Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी-20 नेत्यांची अभूतपूर्व आभासी शिखर परिषद


कोविड-19 या जागतिक साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी आज जी-20 गटाच्या सदस्य देशांच्या नेत्यांनी आभासी शिखर परिषद घेतली आणि या संकटाचा सामना करण्यासाठी जागतिक पातळीवर समन्वयात्मक उपाययोजना कशा करता येतील, यावर या बैठकीत चर्चा केली. त्याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाच्या राजपुत्रांशी यासंदर्भात दूरध्वनीवरुन चर्चा केली. कोविड-19 या आजारामुळे आलेल्या जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी जी-20 राष्ट्रांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सची बैठक होऊन एक पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ही शिखर परिषद घेण्यात आली.

या साथीच्या आजाराचा सामना करुन, लोकांचे त्यापासून रक्षण करण्यासाठीजे जे शक्य होईल, त्या सर्व उपाययोजना करण्याचा निर्धार सर्व नेत्यांनी व्यक्त केला. या संकटावर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला पाठबळ देण्यावरही सर्वांनी सहमती दर्शवली. यात, वैद्यकीय साधने आणि उपकरणांचा पुरवठा, निदान चाचणी किट्स, उपचारासाठीची औषधे आणि लसपुरवठा करण्यावर चर्चा झाली.

या जागतिक साथीच्या आजाराचे सामाजिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे विपरीत परिणाम शक्य तेवढे कमी करून जागतिक विकासदर राखणे, बाजारपेठेत स्थैर्य आणि संकटात उभे राहण्याची शक्ती कायम ठेवण्यासाठी उपलब्ध असलेली धोरणे आणि उपाययोजना करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सर्व नेत्यांनी यावेळी सांगितले. या आजारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला बसणारा फटका काही अंशी कमी करण्यासाठी 5 त्रिलीयन डॉलर्सची मदत देण्याची तयारी जी-20 राष्ट्रसमुहाने दर्शवली आहे. त्याशिवाय, जागतिक आरोग्य संघटनेने सुरु केलेल्या कोविड-19 मदतनिधीत स्वयंस्फूर्तीने मदत करण्यावरही या परिषदेत सहमती झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही आभासी परिषद आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांनी सौदी अरेबियाच्या शासकांचे आभार मानले. या आजाराच्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. कोरोनाचे 90 टक्के रुग्ण आणि 88 टक्के मृत्यू, जी-20 समूह राष्ट्रांमध्ये झाले आहे. या सगळ्या राष्ट्रांचे जागतिक जीडीपीमध्ये 80 टक्के योगदान असून त्यांची लोकसंख्या जगाच्या 60 टक्के इतकी आहे. त्यामुळेच, या जागतिक साथीच्या आजारावर मात करण्यासाठी जी-20 देशांनी एक ठोस योजना जगापुढे मांडली पाहिजे असा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांनी मांडला.

जागतिक समृद्धी आणि सहकार्य याविषयीच्या आपल्या दृष्टीकोनाच्या केंद्रस्थानी केवळ मानव असायला हवा, असे आग्रही प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केले. त्यामुळे, प्रत्येक देशाने याबद्दलची आपली संशोधने आणि वैद्यकीय प्रगती मोकळेपणे सर्वाना सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. एक प्रतिसादात्मक, मानवी आरोग्य व्यवस्था अंगीकारुन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रोटोकॉलचे पालन करणारी उपचारपद्धती विकसित करायला हवी, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल देशांना या संकटाचा सामना करण्यासाठी मदत करायला हवी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

या नव्या जागतिकीकरणाच्या काळात, सराव मानवजातीच्या कल्याणासाठी सर्व देशांनी पुढे यायला हवे असे सांगत मानवतेच्या हितासाठी एक बहुआयामी व्यासपीठ असावे, अशी सूचना त्यांनी केली.

या शिखर परिषदेच्या समाप्तीच्या वेळी जी-20 नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले. कोरोना विषाणूच्या जागतिक साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी, जागतिक अर्थव्यवस्थेच्या संरक्षणासाठी, व्यापारात आलेले अडथळे दूर करण्यासाठी आणि जागतिक सहकार्य वाढवण्यासाठी एकत्रित आणि सुनियोजित प्रयत्न करण्यावर या निवेदनात भर देण्यात आला.

G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor