Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

107 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या उटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण


मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना 2020 वर्षाच्या शुभेच्छा देतो. हे वर्ष तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि तुमच्या प्रयोगशाळांमध्ये उत्पादकता घेऊन येवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. नवीन वर्षाच्या आणि नवीन दशकाच्या सुरुवातीचा माझा पहिला कार्यक्रम विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्याशी जोडलेला आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे. हा कार्यक्रम विज्ञान आणि नाविन्याशी जोडलेलया बंगळुरू या शहरांमध्ये होत आहे. माझ्या मागील बंगळुरू भेटीत साऱ्या देशाच्या नजरा चांद्रयान-2 वर खिळल्या होत्या. त्यावेळी आपल्या देशाने विज्ञान, आपला अंतराळ कार्यक्रम आणि आपल्या शास्त्रज्ञांच्या ताकदीचे केलेले कौतुक माझ्या कायम स्मरणात राहील.

मित्रांनो, उद्यानांचे शहर अशी ओळख असलेले बंगळुरू शहर आता स्टार्ट-अप्ससाठी एक अप्रतिम ठिकाण आहे. नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी साऱ्या जगाची पावले येथे वऴत आहेत. संशोधन आणि विकासासाठी पोषक अशी परिसंस्था या शहराने विकसित केली आहे. यात सहभागी होण्याचे प्रत्येक तरुण वैज्ञानिक, नावीन्यपूर्ण संशोधक आणि अभियंत्यांचे स्वप्न असते. पण, या स्वप्नांचा उद्देश फक्त स्वतःची प्रगती किंवा स्वतःची कारकीर्द घडविणे आहे का? नाही. देशासाठी काहीतरी करून दाखविणे, आपल्या यशाने आपल्या देशाचे नाव मोठे करणे हा या स्वप्नांचा उद्देश आहे.

आणि म्हणूनच जेव्हा आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे चालना मिळालेल्या विकासाच्या सकारात्मकतेसह आणि आशावादांसह 2020 वर्ष सुरू करतो, तेव्हा आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलतो.

मित्रांनो, मला असे सांगण्यात आले आहे की, विज्ञान आणि अभियांत्रिकी प्रकाशनांच्या पडताळणीमध्ये जागतिक स्तरावर भारताने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. जागतिक सरासरी वाढीच्या तुलनेत ही वाढ दहा टक्के इतकी आहे. नावीन्यता निर्देशांक क्रमवारीत भारताने 52 व्या स्थानापर्यंत सुधारणा केली आहे हे ऐकून मला अतिशय आनंद झाला आहे. मागील पन्नास वर्षांच्या तुलनेत, गेल्या पाच वर्षांत आपले कार्यक्रम तंत्रज्ञान व्यवसायास पोषक असे वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी झाले आहेत. या कामगिरीबद्दल मी आपल्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो, भारताची विकासगाथा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीवर अवलंबून आहे. भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संकल्पना या क्षेत्रांमध्ये अमूलाग्र क्रांती घडवून आणण्याची गरज आहे. या देशातील युवा वैज्ञानिकांसाठी माझे घोषवाक्य – “इनोव्हेट, पेटंट, प्रोड्यूस एंड प्राँस्पर” अर्थात “संशोधन, स्वामित्व हक्क, उत्पादन आणि समृद्धी असे आहे. ही चार सूत्रे आपल्या देशाला वेगवान विकासाकडे घेऊन जातील. जर आपण नाविन्यपूर्ण संशोधन केले तर आपण पेटंट घेऊ शकतो आणि त्यामुळे उत्पादनक्षमता सुलभ होईल आणि जेव्हा आपण ही उत्पादने आपल्या देशातील लोकांपर्यंत पोहोचवू, तेव्हा ती समृद्ध होतील. लोकांनी, लोकांसाठी केलेले नाविन्यपूर्ण संशोधन हीच “नवभारताची” दिशा आहे.

मित्रांनो, नवभारतला तंत्रज्ञान देखील हवे आहे, तसेच तर्कसंगत दृष्टिकोनही हवा आहे, ज्यामुळे आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाच्या विकासाला आपण नवीन दिशा देऊ शकू. माझे नेहमीच असे मत राहिले आहे की, भारतीय समाजाला जोडण्यात आणि समान संधी उपलब्ध करून देण्यात, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मोठी भूमिका आहे. आता माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भारतातच तयार होणाऱ्या स्मार्टफोन आणि स्वस्त डेटा यामुळे याची विशेषता संपली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विश्वास वाटू लागला आहे की ते वेगळे नाहीत. सरकारशी संलग्न आहेत आणि त्यांचा आवाज ते सरकारपर्यंत पोहोचवू शकतात. अशाच बदलांना आपल्याला प्रोत्साहित आणि बलवान करायचे आहे.

