Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कटरा येथील श्री माता वैष्णो देवी विद्यापीठाच्या पाचव्या पदवीदान समारंभाला पंतप्रधानांचे संबोधन

कटरा येथील श्री माता वैष्णो देवी विद्यापीठाच्या पाचव्या पदवीदान समारंभाला पंतप्रधानांचे संबोधन

कटरा येथील श्री माता वैष्णो देवी विद्यापीठाच्या पाचव्या पदवीदान समारंभाला पंतप्रधानांचे संबोधन

कटरा येथील श्री माता वैष्णो देवी विद्यापीठाच्या पाचव्या पदवीदान समारंभाला पंतप्रधानांचे संबोधन


उपस्थित मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदु असणाऱ्या माझ्या युवा सहकाऱ्यांनो,

आपणा सर्वांच्या आयुष्यात आजचा हा प्रसंग फार महत्वाचा आहे. के जी पासून शिक्षणाला प्रारंभ झाल्यानंतर 20, 22, 25 वर्षे सलग अखंड तपस्येतला हा महत्वाचा टप्पा आहे आणि तरीही तुम्ही तुमचे ध्येय साध्य केले आहे असे तुम्हाला वाटत असेल, असे मला वाटत नाही. आतापर्यंत तुम्हा सर्वांना कोणीतरी येथवर घेऊन आले आहे. आता तुम्हा सर्वांना स्वत:ला कोठेतरी पोहोचवायचे आहे. आतापर्यंत कोणीतरी बोट धरुन तुम्हाला येथवर आणले आहे. आता मात्र तुम्हाला स्वत:चे ध्येय निश्चित करुन स्वत:चा कस पाहत, ते ध्येय प्राप्त करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करत पुढचा मार्ग चालायचा आहे. मात्र तुम्ही येथून काय घेऊन पुढे जाता, त्यावर तुमची पुढची वाटचाल अवलंबून आहे. आपले आयुष्य घडविण्यासाठी आपल्याकडे कोणता खजीना आहे, त्यावर ही वाटचाल अवलंबून आहे. ज्याला हा खजीना मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत नेता येईल, त्याला आयुष्यभर प्रत्येक क्षण, प्रत्येक वळणावर कोठेतरी निश्चितपणे तो कामी येईल. मात्र तो अशाच लोकांसाठी उपयुक्त ठरेल, ज्यांनी येथवर पोहोचायचे निश्चित केले होते.

युवकांना जेव्हा विचारले जाते की त्यांनी पुढे काय करायचे आहे, तेव्हा बहुतेकदा ते सांगतात की, आधी शिक्षण पूर्ण करायचे आहे. ज्याचे विचार इतके सीमित असतात, त्याच्यासाठी आयुष्यात उद्यापासून काय करायचे, असा प्रश्न आ वासून उभा राहतो. मात्र ज्याला आजच्या नंतर काय करायचे, हे निश्चित ठाऊक असते, त्याला कोणाच्याही आधाराची गरज भासत नाही. आई वडील जेव्हा बाळाला जन्म देतात, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. मात्र जेव्हा तेच बालक आयुष्यात यश प्राप्त करते, तेव्हा आई वडीलांना जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर आनंद वाटतोच मात्र त्या बाळाने प्राप्त केलेले यश पाहणे आई वडिलांसाठी फार आनंददायी असते.

आपण कल्पना करु शकता की आपल्या जन्माच्या आनंदाबरोबरच किंवा त्याहून अधिक आनंद त्यांना आपले यश, आपल्या जीवनातील आनंद पाहून होतो, तर आपली जाबाबदारी किती वाढत असेल, आपल्या सर्वांच्या आई वडिलांनी कित्येक स्वप्ने पाहिली असतील आपल्यासाठी.. ती पूर्ण करण्यासाठी किती हाल अपेष्टा सहन केल्या असतील? कधीतरी तुम्हाला काही खरेदी करायचे असेल, कधी मनी ऑर्डरची गरज असेल, बँकेत पैसे हस्तांतरीत करायची इच्छा असेल, अगदी दोन दिवस जरी उशीर झाला तरी तुम्हाला काळजी वाटली असेल की काय झाले असेल, आई-बाबा काय करत असतील? आणि दुसरीकडे आई-बाबा सुद्धा विचार करत असतील की अरेरे, मुलांना दोन दिवस आधी मिळायला हवे हेाते हे… उशीरच झाला. पुढच्या वेळी थोडा आणखी विचार करतील, आपले काही खर्च कमी करतील, पैसे वाचवतील आणि मुलांना वेळेत पैसे पाठवतील. जीवनातला प्रत्येक क्षण जर आपण आठवत गेलो तर आपल्याला समजेल की कोणी किती योगदान दिले आहे, तेव्हाच आपण आयुष्यात काही साध्य करु शकतो, काहीतरी होऊ शकतो, मात्र अनेकदा आपण या गोष्टी विसरुन जातो. ज्या विसरल्या पाहिजेत, त्या गोष्‍टी विसरु शकत नाही. आणि ज्या विसरु नयेत, त्या लक्षात ठेवणे कठीण होते.

आपल्यापैकी अनेकजण असे असतील, ज्यांनी आपल्या आई-बाबांकडून ऐकले असेल की अरे याला तर इंजिनियर बनवायचे आहे, याला डॉक्टर बनवायचे आहे, याला क्रिकेटपटू बनवायचे आहे. काही आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी अशी स्वप्ने पाहिली असतील आणि ती ऐकून ऐकून मुलांच्या मनातही ती स्वप्ने मुरली असतील. इयत्ता दहावीची परीक्षा कदाचित मुश्किलीने पास झाला असाल, पण ती स्वप्ने झोपू देत नसत कारण आई-बाबांनी मनात पेरलेली स्वप्ने कायम राहिली. त्यांचे पुढे फार काही होऊ शकले नाही. आणि मग तुम्ही फिरत फिरत येथे आले असाल. या ठिकाणी आल्यानंतर इतके चांगले विद्यापीठ आहे, इतक्या चांगल्या वातावरणात शिक्षण घेण्याची संधी मिळाली, याचा आनंद फार नाही. मात्र एका गोष्टीचा भास होत असेल की पोहोचायचे होते तिथे, पण पोहोचलो आपण या ठिकाणी ज्याच्या मनात एका ठिकाणी जायचे होते पण भलत्या ठिकाणी पोहोचलो, याचे ओझे सतत कायम असेल, त्याला कधीही आयुष्य मनापासून जगता येणार नाही. आणि त्याचमुळे मी तुम्हाला आग्रह करेन, विनंती करेन की चला ठीक आहे, लहानपणी, नकळतपणे फार विचार केला असेल, पण तसे होता आले नसेल तर ते सर्व आता विसरुन जा. आता तुम्ही जे आहात.तोच वारसा पुढे घेऊन धैर्याने जीवनात पुढे जा, आपल्या आयुष्याला आपोआप अर्थ लागत जाईल.

अडथळे, अयशस्वी होणे, स्वप्ने साकारण्यात आलेल्या समस्या, हे ओझे होऊ नये तर याच गोष्टी पुढे शिक्षण घेण्यास कारणीभूत ठराव्यात, त्यांच्यापासून काही शिकता यावे आणि जर ते शिकता आले तर आयुष्यात आणखी मोठी आव्हाने स्विकारण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. पूर्वीच्या काळी असे म्हटले जायजे की आता सुरुंगातून चालू लागलो मी तर जिथे हा सुरुंग पूर्ण होईल, तिथेच माझे अंतिम उद्दिष्ट असेल. मात्र आता काळ बदलला आहे. मात्र तरीही, आपण सध्या ज्या मार्गावर चाललो आहोत, तिथेच अंत असेल, तोच शेवटचा टप्पा असेल, तिथेच थांबावे लागेल. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर उडी मारुन अन्य कुठेही जाता येईल आणि काही नवी क्षितीजे ओलांडून पुढे जाऊ शकता. हा विश्वास असला पाहिजे, हे स्वप्न असले पाहिजे.

या देशात अनेक विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेत असतील. तुम्ही सुध्दा त्या कोट्यवधी विद्यार्थ्यांमधलेच एक आहात काय? तुम्हीसुध्दा त्या शेकडो विद्यापीठांमधल्या एका विद्यापीठाचे विद्यार्थी आहात काय? मला असे वाटते की तुम्ही विचार करायची पध्दत बदलली पाहिजे. तुम्ही त्या शेकडो विद्यापीठांपैकी एका विद्यापीठाचे विद्यार्थी नाही. तुम्ही त्या कोट्यवधी विद्यार्थ्यांपैकी एक नाही. तुम्ही कोणी वेगळे आहात आणि जेव्हा मी असे म्हणतो, तेव्हा त्याचे तात्पर्य असे की भारतात अशी अनेक विद्यापीठे आहेत जी करदात्यांच्या पैशांवर, सरकारी पैशावर चालतात. हे विद्यापीठ मात्र या सर्वाला अपवाद आहे. कारण हे विद्यापीठ माता वैष्णो देवीच्या चरणांशी जोडलेले आहे. ज्या गरीब लोकांनी माता वैष्णो देवीच्या चरणी हे पैसे अर्पण केले त्यांच्याकडे येथवर घोड्यावरुन येण्याइतके पैसे नव्हते, त्यांचे वय 60-65-70 वर्षे असे असू शकते, ते आपल्या गावाहून येथे पोहोचण्यासाठी प्रवासाचे आरक्षण न करताच निघाले असतील. केरळमधून कन्याकुमारीहून वैष्णोदेवीपर्यंत आले असतील. मातेला काही अर्पण करायचे असेल. एक वेळचे खाणे त्यांनी बंद केले असेल, कारण मातेच्या चरणी काही अर्पण करायचे असेल. अशा गरीब लोकांनी आणि भारताच्या प्रत्येक काना-कोपऱ्यातल्या गरीब लोकांनी, एकाच नाही तर प्रत्येक कोपऱ्यातल्या गरीब नागरिकांनी या माता वैष्णोदेवीच्या चरणी काही ना काही अर्पण केले असेल. जे काही अर्पण केले, तेव्हा मनात विचार आला असेल की, यातून काही पुण्य पदरी पडेल. त्यांनी जे काही अर्पण केले, त्याचा परिणाम पाहा की केवढे मोठे पुण्य कमावण्याचे सौभाग्य त्यांना प्राप्त झाले आहे. त्याचमुळे तुम्हा सर्वांच्या शिक्षणात या विद्यापीठाच्या भिंतीमध्ये, या इमारतीत, या संपूर्ण वातावरणात त्या गरीबांच्या स्वप्नांचा निवास आहे. त्याचमुळे इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत. इतर विद्यापीठापेक्षा आपण वेगळे आहोत. आणि हे उदाहरण फारच दुर्मिळ आहे की जगातल्या कोट्यवधी गरीब भक्तांनी दिलेल्या, अर्पण केलेल्या दोन आणि पाच रुपयांनी एखाद्या विद्यापीठाचे कामकाज चालत असेल. हा खरोखरच एक चमत्कार आहे. आणि त्यामुळे या विद्यापीठाप्रती आपल्या मनातील भावना त्या कोट्यवधी गरीबांप्रतीत आपुलकीचीच असली पाहिजे. मला कोणीही गरीब दिसो मी आयुष्यात कितीही मोठ्या उच्च स्थानी पोहोचेन, पण मला त्यावेळी दिसले पाहिजे की या गरीबांसाठी मी काही केले पाहिजे कारण कोणीतरी गरीब होता, ज्याने एक वेळचे अन्न त्यागून मातेच्या चरणी एक रुपया अर्पण केला होता, जो माझ्या शिक्षणाच्या कामी आला होता. म्हणूनच आज येथून आपण सर्व जात आहात, तेव्हा एका गोष्टीचा आनंद निश्चितच असेल की बस! आता खूप झाले. चला, आता काही क्षण असे जगूया. असे बरेच काही होत असते. मात्र जेव्हा स्वत:च्या हिंमतीवर दिशा ठरवायची असते, निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा आयुष्यात खरी कसोटी सुरु होते.
आता तुम्ही या विद्यापीठाच्या परिसरात काही करत असाल, कोणी तरी असेल तुमचे बोट धरुन तुम्हाला कोणीतरी पुढे चालायला प्रोत्साहन देत असेल. तुमचा सिनियर विद्यार्थी, तुमच्यापेक्षा मोठा विद्यार्थी असला, तरी तो सुद्धा सांगत असेल की नको, तू असे करु नको, तू या गोष्टींची काळजी घे, सर्व ठीक होईल. अरे, या परिसराच्या बाहेर एखादा चहावाला असला, तर तो सुद्धा सांगत असेल, की बाबा रे, आता खूप रात्र झाली. जास्त अभ्यास करु नकोत, जरा झोप घ्या, सकाळी तुमची परीक्षा आहे. एखाद्या प्यून ने सुद्धा सांगितले असेल की अरे बाबा, असे करु नका, आपले विद्यापीठ आहे, असे का करता… अशा कित्येक लोकांनी तुम्हाला मार्ग दाखवला असेल….

केवळ वर्गातील तुमच्या प्राध्यापकाने नाही, केवळ डीनने नाही, तर परिसराच्या आत असलेल्या कित्येक लोकांनी तुम्हाला पुढे चालायला मदत केली असेल. पण आता चला चला, क्लासची वेळ झाली, असे सांगायला कोणी नसेल. अरे, ते काम पूर्ण झाले का, असे विचारणारेही आता कोणीच नसेल. आता तुम्हाला विचारणारे कोणीच नसेल आणि जेव्हा आपल्याला विचारणारे कोणी नसते, सांगणारे कोणी नसते तेव्हा आपल्या आयुष्यात कसोटीचा काळ सुरु होतो, तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी आठवतात. तुमच्यापैकी जर कोणी शिक्षकी पेशात जाईल आणि वर्गात जेव्हा विद्यार्थ्यांना काही शिकवू लागेल. एखादा विद्यार्थी, एखादा तिरका प्रश्न विचारेल, तुमचे डोके भंडावून सोडेल, तेव्हा तुम्हाला हा वर्ग आठवेल. अरेच्चा शिक्षक जेव्हा शिकवत होते, तेव्हा आपण मागे बसून मस्ती मजा करत होतो, आज ही मुले मी शिकवताना मस्ती करत आहेत. प्रत्येक क्षण तुम्हाला आठवत राहील. खरेतर आयुष्यातल्या कोणत्याही वळणावर थांबा आणि पाहा… आत्ताच मेहबूबाजी त्यांच्या लहानपणाबद्दल सांगत होत्या, त्यांच्या शालेय आयुष्यातल्या आठवणींना उजाळा देत होत्या आणि त्यांचेही स्वप्न आहे की ते सारे क्षण पुन्हा एकदा सापडावे. ते त्या पुन्हा पुन्हा आठवत राहतात. कारण या नियमित मार्गावर जे काही कमावले आहे, आयुष्याची गुजराण त्यावरच करायची आहे. काही जण असेही असतील जे या आधारे आणखी काही नवे प्राप्त करत जातील, मात्र जास्तीत जास्त लोक असाच विचार करतात की चला, ठीक आहे, एवढे मिळाले ना, इतक्यात भागेल सारे काही. आपल्या देशात दीक्षांत समारंभाची फार जुनी परंपरा आहे. बहुतेक संपूर्ण मानव वंशाच्या इतिहासात सर्वात पहिला दीक्षांत समारंभ वेद कालात आढळून येतो, ज्याचा उल्लेख मतय उपनिषदात, आला आहे आणि त्यात पहिल्यांदाच दीक्षांत समारंभाची संकल्पना साकार झाली आहे.

भारतामध्ये ही प्रथा हजारो वर्षांपासून संस्थात्मक स्वरुपात अस्तित्वात आहे. एका अर्थाने दीक्षांत समारंभ हा शैक्षणिक समारंभ नसतो. त्यामुळे तुमच्यापैकी कोणालाही शिक्षण देण्याचा मला अधिकार नाही. हा दीक्षांत समारंभ आहे. जे शिक्षण आम्ही प्राप्त केले, जे ज्ञान आम्ही अर्जित केले त्याला समाजासाठी, जीवनाला दीक्षेसाठी समर्पित करण्याच्या दिशेने आम्ही पावले उचलली पाहिजेत. ज्ञानाचे हे धन समाजाच्या चरणी ठेवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. आपला हा देश विकासाची नवी शिखरे गाठतो आहे. ज्या देशात 35 वर्षापेक्षा कमी वयोगटातील 800 दशलक्ष युवक असतील, त्याने मनात आणले तर काय अशक्य आहे त्याला? प्रत्येक युवकाचे स्वप्न हे देशाच्या प्रगतीला कारणीभूत ठरु शकते. आम्ही असे लोक आहोत ज्यांनी उपनिषदापासून उपग्रहापर्यंतचा प्रवास केला आहे. आम्ही उपनिषदापासून उपग्रहापर्यंत पोहोचण्याचा प्रवास करणारी माणसे आहोत. आम्ही अशी माणसे आहोत ज्यांनी गुरुकुलापासून विश्वकुला पर्यंत प्रवास केला आहे. आम्ही असे लोक आहोत आणि भारताचे असे नवयुवक आहोत.

प्रत्येकाला अनेक वेळा अपयशाचा सामना करावा लागला. मात्र हे भारताचे युवक होते, भारताची बुद्धिमत्ता होती. मंगळ ग्रहावर जाण्यासाठी जगभरातील देश प्रयत्नशील होते. मात्र भारत या बाबतीत पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहिम यशस्वी राबवू शकला. आपण सारे गरीब देशाचे नागरिक आहोत. गरीबीतून मार्ग कसा काढायचा, हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. मंगळ मोहिमेसाठी किती खर्च आला? या ठिकाणाहून कटरा येथे जायचे असेल, तर कदाचित एक किलोमीटर अंतरासाठी 10 रुपये आकारले जातील. मात्र आमच्याकडे वैज्ञानिकांची दृष्टी आहे. या देशाची बुद्धिमत्ता पाहा की मंगळ मोहिमेचा एकूण खर्च प्रतिकिलोमीटर 7 रुपये इतका किंवा त्यापेक्षा कमी आला. इतकेच नाही तर हॉलीवूडमध्ये जे चित्रपट तयार केले जातात, त्यापेक्षा कमी पैसे खर्च करुन माझ्या भारताच्या नवयुवकांना मंगळ मोहिमेवर यशस्वी पाऊल टाकता आले. ज्या देशाकडे ही बुद्धिमत्ता आहे, सामर्थ्य आहे, त्या देशाला स्वप्न पाहण्याचा हक्कसुद्धा निश्चितच आहे. जगाला काही द्यावे, अशी इच्छाही अशा देशाकडे असते. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वत: तुम्ही सामर्थ्यवान व्हा, तेच तुमचे कर्तव्य असते. आणि त्या कर्तव्याचे पालन करण्यासाठी आज आम्ही देशासाठी काय करु शकतो, याचा विचार करतो आणि जे ठरवले, ते साध्य करण्याचा प्रयत्न करतो, असे करुन बघा, तुमच्या आयुष्यातील समाधान कित्येक पटींनी वाढल्याचे दिसेल. तुम्ही येथून अनेक स्वप्ने घेऊन बाहेर पडत आहात. आपण काहीतरी होऊन दाखवू, असा निर्धार केलेली स्वप्ने वास्तवात खरी होत नसतील, असे मला वाटत नाही. मात्र कधी तरी अशी स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत तर मन निराश होते. तुम्हाला जे करायचे आहे, ते निश्चितच करा पण मी सुरुवातीला सांगितले, त्यानुसार तुम्हाला जे करायचे आहे, पण करता येत नसेल, तर त्याचे ओझे वाटू लागते. मात्र एखादे स्वप्न पूर्णत्वाच्या दिशेने निघाले की एक अनोखे समाधान लाभते, एक नवी उर्जा प्राप्त होते, आयुष्याला एक नवी गती मिळते. एक नवे आव्हान मिळते, नवे सिद्धांत, नवे आदर्श सापडतात आणि त्या सर्वामुळेच आयुष्य पुढे चालत राहते. आज माता वैष्णो देवीच्या चरणांपासून तुम्ही शिक्षण-दीक्षा प्राप्त करुन पुढच्या प्रवासाला निघाले आहात. मातेलाही आनंद होतो की मुलींनी तर कमालच केली. असेही होऊ शकते की काही काळानंतर पुरुष आरक्षणासाठी आंदोन केले जाईल, ते सुद्धा एखादी मागणी घेऊन पुढे येतील, अगदी आमच्यासाठी सुवर्णपदक आरक्षित ठेवा, अशी मागणीही करतील.

कालच भारताच्या एका सुकन्येने दीपीकाने भारताचे नाव सगळ्या जगात पोहोचविले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तिची निवड झाली आणि तिच्यामुळे भारताला जिम्नॅस्टिक प्रकारात प्रतिनिधित्व प्राप्त झाले आहे. अशा काही गोष्टी आहेत, असे काही प्रसंग आहेत, जे देशाचे मनोधैर्य उंचावतात, देशाला सामर्थ्य प्रदान करतात. हा प्रसंग या एका कोपऱ्यातला आणि त्या तिथे आहे त्रिपुरा नावाचा छोटासा भू भाग. काय स्रोत असतील तेथे, ज्यांच्या जोरावर ती मुलगी रियो येथे पोहोचू शकली? नाही, ती स्रोतांमुळे नाही, तर संकल्पामुळे निश्चयामुळे तेथवर झेप घेऊ शकली. तीला भारताचा ध्वज उंच उभारायचा आहे, दृढ निश्चय आहे, म्हणून ती तेथवर पोहोचली. त्याचमुळे व्यवस्था, सोयी, सुविधा या गोष्टीच आयुष्यात सर्वस्व नसतात, हे लक्षात येते. आयुष्यात जे लोक यशस्वी ठरले आहेत, त्यांचा इतिहास पाहा. ज्या अब्दुल कलाम आजाद यांनी एस. विद्यापीठाचा शुभारंभ केला होता, त्यांनी कधी तरी वर्तमानपत्रे विकली होती आणि नंतरच्या काळात ते मिसाइल मॅन म्हणून ओळखले गेले. आयुष्य घडविण्यासाठी सुख, सुविधा, संधी, व्यवस्था या सर्व बाबी एकत्रित मिळू शकतीलच, असे नाही. तुमच्याकडे धैर्य असले पाहिजे. सर्व गोष्टी आपोआप होऊ लागतात आणि मार्गही समोर येऊ लागतात. दशरथ मांझीची कहाणी आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहे. तो बिहारमधला एक गरीब शेतकरी, शिक्षणसुद्धा घेतले नव्हते त्याने. मात्र त्याने निर्धार केला एक रस्ता घडविण्याचा आणि त्याने तो बनवला, त्याचा इतिहास झाला. तो केवळ एक रस्ता नव्हता, तर भारतीय, मानवीय पुरुषार्थाचा एक नवा इतिहास होता. आणि त्याचमुळे अवघ्या आयुष्यात तो या सर्व बाबींचा हिशेब मांडत राहिला असे झाले असते, तर बरे झाले असते, तसे झाले असते, तर बरे झाले असते. बहुतेक असे असावे की ज्यांच्याकडे सर्व सुविधा आहेत, त्यांना भविष्यात जे व्हायची इच्छा आहे, ते सहज शक्य होते. अनेकजण असे असतात की ज्यांना वारसा हक्काने बरेच काही मिळते. पण असेही अनेक लोक असतात ज्यांच्या गाठीशी काहीच नसते. मात्र तरीही ते स्वत:च्या सामर्थ्यावर आपले नवे जग उभे करतात. त्याचमुळे जर खरी शक्ती म्हणून काही असेल आणि एकविसाव्या शतकाला ज्याची गरज आहे, तर ती आहे ज्ञानशक्ती संपूर्ण जगात ज्याच्याकडे ज्ञानशक्ती असेल तोच एकविसाव्या शतकात नेतृत्व करेल. एकविसावे शतक हे ज्ञानाचे युग आहे आणि भारताचा इतिहास असे सांगतो की जेव्हा जेव्हा ज्ञान युगात प्रवेश केला, त्या प्रत्येक वेळी भारताने अवघ्या विश्वाचे नेतृत्व केले आहे. एकविसावे शतक हे ज्ञानाचे शतक आहे.

विश्वाचे नेतृत्व करण्यासाठी भारताकडे ज्ञानाचे संकुल आहे आणि आपण सर्व आहात, आपण सर्व ज्ञानाचे वाहक आहोत. तुम्ही असे कोणी आहात ज्यांच्याकडे उर्जा स्वरुपात ज्ञान आहे आणि जे देशासाठी काही करण्याचे सामर्थ्य अंगी बाळगतात. या दीक्षांत समारंभात आपल्या आयुष्याबद्दल विचार करताना, ज्यांच्यामुळे मी जीवनात काही प्राप्त केले आहे, त्यांच्या कल्याणासाठीही मी काही विचार करेन, काही कार्य करेन आणि मला त्याच मुळे आयुष्यात समाधान लाभेल. खरे सांगायचे तर आयुष्यात समाधानापेक्षा मोठी ताकत नाही. समाधानात एक स्वयंपूर्ण आंतरऊर्जा आहे. ही आंतरऊर्जा आपण आपल्यामध्येच जपायची असते. मला मेहबूबाजींची एक बाब मनापासून आवडली की येथील लोकांसाठी आपण असे लोक आहोत, जे त्यांचे विचार जगभरात पोहोचवणार आहोत. हे किती चांगले लोक आहेत, यांची परंपरा किती महान आहे. यांचे वागणे बोलणे किती औदार्याचे आहे, त्यांनी कशा प्रकारे निसर्गाच्या सोबतीने जगणे शिकून घेतले आहे आणि एका राजदूताच्या रुपात मी जम्मू काश्मीरच्या या महान धरतीची वैशिष्ट्ये, भारत मातेच्या या मुकुट मण्याचे वैशिष्ट्य मी कोठे पोहोचवू, कसे पोहोचवू? तर हे काम मी विद्यापीठाच्या माध्यमातून करु शकेन, येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करु शकेन आणि हेच सामर्थ्य घेऊन आपण पुढे चालावे. भारतामध्ये अनेक राज्ये आहेत. तसे पाहायला गेले तर या विद्यापीठात या सभागृहात भारताचे लघुरुप दिसून येते आहे. भारताचे अनेक काने-कोपरे असतील, जेथे माहिती सुद्धा नसेल की जम्मू काश्मीरच्या धरतीवर सुद्धा भारताच्या भविष्यासाठी स्वप्ने पाहणारे येथे माझ्यासमोर बसले आहेत, तेव्हा त्यांना किती आनंद होईल… आनंदाचा हाच प्रवाह घेऊन आपण पुढे चालू या. ‘सबका साथ – सबका विकास’ हे साध्य करु या. सोबत सर्वांची हवी आहे, सर्वाचा विकास झाला पाहिजे. हा संकल्पच देशाला नव्या शिखरांपर्यंत घेऊन जातो आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या रुपात आपणही या कामी योगदान देऊ या. हे स्वप्न घेऊन पुढे जावे. या सर्व तरुणांना माझ्या हृदयापासून अनेकानेक शुभेच्छा. खास करुन ज्यांच्या मुलींनी आज उत्तम कामगिरी करुन दाखवली आहे, त्या मुलींना आणि त्यांच्या पालकांनाही माझे अभिवादन. त्या सर्व पालकांनी आपल्या मुलीला शिक्षण प्राप्त करण्यासाठी येथवर पाठवले. जेव्हा एखादी मुलगी शिकते तेव्हा तिची कामगिरी चांगलीच असते, परंतु तिच्यापेक्षा जास्त आईने केलेल्या कामगिरीचे मोल त्यापेक्षा जास्त असते. या माता मुलींच्या शिक्षणासाठी स्वत: कष्ट करतात. खरे तर मोठे भावंड घरात असले तर आईला त्याची घरात फार मदत होते. ती लहान भावंडांना सांभाळू शकेल, घरात असेल, पाहुणे आले असतील तर भांडी घासू शकेल. पण नाही. ती आई आहे. ती केवळ स्वत:च्या नाही तर मुलांच्या सुखासाठी आपले आयुष्य वेचते. अशी आई मुलींना शिक्षणासाठी शिकायला बाहेर ठेवते. मी त्या मातांनाही वंदन करतो. यांच्या मुलींना शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मी त्या सर्वांना आज वंदन करतो आणि आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद!

M.Pange/B. Gokhale