Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“प्रधानमंत्री उज्ज्वला योजने”च्या शुभारंभ प्रसंगी बलिया येथे प्रधानमंत्र्यांनी केलेले भाषण

“प्रधानमंत्री उज्ज्वला योजने”च्या शुभारंभ प्रसंगी बलिया येथे प्रधानमंत्र्यांनी केलेले भाषण


मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधु-भगिनींनो,

भृगू महाराजांच्या या भूमीवर तुम्हा सर्वांना प्रणाम, ही भूमी साक्षात भृगू ऋषींची भूमी आहे. ब्रह्मदेवही याच भूमीवर उतरले होते. प्रभू श्री राम देखील या ठिकाणाहूनच विश्वामित्र मुनींबरोबर गेले होते. तेव्हा या सुंदर भूमीवर सर्वांना हात जोडून प्रणाम.

बंधू भगिनींनो मी पहिल्यांदाच बलियामध्ये आलो आहे. बलियाची ही भूमी क्रांतिकारी भूमी आहे. देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी या भूमीचे सुपुत्र मंगल पांडे यांच्या पासून ते चितु पांडे यांच्या पर्यंत प्रत्येक पिढीपर्यंत ही मालिका सुरू राहिली. प्रत्येक कालखंडात या भूमीने देशासाठी जीवन समर्पित करणारे, बलिदान देणारे वीर निर्माण केले. अशा या भूमीला मी नमन करतो. ही तीच भूमी आहे, ज्या भूमीशी श्रीयुत चंद्रशेखर यांचे नाव जोडलेले आहे. हीच ती भूमी आहे जिचे थेट नाते बाबू जयप्रकाश नारायण यांच्याशी आहे आणि हीच ती भूमी आहे. राम मनोहर लोहिया आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या शिवाय उत्तर प्रदेश अपूर्ण वाटतो. असे एका पेक्षा एक दिग्गज ज्या भूमीने दिले त्या भूमीला मी नमन करतो. तुमच्या प्रेमासाठी शत, शत प्रणाम.

तुम्ही मला जितके प्रेम देत जाता तितके माझ्यावरचे ऋण वाढत जाते, वाढतच जाते. पण माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो हे ऋण, प्रेमाचे हे ऋण व्याजासकट फेडण्याचा संकल्प करून मी काम करत आहे आणि व्याजासकट हे ऋण फेडेन, विकास करून फेडेन माझ्या बंधु भगिनींनो, विकास करून फेडेन.

आज एक मे आहे. संपूर्ण जगभरात आजचा दिवस श्रमिकांचा दिवस म्हणून साजरा केला जातो, कामगारांचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जात आहे. आज देशातला हा ‘’पहिल्या क्रमांकाचा कामगार’’ देशाच्या सर्व श्रमिकांचे, त्यांच्या पुरुषार्थाचे, त्यांच्या परिश्रमांचे, देशाला पुढे नेण्यासाठी ते देत असलेल्या निरंतर योगदानाचे कोटी कोटी अभिनंदन करत आहे. या महान परंपरेला प्रणाम करत आहे.

बंधू भगिनींनो जगामध्ये एक घोषणा दिली जात होती. या घोषणेला राजकारणाचा गंध येणे स्वाभाविक होते आणि ती घोषणा सुरू होती. जगातील कामगार एक होते, जगातील कामगारांनो एक व्हा आणि वर्गविरोधी संघर्ष करण्यासाठी कामगारांना एक होण्याचे आवाहन करत होते. बंधू भगिनींनो जे लोक ही विचारसरणी घेऊन वाटचाल करत होते, आज ते जगातील राजकीय नकाशावर ते आपले स्थान हळूहळू हरवत चालले आहेत. 21 व्या शतकात जगातील कामगारांनो एक व्हा या घोषणेवर भागणार नाही. 21 व्या शतकाच्या गरजा वेगळ्या आहेत, 21 व्या शतकातील परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे एकविसाव्या शतकाचा केवळ एकच मंत्र असू शकतो. जगातील श्रमिकांनो, जगातील कामगारांनो चला आपण जगाला एकत्र करूया, जगाला जोडूया. 21व्या शतकाची ही घोषणा असली पाहिजे.

एक काळ होता ज्या काऴात “जगातील कामगारांनो एक व्हा” ही स्थिती होती. आताच्या काळात “जगातील कामगारांनो जगाला एकत्र आणा” ही स्थिती आहे. या मंत्रासोबत झालेला हा बदल आहे. आज जगाला एकत्र आणण्याची गरज आहे आणि जगाला जोडण्यासाठी कोणत्या रसायनाची आवश्यकता असेल, अतिशय मजबूत पकड असणारे सिमेंट काँक्रिटसारखे कोणते बल असेल तर ते म्हणजे कामगार गाळत असलेला घाम. या घामामध्ये एक प्रकारचे वेगळेच सामर्थ्य आहे. जे सामर्थ्य जगाला एकत्र जोडू शकते.

बंधू भगिनींनो तुम्ही लोकांनी भारतीय जनता पक्षाला मोठ्या बहुमताने विजयी केले. तब्बल तीस वर्षांनंतर दिल्लीमध्ये पूर्ण बहुमत असलेल्या सरकारची स्थापना झाली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील सर्व घटकांनी मला आपला नेता म्हणून निवडले. त्यावेळी संसदेच्या केंद्रीय सभागृहात केलेल्या पहिल्या भाषणात मी सांगितले होते, माझे सरकार गरिबांना समर्पित असलेले सरकार आहे. हे सरकार जे काही करेल ते गरिबांच्या चांगल्यासाठी असेल, गरिबांच्या कल्याणासाठी असेल. बंधू भगिनींनो आम्ही कामगारांसाठी देखील असलेल्या श्रम कायद्यामध्ये, श्रमिकांच्या सरकारशी असलेल्या संबंधांमध्ये आमूलाग्र परिवर्तन आणले आहे, अनेक प्रकारचे बदल केले आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो तुम्हाला हे ऐकून दुःख वाटेल, त्रास होईल आणि आश्चर्यही वाटेल की आपल्या देशात सरकारकडून ज्यांना निवृत्तीवेतन मिळत होते, त्यापैकी या देशात 30 लाखांहून अधिक श्रमिक असे होते ज्यांना अतिशय तुटपुंजे म्हणजे काहींना महिन्याला 15 रुपये, कोणाला महिन्याला 100 तर कोणाला महिन्याला 50 रुपये निवृत्तीवेतन मिळत होते. आता मला सांगा हे गरीब वृद्ध लोक निवृत्तीवेतन आणायला कार्यालयात गेले तर त्यांच्या बसच्या भाड्यावर खर्च होत असेल, ऑटो रिक्षाच्या भाड्यासाठी खर्च होईल. पण वर्षानुवर्षे माझ्या देशाला घडवणा-या श्रमिकांना 15 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये निवृत्तीवेतन मिळत होते. आम्ही सत्तेवर आल्यावर या तीस लाख श्रमिकांना मासिक 1000 रुपये निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला आणि लागू देखील केला. त्या गरीब कुटुंबांना निवृत्तीवेतन मिळायला देखील लागले आहे.

बंधू भगिनींनो आपल्याकडे कधी कधी गरिबांसाठी असलेल्या योजनांवर चर्चा तर पुष्कळ होते आणि त्यांच्या कल्याणासाठी कामे करण्याच्या वार्ता देखील भरपूर होतात. आम्ही आल्यानंतर एक श्रम सुविधा पोर्टल सुरू केले. या पोर्टल अंतर्गत आठ महत्त्वाच्या कामगार कायद्यांना एकत्र करून ते सोपे करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. पहिल्यांदाच देशातील कामगारांना लेबर आयडेंटिटी नंबर(लिन) अर्थात कामगार ओळख क्रमांक देण्यात आला. ज्यायोगे आमच्या कामगारांची ओळख तयार होईल. इतकेच नव्हे आपल्या देशातील श्रमिकांना संपूर्ण देशभर संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी एनसीएसपी अर्थात नॅशनल करिअर सर्विस पोर्टल सुरू केले. ज्यांना रोजगार द्यायचा आहे आणि ज्यांना रोजगार मिळवायचा आहे, त्या दोघांमध्येही अतिशय सहजतेने ताळमेळ निर्माण व्हायला या पोर्टलमुळे मदत होईल.

बंधू भगिनींनो बोनसचा कायदा आपल्या देशात अनेक वर्षांपासून आहे. बोनसचा कायदा पूर्वी असा होता की ज्या कायद्यानुसार ज्यांचे उत्पन्न 10 हजारपेक्षा कमी आहे आणि ज्या कंपनीची बोनस द्यायची इच्छा असेल त्या कंपनीत काम करणा-या अशा व्यक्तींनाच बोनस मिळू शकेल. आजच्या काळात दहा हजार रुपये उत्पन्न अगदीच किरकोळ म्हणावे लागेल आणि या अटीमुळेच अनेक श्रमिकांना बोनसपासून वंचित राहावे लागत होते. आम्ही सत्तेवर आल्यावर निर्णय घेतला की किमान वेतनाची मर्यादा 10 हजारावरून 21 हजार करण्यात यावी. इतकेच नव्हे तर पूर्वी बोनस केवळ 3500 रुपयांपर्यंत मिळायचा. आम्ही असा निर्णय घेतला की बोनस किमान 7000 रुपये असेल आणि त्यापेक्षाही जास्त बोनस मिळवण्याचा अधिकार कामगाराला असल्यास तो बोनसही कामगाराला मिळू शकेल.