मित्रांनो, यावेळी ‘ग्रामीण विकासातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका’ या विषयावर आपण चर्चा आयोजित केली आहे, म्हणून या क्षेत्राबाबत मी विस्तृत भाष्य करीन. गेल्या पाच वर्षात ग्रामीण विकासातील घडामोडी सामान्य जनतेने पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानापासून आयुष्मान भारतापर्यंत जगातील सर्वात मोठ्या योजना, ज्या आज प्रभावी अंमलबजावणीसाठी वाखाणल्या जात आहेत त्यांच्या मागील शक्ती आहे – तंत्रज्ञान आणि चांगल्या प्रभावी शासनासाठी आपण बांधिल आहोत.

मित्रांनो, आज देशातील प्रशासनात जेवढ्या व्यापक प्रमाणात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर चालू आहे, तेवढा यापूर्वी कधी झाला नाही. कालच आमच्या सरकारने सहा कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे पैसे एकाच वेळी खात्यात जमा करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. हे सर्व कसे शक्य झाले? आधार सक्षम तंत्रज्ञानामुळे .

मित्रांनो, जर देशातील प्रत्येक गावापर्यंत, गरीब कुटुंबापर्यंत शौचालय पोचली आहेत, वीज पोहोचली आहे, तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. लाकडांच्या धुरामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या आठ कोटी गरीब भगिनींची ओळख पटविणे हे तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासोबतच, नवीन विपणन केंद्रे, कोठे आणि किती उभारली गेली आहेत, हे आम्ही अगदी कमी वेळात निश्चित करू शकलो. आज खेड्यांमधील रस्त्यांची कामे वेळेवर पूर्ण होत आहेत, गरीबांकरिता दोन कोटींहून अधिक घरे वेळेवर तयार होत आहेत, तर याच्या मागे तंत्रज्ञान आहे. जिओ टॅगिंग आणि डेटा सायन्सच्या वापरामुळे आता प्रकल्पांची गती अधिक वेगवान झाली आहे. रिअल टाइम मॉनिटरिंग सोयीमुळे योजना आणि त्याचे लाभार्थी यांमधील अंतर आता संपुष्टात येत आहे. वेळेवर काम पूर्ण होण्यामुळे वाढीव प्रकल्प खर्च आणि अर्धवट प्रकल्प मंजूर केल्याबद्दल येणाऱ्या तक्रारी आता संपुष्टात येत आहेत.

मित्रांनो, लालफितीचा कारभार कमी करण्यासाठी आम्ही व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्यावर आणि माहिती-तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर देत आहोत. दलालांच्या दयेवर अवलंबून न राहता, आज, शेतकरी आपली उत्पादने थेट बाजारात विकू शकतात. डिजीटलायझेशन, ई-कॉमर्स, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवा ग्रामीण भागातील लोकांना महत्त्वपूर्ण मदत करीत आहेत. आज, अनेक ई-गव्हर्नन्स पुढाकारांद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या बोटावर हवामान आणि हवामान अंदाज विषयी आवश्यक माहिती मिळत आहे.

मित्रांनो, भारताच्या विकासात, विशेषतः ग्रामीण भागाच्या विकासात तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला अधिक व्यापक करायचा आहे. येणारे दशक भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित शासनासाठी निर्णायक असेल. विशेषतः, किफायतशीर शेती आणि आणि शेतकरी ते ग्राहक यांना सांधणारी पुरवठा साखळी निर्माण करण्यात तंत्रज्ञानाचा खूप मोठा वापर केला जाणार आहे. याचा प्रत्यक्ष फायदा गावांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला होणार आहे. तुम्हा सर्वांना माहीतच असेल की भारतातील ग्रामीण क्षेत्रातील घराघरात पाणी पोचविण्यासाठी एक खूप मोठी मोहीम – जल जीवन मिशन सुरु केली आहे. तंत्रज्ञान हीच या मोहिमेची ताकद आहे. पाण्याचा पुनर्वापर आणि प्रक्रिया करण्यासाठी प्रभावी कार्यक्षम तंत्रज्ञान विकसित कसे केले जाईल हे पाहणे आता आपली जबाबदारी आहे. एक प्रकारे प्राणी प्रशासन आपल्यासाठी नवीन आव्हान आहे. घरातून उत्सर्जित होणाऱ्या पाण्याचा शेतात सिंचनासाठी वापर करण्याची सोय आणि उपाययोजना आपल्याला तयार करावयाच्या आहेत. अधिक पोषण मूल्य असलेली आणि कमी पाणी वापरणारी बीजनिर्मिती आपल्याला करावी लागेल. देशभरात जी मृदा आरोग्य कार्ड दिली गेली आहेत, त्याच्या माहितीचा उपयोग रोजच्या शेतीकामात कसा केला जाईल याचा आपणास नव्याने विचार करावा लागेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुरवठासाखळी मध्ये आपल्या शेतकऱ्यांचे नुकसान होते ते भरून काढण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराने उपाय योजना करणे आवश्यक आहे.

मित्रांनो, आपले एमएसएमई म्हणजे लघु आणि मध्यम उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहेत. बदलत्या काळानुरूप त्यांचे बळकटीकरण तुम्हा सर्वांबरोबर जोडलेले आहे. एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकचे उदाहरण घ्या ना. देशाने आपले पर्यावरण, आपले पशुधन, आपले मासे, आपली माती यांना वाचविण्यासाठी एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिक पासून मुक्ती मिळवण्याचा संकल्प केला आहे. परंतु प्लास्टिकचा स्वस्त आणि टिकाऊ आणि काही नवीन पर्याय आपल्याला शोधावे लागतील. धातु असतील किंवा मातीचे असतील किंवा फायबरचे, प्लास्टिकला नवीन पर्याय आपल्या प्रयोगशाळेतूनच मिळतील. प्लास्टिक कचऱ्या बरोबरच इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून धातु वेगळे काढून त्याचा पुनर्वापर करण्याचे तंत्र विकसित करण्याची गरज आहे.

तुम्ही सुचविलेल्या पर्यायांवर काम करून आपले लघुउद्योजक, आपले कुंभार, आपले काष्ठशिल्पकार ती उत्पादने बनवून बाजारात घेऊन येतील. यामुळे पर्यावरणाची हानी थांबेल आणि आपल्या लघु उद्योगांचा विकासही होईल.

मित्रांनो, गावांमध्ये हरित, सर्क्युलर आणि स्थायी अर्थव्यवस्थेसाठी, ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी समर्पित स्टार्ट- अप्सच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. पिकांचे अवशेष आणि घरातून निघणारा कचरा देखील प्रदूषण आणि अस्वच्छतेसारखी आव्हाने निर्माण करत आहे. या कचऱ्याचे संपत्तीमध्ये परिवर्तन करण्याकरिता आपल्याला वेगाने प्रयत्न करावे लागतील. 2022 पर्यंत कच्च्या तेलाची आयात 10 टक्‍क्‍यांनी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे जैवइंधन इथेनॉल निर्मिती या क्षेत्रांमध्ये स्टार्ट-अप्सच्या साठी विपुल संधी उपलब्ध आहेत.

अशात उद्योगांवर आधारित संशोधनाला आपल्याला अधिक प्रोत्साहन द्यावे लागेल, प्रत्येक हितधारकांमध्ये सुसंवाद वाढवावा लागेल. लक्षात ठेवा, तुमचे हेच योगदान भारताला 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यात मोठी भूमिका पार पाडेल.

मित्रांनो, कृषी पद्धतींना सहाय्यभूत ठरणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये आमूलाग्र क्रांती होण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, पिकांचे खुंट जाळण्याच्या समस्येवर शेतकरी-केंद्रित उपाय शोधू शकू का? उत्सर्जन कमी करून जास्त ऊर्जा कार्यक्षमतेसाठी आपण आपल्या वीटभट्ट्यांचा नवीन आराखडा बनवू शकतो का? देशभरातील शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याच्या समस्येवर आपल्याला चांगले आणि वेगवान निराकरण शोधण्याची आवश्यकता आहे. आगामी काळात आपली माती आणि भूजल साठे यांना उद्योगांमधून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक द्रव्य आणि प्रदूषित घटक यांपासून वाचविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील?

मित्रांनो, रोगनिदानातील आधुनिक उपचारशैली आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वैद्यकीय उपकरणांमधील मेक इन इंडियाचे महत्व मला अधोरेखित करायचे आहे.

महात्मा गांधींनी एकदा म्हटले होते कि “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, सोने आणि चांदीचे तुकडे नाही”. आपल्या कल्याणासाठी आपण केवळ निवडक प्रचलित पारंपारिक ज्ञानाचा वापर न करता, आधुनिक साधने आणि समकालीन बायोमेडिकल जैवविज्ञान संशोधनाची संकल्पना राबवून त्याची व्याप्ती वाढवायला हवी.

