पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील नव्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच एनआयटीच्या नव्या इमारतींच्या उभारणीसाठी 4,371.90 कोटी रुपयांच्या सुधारित निधीला मंजुरी देण्यात आली. वर्ष 2021-22 साठी हा निधी देण्यात आला आहे.
2009 साली या संस्थांची स्थापना करण्यात आली होती. 2010-11 या शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम सुरू झाले. तात्पुरत्या परिसरात अत्यंत कमी जागेत आणि मर्यादित पायाभूत सुविधांमध्ये या संस्था काम करत आहेत. या संस्थांच्या उभारणीसाठी आवश्यक ती जागा मिळण्यास उशीर झाल्यामुळे संस्थेचा कायमस्वरुपी परिसर उभारता आला नव्हता.
सुधारित निधीमुळे या संस्थांना स्वत:ची कायमस्वरुपी जागा मिळू शकेल आणि 31 मार्च 2022 पासून या संस्थांचा कामकाज तेथून चालू शकेल. या सर्व संस्थांमधील विद्यार्थी क्षमता 6,320 इतकी असेल.
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एनआयटी या संस्थांचे विशेष महत्व आहे. उच्च दर्जाच्या तंत्रज्ञान शिक्षणासाठी या संस्था ओळखल्या जातात. तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम दर्जाचे मनुष्यबळ, रोजगाराच्या संधी आणि स्वयं उद्योजकतेला चालना देण्यात या संस्था अग्रणी आहेत.
**********
S.Tupe/R.Aghor/P.Kor