Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताच्या कोविड19 विरुद्धच्या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चौथ्यांदा देशाला उद्देशून भाषण


 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊनचा कालावधी 3 मे 2020 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. आधीचा 21 दिवसांचा लॉकडाऊन आज म्हणजेच 14 एप्रिल 2020 ला संपणार होता.

कोरोनाविरुधाच्या लढाईत देशवासियांना उद्देशून आज केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की सर्व राज्ये, तज्ञ व्यक्ती आणि जनतेकडून आलेल्या सूचनांचा विचार करूनच लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जनतेने पुढच्या काळातही सामाजिक अंतर आणि लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे दक्ष राहून पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ज्या भागांमध्ये आता कोरोनाचा धोका कमी झाला आहे, अशा काही भागांमध्ये 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनचे काही नियम शिथिल केले जाऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले.

मात्र, 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक गाव, प्रत्येक पोलीस ठाणे, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्य अशा सर्व ठिकाणी लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी झाली, नियमांचे किती पालन केले गेले, हे काटेकोरपणे पहिले जाईल. या अग्निपरीक्षेत जे भाग यशस्वी होतील. जे भाग पुढे हॉट स्पॉट श्रेणीतून बाहेर पडतील आणि पुन्हा हॉट स्पॉट मध्ये जाण्याची शक्यता नसेल, त्या भागात काही आवश्यक कामांसाठी लॉकडाऊनच्या अटी 20 एप्रिलनंतर शिथिल केल्या जातील” असेही पंतप्रधानांनी सांगितले.

“मात्र, जर नियमभंग केला, किंवा त्या भागात कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता वाढली, तर शिथिलतेविषयीच्या सर्व परवानग्या रद्द केल्या जातील, असा इशाराही त्यांनी दिला. यासंदर्भात सरकारकडून उद्या सविस्तर मार्गदर्शक तत्वे जारी केली जाणार आहेत.

गरीब आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना लॉकडाऊन मुळे होणारा त्रास लक्षात घेऊन, कमी धोका असलेल्या भागात निर्बंध शिथिल करण्याचा विचार करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

“जे लोक रोजंदारीवर काम करतात, जे आपल्या चरितार्थसाठी रोजच्या मजुरीवर अवलंबून असतात, ते सगळे माझे कुटुंब आहे, त्यामुळे अशा सगळ्या लोकांना या संकटातून बाहेर काढण्याला माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमार्फत अशा सर्वांना जेवढी शक्य आहे, तेवढी सगळी मदत सरकार करत आहे. त्यामुळे, लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्वे निश्चित करतांना, त्यांचे हित सर्वात आधी लक्षात घेतले जाणार आहे.”

आपल्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करत पंतप्रधान म्हणाले, “तुम्हा सर्वांना ज्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे, त्याची मला पूर्ण जाणीव आहे.-काहींना अन्न, काहींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची समस्या, तर काही लोक आपले घर आणि कुटुंबांपासून दूर कुठेतरी अडकले आहेत. मात्र, आपल्या देशासाठी तुम्ही एखाद्या शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहात. हीच “आम्ही भारताचे लोक” या भावनेची शक्ती आहे, हीच एकात्मतेची भावना आपल्या संविधानाने आपल्याला शिकवली आहे. 

देशात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, त्यावेळीच भारताने सजग होत यासंदर्भात सक्रीय पावले उचलली, असे पंतप्रधानांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे स्क्रीनिंग, 14 दिवस विलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य, मॉल्स, क्लब, जिम बंद करण्याचा निर्णय फार लवकर घेण्यात आला. भारताने अगदी योग्य वेळी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला, जो लॉकडाऊन आज संपतो आहे.

जगातील इतर प्रगत, मोठ्या आणि शक्तिशाली देशांमधील कोविड19 च्या प्रसाराची स्थिती बघता, तुलनेने भारतात  चांगली परिस्थिती आहे, असे त्यांनी सांगितले. 

“ एक किंवा दीड महिन्यापूर्वी, अनेक देशांमध्ये कोरोनाची स्थिती भारतासारखीच होती. मात्र आज, या सर्व देशांमध्ये भारताच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या 25 ते 30 टक्क्यांनी जास्त आहे. या सर्व देशांमध्ये अनेकांचे दुर्देवी मृत्यू झाले आहेत. जर भारताने, वेळीच एक सर्वसमावेशक आणि एकात्मिक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला नसता, त्वरित आणि निर्णयक कृती केली नसती, तर भारतातील स्थितीही पूर्णपणे वेगळी राहिली असती.” असेही ते म्हणाले.

लॉकडाऊन लागू केल्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार नियंत्रित आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा खूप मोठा फटका बसणार आहे, हे जरी खरं असलं तरी, देशातील अनेक लोकांची आयुष्ये वाचवण्यासाठी हाच मार्ग योग्य ठरला आहे, असेही त्यांनी संगीतले.

“ अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पाहिल्यास, हे आपल्याला खूप महागात पडेल, असे आता स्पष्ट दिसत आहे, मात्र भारतीयांच्या आयुष्याकडे बघितलं तर दोन्हीची काही तुलनाच होऊ शकत नाही. भारताकडे अतिशय तुटपुंजी साधने असतांनाही आपण निवडलेल्या मार्गाविषयी आज जगभरात चर्चा होते आहे.” असे ते म्हणाले

सध्या देशात, औषधे, आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या काळात आपली आरोग्ययंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले.

“जानेवारी महिन्यात आपल्या देशात कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी फक्त एकच प्रयोगशाळा होती, मात्र आता 220 प्रयोगशाळा आहेत. जागतिक अनुभवावरून असे दिसते की, प्रत्येक दहा हजार रूग्णांसाठी देशात किमान 1500 ते 1600 खाटा उपलब्ध असाव्यात. आज आपल्याकडे एक लाख खाटा तयार आहेत. केवळ एवढेच नाही, तर 600 कोरोना समर्पित रुग्नालाये उभारण्यात आली आहेत. आपण आज जसे बोलतो आहोत, त्यासोबतच, या सुविधा वेगाने उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत

कोरोनाशी लढा देण्यासाठी पंतप्रधानांनी जनतेला सात पावलांचे पालन करण्यास सांगितले. 

 

एक : घरातील ज्येष्ठ व्यक्ती, विशेषतः ज्यांना आधीपासून गंभीर आजार आहेत, त्यांची विशेष काळजी घेणे.

 

दोन: लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या लक्ष्मणरेषेचे काटेकोर पालन करणे.घरात बनवलेल्या मास्कचा न चुकता वापर करणे .

 

तीन: आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे.

 

चार: आरोग्यसेतू app डाऊनलोड करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करणे, इतरांनी app डाउनलोड करण्यास प्रोत्साहन देणे.

 

पाच : गरिबांची काळजी घेणे, त्यांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करणे.

 

सहा : जे लोक स्वतंत्रपणे एकटेच काही व्यवसाय किंवा उद्योग करत आहेत, त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे, त्यांच्या उपजीविकेची काळजी घेणे.

 

सात: देशात कोरोनाविरुध्द पहिल्या फळीत उभे असलेले योद्धे म्हणजे आपले डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी आणि पोलिसांना सन्मान आणि आदर देणे.

*****

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor