पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रगती मैदानाविषयीच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. एसपीव्ही अर्थात विशेष उद्देश कंपनीला प्रगती मैदानातली 3.7 एकर जमीन 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर 611 कोटी रुपये मूल्यावर हस्तांतरित करण्यासाठी भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेला अधिकार देण्यात आले. पंचतारांकित हॉटेल विकसित करण्यासाठी आणि त्याचे संचालन करण्यासाठी भारतीय पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ विशेष उद्देश कंपनी स्थापन करतील.
आयएफसीसी अर्थात,आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने सुरु असून 2020- 21 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
प्रगती मैदानावर हॉटेल निर्मितीचे काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी एसपीव्ही आवश्यक पावले उचलेल. हॉटेल निर्मिती, संचालन आणि व्यवस्थापन यासाठी पारदर्शी आणि स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे योग्य विकासकाची निवड यांचा यात समावेश आहे.
भारतातली पायाभूत संरचना आणि पर्यटन दर्जेदार राखण्याच्या दृष्टीने, आयटीपीओ प्रगती मैदानाचा पुनर्विकास करून जागतिक दर्जाचे आयईसीसी उभारण्यासाठी हा मोठा प्रकल्प कार्यान्वित करत आहे.
हॉटेल सुविधा ही आयईसीसीचा अविभाज्य भाग असून त्यामुळे जागतिक बैठका, परिषद आणि प्रदर्शन केंद्र म्हणून भारताला प्रोत्साहन मिळणार आहे रोजगार निर्मितीबरोबरच वाणिज्य आणि व्यापाराला प्रोत्साहन मिळणार आहे.
प्रगती मैदानाच्या या रुपांतरणामुळे, दरवर्षी लाखो छोटे व्यापारी भाग घेतात त्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याला फायदा होणार आहे. व्यापार मेळ्यात भाग घेणाऱ्या लोकांच्या संख्येत यामुळे वाढ अपेक्षित आहे. व्यापार विस्तार करण्यासाठी आणि भारतीय वस्तू आणि सेवा यांचा विस्तार करण्यासाठी लोकांना एक मंच उपलब्ध होणार आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor