होऊ शकेल.आणखी एक लाभ हा ही होईल, की शेकडो किलोमीटर दुरून इथे येणाऱ्या नर्मदेच्या पाण्याचा आपण अधिक चांगला सदुपयोग करु शकू. हे पाणी, कच्छचे इतर तालुके, जसे रापर, भचाऊ, गांधीधाम आणि अंजार या भागातही सुव्यवस्थितपणे पोचू शकेल.

 

मित्रांनो,

कच्छ शिवाय, दहेज, द्वारका, घोघा भावनगर, गीर सोमनाथ या भागातही असे प्रकल्प येत्या काळात सुरु होणार आहेत. मला विश्वास वाटतो की समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या इतर राज्यांनाही मांडवीच्या या प्रकल्पामुळे नवी प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल.

 

बंधू आणि भगिनींनो,

काळ आणि गरजेनुसार परिवर्तन करणे हीच कच्छची, गुजरातची ताकद आहे. आज गुजरातचे शेतकरी, इथले पशुपालक, इथले आमचे मच्छिमार सहकारी आज आधीपेक्षा कितीतरी उत्तम स्थितीत आहेत. याचे आणखी एक कारण हे ही आहे की इथेपारंपरिक शेतीला आधुनिकतेशी जोडले गेले, पिकांच्या वैविध्यावर भर देण्यात आला. कच्छसोबत संपूर्ण गुजरातमधले शेतकरी अधिक मागणी आणि अधिक मूल्य देणाऱ्या पिकांकडे वळले आणि आज त्या क्षेत्रात प्रगती करत आहेत. आता  आपल्या कच्छकडेच बघा ना, इथल्या शेतीत निर्माण होणाऱ्या उत्पादनांची निर्यात होईल, असा कधी कोणी विचार तरी केला असेल का? मात्र आज इथे निर्माण होणारे खजूर, त्याशिवाय कमलम आणि ड्रैगन फ्रूटचे ही उत्पादन अधिकाधिक होते आहे. केवळ दीड दशकांत, गुजरातमध्ये कृषी उत्पादनात दीड पट पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

गुजरात मध्ये कृषी क्षेत्र मजबूत होण्याचे एक मोठे कारण आहे, इथे इतर उद्योगांप्रमाणेच शेतीशी संबंधित व्यापारातही सरकार हस्तक्षेप करत नाही, अडथळे निर्माण करत नाही. सरकारने आपला हस्तक्षेप अत्यंत मर्यादित ठेवला आहे, पूर्ण सूट दिली आहे. आज आपण बघतो की दुग्धव्यवसाय  आणि मस्त्यव्यवसाय या शेतीशी संबंधित दोन क्षेत्रांचा देशात अत्यंत जलदगतीने विकास होतो आहे. खूप कमी लोकांनी त्याचा अभ्यास केला आहे, खूप कमी लोक त्याविषयी लिहितात. गुजरातमधेही दुग्धव्यवसायांचा विकास आणि व्यापक प्रसार यासाठी झाला कारण सरकारकडून कमीत कमी बंधने घालण्यात आली होती. सरकार आवश्यक त्या सवलती देते, बाकी काम एकत्र सहकारी क्षेत्रातील लोक करतात, किंवा आमचे शेतकरी बंधू-भगिनी करतात.आज अंजार ची  सरहद डेअरी याचेच उत्तम उदाहरण आहे. मला आठवतं, मी अगदी सुरुवातीपासून म्हणत असे, की कच्छ मध्ये डेअरी सुरु व्हायला हवी, मात्र मी ज्यांना ज्यांना भेटत असे त्यांच्याशी या विषयावर बोलल्यावर, ते निराशेचा सूर लावत असत. इथे कुठे होणार? ठीक आहे, बघू, असे काहीतरी बोलत असत. मी म्हणत असे, छोट्या प्रमाणावर सुरु करा, बघूया काय होते? ते छोटेसे काम आज कुठे पोचले आहे, बघा. या डेअरीने कच्छच्या पशुपालकांच्या आयुष्यात परिवर्तन करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. काही वर्षांपूर्वी तर कच्छमधून अगदी थोडे दूध प्रक्रिया करण्यासाठी गांधीनगर च्या डेअरीत आणले जात असे. मात्र आता तीच प्रक्रिया अंजार च्या डेअरी  प्रकल्पात  होते आहे. यामुळे दररोज शेतकऱ्यांना येणारा वाहतुकीचा मोठा खर्च कमी झाला आहे. आता सरहद डेअरीच्या स्वयंचलित प्रकल्पाची क्षमता आणखी वाढणार आहे. येत्या काळात, इथल्या डेअरी प्रकल्पात दररोज 2 लाख लिटर अधिक दुधावर प्रक्रिया केली जाईल. याचा लाभ आसपासच्या भागातल्या पशुपालक शेतकऱ्यांना मिळेल. एवढेच नाही, तर नव्या प्रकल्पात, दही, लोणी, ताक, लस्सी, खवा असे दुग्धपदार्थही विकले जाऊ शकतील.

 

मित्रांनो,

दुग्ध व्यवसाय क्षेत्रात ज्या पशुपालकांना लाभ मिळत आहेत त्यात बहुतांश लहान शेतकरीच आहेत. कुणाकडे 3-4 जनावरं आहेत, कुणाकडे 5-7, आणि जवळपास संपूर्ण देशात हीच परिस्थिती आहे.

इथली कच्छची बन्नी म्हैस तर जगप्रसिद्ध आहे. कच्छमध्ये तापमान 45 डिग्री असो कि शून्यापेक्षा कमी. बन्नी म्हैस सगळं विनासायास सहन करते आणि आनंदात राहते. तिला पाणी देखील कमी लागतं आणि चाऱ्यासाठी पायपीट करायचा त्रास देखील होत नाही. हि म्हैस दिवसाला सरासरी जवळ जवळ 15 लिटर दुध देते आणि यातून वर्षाला 2 ते 3 लाख रुपये उत्पन्न मिळतं. मला सांगण्यात आलं आहे, नुकतीच एक बन्नी म्हैस 5 लाखांपेक्षा जास्त रुपयांना विकली गेली, म्हणजे दोन लहान गाड्यांच्या किमतीत एक बन्नी म्हैस मिळते.

 

मित्रांनो,

वर्ष 2010 मध्ये बन्नी म्हशीला राष्ट्रीय मान्यता मिळाली होती. स्वातंत्र्यानंतर अशा प्रकारे राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळणारी हि म्हशीची पहिली जात होती.

 

मित्रांनो,

बन्नी दुधाचा व्यवसाय आणि त्यासाठी कच्छमध्ये तयार झालेली व्यवस्था अतिशय यशस्वी ठरली आहे. देशात इतर ठिकाणी देखील दुध  उत्पादक आणि दुग्ध व्यवसाय करणारे खाजगी आणि सहकारी क्षेत्र एकत्र येऊन उत्तम पुरवठा साखळी तयार झाली आहे. याचप्रमाणे, फळे आणि भाजीपाला व्यवसायात बहुतेक बाजारात सरकारचा थेट हस्तक्षेप नाही.

 

मित्रांनो,

मी हे उदाहरण इतकं सविस्तर यासाठी सांगतो आहे, कारण आजकाल दिल्लीच्या आसपास शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे कारस्थान सुरु आहे. कृषी सुधारणा लागू झाल्या तर त्यांच्या जमिनी बळकावल्या जातील अशी भीती दाखवली जाते आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

मला सांगा, जेंव्हा एखादा डेअरीवाला तुमच्याकडून दुध खरेदीचा करार करतो, तो तुमची गाय-म्हैस घेऊन जातो का? कुणी फळे-भाजीपाला खरेदी करतो, तर तुमची जमीन घेऊन जातो का, तुमची संपत्ती उचलून घेऊन जातो का?

 

मित्रांनो,

आपल्या देशाच्या एकूण कृषी अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसायाचा वाटा 25 टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजे जवळपास 8 लाख कोटी रुपये. दुग्ध उत्पादनांचे एकूण मूल्य, धन्य आणि डाळींच्या एकूण मूल्यापेक्षा देखील जास्त असते. या व्यवस्थेत पशुपालकांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. आज देश विचारतो आहे, हेच स्वातंत्र्य, धान्य आणि डाळी उत्पादन करणाऱ्या लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना का मिळू नये?

 

मित्रांनो,

नुकत्याच झालेल्या कृषी सुधारणांची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. अनेक शेतकरी संघटनांनी, धान्य कुठेही विकण्याचा पर्याय देण्याची मागणी केली होती. आज विरोधीपक्षात असलेले लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, त्यांनी देखील सत्तेत असताना या कृषी सुधारणांचं समर्थन केलं होतं. पण सत्तेत असे पर्यंत ते निर्णय घेऊ शकले नाही, शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देत राहिले. आज जेंव्हा देशाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे, तर हे लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करू लागले आहेत. मी माझ्या शेतकरी बंधू भगिनींना पुन्हा एकदा सांगतो, पुनःपुन्हा सांगतो की त्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन करायला सरकार चोवीस तास तयार आहे. शेतकऱ्यांचे हित, आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. शेतीवर शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा, त्यांना नवनवे पर्याय मिळावेत, त्यांचे उत्पन्न वाढावे, शेतकऱ्यांच्या समस्या कमी व्हाव्यात यासाठी आम्ही सदैव काम केले आहे. मला विश्वास वाटतो, आमच्या सरकारचा प्रामाणिकपणा, आमच्या सरकारचे प्रामाणिक प्रयत्न आणि ज्याला जवळपास संपूर्ण देशाने आशीर्वाद दिले आहेत, देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिले आहेत, मला विश्वास वाटतो की देशभरातल्या शेतकऱ्यांच्या आशीर्वादाची ही शक्ती, जे लोक दिशाभूल करत आहेत, जे लोक राजकारण करत आहेत, जे शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हल्ला करत आहेत, देशातले जागरूक शेतकरी त्यांना नक्कीच पराभूत करतील.

 

बंधू भगिनींनो,

या बरोबरच मी पुन्हा एकदा कच्छचे अभिनंदन करतो. आता थोड्याच वेळात, मी इथे आलोच आहे, तर प्रलोत्सव हे माझ्यासाठी मोठं आकर्षण नेहमीच असतं, कच्छचा वारसा, इथल्या संस्कृतीला नमन करणाऱ्या आणखी एका प्रलोत्सव कार्यक्रमात सहभागी होणार आहे. पुन्हा एकदा ते क्षण जगण्याचा प्रयत्न करणार आहे.  कच्छच्या जगप्रसिद्ध White Desert च्या आठवणी पुन्हा एकदा दिल्लीला घेऊन जाईन. मी नेहमी हीच कामना करेन कि, कच्छ विकासाची नवनवीन शिखरे सर करो. मी पुन्हा एकदा अपणा सर्वांचे अभिनंदन करतो. सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देतो.

खूप खूप धन्यवाद!!

 

M.Chopade/S.Bedekar/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com