पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिज रॉयल हायनेस प्रिन्स ऑफ वेल्स- प्रिन्स चार्ल्स यांच्याशी दूरध्वनीव्दारे संवाद साधला.
उभय नेत्यांनी कोविड-19 या महामारीविषयी चर्चा केली. गेल्या काही दिवसांमध्ये ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंविषयी पंतप्रधान मोदी यांनी शोक भावना व्यक्त केल्या. अलिकडच्या काळात प्रकृती अस्वास्थातून आता प्रिन्स चार्ल्स पूर्ण बरे झाले आहेत, त्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले आणि त्यांना सदैव चांगले आरोग्य लाभावे अशी कामना केली.
ब्रिटनमध्ये असंख्य भारतीय वास्तव्य करीत आहेत. त्यापैकी अनेकजण तिथल्या राष्ट्रीय आरोग्य सेवेमध्येही आहेत. हे सर्व भारतीय कोविड-19महामारीचा सामना करण्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका निभावत आहेत, त्याबद्दल प्रिल्स चार्ल्स यांनी तिथल्या अनिवासी भारतीयांचे कौतुक केले. इथं असलेल्या भारतीयांच्या धार्मिक आणि सामाजिक संघटना निःस्वार्थ वृत्तीने कार्य करीत असल्याचा उल्लेख प्रिन्स चार्ल्स यांनी यावेळी केला.
सध्याच्या संकट काळामध्ये भारतामध्ये अडकलेल्या ब्रिटनच्या नागरिकांना भारताने ज्या सुविधा आणि जी मदत देवू केली आहे, त्याबद्दल प्रिन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
प्रिन्स चार्ल्स आयुर्वेद या विषयात नेहमीच रूची दाखवतात, त्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार व्यक्त केले. लोकांना मूलभूत योगाभ्यास सोप्या पद्धतीने शिकवण्याच्या उद्देशाने भारताने पुढाकार घेवून एका लघु अॅनिमेशनपटाची निर्मिती केली आहे. यामुळे सर्वांना घरामध्येच अगदी सहजपणे योगासने करून आणि पारंपरिक उपचारांच्या माध्यमातून आपली प्रतिकारशक्ती वाढवणे शक्य होणार आहे, याविषयी पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. सद्यस्थितीमध्ये आरोग्य आणि सर्वांचे कल्याण व्हावे, यासाठी भारताकडून जे प्रयत्न केले जात आहेत, त्याची प्रिन्स चार्ल्स यांनी प्रशंसा केली.
U.Ujgare/S.Bedekar/P.Malandkar