बंधू भगिनींनो आपला कामगार जेव्हा एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नोकरीसाठी जात असे तेव्हा त्याचे जे भविष्य निर्वाह निधीचे म्हणजे पीएफ वगैरेचे जे काही पैसे कापले जायचे त्याचा कोणताही हिशोब त्याच्याकडे नसायचा. तो बिचारा जुन्या ठिकाणी ते पैसे आणण्यासाठी परत कधी जात नसे. सरकारच्या तिजोरीत अशा प्रकारे जमा झालेले या गरीब कामगारांचे 27 हजार कोटी रुपये पडून आहेत. कोणतेही सरकार याची दखल घ्यायला तयार नव्हते. आम्ही आल्यावर सर्व कामगारांना एका अशा कायद्याच्या कक्षेत आणले ज्या कायद्यानुसार ते कोणत्याही ठिकाणी कामाला गेले तरी त्या त्या ठिकाणी त्यांच्या पीएफचे पैसे देखील त्यांच्या सोबत जात राहतील आणि त्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा तो ते पैसे काढू शकेल. आज या 27 हजार कोटी रुपयांचा तो मालक बनू शकेल, अशी व्यवस्था आम्ही केली आहे.

बंधू भगिनींनो बांधकाम क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने मजूर असतात. चार कोटींपेक्षा जास्त संख्येने मजूर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत आहेत. कोणी इमारती बांधतात, घरे बांधतात. मात्र, त्यांची देखभाल करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. कामगार कायद्यात बदल करून त्यांच्या आरोग्यासाठी, विम्यासाठी, त्यांच्या बँक खात्यासाठी, त्यांच्या निवृत्ती वेतनासाठी एक व्यापक योजना तयार करून आपल्या बांधकाम क्षेत्रातील मजूरांनाही त्याचे लाभ आम्ही दिले आहेत.

बंधू भगिनींनो, ज्या भागाने या देशाला सर्वात जास्त पंतप्रधान दिले त्या उत्तर प्रदेशची गरिबी सातत्याने वाढतच गेली याची कारणे काय असू शकतील. आपल्या धोरणात अशा कोणत्या त्रुटी होत्या ज्यामुळे आपण गरिबांना गरिबीच्या विरोधात लढा पुकारण्यासाठी सक्षम करू शकलो नाही. असे कोणते कारण होते ज्यामुळे आपण गरिबांना केवळ दारिद्रयात जगण्यासाठीच नव्हे तर नेहमीच सरकारकडे हात पसरण्यासाठी भाग पाडले, त्यांच्या स्वाभिमानाला संपुष्टात आणले. गरिबीच्या विरोधात लढा पुकारण्यासाठी आवश्यक असलेला त्यांचा निर्धारच आपण संपवून टाकला. बंधू भगिनींनो आताच धर्मेंद्रजी सांगत होते की गाझीपूरचे खासदारांनी नेहरुंच्या काळात संसदेत सांगितले होते की त्यांच्या उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील बांधव इतक्या गरिबीत जगत आहेत की त्यांच्याकडे खाण्यासाठी अन्नाचा एक दाणाही नाही आणि म्हणून ते काय करतात तर जनावरांचे जे शेण असते ते धुतात आणि त्यातून अन्नाचे जे दाणे निघतात, त्यावर आपले पोट भरून आपली अन्नाची गरज भागवतात. जेव्हा ही गोष्ट संसदेत सांगितली गेली तेव्हा संपूर्ण भारतात खळबळ उडाली आणि इकडची परिस्थिती सुधारण्यासाठी त्या काळात पटेल आयोगाची स्थापना करण्यात आली. पन्नास वर्षांपूर्वी अनेक प्रकारच्या शिफारशी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या शिफारशींचे काय झाले ते देवालाच ठाऊक. बंधू भगिनींनो, त्यामध्ये एक शिफारस करण्यात आली होती. ती शिफारस म्हणजे गाझीपूर, ताडीघाट, महू यांना रेल्वेने जोडण्यात यावे. पन्नास वर्षे उलटून गेली तरी ती शिफारस कागदावरच राहिली. पण मी मनोज सिन्हा यांचे या संदर्भात अभिनंदन करेन. या ठिकाणच्या माझ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांचे अभिनंदन करेन. कारण पन्नास वर्षांपूर्वी ज्या गोष्टींना विस्मृतीत टाकण्यात आले होते, त्या गोष्टींचा त्यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यासाठी ते माझ्यावर दबाव टाकत राहिले. वारंवार माझी भेट घेत राहिले आणि आज मला सांगायला आनंद होत आहे की, त्या रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि ते काम आम्ही सुरू करत आहोत. गंगा नदीच्या वरून आम्ही रेल्वे आणि रस्ते अशा दोन्ही मार्गांसाठी पूल बांधणार आहोत. पायाभूत सुविधा या विकासाची नवी दालने खुली करत असतात आणि त्या दिशेने आम्ही काम करत आहोत.

