नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 24 ऑक्टोबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून गुजरात मधील तीन महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी “किसान सूर्योदय योजने’चे उद्घाटन करतील. तसेच यु एन मेहता हृदयरोगशास्त्र संस्था आणि संशोधन केंद्राशी संलग्न बालहृदय रूग्णालयाचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल. याचवेळी, अहमदाबाद इथल्या शासकीय रूग्णालयात टेली-हृद्योपचार सेवेच्या मोबाईल अॅपचेही उद्घाटन करतील. त्याशिवाय गिरनार येथे नव्या रोपवे चे ही त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
किसान सूर्योदय योजना
कृषी सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी, गुजरात सरकारने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखाली अलीकडेच ‘किसान सूर्योदय योजने’ची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत वीजपुरवठा उपलब्ध होईल. ही योजना 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यासाठी पारेषण पायाभूत व्यवस्था उभारण्यासाठी, 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 66-किलोवॅट च्या 234 पारेषण वाहिन्या, ज्यांचे 3490 किलोमीटर लांबीचे सर्किट तयार केले जाईल त्याशिवाय, 220 KV ची वीज उपकेंद्रे तयार केली जातील.
वर्ष 2020-21 साठी दाहोड, पाटण, महिसागर, पंचमहाल, छोटा उदयपर, खेडा, तापी, वलसाड, आणंद आणि गिर-सोमनाथ या भागांत योजना राबवली जाणार आहे. उर्वरीत जिल्ह्यात 2022-23 मध्ये योजना राबवली जाईल.
यु एन मेहता हृदयरोगशास्त्र संस्था आणि संशोधन केंद्राशी संलग्न बालहृदय रूग्णालय
यु एन मेहता हृदयरोगशास्त्र संस्था आणि संशोधन केंद्राशी संलग्न बालहृदय रूग्णालयाचे आणि अहमदाबाद इथल्या शासकीय रूग्णालयात टेली-हृद्योपचार सेवेच्या मोबाईल अॅपचेही पंतप्रधान उद्घाटन करतील. या विस्तारामुळे, यु एन मेहता आरोग्यसंस्था हृदयरोग उपचारांसाठीची देशातली सर्वात मोठी संस्था ठरली आहे, तसेच जगातील, मोजक्या हृदयरोगशास्त्र विषयक रुग्णालयांमध्ये असलेल्या सर्वोत्तम सुविधा आणि उपचार देखील या रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत.
यु एन मेहता हृदयरोगशास्त्र संस्थेच्या विस्तारीकरणासाठी 470 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येईल. खाटांची संख्या देखील, 450 वरून 1251पर्यंत वाढवली जाणार आहे. यामुळे ही संस्था या देशांतील सर्वात मोठी हृदयरोगशास्त्र विषयक शिक्षणसंस्था आणि जगातील सर्वात मोठ्या सुपर स्पेशालीटी रुग्णालयांपैकी एक होणार आहे.
या इमारतीसाठी भूकंपरोधी बांधकाम,अग्नीरोधक व्यवस्था आणि फायर मिस्ट सारख्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. येथील संशोधन केंद्रात, देशातील पहिला अत्याधुनिक हृदयरोग अति दक्षता विभाग, फिरते आणि अशा सर्व अत्याधुनिक उपरकरण-सुविधांनी सज्ज शस्त्रक्रिया केंद्र, इत्यादी सुविधा असतील. त्याशिवाय 14 शस्त्रक्रिया केंद्र, 7 कॅथेटरिझेशन प्रयोगशाळा देखील सुरु होणार आहेत.
गिरनार रोपवे
पंतप्रधानांच्या हस्ते , 24 तारखेला गुजरातच्या गिरनार मध्ये रोपवे च्या सुविधेचेही उद्घाटन होणार आहे, या नव्या सुविधेमुळे, गुजरात पुन्हा एकदा जागतिक पर्यटनाच्या नकाशावर येण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीला, या रोपवे मध्ये 25 ते 30 केबिन्स असतील, ज्यांची क्षमता, प्रती केबिन/आठ व्यक्ती एवढी असेल. या रोपवे मुळे, 2.3 किलोमीटरचे अंतर केवळ 7.5 मिनिटात पार केले जाऊ शकेल. त्याशिवाय, या रोपवे मुळे, गिरनार पर्वतरांगांच्या हिरव्यागार निसर्गसौंदर्याचे दर्शनही पर्यटकांना होऊ शकेल.
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com