निपा, इबोला इत्यादीसारख्या धोकादायक संसर्गजन्य रोगांच्या धोक्यांपासून लोकांना वाचविणे हे आपले ध्येय असायला हवे. 2025 पर्यंत क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आपल्याला अधिक परिश्रम घ्यावे लागतील.

जागतिक स्तरावर, लसींच्या पुरवठ्यात भारत आघाडीवर आहे. 2024 पर्यंत जागतिक स्तरावरील, 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या बायो-मॅन्युफॅक्चरिंग हबच्या रूपात भारताचा विकास करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हे योग्य धोरणात्मक पुढाकार आणि नाविन्यपूर्ण संशोधन, मनुष्यबळ विकास आणि उद्योजकीय परिसंस्थेच्या मदतीने होईल.

मित्रांनो, शाश्वत आणि पर्यावरणाला अनुकूल वाहतूक आणि ऊर्जा साठवण पर्यायांसाठी भारताने दीर्घकालीन कृती आराखडा देखील विकसित केला पाहिजे. आपल्या ऊर्जा पुरवठ्याचे नूतनीकरण आणि विस्ताराकरिता आणि ग्रीड व्यवस्थापनाकरिता दुसरा पर्याय अधिक महत्त्वाचा आहे. यासाठी पृथ्वीवर मुबलक उपलब्ध असणाऱ्या, पर्यावरणास पोषक असलेल्या आणि एकाधिकारशाही नसलेल्या साहित्याचा वापर करून 100 गीगा वॅटच्या मापनावर परवडतील अशा आणि उष्णकटिबंधीय हवामानासाठी योग्य असे नवीन बॅटरी प्रकार विकसित करणे आवश्यक आहे.

मित्रांनो, अचूक हवामान आणि हवामान अंदाज यांचे आर्थिक आणि सामाजिक फायदे अफाट आहेत. हवामान अंदाज आणि इशारा देणाऱ्या सेवांमध्ये विशेषत: उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या बाबतीत बरीच सुधारणा झाली आहे. अशा दुर्घटनांमध्ये जीवितहानीत मोठ्या प्रमाणात झालेल्या घटीमुळे हे सिद्ध होते. अंतराळ संशोधनातील आपले यश आता खोल समुद्राच्या नव्या सीमेवर प्रतिबिंबित केले पाहिजे. आपण पाणी , ऊर्जा, अन्न आणि खनिजांच्या विशाल समुद्री संसाधनांचा शोध, मापन आणि जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. यासाठी मानव संचालित सबमर्सिबिल्स, खोल समुद्र खनन प्रणाली आणि स्वायत्त पाण्याखालील वाहनांमध्ये प्रभुत्व मिळविणे आवश्यक आहे. मी आशा करतो की पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने तयार केलेल्या ‘डीप ओशन मिशन’ च्या माध्यमातून हे शक्य होईल

मित्रांनो,

मी शास्त्रज्ञांकडून शिकलो आहे की संभाव्य उर्जा, उर्जेचे मूक स्वरूप, त्याच्या गतिशील उर्जेमध्ये रूपांतर झाल्यास पर्वत हलवू शकते. आपण गतीमध्ये विज्ञान तयार करू शकतो? संबंधित तंत्रज्ञान, नवकल्पना, स्टार्टअप्स आणि उद्योग यांच्या माध्यमातून अभूतपूर्व सामाजिक-आर्थिक विकासामध्ये आपल्या वैज्ञानिक क्षमतांच्या पूर्ण वापराचा परिणाम कसा होईल याची कल्पना करा. आपल्याकडे हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे वेगवान इंजिन चालविण्यासाठी आणि नवीन भारताच्या संधींना जोडण्यासाठी सामर्थ्य आहे का?

मित्रांनो,

तंत्रज्ञान सरकार आणि सामान्य माणसांदरम्यान दुवा आहे. तंत्रज्ञान हे जलद विकास आणि योग्य विकासात संतुलन राखण्याचे काम करते. तंत्रज्ञानाचा स्वतःचा पक्ष नसतो, ते निष्पक्ष असते. हेच कारण आहे कि जेव्हा मानवी संवेदनशीलता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय वाढतो तेव्हा अभूतपूर्व परिणाम मिळतो. मला पूर्ण विश्वास आहे की नवीन वर्षात, नवीन दशकात, नवीन भारताचा नवीन दृष्टीकोन,आपण सर्वानी मिळून अधिक मजबूत करू. पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना ,संपूर्ण वैज्ञानिक समुदाय आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या शुभेच्छा . खूप खूप-धन्यवाद!

B.Gokhale/S.Kane/D.Rane