Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2020

 

केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी रविशंकर प्रसाद आणि दूरसंचार उद्योग क्षेत्रातले नेते आणि इतर  मान्यवर,

भारत मोबाइल काँग्रेस 2020 मध्ये भाषण करताना मला आनंद होत आहे. दूरसंचार क्षेत्रातले प्रतिभावंत,विचारवंत या  सभेमध्ये एकत्रित आले आहेत. मागील काही काळामध्ये या क्षेत्रातल्या तुमच्यासारख्या प्रमुख मंडळींनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आणि आगामी काळामध्ये भारताला अधिक समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी तुम्ही मंडळीच महत्वाची भूमिका निभावणार आहात, अशी अपेक्षा आहे.

मित्रांनो,

आपण ज्यावेळी कनेक्टिव्हिटी सुधारल्याचा, संपर्क वेगाने, त्वरित होत असल्याचा अनुभव घेतो, त्याचवेळी कोणत्याही कामाला वेग येतोय, असे आपल्याला जाणवत असते. ज्याक्षणी पहिल्यांदा दूरभाषच्या माध्यमातून संपर्क साधला गेला, त्यावेळीही असेच वाटले होते आणि आता आपण त्यापासून खूप पुढे आलो आहोत, खूप मोठा पल्ला आपण पार केला आहे. वास्तविक, आपल्या देशात मोबाइल क्रांतीपूर्वीचा अगदी, गेल्या 10 वर्षापूर्वीचा काळही कसा होता याविषयी आता कल्पना करणे अवघड झाले आहे. आणि आता आपण ज्यावेळी भविष्याचा विचार करायला लागतो त्यावेळी आजची ही कार्यपद्धती आपल्याला आदिवासी युगातली वाटायला लागेल. या संदर्भात आपले जीवनमान कसे सुकर होऊ शकेल, याचा विचार करण्याची गरज असून तशी योजना करण्याची आवश्यकता आहे आणि हे करणे महत्वाचेही आहे. उत्तम आरोग्य सेवा, उत्तम शिक्षण, आणि आमच्या शेतकऱ्यांना उत्तम माहिती आणि चांगल्या संधी, लहान व्यावसायिकांना उत्तम बाजारपेठ मिळवून देणे, ही काही उद्दिष्टये निश्चित केली आहेत, त्यावर कार्य करता येईल.

मित्रांनो

संपूर्ण जगामध्ये महामारीच्या उद्रेक झालेला असताना ही दूरसंचार क्षेत्राच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण पद्धतीने सर्व कामे सुरू होती. अशा अवघड काळामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये राहणारे आई आणि मुलगा केवळ मोबाइलमुळे एकमेकांच्या संपर्कात राहू शकत होते. शाळा आणि वर्ग सुरू नसतानाही विद्यार्थी आपल्या शिक्षकांकडून शिकू शकले. एखाद्या रूग्णाला डॉक्टरांकडून आपल्या घरामधूनच वैद्यकीय सल्ला घेता आला आणि व्यापारी वर्गाला वेगवेगळ्या भागातल्या ग्राहकांशीही जोडणे शक्य झाले.

तुमच्या प्रयत्नांमुळेच एक सरकार म्हणून आम्ही आयटी आणि दूरसंचार क्षेत्राच्या संपूर्ण क्षमतेचा वापर करीत आहोत. इतर नवीन सेवा प्रदात्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या जात असल्यामुळे  भारतीय आय टी सेवा उद्योगाने नवीन विक्रमी उंची गाठली आहे. महामारी संपुष्टात आल्यानंतरही या क्षेत्राच्या वाढीसाठी चालना मिळणार आहे. या नवीन उपक्रमामुळे आयटी सेवा उद्योगाचे लोकशाहीकरण होण्यास मदत मिळाली आणि हा व्यवसाय आता देशाच्या कानाकोप-यापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

मित्रांनो,

आज आपण अशा युगात आहोत, तिथं अगदी अलिकडेच म्हणजे काही वर्षांपूर्वीच आलेल्या मोबाइल अॅप्सनी दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कंपन्यांना मागे टाकले आहे. हे भारतातल्या आणि आमच्या तरूण नवोदितांच्या दृष्टीने एक सुचिन्ह आहे. आपले तरूण अनेक उत्पादनांवर कार्यरत आहेत. त्यांच्या या  कामामध्ये त्यांना जागतिक स्तरावर नेण्याची क्षमता आहे.

बरेच युवक मला सांगतात की, अलिकडच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये विशिष्ट कोड बनवून ते उत्पादन वैशिष्टपूर्ण बनविण्याची संकल्पना उद्योजकांना महत्वाची वाटते. तर गुंतवणूकदारांना भांडवल महत्वाचे वाटते. मात्र बरेचदा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे युवकांनी त्या उत्पादनावर दाखवलेला विश्वास आहेया सगळ्यांचा एकत्रित विचार करून दृढनिश्चयाने कार्य करून व्यवसाय लाभदायक ठरवणे महत्वाचे आहे. त्यामुळे माझ्या या तरूण मित्रांना, माझा संदेश आहे की, तुम्ही सध्याच्या काळात निर्माण झालेल्या  अमर्याद संधी लक्षात घ्या आणि त्याचबरोबर तुमच्या उत्पादनांवर विश्वास ठेवावा.

मित्रांनो,

आज आपल्या देशात अब्जावधींपेक्षा जास्त लोक फोन वापरतात. आज आपल्याकडे एक अब्जापेक्षा जास्त डिजिटल समावेशक असलेले लोक आहेत. आज आपल्याकडे 750दशलक्षांपेक्षा जास्त इंटरनेट वापरकर्ते आहेत. इंटरनेट वापरणा-यांच्या संख्येत होणारी वेगाने वाढ आणि इंटरनेट वापराच्या कालावधीत होणारी वाढ जाणून घेण्यासाठी आपल्याला काही आकडेवारी, माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. सध्या जितके इंटरनेट वापरकर्ते आहेत, त्यापैकी 50टक्के वापरकर्ते गेल्या चार वर्षातले आहेत. 50 टक्के वापरकर्ते आमच्या ग्रामीण भागातले आहेत. आमचे डिजिटल आकारमान आणि डिजिटल गरज अभूतपूर्व आहे. आमच्या देशात जगामध्ये सर्वात कमी दरामध्ये दूरसंचार सेवा उपलब्ध आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ म्हणजे भारत आहे. आमच्या राष्ट्राची डिजिटल क्षमता अतुलनीय आहे. मानवजातीच्या इतिहासात इतक्या प्रचंड वेगाने कोणतीही बाजारपेठ वाढलेली दिसणार नाही.

मोबाइल तंत्रज्ञानामुळेच आम्ही कोट्यवधी भारतीयांना लक्षावधी डॉलर्सची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो. मोबाइल तंत्रज्ञानामुळेच आम्ही महामारीच्या काळामध्ये देशभरातल्या गरीब आणि असुरक्षित लोकांना सरकारकडून त्वरित मदत देऊ शकलो. गेल्या काही  दिवसांमध्ये अब्जावधींचे रोखतेशिवाय- कॅशलेस व्यवहार झाले. यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता आली आता आम्ही टोलनाकेही मानवी संपर्कविहीन करून अधिक सुरळीत, कार्यक्षम करीत आहोत. आताही मोबाइल तंत्रज्ञानाच्या मदतीनेच आम्ही जगातल्या सर्वात मोठ्या कोविड-19 लसीकरणाची मोहीमेचा प्रारंभ करू शकणार आहे.

मित्रांनो,

भारताने मोबाइल उत्पादनाबावत चांगले यश मिळविले आहे. मोबाइल उत्पादनासाठी भारताला सर्वाधिक पसंती मिळत असलेला देश म्हणून उदयास येत आहे. या क्षेत्रामध्ये उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ‘उत्पादन संलग्न प्रोत्साहन’-‘पीएलआय’ योजना सुरू केली आहे. चला तर मग आपण सर्वजण मिळून एकत्र येऊन भारताला  दूरसंचार उपकरणे, डिझाइन,विकास आणि उत्पादन यांचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी कार्य करूया. 

आगामी तीन वर्षांत देशातल्या प्रत्येक गावामध्ये अतिवेगवान संपर्क सुनिश्चित करण्यासाठी फायबर ऑप्टिक केबल टाकण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे. अंदमान आणि निकोबार बेटांना आम्ही याआधीच फायबर ऑप्टिक केबलने जोडले आहे. देशातल्या दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये संपर्क साधने पोहोचणे अवघड आहे, अशा आकांक्षी जिल्हयांना चिन्हांकित केले आहे, त्याचबरोबर दहशतवादी कारवायांनी प्रभावीत असलेली गावे, ईशान्येकडील राज्ये, लक्षव्दीप बेटे यांना जोडण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. दुर्गम भागामध्ये ब्रॉडबँड संपर्क व्यवस्था आणि सार्वजनिक स्थानी वाय-फाय हॉटस्पॉट तयार करण्यासाठी कार्य करण्यात येत आहे.

मित्रांनो,

तंत्रज्ञानामध्ये सातत्याने होत असलेले संशोधन आणि प्रगतीमुळे मोबाइल फोन आणि तत्सम इतर साधने वरचेवर बदलण्याची संस्कृती येत आहे. वाढता इलेक्ट्रॉनिक कचरा ही समस्या हाताळण्यासाठी अधिक योग्य मार्गाचा विचार करून कृती दलाची स्थापना  आणि चक्राकार अर्थव्यवस्था निर्माण करता येईल.

मित्रांनो,

याआधीच मी म्हटल्याप्रमाणे, ही एक सुरूवात आहे. वेगवान तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी मोठी क्षमता आहे. भविष्यात गरूड भरारी घेण्यासाठी आणि लक्षावधी भारतीयांना सक्षम बनविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन 5 जी नियोजित वेळेत कार्यरत होणे सुनिश्चित करण्याची गरज आहे. या संमेलनामध्ये अशा सर्व गोष्टींवर विचारमंथन होईल आणि त्यातून प्रभावी निष्कर्ष निघतील. त्यामुळे या गंभीर, महत्वाच्या क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा  आणि विकासकार्य पुढे जाईलअशी मला आशा आहे.

आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो.

धन्यवाद!!

 

U.Ujgare/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो कराPM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com