बंधू भगिनींनो आज बलियाच्या या भूमीवरून देशातील त्या कोटी कुटुंबांना मी माझे मस्तक झुकवून प्रणाम करत आहे, त्यांचे अभिनंदन करत आहे, सुमारे एक कोटी दहा लाखांहून अधिक अशी कुटुंबे आहेत ज्यांना मी सांगितले होते की जर तुम्ही मोठे खर्च करू शकता तर स्वयंपाकाच्या गॅससाठी अनुदान का घेता. वर्षाकाठी तुम्ही पाच दहा हजार रुपयांचा बोजा उचलू शकत नाही का. तुम्ही स्वतःहून अनुदानाचा त्याग करू शकता का. एका कार्यक्रमात मी सहज आपले विचार व्यक्त केले होते. मी त्याबाबत जास्त विचारही केला नव्हता किंवा त्यासाठी काही नियोजन केले होते किंवा त्या योजनेचा पाठपुरावा करण्याची व्यवस्था तयार केली होती. असाच अंतकरणातून एक आवाज आला आणि मी माझे मनोगत जाहीरपणे मांडले. आज केवळ एका वर्षाच्या आत, माझ्या देशातील लोक किती महान आहेत पाहा जर काही चांगले काम असेल तर सरकारच्याही दोन पावले पुढे चालण्याची त्यांची तयारी असते, याचे हे उदाहरण आहे. आजच्या काळात आपण बसमधून प्रवास करत असतो. आपल्या बाजूची जागा रिकामी असेल तर जरा आपण पसरून बसतो. मनात ठरवतो की जरा निवांत पसरून बसून प्रवास करुया. असे बसले असतानांच दुसरा कोणी प्रवासी आला तर आपण त्याला बसायला जागा तर देतो. पण मनात मात्र नाराजी असते. खरे तर आपण आपल्या जागेवर बसलेले असतोच. पण मनातून हा मध्येच कुठून उगवला ही भावना असते. जणू काही त्याने आपलीच जागा बळकावलेली असते. असा काळ आला आहे. अशा काळामध्ये जेव्हा एक कोटी दहा लाखांपेक्षा जास्त कुटुंबे केवळ बोलण्या बोलण्यात पंतप्रधानांनी केलेली सूचना इतक्या गांभीर्याने घेतात आणि ती सूचना शिरोधार्य मानून एक कोटी दहा लाखापेक्षा जास्त कुटुंबे आपल्या अनुदानाचा त्याग करतात यापेक्षा जास्त मोठी गोष्ट काय असू शकते. मी तुम्हा सर्वांना असा आग्रह करतो की त्या एक कोटी दहा लाख कुटुंबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा बहुमान करा. बंधु भगिनींनो मी तुम्हाला हा आग्रह करत आहे कारण हे देशासाठी करण्यात आलेले काम आहे. हे गरीबांसाठी केलेले काम आहे. या लोकांचा जेवढा सन्मान करू तितका कमी आहे आणि आपल्या देशात घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांचा जास्त सन्मान होतो. हे देणारे लोक आहेत. ते जिथे कुठेही असतील, त्यांच्यापर्यंत या टाळ्यांचा गडगडाट पोहोचत असेल आणि त्यांनाही त्यामुळे त्यांचा सन्मान होत असल्याची जाणीव होईल.

बंधू भगिनींनो आम्ही सांगितले होते की, गरीबांसाठी जे अनुदानाचा त्याग करतील, त्या अनुदानाचे पैसे सरकारच्या तिजोरीत जमा होणार नाहीत. ते पैसे गरिबांच्या घरामध्ये जातील. एका वर्षाच्या आत, हा ऐतिहासिक विक्रम आहे बांधवांनो 1955 पासून स्वयंपाकाचा गॅस पुरविण्याचे काम सुरू आहे. इतक्या वर्षात 13 कोटी लोकांना स्वयंपाकाचा गॅस मिळाला. साठ वर्षात केवळ 13 कोटी लोकांना. मात्र, बंधु भगिनींनो आम्ही केवळ एका वर्षात तीन कोटी लोकांना स्वयंपाकाचा गॅस दिला आहे. ज्या लोकांनी अनुदानाचा त्याग केला आहे त्यांचे गॅस सिलेंडरही गरिबांच्या घरी पोचते झाले आहेत.

बंधू भगिनींनो, काही लोक म्हणतात की मोदीजींनी बलियामध्ये कार्यक्रम का घेतला? आपल्या देशाचे एक दुर्दैव असे आहे की येथे काही लोक राजकारणात नसून देखील त्यांना 24 तास राजकारणाशिवाय काहीही दिसत नाही. कोणीतरी लिहिले देखील आहे की मोदी बलियामध्ये कार्यक्रम करून निवडणुकीचे बिगुल वाजवत आहेत म्हणून. बिगुल वाजवायला आले आहेत. माझ्या कृपावंतांनो आम्ही काही निवडणुकीचा बिगुल वाजवायला आलेलो नाही. बिगुल तर मतदार वाजवतात.

बंधू भगिनींनो, गेल्या आठवड्यात मी झारखंडमध्ये एक योजना सुरू करण्यासाठी गेलो होतो. झारखंडमध्ये कोणत्याही निवडणुका होत नाही. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात एक योजना सुरू करण्यासाठी गेलो होतो. तिथेही सध्या निवडणुका नाही होत आहेत. मी ‘’ बेटी बचाओ’’ योजनेची सुरुवात हरियाणापासून केली. तिथे कोणत्याही निवडणुका नाहीत. स्वयंपाकाच्या गॅसचा हा कार्यक्रम बलियामधून सुरू करण्याचा निर्णय यासाठी घेतला कारण उत्तर प्रदेशात प्रत्येक जिल्ह्यात स्वयंपाकाच्या गॅसची जी सरासरी आहे त्याचे प्रमाण बलिया या जिल्ह्यात सर्वात कमी आहे. त्यामुळे मी येथे आलो आहे. हा असा भाग आहे जिथे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणा-या 100 कुटुंबांपैकी जेमतेम आठ कुटुंबांच्या घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस वापरला जातो आणि म्हणूनच बंधू भगिनींनो ज्या ठिकाणी कमीत कमी कुटुंबांमध्ये स्वयंपाकाचा गॅस वापरला जातो त्या बलियामध्ये येऊन मी संपूर्ण देशासमोर ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणामधून मी बेटी बचाओ कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला कारण त्या ठिकाणी बालकांच्या संख्येच्या तुलनेत बालिकांचे प्रमाण अतिशय कमी होते. अतिशय चिंताजनक स्थिती होती. म्हणूनच मी तिथे जाऊन उभा ठाकलो आणि त्या कामासाठी तिथल्या जनतेला प्रेरित केले आणि आज बालिका वाचवण्याच्या मोहिमेमध्ये भारतामध्ये हरियाणा पहिल्या क्रमांकावर आला आहे. म्हणूनच बंधू भगिनींनो पूर्व उत्तर प्रदेशातील या बलियामध्ये मी यासाठी आलो आहे, कारण आपल्याला गरिबीच्या विरोधात संघर्ष करायचा आहे. जर पूर्व भारताने पश्चिम भारताची बरोबरी केली तर या देशात गरिबीचे नावनिशाण शिल्लक राहणार नाही. माझी अशी धारणा आहे, की माझा पूर्व उत्तर प्रदेश, माझा बिहार, माझा पश्चिम बंगाल, माझा आसाम, माझी ईशान्येकडील राज्ये, माझे ओदिशा हे भाग असे आहेत की जिथे विकास गरिबांपर्यंत पोहोचला तर गरिबी विरोधातील आपल्या लढाईला यश मिळू शकेल, बंधूंनो.

तुम्ही मला सांगा, एक काळ असा होता, अनेक लोकांना या स्वयंपाकाच्या गॅसचे काय सामर्थ्य आहे ते अजूनही समजत नाही. अनेक लोकांना या स्वयंपाकाच्या गॅसमागे कोणते राजकारण होते हे देखील आठवत नाही, अनेक लोक स्वयंपाकाच्या गॅसला किती मौल्यवान मानले जात होते हे विसरले आहेत. राजकीय पंडितांना या गोष्टीची मला आठवण करून द्यायची आहे. दिल्लीमध्ये वातानुकूलित केबिनमध्ये बसून चांगले चांगले सल्ले देणा-यांच्या डोळ्यात मला अंजन घालायचे आहे. त्यांना मला हलवायचे आहे. त्यांना समजावून द्यायचे आहे. जरा ते दिवस आठवा जेव्हा खासदार संसदेचे सदस्य बनत होते तेव्हा त्यांना दरवर्षी स्वयंपाकाच्या गॅसची 25 कूपन्स दिली जात होती आणि ते आपल्या भागातील 25 कुटुंबांना वर्षाला स्वयंपाकाचा गॅस देत होते. त्याबद्दल ते एवढा अभिमान बाळगायचे की, मी माझ्या भागातील 25 कुटुंबांना एका वर्षात स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन मिळवून दिले. मी फार लांबची गोष्ट सांगत नाही आहे. अगदी अलीकडच्या काही वर्षातील घटना मी सांगत आहे. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या यायच्या की खासदार महाशयांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या कूपनची काळ्या बाजारात विक्री केली. त्या काळात असेही लोक होते जे हे कनेक्शन मिळवण्यासाठी दहा दहा, पंधरा पंधरा हजार रुपये खर्च करत होते, हे कूपन काळ्या बाजारात खरेदी करत होते. ते दिवस असे होते आणि आज हे सरकार पाहा. एक एक खासदार देशाच्या एका एका संसद सदस्याच्या क्षेत्रात कोणाच्या भागात वर्षभरात दहा हजार गॅस सिलिंडर पोहोचवले जातील, कोणाच्या भागात वीस हजार, कोणाच्या पन्नास हजार आणि तीन वर्षात पाच कोटी गरिबांच्या घरात गॅस सिलिंडर पोहोचवण्याचे माझे उद्दिष्ट आहे. पाच कोटी कुटुंबाच्या घरात बंधु भगिनींनो पाच कोटी कुटुंबांच्या घरात स्वयंपाकाचा गॅस पोहोचवणे हे साधेसुधे काम नाही आहे. एवढे मोठे काम, इतके मोठे काम आज मी गरीब माताभगिनींसाठी घेऊन आलो आहे. तुम्ही पाहिले असेल मी या मातांना काय विचारत होतो ते, की तुम्ही कधी आपल्या घरात स्वयंपाकाचा गॅस येईल याचा विचार केला होता का. त्यांनी मला सांगितले की आम्हाला तर कधीच असे वाटले नव्हते की आपल्या घरात स्वयंपाकाचा गॅस येईल. त्या मला म्हणाल्या की आमच्या मुलांच्या नशिबातही स्वयंपाकाचा गॅस असेल असेही आम्हाला कधी वाटले नव्हते, असा विचारच आम्ही कधी केला नव्हता. मी त्यांना विचारले की स्वयंपाक करण्यामध्ये तुमचा किती वेळ जातो. त्यावर त्यांनी मला सांगितले की लाकडे आणायला जावे लागते. लाकडे जळत रहावी लागतात, ती विझतात. मग कधी कधी चपाती अर्धी कच्ची राहाते. मग पुन्हा लाकडे आणायला जावे लागते. खूपच त्रास सहन करावा लागतो, असे त्या सांगत होत्या. बंधू भगिनींनो स्वयंपाकाचा हा गॅस पाच कोटी कुटुंबांच्या घरात 2019 मध्ये जेव्हा महात्मा गांधीजींची 150 वी जयंती असेल, त्या वेळी गाव आणि गरीबांसाठी पाच कोटी स्वयंपाकाचे गॅस पोहोचते झालेले असतील. निर्धारित कालमर्यादेत काम करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.

एक गरीब माता जेव्हा लाकडे जाळून चुलीवर स्वयंपाक बनवत असते तेव्हा तिच्या शरीरात 400 सिगारेटमधून जितका धूर निघतो तितका धूर जात असतो, 400 सिगारेटचा धूर. लहान मुले घरात असतात आणि त्यांना देखील त्यामुळे या धुरातच राहावे लागते. जेवण देखील धुरामध्येच घ्यावे लागते. सगळीकडे धूरच धूर झालेला असतो. डोळ्यातून पाणी येत असते आणि ते बालक धुरामध्ये जेवत असते. हे सर्व अनुभव मी देखील माझ्या लहानपणी घेतले आहेत. ज्या घरात मी जन्माला आलो ते अतिशय लहान एखाद्या खोपटासारखे माझे घर होते. तिला एकही खिडकी नव्हती. केवळ ये-जा करण्यासाठी दरवाजा होता आणि आई लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करत असायची. काही वेळा तर इतका धूर असायचा की, आई आम्हाला जेवण वाढत असायची पण त्या धुरामध्ये आम्हाला आई दिसायची देखील नाही. अशा प्रकारे बालपणात आम्ही धुरामध्ये जेवायचो. म्हणूनच त्या मातांना होणाऱ्या त्रासाचा, त्या बालकांना होणा-या त्रासाचा पुरेपूर अनुभव घेऊनच, तो त्रास सहन करूनच मी आलो आहे आणि म्हणूनच माझ्या या गरीब मातांना या कष्टप्रद जीवनापासून मुक्ती द्यायची आहे. त्यासाठीच पाच कोटी कुटुंबाना स्वयंपाकाचा गॅस देण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे.

बंधू भगिनींनो आज लाकडामुळे जो खर्च होतो, स्वयंपाकाच्या या गॅसमुळेही खर्च कमीच होणार आहे. तिचे आरोग्य बिघडत राहात होते. आता तिचे आरोग्य ठीक राहिल. लाकडे आणण्यात, चूल पेटवण्यात बराच वेळ जातो. या गरीब मातेचा वेळही आता वाचणार आहे. तिला मोलमजुरी करायची असेल, भाजी विकायची असेल तर ती अगदी सहजपणे ही कामे करू शकणार आहे.

बंधू भगिनींनो आमचा हा प्रयत्न आहे आणि केवळ इतकेच नाही तर या गॅससाठी जे अनुदान दिले जाते ते देखील या महिलांच्या नावाने दिले जाणार आहे. त्यांचे जे प्रधानमंत्री जन धन योजनेचे खाते आहे, त्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, जेणेकरून ते इतर कोणाच्या हातामध्ये पडणार नाहीत, त्याच मातेच्या हातात पडतील याची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी देखील आमचा हा मोठा पुढाकार आहे आणि म्हणूनच बंधू भगिनींनो हजारो कोटी रुपयांचा बोजा सरकारवर पडणार आहे. कुठे खासदारांची स्वयंपाकाच्या गॅसची 25 कूपन्स आणि कुठे पाच कोटी कुटुंबांमध्ये स्वयंपाकाचा गॅस पोहोचवण्याचे अभियान. सरकार-सरकारमध्ये हा फरक असतो. काम करणारे सरकार, गरिबांचे भले करणारे सरकार, गरिबांसाठी त्यांच्या समोर जाऊन काम करणारे सरकार कशा प्रकारे काम करत असते याचे पाच कोटी कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस देण्यासाठी सुरू केलेले हे अभियान उत्तम उदाहरण आहे.

बंधू भगिनींनो, यापूर्वी कोणत्याही सरकारने उत्तर प्रदेशच्या विकासासाठी काम केले नसेल, इतका निधी आज भारत सरकार उत्तर प्रदेशमध्ये गुंतवत आहे. कारण आम्हाला असे वाटते की, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी जी गरीब राज्ये आहेत त्यांनी झपाट्याने प्रगती करावी आणि म्हणूनच आम्ही कामाला लागलो आहोत. गंगेच्या स्वच्छतेचे अभियान जनतेच्या सहभागाने यशस्वी होणार आहे आणि त्यामुळेच या लोकसहभागासाठी प्रत्येक नागरिकाने संकल्प केला पाहिजे. माझी ही बलियाची भूमी तर माता गंगा आणि शरयूच्या तीरावर आहे. दोघींची कृपादृष्टी तुमच्यावर आहे आणि आपण सर्व ज्या ठिकाणी बसलो आहोत ती जागा सुद्धा माता गंगेची कूस आहे. म्हणूनच माता गंगेच्या कुशीत बसून माता गंगेच्या स्वच्छतेचा संकल्प प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे. आपण कधीही गंगा नदीला अस्वच्छ करणार नाही, असे प्रत्येकाने ठामपणे ठरवले पाहिजे. माझ्याकडून कधीही गंगेमध्ये घाण फेकली जाणार नाही. एकदा का आपण हा निर्धार केला की आपण गंगेला कधीही अस्वच्छ करणार नाही, ही माझी माता आहे, या मातेला अस्वच्छ करण्याचे पाप मी करू शकत नाही. जर आपण हा निर्धार पक्का केला तर जगातील कोणतीही ताकद या गंगा मातेला अस्वच्छ करू शकणार नाही.

म्हणूनच माझ्या बंधू भगिनींनो गरीब लोकांचे जीवन बदलण्याची आमची इच्छा आहे. त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत. आज एक मे हा कामगारांचा दिवस आहे. गरीबीत जीवन जगणारी व्यक्ती मजुरीसाठी झगडत राहते. बंधू भगिनींनो, गरिबी हटवण्याच्या घोषणा तर अनेकदा देण्यात आल्या, अनेक आश्वासने देण्यात आली, अनेक योजना आल्या पण प्रत्येक योजना गरिबांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली नाही, प्रत्येक योजना मतपेटीवर नजर ठेवून तयार करण्यात आली. जोपर्यंत मतपेट्यांवर नजर ठेवून योजना तयार केल्या जातील, तोपर्यंत कधीही गरिबीचे उच्चाटन होणार नाही. गरिबांना जेव्हा गरिबीच्या विरोधात संघर्ष करण्याचे बळ मिळेल, तेव्हाच गरिबीचे उच्चाटन होऊ शकेल. गरिबी तेव्हाच हटेल जेव्हा गरीब व्यक्ती हा निर्णय घेऊ शकेल की आता माझ्या हाती साधन आहे आणि मी त्याच्या साहाय्याने या गरिबीला पराभूत करेन. आता मी गरीब राहणार नाही. मी गरिबीतून बाहेर पडेन. त्यासाठीच त्याला शिक्षण मिळाले पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, राहायला घर मिळाले पाहिजे, घरात शौचालय असले पाहिजे, पिण्याचे पाणी असले पाहिजे, वीज असली पाहिजे, हे जर आपण केले तर गरिबीच्या विरोधात लढण्यासाठी माझा गरीब सामर्थ्यवान बनेल. म्हणूनच माझ्या बंधू भगिनींनो आपण गरिबीच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही काम करत आहोत.

स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे उलटून गेली. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटून गेल्यावरही देशात 18 हजार गावे अशी आहेत जिथे विजेचा एक खांबही पोहोचलेला नाही, एक तारही गेलेली नाही. 18 व्या शतकातील आयुष्यासारखे आयुष्य या गावातील नागरिक जगत होते. 21 व्या शतकातही 18 हजार गावांच्या वाट्याला अशा प्रकारचे आयुष्य जगण्याची असहाय्यता आली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो मला सांगा गरिबीच्या नावाने राजकारण करणा-यांनी त्यांच्यासाठी काय काय केले. या 18 हजार गावांमध्ये वीज का नाही पोहोचवली. मी विडा उचलला आहे. लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टला मी घोषणा केली होती की एक हजार दिवसात 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचवेन. रोजचा हिशोब देत आहे, देशवासीयांना आणि आज आपल्या उत्तर प्रदेशातील नागरिक चकित होतील की इतके पंतप्रधान झाले उत्तर प्रदेशातील. आज उत्तर प्रदेश माझे कार्यक्षेत्र आहे. उत्तर प्रदेशाने माझा स्वीकार केला याचा मला अभिमान आहे. उत्तर प्रदेशने मला आशीर्वाद दिले आहेत. मला अभिमान आहे की उत्तर प्रदेशने मला आपलेसे केले आहे आणि म्हणून उत्तर प्रदेशमध्ये इतके पंतप्रधान आले बंधू भगिनींनो तरीही 1529 गावे अशी होती की जिथे विजेचा खांबही पोहोचला नव्हता. आता तर केवळ अडीचशे दिवस झाले आहेत. माझ्या योजनेला अडिचशे दिवस झाले आहेत. बंधू भगिनींनो मी आतापर्यंत 1326 गावांमध्ये, 1529 गावांपैकी 1326 गावांमध्ये खांब पोहोचले, तारा पोहोचल्या, वीज आली आणि लोकांनी या विजेचे स्वागतही केले. आता ज्या गावांमध्ये बाकी आहे तिथे सुद्धा वेगाने काम सुरू आहे. आज उत्तर प्रदेशात सरासरीने आम्ही एक दिवसात तीन गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे काम करत आहोत.

बंधू भगिनींनो, संपूर्ण देशात आज ज्या प्रधानमंत्री उज्वला योजनेचा प्रारंभ होत आहे. माझ्या सव्वाशे कोटी देशवासीयांमध्ये सुमारे 25 कोटी कुटुंबे आहेत. त्यापैकी 5 कोटी कुटुंबांसाठी ही योजना आहे. यापेक्षा मोठी योजना कोणती असूच शकत नाही. पाच कोटी कुटुंबांना कक्षेत आणू शकेल अशी एक योजना असू शकत नाही. अशी योजना आज लागू होत आहे. बलियाच्या भूमीवर होत आहे. राम मनोहर लोहिया, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या आशीर्वादाने होत आहे. चंद्रशेखरजी, बाबू जयप्रकाश यांच्यासारख्या महापुरुषांच्या आशीर्वादाने तिचा प्रारंभ होत आहे आणि बलियाची भूमी आता बलिया बलिया झाली पाहिजे, असा संकल्प घेऊन पुढे चालले पाहिजे. मी पुन्हा एकदा खासदार महाशय भाई भरत यांचे आभार मानतो. इतक्या अपेक्षांनी त्यांनी या कार्यक्रमाची मागणी केली. मी पूर्ण उत्तर प्रदेशचे अभिनंदन करतो. श्रीयुत धर्मेंद्र प्रधान यांच्या पूर्ण टीमचे अभिनंदन करतो. पेट्रोलियम क्षेत्र कधी गरिबांसाठी आहे असे मानले जात नव्हते. आम्ही पेट्रोलियम क्षेत्रालाही गरिबांसाठी बनवले आहे. हा अतिशय मोठा बदल धर्मेन्द्रजींच्या नेतृत्वात झाला आहे. मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करत आहे. मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करत आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करत आहे, अनेक अनेक धन्यवाद.

S.Patil/B. Gokhale