Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या ‘आरई -इन्व्हेस्ट 2020’ मध्ये केलेले भाषण


नवी दिल्ली ,  26 नोव्हेंबर 2020

सन्माननीय महोदय-इस्त्रायलचे पंतप्रधान, सन्माननीय महोदय- नेदरलँडचे पंतप्रधान, संपूर्ण जगभरातील माननीय मंत्री, माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि सन्माननीय अतिथी, आपला संदेश सामायिक केल्याबद्दल नेदरलँडच्या  सन्माननीय पंतप्रधानांचे मी आभार व्यक्त करतो.

आपल्या सर्वांना ‘नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूक बैठक आणि एक्सपो  आरई-इन्व्हेस्ट’च्या तिस-या आवृत्तीमध्ये सहभागी होताना पाहणे, एक खूप चांगला अनुभव आहे. याआधीच्या आवृत्तींमध्ये आपण नवीकरणीय ऊर्जेचा मेगावॅट ते गिगावॅटपर्यंतच्या प्रवासाविषयी ,आमच्या योजनांबद्दल चर्चा केली. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी ‘‘वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड अर्थात  एक सूर्य, एक जग, एक  ग्रिडया विषयावरही आपण बोललो होतो. अतिशय अल्प काळामध्ये त्यापैकी अनेक योजना प्रत्यक्षात येत आहेत.

मित्रांनो,

गेल्या सहा वर्षांमध्ये भारताने जो मोठा पल्ला गाठला आहे, तो अतुलनीय आहे. आमच्या देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत वीज पोहोचविणे सुनिश्चित करण्यासाठी आमच्यातील क्षमतांचा पूर्णतेने वापर करून ऊर्जा निर्मितीची क्षमता आणि नेटवर्कही विस्तारण्यात आले आहे. त्याचबरोबर अक्षय-नवीकरणीय स्त्रोतांच्या माध्यमांतून ऊर्जा निर्मितीच्या कार्याचा विस्तारही आम्ही वेगाने करत आहोत. यासंदर्भामध्ये काही तथ्ये आपल्यापुढे सादर करू इच्छितो.

नूतनीकरणयोग्य ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारत आजमितीला जगामध्ये चैथ्या क्रमांकावर आहे. सर्व प्रमुख देशांमध्ये भारत सर्वात वेगाने वृद्धी करणारा  आहे. 136 गिगा वॅटस् नवीकरणीय ऊर्जा निर्मिती करण्याची क्षमता  सध्या भारताकडे आहे. हे प्रमाण एकूण क्षमतेच्या जवळपास 36 टक्के आहे. सन 2022 पर्यंत नवीकरणीय ऊर्जेचा निर्मितीची क्षमता वाढून देशामध्ये 220 गिगा वॅटस् पेक्षाही जास्त वीज निर्मिती या क्षेत्रातून होऊ शकेल.

आपल्याला हे जाणून आनंद होईल की, आमची वार्षिक नवीकरणीय ऊर्जा क्षमता सन 2017 पासून कोळशापासून बनणा-या औष्णिक ऊर्जेपेक्षाही अधिक  आहे. गेल्या सहा वर्षामध्ये आम्ही स्थापित नवीकरणीय ऊर्जा क्षमता अडीच पटींनी वाढविली आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये आमची सौर ऊर्जा प्रकल्प स्थापनेची क्षमता 13 पटींनी वाढली आहे.

मित्रांनो,

हवामान बदलाच्या संकटाशी लढा देण्यासंबंधी भारताची असलेली वचनबद्धता आणि दृढ निश्चय याचे परिणाम म्हणजे आम्ही अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये केलेली उत्कृष्ट प्रगती आहे. सध्या नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचा खर्च  परवडण्यासारखा नसला तरीही आम्ही यामध्ये गुंतवणूक करीत आहोत. आता मात्र आम्ही केलेली गुंतवणूक आणि त्याप्रमाणात नंतर येणारा खर्च कमी होत आहे. जर पर्यावरणाविषयीची धोरणे योग्य असतील तर अर्थशास्त्रही योग्यच ठरते, हे आम्ही जगाला दाखवून देत आहोत. आज, भारत आपले लक्ष्य साध्य करणा-या अगदी मोजक्या देशांपैकी एक आहे.

