Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रु रियांग करारामुळे 35 हजार पेक्षा जास्त शरणार्थींना मदत आणि दिलासा मिळाला आहे-पंतप्रधान


2020 या दशकातल्या आपल्या पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी आज जनतेशी संवाद साधला. ब्रु रियांग करारामुळे मिझोराममधल्या 35 हजारपेक्षा अधिक शरणार्थींना दिलासा मिळाला असून दोन दशकांपासूनची शरणार्थींची समस्या या करारामुळे संपली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

या प्रश्नाविषयी पंतप्रधानांनी सविस्तर चर्चा केली. 90 च्या दशकापासून हा प्रश्न निर्माण झाला आहे. 1997 साली मूळ निवासी संस्कृतीविषयींच्या तणावाखाली मिझारोमच्या ब्रु रियांग या आदिवासी जमातीच्या लोकांना मिझोराम सोडून त्रिपूरा येथे आश्रय घ्यावा लागला होता. या शरणार्थींना उत्तर त्रिपूराच्या कंचनपूर इथल्या शिबिरांमध्ये ठेवण्यात आले होते. आयुष्याचा बराच काळ या सर्वांना या शिबिरांमध्ये घालवावा लागला. शरणार्थी म्हणून राहतांना त्यांना हक्काच्या मूलभूत सुविधांही मिळाल्या नाहीत. 23 वर्ष घर, जमीन, वैद्यकीय उपचार, शिक्षण अशा कोणत्याही सुविधांशिवायच आयुष्य जगले, असे पंतप्रधान म्हणाले.

अनेक सरकारं आली कोणीही या प्रश्नावर तोडगा काढला नाही मात्र, इतकी वर्ष भारतीय संविधानावर अढळ विश्वास ठेवणाऱ्या या शरणार्थींचे पंतप्रधानांनी कौतुक केले. त्यांच्या या विश्वासामुळे अखेर त्यांच्याविषयीचा करार नवी दिल्लीत या महिन्यात होऊ शकला, असे ते म्हणाले.

‘त्यांच्या विश्वासामुळेच त्यांच्या आयुष्यात आता नवी पहाट उजाडणार आहे. या करारामुळे एका चांगल्या प्रतिष्ठीत आयुष्याचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडला गेला आहे. 2020चे हे नवे दशक ब्रु रियांग समुदायाच्या आयुष्यात आशेचा नवा किरण घेऊन आला आहे. ’

या कराराचे लाभ आणि तरतुदींची माहिती पंतप्रधानांनी दिली. सुमारे 34 हजार ब्रु शरणार्थींचे या करारांद्वारे त्रिपूरा येथे पुनर्वसन केले जाईल. केवळ एवढेच नाही तर सरकार त्यांच्या पुनर्वसन आणि विकासासाठी 600 कोटी रुपये मदतही देणार आहे. विस्थापित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला जमिनीचा तुकडा दिला जाईल तसेच घर बांधण्यासाठी मदतही केली जाईल. त्याशिवाय त्यांना अन्नधान्यही पुरवले जाईल. तसेच त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सरकारी योजनांचा लाभही मिळेल.

हा करार सहकार्य संघराज्याच्या तत्वानुसार करण्यात आला आहे. त्यामुळे या कराराचे विशेष महत्व आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृतीमध्ये असलेली मूलभूत संवेदनशीलता आणि करुणेच्या भावनेचे हे मूर्त रुप आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

हिंसा सोडा-मुख्य प्रवाहात परत या

हिंसा हे कुठल्याही प्रश्नावरचे उत्तर असू शकत नाही असे सांगत हिंसा सोडून मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. आसाममधल्या 8 गटांमधले 644 दहशतवादी, दहशतवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करणाऱ्या आसाम राज्याने 644 दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वाचे कामही केले, असे पंतप्रधान म्हणाले. जे हिंसेच्या मार्गावर चालत होते त्यांनी आता शांततेचा मार्ग स्वीकारला असून देशाच्या प्रगतीच्या वाटचालीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

त्रिपुरामधल्याही 80 लोकांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्यास सहमती दर्शवली आहे. तसेच इशान्य भारतातील घुसखोरी देखील कमी झाली आहे, असे ते म्हणाले.

हा प्रश्न सुटण्याचे कारण म्हणजे या प्रदेशातील प्रत्येक व्यक्तीने प्रामाणिकपणे आणि शांततेतून संवादाच्या माध्यमातून सगळे प्रश्न सोडवण्यासाठी उचललेले पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी देशातल्या सर्व जनतेला आवाहन करतो की त्यांनी कधीही आपले प्रश्न सोडवण्यासाठी अस्त्र-शस्त्रांचा वापर करू नये. उलट, प्रश्न सोडवण्याच्या देशाच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, असे ते म्हणाले.

**********

B.Gokhale/R.Aghor/P.Kor