पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पेनचे राष्ट्रपती (पंतप्रधानांशी समतुल्य) पेड्रो सान्चेझ पेरेझ-कॅस्टीजॉन यांच्याशी दूरध्वनी द्वारे संवाद साधला. यावेळी उभय नेत्यांनी कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या जागतिक आव्हानावर चर्चा केली.
स्पेनमध्ये कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्युंविषयी पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे आणि ह्या रोगाची लागण झालेल्या लोकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली. मोदी यांनी यावेळी स्पेनच्या पंतप्रधानांना आश्वासन दिले की, भारत स्पेनच्या वीरांच्या प्रयत्नांच्या पाठीशी एकजुटीने उभी आहे आणि सर्वतोपरी पाठिंबा देण्यासाठी तयार आहे.
या जागतिक आरोग्य संकटाशी लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या महत्वावर उभय नेत्यांनी सहमती दर्शवली. कोविड नंतरच्या काळासाठी जगाला एन नवीन मानवकेंद्रित संकल्पना परिभाषित करण्याची आवश्यकता आहे या पंतप्रधान मोदी यांच्या निरीक्षणास स्पेनच्या पंतप्रधानांनी सहमती दर्शवली.
या साथीच्या आजारामुळे घरात बंदिस्त झालेल्या लोकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी योगाभ्यास आणि पारंपारिक वनौषधींचा वापर केला जाऊ शकतो यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
कोविड-19 मुळे समोर येणारी परिस्थिती आणि त्यातून उद्भवणाऱ्या गरजांच्या संदर्भात उभय देशांचे कार्यकारी गट एकमेकांच्या संपर्कात राहतील याबाबत उभय नेत्यांनी सहमती दर्शवली.
U.Ujgare/S.Mhatre/P.Kor