मित्रांनो,

आम्ही अधिक स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांच्या दिशेने जाण्यापूर्वीच्या संक्रमणअवस्था  असून  तिच्यामागे सर्वाना वीज उपलब्ध  करून देणे,उर्जेची कार्यक्षमता वाढवण्याचे आणि या क्षेत्रात उत्क्रांती / लक्षणीय बदल घडवून आणणे  ही प्रमुख लक्ष्य होती . ज्यावेळी मी सर्वाना वीज उपलब्ध  करून देणे असे संबोधन वापरतो, त्यावेळी  मी जी आकडेवारी वापरतो  यावरून तुम्हाला याची व्याप्ती किती  मोठी  आहे याचा अंदाज आला असेल. गेल्या काही वर्षात  2.5 कोटी म्हणजेच 25 दशलक्ष कुटुंबांना आम्ही विद्युत जोडणी दिली आहे. ज्यावेळी मी ऊर्जा कार्यक्षमता असा उल्लेख करतो, त्यावेळी आम्ही हे अभियान केवळ कोणत्याही एका मंत्रालय अथवा विभागापर्यंतच मर्यादित ठेवले नाही, तर आम्ही हे आमच्या संपूर्ण सरकारचे लक्ष्य सुनिश्चित केले. आम्ही सर्व धोरणे ऊर्जा कार्यक्षमता साध्य करण्यासाठी तयार केली. यामध्ये एलईडी बल्ब, एलईडी पथदीप, स्मार्ट विजेची मीटर्स, विजेवर चालणाऱ्या वाहनांना पाठिंबा देणे, तसेच वीज  वितरणामध्ये होणारी गळती कमी करणे, अशा सर्व गोष्टींचा विचार केला. ज्यावेळी मी ऊर्जा उत्क्रांती असे म्हणतो, त्यावेळी ‘पीएम-कुसुम’ च्या मदतीने आम्ही कृषी सिंचनासाठी सौरऊर्जेवर आधारित कृषिपंपांची सुविधा उपलब्ध करून कृषी क्षेत्राला अधिक बळकट करण्याचे आम्ही लक्ष्य निश्चित केलेले असते.

मित्रांनो,

नवीकरणीय म्हणजेच अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी भारताची जगात ‘एक पसंतीचा देश’ म्हणून सातत्यपूर्ण वाटचाल सुरु आहे. गेल्या सहा वर्षात, सुमारे 5 लाख कोटी किंवा 64 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारतातल्या अक्षय उर्जा क्षेत्रात करण्यात आली आहे. आम्हाला, भारताला अक्षय ऊर्जा क्षेत्रात, जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवायचे आहे.

आपण भारतात अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक का करावी यासाठीची अनेक कारणे मी आपल्याला देईन. अक्षय ऊर्जा क्षेत्रासाठीचे भारताचे धोरण अत्यंत उदार आणि लवचिक आहे. परदेशी गुंतवणूकदार येथे स्वतः गुंतवणूक करु शकतात, किंवा भारतीय कंपन्यांबरोबर भागीदारी करुन इथे अक्षय ऊर्जा आधारित वीजनिर्मिती प्रकल्प स्थापन करू शकतात. अक्षय ऊर्जा स्त्रोतांपासून चोवीस तास वीजपुरवठा करण्यासाठी नाविन्यपूर्ण बोलींवर भारताने आता लक्ष केंद्रित केले आहे. सौर-पवन मिश्र ऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे विकसित करण्यात आले आहेत.

देशांतर्गत विकसित सौर सेल्स आणि मोड्यूल्स ची मागणी येत्या तीन वर्षात 36 गिगा वॅट पर्यंत पोहचू शकेल.या दृष्टीने तंत्रज्ञानात क्रांतीकारक बदल करण्यासाठीची धोरणे आम्ही आणतो  आहोत. एक सर्वसमावेशक राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा अभियान सुरु करण्याचा प्रस्ताव आम्ही मांडला आहे.  इलेक्ट्रोनिक्स वस्तू उत्पादन क्षेत्रात PLI म्हणजेच उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेला उत्तम यश मिळाल्यानंतर आम्ही उच्च क्षमतेच्या सौर मोड्यूल्ससाठीही तशाच प्रकारच्या सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योगसुलभ वातावरण’ निर्माण करण्याला आमचे कायम सर्वोच्च  प्राधान्य राहील, हे ही आम्ही सुनिश्चित केले आहे. गुंतवणूकदारांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी आम्ही सर्व मंत्रालयांमध्ये समर्पित असे प्रकल्प विकास विभाग आणि थेट परदेशी गुंतवणूक विभाग स्थापन केले आहेत.

आज, भारतातील प्रत्येक गाव आणि जवळपास प्रत्यके घरात वीज पोहोचली आहे. उद्या त्यांची विजेची मागणी वाढणार आहे. म्हणजेच, भारतात विजेची मागणी सातत्याने वाढत राहणार आहे. पुढच्या दशकात भारतात, मोठमोठे अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. यातून दरवर्षी सुमारे 1.5 लाख कोटी किंवा 20 अब्ज डॉलर्स इतक्या किमतीच्या मागणीचा उर्जा व्यवसाय निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतात गुंतवणूक करण्याची ही खूप मोठी संधी आहे. मी सर्व गुंतवणूकदार, विकासक आणि उद्योगांना भारताच्या अक्षय उर्जा प्रवासात सहभागी होण्याचे आमंत्रण देतो.

मित्रांनो,

हा कार्यक्रम, भारतातील अक्षय उर्जा क्षेत्रातील हितसंबंधीयांना या क्षेत्रातील सर्वोत्तम जागतिक उद्योगांशी, धोरणकर्त्यांशी आणि अभ्यासकांशी  जोडणारा आहे. मला विश्वास आहे की या परिषदेमध्ये अत्यंत फलदायी आणि सकस चर्चा होईल, ज्यातून भारताला नव्या उर्जा भवितव्याकडे वाटचाल करण्याची संधी मिळेल.

धन्यवाद !!

 

Jaydevi P.S/S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com