मंत्रिमंडळातील माझे सहकारी…उपस्थित सर्व मान्यवर आणि सहयोगी, देशाच्या दृष्टीने आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनात आणि विशेषतः आपल्या आयुष्यात नागरी, प्रशासकीय सेवादिवस सार्थक कसा बनवता येईल? हा दिवस फक्त एक उपचार म्हणून साजरा झाला पाहिजे? वर्षातून एकदा एक दिवस येतो आणि आपल्याला ऐतिहासिक परंपरांचे स्मरण करण्याची संधी मिळते. याच संधीमुळे आपल्याला अनेक गोष्टी करण्याची प्रेरणाही मिळू शकते. आपल्याला नेमके कुठे जायचे आहे? त्या विविक्षित स्थानी पोहोचण्यासाठी आपण किती मार्गक्रमणा केली? आता कुठपर्यंत पोहोचलो? आपल्याला खरोखरीच ज्या स्थानी जायचे होते त्यापेक्षा वेगळीकडेच दूर कुठे जाऊन नाही ना पोहोचलो? किंवा आपल्या ठिकाणाला पोहोचण्यासाठी आणखी खूप वाटचाल करावी लागणार आहे, ते अजून दूर आहे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, माणसाला विचार करण्याची संधी आणि प्रेरणा या दिनामुळे मिळते. अशी संधी मिळाली की, आपण केलेल्या वाटचालीकडे थोडेसे मागे वळून समीक्षात्मक दृष्टीने पाहण्याचीही संधी घेता येते. आणि त्याच्या बरोबरीने नवीन संकल्प करण्यासाठी एक निमित्त मिळते. आज आपण सगळे इथे जमलो आहोत म्हणून अशी संधी, प्रेरणा मिळते असे नाही, तर अशा गोष्टी प्रत्येकाला आपल्या जीवनात अनुभवता येतात.
एक विद्यार्थी परीक्षा देऊन घरी परतल्यानंतर निकालाची वाट पहात असतो, आणि त्याचबरोबर पुढच्यावर्षी असा ऐनवेळी अभ्यास करायचा नाही.अगदी वर्षाच्या सुरवातीपासूनच नियमित अभ्यास करण्याचा निश्चय करतो. असे करण्यास त्याला कोणी सांगत नाही तर तो मनानेच निर्धार करतो. याला कारण म्हणजे परीक्षेच्या काळातले वातावरण असते. ऐनवेळी अभ्यास करताना परीक्षेच्यावेळी येणाऱ्या तणावामुळे त्याला मनातून काही बदल करावे वाटत असतात. आणि ज्यावेळी शाळा प्रत्यक्षात सुरू होते त्यावेळी, तो विचार करतो आज रात्रीच्याऐवजी सकाळी पहाटे उठून अभ्यास करावा. पहाटे झोप अनावर होते. अशावेळी तो विचार करतो, अरे असं इतक्या लवकर उठून अभ्यास करणं आपल्याला नाही जमू शकत. रात्रीच करू अभ्यास! मग कधी आईला लवकर उठवायला सांगतो. तर कधी आईला म्हणतो, तू रात्रीच्यावेळी जास्त जेवायला देत जाऊ नको. मला अभ्यास करता येईल, सुस्ती येणार नाही, असं काही तरी खायला देत जा. अभ्यास न केला जाण्याची किंवा होऊ शकत नाही याची एक नाही अनेक कारणे तो शोधत बसतो. भारंभर प्रयोग होत राहतात, परंतु त्यातून निष्कर्ष पुन्हा तोच निघतो. पुन्हा परीक्षेच्यावेळी रात्रभर जागून अभ्यास केला जातो. विषयांच्या नोटस्ची अदलाबदल केली जाते आणि विचार मनात येतो उद्या काय होणार? हा एक जीवनक्रम बनून जातो. अशाच उपचारांच्या बंधनांमध्ये आपण स्वतःला अडकवून घेऊ इच्छितो का? कामांमध्ये फक्त अडथळे निर्माण होत असतात, असं नाही तर थकवाही येत असतो, हे मी समजू शकतो. आणि कधी कधी तर अडथळ्यांपेक्षाही जास्त थकव्यामुळे गंभीर संकट निर्माण होत असते. ज्या लोकांना थकवा वाटत नाही आणि कोणत्याही गोष्टीचा अडथळा वाटत नाही, उलट अडथळ्यांना जे लोक आव्हान समजतात, ते आयुष्याला वेगळ्याच स्तरावर नेतात. खूप काही कमावतात. परंतु जीवनात एकदा का थकवा नावाच्या गोष्टीचा प्रवेश झाला की त्या माणसाचे काही खरे नाही. कारण थकवा इतर कोणत्याही रोगापेक्षा भयंकर आहे. एकदा का तो शरीरात शिरला की, त्याला बाहेरचा रस्ता दाखवू शकत नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे थकवा काही शरीराचा नसतो तर ती मनाची अवस्था असते. ही मानसिक अवस्था जगण्याची ताकद हरवून टाकते. थकवा आला की, स्वप्ने पाहण्याचे मानसिक सामर्थ्यही रहात नाही. आयुष्यात काहीच करण्याचं मानसिक बळ राहत नाही. जीवनात काहीच घडत नाही अशी अवस्था काही एखाद्या व्यक्तीपुरती मर्यादित राहत नसते. आणि जर ती व्यक्ती एखाद्या उच्चपदावर असेल तर त्याचा तितक्या मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडत असतो. कधी कधी तर वरिष्ठ पदावरील व्यक्ती भरपूर काही करून जो काही प्रभाव निर्माण करतात, त्यापेक्षा जास्त काही न करता नकारात्मक प्रभाव निर्माण करत असतात. आणि त्यामुळेच आपण काही चांगले काम करतोय ही तर खूप आनंदाची, चांगली बाब आहे. आणि समजा काम नाही करू शकणार असू तर, जे काही काम करीत आहोत, त्यात थकवा येणार नाही; हे पाहिले पाहिजे. कारण थकव्यामुळे एकप्रकारचे साचलेपण येते. विराम येत असतो. असा विराम येत नाही ना? हे आपण पाहिले पाहिजे. कारण अशा साचलेपणामुळे संपूर्ण व्यवस्थाच ऊर्जाहीन, चैतन्यहीन, निष्प्राण, संकल्प करू न शकणारी, गती नसलेली बनत असते, असे काम मी करत नाही ना? आणि जर अशी मानसिक अवस्था असेल तर संकट खूपच गंभीर होत आहे असे मी समजतो. आणि म्हणूनच लोकांच्या जीवनातील जबाबदाऱ्या जसजशा वाढत जातात तसतशा आपल्यामध्ये नवे काहीतरी करण्याचा उत्साह वाढला पाहिजे, ऊर्जाही वाढली पाहिजे. आपल्यातील क्षमतावृद्वीसाठी असे दिवस साजरे करताना संधी मिळत असते.
कधी कधी एखादा चांगला, सुंदर विचार जितके सामर्थ्य देतो; त्यापेक्षाही जास्त यश, मग ते दुसऱ्या एखाद्याचे असले तरी आपले धैर्य, मनोबल वाढवतो. आज ज्यांनी पुरस्कार प्राप्त केला आहे त्यांचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारताशी तुलना केली तर खूप लहान आहे. इतक्या मोठ्या देशापुढे असलेल्या अनेक समस्यांपैकी एखादा प्रश्न सोडवणे त्यामानाने खूपच सोपे काम आहे. इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात या छोट्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा परिणाम हा होऊ शकतो? असा प्रश्न या यशामुळे उभा राहिला असेल. अरेच्या अनंतनागमध्ये हे घडू शकते? आनंदपूरमध्येही घडू शकते? प्रत्येकाच्या मनामध्ये विचारांचे चक्र फिरवून, आंदोलन निर्माण करण्याचे काम यशोगाथा करत असते.
आणि म्हणूनच प्रशासकीय-नागरी सेवादिन साजरा करण्याबरोबरच‘प्रधानमंत्री पुरस्कार’ देण्याची परंपरा आहे तिलाच एक नवे परिमाण देण्याचा प्रयत्न यावर्षी केला आहे. काही भौगोलिक समस्या आहेत, काही लोकसंख्येच्या मर्यादा आहेत, अशा विविधतापूर्ण देशाची विभागणी तीन समुहामध्ये करण्याचा प्रयत्न केला. सरकारी कामामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर छाननी होऊ शकेल का असा विचारही कोणाच्यातरी मनात नक्कीच आला असेल. आधी काय परिस्थिती होती? अर्ज केला जायचा आणि काही लोकांना तर अतिशय चांगला अहवाल बनवता येतो आणि परीक्षकांना प्रभावित करताही येते. मात्र यावेळी तर प्रभावित करण्याची काही गरजही नव्हती. कारण कॉल सेंटरवरून शेकडो दूरध्वनी करून आपल्याकडे अमूक-तमूक काम केले जाणार होते, झाले का पूर्ण? परीक्षकांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन बैठका घेतल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून इथून मुलाखती घेण्यात आल्या. म्हणजेच अनेक प्रकारांनी प्रयत्न केल्यानंतर काहीतरी चांगले घडल्याचे दिसून आले. इतकी मोठी प्रक्रिया केल्यानंतर जे काही चांगले होते; त्याचा आनंद तर असतोच.
देशात 600-650 पेक्षा जास्त जिल्हे आहेत. आमचे आव्हान खऱ्या अर्थाने इथेच सुरू होते. कारण जवळपास 74 यशोगाथांची पहिली सूची बनवली गेली. पहिल्यापेक्षा ही संख्या कैकपटीने जास्त आहे. आणि पहिल्यापेक्षा यंदाची ही संख्यावृद्धी मोठे समाधान देणारी गोष्ट आहे. ज्याच्या जीवनात थकवा नाही, अडथळ्याचा जो विचारही करीत नाही तो थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करतो. 650-700 जिल्ह्यांमध्ये 10 टक्केच पहिल्या सुचीत आहेत, म्हणजे 90 टक्के बाकी राहिले आहेत. या उर्वरित 90 टक्के लोकांसाठी हे आव्हान ठरू शकते? भले आपल्याला यश मिळेल अथवा नाही, काही हरकत नाही; आपण किमान पात्रतेच्या पहिल्या यादीमध्ये आपला जिल्हा आणला पाहिजे, असे आव्हान त्यांच्यापुढे निर्माण होऊ शकते? आपल्याला आवडेल, पसंत पडेल ती योजना यावर्षी निवडता येईल. आणखी एक, ‘त्या’ विद्यार्थ्यासारखे नाही करायचे; असा आजच्या प्रशासकीय सेवादिनी निश्चय करा. पुढच्यावर्षी या व्यासपीठावर आपण असणार आणि पुरस्कार स्वीकारणार, असा निर्धार आजच करा. हिंदुस्तानातील सर्वच्या सर्व 650 पेक्षा अधिक जिल्ह्यांच्या मनात हा विश्वास निर्माण झाला पाहिजे.
आधीच्या आकड्यांशी तुलना केली तर 74 हा आकडा खूप मोठा आहे. परंतु, जर मी याच्याही पुढे जाण्याचा विचार करत असेन तर त्याचा अर्थ असा की, मी थकव्याच्या बंधनामध्ये अडकलेला नाही. अडथळ्यांची पर्वा मी करत नाही. पुढे जाण्यासाठी मी आणखी खूप काही करू इच्छितो. अशी भावना, असा संकल्प करण्याची भावना या समुहामध्ये यावी. आणि जे लोक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माझे भाषण आत्ता ऐकत आहेत, तसेच सर्व कार्यक्रमातील अधिकारी अशा या सगळ्यांच्या मनात अशीच भावना निर्माण होईल. आमच्या राज्याचे नाव या सूचीमध्ये नाही, यामागे काय कारण असेल, याची चर्चा करा. त्या त्या जिल्ह्यातील समुहांनी विचार करून आपल्या जिल्ह्यांचे नाव का झळकले नाही याचे कारण शोधावे. सरकारमध्ये काही गोष्टींसाठी मी सातत्याने आग्रह धरत आलोय, ते म्हणजे- सुदृढ स्पर्धा! सहकार्याबरोबरच स्पर्धात्मक सहकार्याचा विचार झाला पाहिजे आणि राज्यांराज्यांमध्ये विकासाची स्पर्धा, चांगल्या कामांची स्पर्धा झाली पाहिजे. सुप्रशासनाची, चांगल्या पद्धतींची, मूल्यांची स्पर्धा व्हावी. एकात्मतेची स्पर्धा व्हावी, दायित्वाची, जबाबदारीची स्पर्धा प्रामुख्याने व्हावी. किमान प्रशासनामध्ये आपण सर्वांमध्ये आघाडीवर असावे असे सगळ्यांनाच वाटले पाहिजे. स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे हे जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये जाणवले पाहिजे. आपल्यालाही दोन पावलं अधिक पुढे जायचे आहे, असा संकल्प आजच्या नागरी सेवादिनी आपण करावा.
दुसरी गोष्ट, आपण प्रशासकीय सेवेत आहात, काही लोक तर घरच्या परंपरेमुळे या सेवेत आले असतील. गेले तीन-चार पिढ्या या सेवेमध्ये कार्यरत असणारे अनेक लोक असतील. तर काही लोकांना वाटत असेल, एकदा का आत घुसले की झाले. बाकी सगळे द्या सोडून….एकदा का या व्यवस्थेत प्रवेश मिळाला की काही करायची आवश्यकता नाही. असेच आपण पुढे सटकू! काही न करता काळच आपल्याला पुढे घेवून जाईल. आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. 15 वर्षे झाले तर इथपर्यंत पोहोचलो, 20 वर्षे झाले तर तिथपर्यंत पोहोचलो. 22 वर्षे झाले तर आणखी कुठे पोहोचलो आणि इथून बाहेर पडताना तीनपैकी किमान एका जागी तर निश्चितच पोहोचलेले असणार. या सेवेमध्ये आपले भविष्य निश्चित माहीत आहे, असे सगळ्यांचे मत आहे. हाती सत्ता आहे, मानमरातब आहे; त्यामुळे प्रशासकीय सेवेत येण्याची इच्छाही सगळ्यांची असते, आणि यामध्ये काही चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. असा विचार करणे चुकीचे आहे, असे म्हणणाऱ्यांपैकी मी नाही. परंतु सव्वाशे कोटी देशवासियांमध्ये कितीजणांना प्रशासकीय सेवेत येण्याचे भाग्य मिळते? आपल्या परिश्रमाने, स्वतःच्या मेहनतीने इथे आले, अगदी मान्य, तरीही सव्वाशे कोटीमधून आपणासारख्या एक-दोन हजार, पाच हजार, दहा हजार, पंधरा हजार लोकांना हे भाग्य मिळाले आहे. प्रशासनाची जी व्यवस्था आहे, त्याचे आपण भागीदार आहात. त्यामुळेच सव्वाशे कोटी लोकांचे भाग्य बदलण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आयुष्यात इतके मोठे भाग्य मिळाले असतानाही आपण जर काही करून दाखवण्याचा निर्धार केला नाही, निश्चय केला नाही तर या उच्च पदावर पोहोचूनही त्या जीवनाचा काय उपयोग? 35-40 वर्षांपूर्वीची गोष्ट माझ्या लक्षात आहे. राजकारणात तर मी नंतर बराच उशीरा आलो. त्याआधी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलं होतं. त्यावेळी मी अधूनमधून विद्यापीठातल्या मित्रांशी गप्पा-गोष्टी करायला जात होतो, त्यांना भेटत होतो. एकदा बोलताना असेच त्यांना मी विचारलं, पुढे काय करणार? यावर प्रत्येकजण म्हणत होता, शिक्षण पूर्ण झाल्यावर विचार करू. काहीजणांनी वडिलांचा व्यवसाय आहे, तोच पुढे चालवणार; असंही उत्तर दिलं. एका नवयुवकानं हात वर करून सांगितलं, ‘आयएएस अधिकारी होण्याची माझी इच्छा आहे.’ मी विचारलं, ‘का रे, बाबा, अशी इच्छा का तुझी आहे?’ त्यावेळी मला वाटलं, हा आता सांगणार, आयएएस अधिकाÚयाला मान मरातब असतो म्हणून तसे व्हावे वाटते. पण, नाही असे उत्तर आले नाही. तो तरूण म्हणाला, आयएएस अधिकारी बनलो तर मी खूप काही चांगलं करू शकेन, अनेकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकेन, असं मला वाटतंय.’ मी म्हणालो, मग राजकीय क्षेत्रात का नाही जात? तिथूनही तुला खूप काही करू शकते. यावर तो म्हणाला, ‘‘ नाही, ते क्षेत्र-पद तर तात्पुरते असते.’’ विचारात किती स्पष्टता होती पहा. प्रशासकीय सेवेतून दीर्घकाळ शाश्वत असे, चांगले काम आपण करू शकतो. आपण इतक्या प्रचंड ताकदीचे लोक आहात. आपण काय आणि किती मोठे काम करू शकतो, हे आपणही चांगल्या तऱ्हेने जाणता. त्यामुळे त्याची जाणीव करून देण्याची आवश्यकता नाही. एकेकाळी परिस्थिती वेगळी असेल. मात्र आता नवीन कार्यपद्धती बनवली पाहिजे. एक विशिष्ट विचारसुध्दा असेल आणि आपली भूमिका मुख्यत्वे ‘नियामक’म्हणून असेल. खूप लोकांची, अगदी एक-दोन पिढ्यांनी परंपरागत पद्धतीनुसार आपली सगळी शक्ती, संपूर्ण कार्यकाल नियामक म्हणून खर्ची घातली असेल. यानंतर आलेल्या काळात कदाचित थोडी मर्यादा, सीमा बदलली असेल. प्रशासकाची भूमिका आली असेल. प्रशासकाबरोबरच थोडीफार नियंत्रकाची भावना निर्माण झाली असेल. यानंतर थोडा काळ बदला असेल तर, वाटले असेल; अरेच्या आमची भूमिका नियंत्रक म्हणून राहिलीच नाही. प्रशासक किंवा नियंत्रकाच्याही पुढे आता एक व्यवस्थापकीय कौशल्य विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण आता एकाचवेळी अनेक गोष्टींचे व्यवस्थापन करावे लागत आहे.
आमच्या जबाबदाऱ्या बदलत आहेत, परंतु आजच्या काळात 21व्या शतकांमध्ये आपण जे काही करतो ते पुरेसे आहे का? भले आपण ‘नियामक’ या भूमिकेतून बाहेर पडलो आहोत. लोकशाहीच्या गाभ्याला, आत्म्याला अनुरूप असे बदल करीत प्रशासकापासून ते व्यवस्थापकाच्या भूमिकेपर्यंत पोहोचलो आहोत. परंतु 21 व्या शतकात संपूर्ण जगामध्ये स्पर्धेचे युग अवतरले आहे. आणि भारताच्या दृष्टीने अपेक्षांचे, आशा- आकांक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे. इथे प्रत्येकाला काहीना काही करून पुढे जायचे आहे. प्रत्येकाला काही ना काही मिळवायचे आहे. काही लोकांना याची एकप्रकारे भितीही वाटत असेल. मी मात्र याला एक संधी मानतो. देशातल्या सव्वाशे कोटी लोकांच्या मनात काहीतरी करून दाखवण्याची उर्मी असते. काहीतरी मिळवायचं असा मनानं ज्यानं निर्धार केलेला असतो. त्यावेळी देशाला पुढे नेण्याचे काम त्याच्या हातून आपोआप होतच असते. ठिक आहे, चालू दे, चालले आहे तसेच….वडील असेच गेले, आता आपण काही करायची काय गरज आहे? शौचालय बनविण्याची काय गरज आहे? आपल्या आई-वडिलांनी बिना शौचालयाचे संपूर्ण आयुष्य काढलेच की, तसंच आपणही जीवन जगू. आता मात्र असे विचार राहिलेले नाहीत. जीवन असं पाहिजे, आयुष्य असं नाही….अशी भाषा आज कोणी काढतही नाही. विचारही करीत नाही. देशाला पुढे नेण्यासाठी यामुळेच एक मोठी ऊर्जा मिळतेय. आणि मग अशावेळी आपण प्रशासक असू, नियंत्रक असू, जिल्हाधिकारी असू इतकेच पुरेसे नाही. कार्यपद्धतीशी जोडला गेलेला प्रत्येक छोटा घटक, अगदी लहानातील लहान संस्थेपासून ते मोठ्यात मोठ्या पदावर बसलेली व्यक्ती असो, त्या प्रत्येकाला बदलाचे शिलेदार बनावे लागणार आहे. ही आजच्या काळाची मागणी आहे, गरज आहे. या प्रत्येक घटकाने आपल्यामध्ये बदल घडवून आणला, बदलाचा विचार केला तरी त्याचा परिणाम जाणवल्याशिवाय राहणार नाही. आज नाही तर उद्या हे बदल घडणार आहेतच, आता त्यासाठी फार वाट पहावी लागणार नाही. आता आपल्याला वेगाने बदलाच्या शिलेदाराच्या रुपात काम करावे लागणार आहे आणि परिस्थितीत बदल घडवून आणला पाहिजे. मग हा बदल नीतीमध्ये असेल अथवा रणनीतीमध्ये, आपल्याला बदल घडवून आणण्यासाठी काम करावे लागेल.
कामाची एखादी विशिष्ट पद्धत पूर्वापार अवलंबिली गेली तर काहीवेळेस नवीन प्रयोग करण्याची भिती वाटते. अपयश तर येणार नाही ना, कुठे काही चुकणार तर नाही ना; असं वाटतं. परंतु असं म्हणून आपण प्रयोग करणंच सोडून दिले तर मात्र व्यवस्थेमध्ये बदल निर्माण होणं अशक्य आहे. आणि प्रयोग कधी कार्यालयीन पत्रक काढून होत नसतो. त्यासाठी मनातून आवाज येत असतो. जर कोणी धोका पत्करायला नको पण नवीन प्रयोग करून पाहू. असे म्हणून कधीच नवीन प्रयोग होत नसतो. धोका पत्करूनच नवीन प्रयोग करायचा असतो. धोक्याशिवाय जे काही केले जाते ती योजना असते. योजना आणि प्रयोगामध्ये खूप अंतर आहे. एखाद्या गोष्टीची योजना तयार करताना आपल्याला अमूक होणार, तमूक होणार, या गोष्टी करायच्या आहेत, हे आधीच माहीत असते. तशी आपण आखणी केलेली असते. प्रयोगामध्ये तसे नसते, आणि मी नेहमीच प्रयोग करायला प्राधान्य देतो. नेहमीपेक्षा थोडे वेगवेगळे करणाऱ्या माणसाला आपण काही वेगळं केल्याचं समाधानही मिळत असते. सगळ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने आणि सर्वात प्रथम काही केल्याचा आनंदही मिळत असतो. आपण पहिल्यांदा काही केल्यामुळे वेगळी क्षमता त्याच्यामध्ये दिसून येते.
इतक्या मोठ्या देशाला 20-25-30 वर्षांपूर्वी किंवा गेल्या शतकामध्ये ज्या पद्धतीने, नियमाने चालविले जात होते त्याचप्रमाणे आता आपण चालवू शकत नाही. आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणसाचं जीवन पूर्णपणे बदललं आहे. तंत्रज्ञानामुळे झालेल्या बदलांचे प्रतिबिंब जीवनशैली, शासनाची कार्यपद्धती यामध्ये नाही पडले तर कितीतरी मर्यादा येतील. सरकारच्या योजना येत असतात, त्यात वेगळं काहीच नाही. परंतु सरकारच्या सीमेतून बाहेर पडून नवीन योजना जनसामान्यांपर्यंत पोचली गेली तरच ती योजना यशस्वी ठरणार आहे. याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतला आहे. जनतेची सहभागीदारीता वाढल्यामुळेच आपली योजना यशस्वी होते. याचाच अर्थ असा झाला की, आपण जर प्रशासकीय सेवक आहात तर नागरी समाजासाठी आपली बांधिलकी असणे जरूरीचे आहे. अनिवार्य आहे. मी जर आपल्या सीमा निश्चित केल्या आणि आपल्या कार्यालयात, कक्षात, फाइलींच्या गराड्यात बसून देश आणि दुनिया चालवू इच्छितो, असं म्हणालो तर जनतेचे सहकार्य मला कमीच मिळणार आहे. ज्यांना गरज आहे, ते लोक याचा लाभ उठवतील. लोक येतीलही, परंतु काही जागरूक लोकांच्या सज्जनतेमुळे देश बनत नाही. सामान्य माणूस आहे, तो जागरूक नाही. मात्र त्याच्या हिताची गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचते आणि त्या योजनेचा लाभ त्याला मिळतो, विकास कामात तो भागीदार बनतो, त्यावेळेस देशाची परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही. आणि शौचालय बनवण्याचं काम काय याच सरकारनं केलं नाही..याआधी जितकी सरकारं आली त्या सगळ्या सरकारांनी शौचालये बनविण्याचा विचार केला असणार, परंतु तो विचार जनआंदोलन बनला नाही. आपल्या लोकांचं, आणि सरकारी कार्यालयांमध्ये बसलेल्या व्यक्तिंचेही हे काम आहे. यासाठी आमच्या कार्यपद्धतीमध्ये नागरी समाजाशी बांधिलकी आहे. त्यामुळे या मर्यादा नष्ट करून काम कसे करता येईल हे पाहिले पाहिजे. तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर या नवीन योजनेत एक सरलीकरण केले गेले असल्याचे लक्षात येईल. आणि अशा नवीन गोष्टी त्या नवीन आहेत म्हणूनही केल्या जातात, स्वीकारल्याही जातात. नवीन धोरणाच्या एक भाग बनतात. तशा त्या बनाव्यात असा प्रयत्न आपण केला पाहिजे.
आपल्याबरोबर नेहमी दोन प्रकारचे लोक असतात, याचा अनुभव आपण नेहमी घेत असतो. काही लोकांना, ते काय करतात असे विचारले तर म्हणातात, नोकरी करतो. काहीजण याच प्रश्नाला उत्तर देतात, ‘सेवा करतो’. ते पण आठ तास, हे पण आठ तास. ते पण पगार घेतात, हे पण पगार घेतात. परंतु तो नोकरी करतो आणि हा सेवा करतो. यामध्ये जो फरक आहे, तो आपण कधी विसरू नये. आपण नोकरी करत नाही तर सेवा करीत आहात. त्याचबरोबर आपण फक्त सेवा या शब्दाशी बांधले गेलो नाही तर नागरी सेवेशी बांधिल आहोत आणि म्हणूनच नागरी समाजाचे आपण अभिन्न अंग आहोत. मी आणि नागरी समाज, मी आणि नागरी समाजाला काही देणं लागतो, मी आणि नागरी समाजासाठी काही करणारा आहे. असे नाही! काळ बदलला आहे. मी, आपण सर्वजण आणि नागरी समाज असे सगळ्यांनी मिळून गोष्टी बदलल्या पाहिजेत. ही बदलत्या काळाची मागणी आहे. आणि म्हणूनच सेवाभावाने तसेच आपण काही सेवा करत असल्याच्या भावनेने काम करून जीवनात आनंद घेत आहोत. देशाची सेवा केली, मग ती एखाद्या खात्यामार्फत असेल किंवा एखाद्या प्रकल्पाव्दारे असेल पण सेवा केली आहे. आपल्याकडे तर ‘सेवा परमोधर्मः‘ असे म्हटले जाते. सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे असे, सेवेचे बाळकडूच पाजले जात असताना तुम्हाला तर आपल्या कार्यातूनच सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. ही सेवेची एक सुवर्णसंधी आपल्याला मिळाली आहे.
मला मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ सेवा करण्याची संधी मिळाली. तो अनुभव आहेच. गेल्या दोन वर्षांपासून आपल्याकडून खूप काही शिकत आहे. आलेल्या अनुभवांमुळे मोठ्या विश्वासाने हे सांगतो, की आपल्याकडे खरोखरीच देवदुर्लभ असा समूह आहे. सामर्थ्यवान लोक आहेत. एकापेक्षा एक मोठमोठाली कामे लीलया करू शकतील असे लोक आहेत. जर त्यांच्यावर कामाची जबाबदारी आली तर ते शनिवार, रविवारसुद्धा विसरून जातात. आपल्या मुलाचा वाढदिवसही विसरून जातात. असे अधिकारी मी पाहिले आहेत, त्यामुळेच आमच्या या अधिकाऱ्यांचा देशाला अभिमान वाटतो. आपल्या पदाचा उपयोग देशाला आघाडीवर नेण्यासाठी करणारे अधिकारी आपल्याकडे आहेत.
अलिकडेच नीति आयोगाच्यावतीने एका कामाचे सादरीकरण केले. याविषयी फारच थोड्या लोकांना माहिती असेल, म्हणून सांगतो. या अधिकाऱ्यांना अशाप्रकारचे काम पहिल्यांदाच दिले होते. पहिल्या दिवशी त्यांना सादरीकरणात जी माहिती दिली, ती जाणून घेतल्यावर मी म्हणालो, तुम्ही आणखी थोडा वेळ घ्या, याविषयी आपण अजून सविस्तर चर्चा करू, आणि मग तुमच्याकडे असलेल्या नवीन कल्पना त्यामध्ये समाविष्ट करता येतील. काम करण्याविषयी कोणतेही कार्यालयीन पत्रक, सूचनापत्रक काढलेले नव्हते. कसलेही बंधन घालण्यात आलेले नव्हते. तरीही सगळे अधिकारी स्वेच्छेने दिवसरात्र काम करत होते. हे मोठ्या अभिमानाने मी आज इथं सांगतोय. दहा हजार मनुष्यबळ तास काम एका विशिष्ट योजनेसाठी नीति आयोगाने केले. हिंदुस्तानातील लोकांना अचंभा वाटावा, इतके प्रचंड काम या अधिकाऱ्यांनी केलं आहे. ही काही छोटी घटना नाही. त्यांच्या कार्यपद्धतीची मी माहिती घेतली, त्यावेळी समजले, अधिकाऱ्यांचे काही समूह बनविण्यात आले होते. हे समूह 8, 10-10, 12-12 वाजेपर्यंत काम करत होते. काही समुहांनी आपल्या शनिवार-रविवारच्या सुट्यांवर पाणी सोडले. हे विशेष काम कार्यालयीन वेळेत करायचे नाही. जे काही करायचे ते सायंकाळी सहानंतर! म्हणजे रोजचे नियमित कार्यालयीन काम संपल्यानंतर या अधिकाऱ्यांनी दहा हजार मनुष्यबळ तास जास्त काम केले. चिंतन-मनन करून कामाची रूपरेषा निश्चित केली. यापेक्षा मोठी घटना काय असू शकेल. यापेक्षा अभिमानाची मोठी गोष्टी कोणती असेल? नीति आयोगामार्फत आपल्याला खूप विद्वान, ज्ञानी लोक सल्ला देतात, नवनवीन माहिती देतात. 25-30 वर्षे या भूमीवर काम करतांना त्यांनी केलेल्या विचारांमधून किती चांगल्या, सामर्थ्यवान गोष्टी ते देऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण हे आहे. अनुभवातून आलेल्या गोष्टीकडे असेच दुर्लक्ष करून चालत नाही. चिंतन साखळीच्या रुपाने पुन्हा पुन्हा या गोष्टींचा पाठपुरावा केला गेला. ह्यांनी बैठका घेतल्या, त्यांनी वेगवेगळी चर्चा केली. त्याच्याच जोडीला आम्ही सगळ्यांनी आपआपल्या विभागांनी स्वतःची कृतियोजना तयार केली. या कृतियोजनेचेही अंदाजपत्रकावर प्रतिबिंब दिसत होते. अंदाजपत्रकामध्येही काही गोष्टी या चिंतनामधूनच आल्या होत्या. त्यामध्ये राजकीय विचार प्रक्रिया अजिबात नव्हती. ही काही लहान-सहान बाब नाही. कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला जाणं म्हणजे एक नवीन कार्यसंस्कृती, कार्यशैली तयार झाली आहे, असे म्हणता येईल.
मी कधीच अधिकाऱ्यांमुळे निराश झालो नाही. इतक्या प्रदीर्घ अनुभवामुळेच पूर्ण विश्वासाने सांगू शकतो, अधिकाऱ्यांनी मला कधी नाराज केलं नाही. एखाद्या अधिकाऱ्यावर रागवण्याची वेळ माझ्यावर कधीच आली नाही. एवढेच काय कोणा अधिकाऱ्याशी चढ्या आवाजात बोलण्याचा प्रसंगही आला नाही. सरकार चालवण्यासाठी म्हणून ज्यावेळी मी आलो, त्यावेळी प्रशासकीय कामाचा मला शून्य अनुभव होता. अगदी पंचायत कारभाराचाही अनुभव मला नव्हता. परंतु अगदी पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत मला एकदासुद्धा कटू अनुभव आला नाही. मी समोरच्या व्यक्तिमधले सामर्थ्य पाहिले. का बरं? कारण प्रत्येक व्यक्तिच्या आतमध्ये परमात्म्यानं उत्तमातील उत्तम अशी ताकद दिली आहे. असा विचार मी करतो. त्याच नजरेनं समोरच्या व्यक्तिकडे पाहतो. माणसाच्या आतील परमात्म्यामुळेच प्रत्येक व्यक्तीमध्ये, आहे त्यापेक्षा उच्चस्थानी जाण्यासाठी सामर्थ्य येत असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्मा आहे. काहीतरी चांगलं करण्याचा त्याचा निश्चय असतो. मग व्यक्ती कितीही वाईट असो, त्याच्या मनात काहीतरी चांगलं करण्याचा विचार येत असतोच. माणसातल्या या चांगुलपणाला पकडण्याचं कामच आपलं आहे. असा प्रयत्न केला गेला तर मला नेहमीच खूप उत्साहवर्धक अनुभव आला आहे. एकेका व्यक्तिमधील अपार शक्ती, क्षमता पाहिली तर मला आपल्याकडे असलेल्या अपरंपार शक्तीचं भांडार दृष्टीस पडते. आणि मग मी आशावादी बनतो. आता राष्ट्राचं कल्याण सुनिश्चित असल्याचं, मला जाणवतं. तसंच यामध्ये कोणताही अडसर येणार नाही, राष्ट्राचं कल्याण होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, असा मनोमन विश्वास वाटतो. हाच दृढ विचार मनात ठेवून मी पुढची वाटचाल करू शकतो.
ज्याच्याकडे इतका छान समूह आहे, देशभरामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी उत्सूक लोक असतांना कोणाला निराश होण्याचं कारण काय? त्याच आशेने आणि निश्चयाने या समुहाच्या विश्वासावर काही स्वप्न उराशी बाळगून आपण वाटचाल करीत आहोत. वेळ गेली असेल, कदाचित वेगही मंदावला असेल. थोडी वाकडी वाट करावी लागली असेल, विभागणीही झाली असेल. तरीही आपल्याजवळचा अनुभव आणि त्याचे सामर्थ्य यांच्या संयोगातून आपण गती वाढवू शकतो. कामाची व्याप्ती विस्तारू शकतो. उत्पादन आणि खर्च या जगातून बाहेर पडून आपण निष्पत्ती किंवा परिणाम यावर लक्ष्य केंद्रीत करू शकतो. आणि हवा तो परिणाम मिळवू शकतो.
कधीतरी आपण वरिष्ठ बनतो. कधीतरी काय बनतोच, ही कार्यपद्धतीच तशी आहे. ही एक सहज, सामान्य गोष्ट आहे. वडील आपल्या मुलावर कितीही प्रेम, माया करू दे, आपला मुलगा आपल्याला समजुन घेत असेल. असा समज करून घेण्यामध्ये कुणाला दोष देण्यात अर्थ नाही. कारण या भावना आपल्यामध्ये जन्मापासून आल्या आहेत. मलाही असे वाटू शकते, आपल्यापैकी सगळ्यांमध्ये अशी भावना असते. परंतु जर का एकदा सत्याचा अनुभव घेतला, तरीही मग मनातल्या भावना, विचार बदलू शकत नाही. तसा प्रयत्न होत नाही. दोन पिढ्यांतलं अंतर आपण समजून घेतलं पाहिजे. आपण लहान असताना आपली समज, माहिती यांच्या सीमा किती होत्या. आणि आजच्या पिढीची समज, त्यांना असलेली माहिती पाहिली तर ‘जमीन-आसमान’इतका फरक जाणवतो. याचा अर्थ आमच्यानंतर जी पिढी तयार होवून काम करतेय, त्यांना भले कामाचा आमच्याइतका अनुभव नाही, तर ज्ञानानं आमच्यापेक्षा सरस आहे. आमच्यापेक्षा त्यांना खूप सारी माहिती आहे. तुझ्यापेक्षा मी जास्त जाणतो, यावर आपलं यश अवलंबून नाही; तर माझा अनुभव आणि नवीन पिढीला असलेलं ज्ञान, माझा अनुभव आणि तुझी ऊर्जा, यांचा सुरेख संगम झाला तर देशाचे कोटी कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा मार्ग आपण निवडू शकतो. असं केलं तर ऊर्जा वाढेल, सीमा विस्तारतील. आपल्याला एक नवी शक्ती मिळेल.
आपण संगणकावर काम करायला शिकलो की या वेगळ्याच जगात प्रवेश करतो. नवनवीन शोधत, आत आत शिरत जातो, असं मी कधीतरी म्हणत असतो. संपर्क, संदेशाचं जगंच खूप प्रचंड मोठं आहे. आपण संगणकावर काम करताना आपल्या आईने पाहिलं, तर ती म्हणते,‘‘ अरे व्वा, तुला तर खूप काही येतं की, किती शिकलास तू’’ परंतु यावर आपला पुतण्या म्हणतो, ‘‘ काय हे काका, एवढं साधं करता येत नाही? हे तर कोणी लहान पोरही करू शकेल.’’ इतका मोठा फरक असतो. एकाच घरामध्ये तीन पिढ्या राहत असतील तर, नक्कीच असा अनुभव येतो. आपण वयाने ज्येष्ठ आहोत, मग या वडिलकीच्या नात्याने या नवीन बदलांचा, बदलेल्या सत्याचा स्वीकार करू शकतो? आपल्याकडे जे नाही, ते नवीन पिढीकडे असेल, तर त्याचा मनापासून स्वीकार केला पाहिजे. नवीन पिढीची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. माहिती मिळवण्याचे त्यांचे मार्ग भिन्न आहेत. एखादी गोष्ट शोधून काढण्यासाठी आपण अनेक तास घालवतो. त्यावेळेस नेमकं काय झालं होतं, याची माहिती शोधत बसतो. आणि आजची तरूण मंडळी काही क्षणात ती माहिती आपल्यापुढं हजर करतात. ‘‘असं नाही सर, त्यावेळी असं घडलं होतं’’ हे सांगतात.
आज नागरी सेवादिनी आपण एक संकल्प करण्याची आवश्यकता आहे. आपल्या कार्यालयीन व्यवस्थेमध्ये नव्याने रूजू झालेले अधिकारी, एकदम कनिष्ठ अधिकारी आहेत, त्यांना आमच्यापेक्षा खूप काही माहिती आहे, हे लक्षात घेवून त्यांना कामाची संधी मनापासून दिली पाहिजे. नवीन पिढी अधिक माहितगार आहे, याचा मनोमन स्वीकार करण्यासाठी आणि त्यापद्धतीने कामाची आखणी करण्यासाठी आपण काय करणार? तुम्ही एकदा का हे केले की, तुमच्या लक्षात येईल; आपल्या विभागाच्या कार्यक्षमतमध्ये खूप बदल झाला आहे. आपण घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी अतिशय उत्साहाने, स्फूर्तीने तुम्ही करू शकणार आहात.
आणखी एक गोष्ट आहे. सगळ्याच समस्यांच्या मुळाशी विरोध-विसंगती आणि संघर्ष असतो. अर्थात हे काही कोणत्या हेतूने आलेले नाहीत. एकूणच आपल्याकडे ज्या पद्धतीची कार्यशैली विकसित झाली त्यातून आले असून, आज आपल्याला इथं आणून सोडलं आहे. ‘सिलो’मध्ये काम करण्याची पद्धत कोणीतरी अगदी सोप्या शब्दात सांगतात. काही लोकांना या पद्धतीने काम करण्यामुळे चांगले परिणाम मिळतात, असे वाटते. परंतु परिणाम काही एवढ्यानेच मिळतात असे नाही. तर समुहामध्ये काम केल्यामुळे अधिक, जास्त परिणम मिळतात. समुहाची क्षमता खूप मोठी असते. खांद्यााला खांदा लावून संपूर्ण विभागातील सहकाऱ्यांनी मिळून यश मिळवणं जरूरी असतं. अगदी त्याचप्रमाणे राष्ट्राच्या निर्मितीसाठी विभागा-विभागाचा खांद्याला खांदा मिळाणं अतिशय जरूरीचे आहे. जर ‘सिलो’ नसते तर आपल्या सरकारचे न्यायालयात इतके खटले नसते. एक विभाग दुसऱ्या विभागाशी सर्वोच्च न्यायालयात लढतोय. कशासाठी? या विभागाला वाटतं, माझं बरोबर आहे. त्या विभागालाही वाटतं, माझं बरोबर आहे. आता हे दोन्ही विभाग बरोबर आहेत की नाही याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. आता हे सर्व काही एखाद्याला हरवण्यासाठी सुरू नाही. तर तिथे काही वर्षांपूर्वी काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे कोणाशी तरी भांडण झाले होते, त्यामुळे हा खटला सुरू झाला. त्यानंतर आत्तापर्यंत चार अधिकारी बदलून गेले तरी वाद सुरूच आहे. ‘सिलो’मध्ये काम करीत असल्यामुळे दुसऱ्यांना समजून घेण्याची संधीच मिळत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी हे नवीन समूह बनविण्यात आले, त्याचा खूप मोठा लाभ झाला. मी या खात्याच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याविषयी विचारू शकतो. कोणत्याही गोष्टीवर फक्त ‘कार्यालयीन’ असा ठप्पा मारून काम करण्याची माझी पद्धत नाही. आणि मला ती पद्धत शिकायचीही नाही. त्यापासून माझा बचाव तर देवच करू शकेल. काम करताना भोजन मात्र मी सगळ्याअधिकाऱ्यांसमवेत घेतो. त्यावेळी कोणी उपस्थित रहावे, याविषयी मी अतिशय आग्रही असतो. कारण त्यावेळेस चांगल्या पद्धतीने चर्चा होते, सल्ले देता येतात. अहवाल वगैरे देणे ठिक आहे, पण आपण एकत्र बसतो त्याविषयी काय वाटते? तर बहुतेक लोकांनी सांगितलं, ‘‘साहेब, आम्ही एकाच बॅचचे आहोत, पण इतकी वर्षे वेगळी वेगळी कामं करत होतो, त्यामुळे आपल्या बॅचमध्ये इतकी प्रचंड क्षमता असणारे बुद्धिवान आहेत हे कधी आत्तापर्यंत लक्षात आलेच नाही. आपण असे भेटत, बोलत होतो, त्यामुळे माहिती झाली’’. याचाच अर्थ आपल्या सहकाऱ्यांमध्ये किती प्रचंड हुशारी आहे, सामान्यांपेक्षा त्याच्यामध्ये किती जास्त ऊर्जा आहे, हे एकमेकांना माहीत नव्हते. एवढेच नाही तर असे एकत्रित भोजनामुळे त्याला समोसा आवडतो की, पकौडे हेही समजले. त्यामुळे पुढच्यावेळेस तो अधिकारी बैठकीला येणार असेल तर आम्ही सांगू शकतो, अरे बाबा, आज त्याच्यासाठी सामोसे घेवून ये. या अगदी खूप लहान लहान गोष्टी असतात परंतु समूह बनवण्यासाठी आणि तो टिकून राहण्यासाठी खूप आवश्यक आणि उपयोगी ठरतात.
कोणत्याही सीमा, मर्यादा यासारख्या बंधनांना सोडून समुहाच्या रूपामध्ये ज्यावेळी सगळे एकत्र येतात त्यावेळी ताकद, क्षमता कैकपटीने वाढते. कधीतरी एका विभागाला आणखी काही विभाग जोडले जातात, अशावेळी ते दोन होतात परंतु एका विभागाला दुसऱ्याची सोबत मिळाली तर ते अकरा होतात. समुहाची आपली अशी एक खूप मोठी ताकद असते. तुम्ही कधी एकटेच जेवायला बसला आणि कोणी आग्रह केला तर एखादी पोळी जास्त खाऊ शकता. परंतु सहा मित्र मिळून अंगत-पंगत करायला बसला तर तीन-चार पोळ्या कधी पोटात गेल्या ते तुम्हाला समजणारही नाही. समुहाचेही असेच वातावरण असते. म्हणूनच आपल्याला ‘सिलो’च्या बाहेर पडून समुहाच्या रूपामध्ये काम करायचे आहे. काही प्रश्न असेल तर आपल्या सहकाऱ्याला थेट दूरध्वनी करून का नाही विचारता येणार? उठून त्याच्या कक्षात जायला काय हरकत आहे? तो माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे, म्हणून काय बिघडले तुम्ही स्वतःहून जायला हरकत नाही. अरे बाबा, ही फाईल सात दिवसांपासून तुझ्याकडे आली आहे, पहा जरा. त्यावर शेरा मारलेला असतो, त्याकडे थोडे लक्ष द्या.
आपल्या लक्षात येईल, कामांना नक्कीच वेग येईल. आणि म्हणूनच ’सुधारणा ते परिवर्तन’ असा मंत्र जपत मी चाललो आहे. सुधारणेतूनच परिवर्तन होते, असे नाही. ही गोष्टही खरी आहे. मात्र ‘सुधारणा ते सादरीकरण आणि मग परिवर्तन. सादरीकरणाची बाब आमच्या आणि आमच्याच हातात आहे. आणि म्हणूनच आपल्या लोकांसाठी सुधारणा ते सादरीकरण आणि त्यानंतर परिवर्तन आहे. यापैकी सादरीकरणामध्ये दृष्टिकोणाचा अभाव आहे, किंवा दिशाहीनता आहे, असे मला तरी काही वाटत नाही. सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली आत्तापर्यंत सरकारची नीति अयोग्य आहे, असा काही आरोप केला गेला नाही. कोणी कसलेही आव्हान दिलं नाही. जास्तीत जास्त काय तर, सरकारच्या कामाची गती वेगवान नाही, अशी तक्रार केली आहे. कोणी म्हणते ‘प्रभाव’ दिसत नाही. तर कोणी म्हणतात ‘परिणाम’ दिसून येत नाही. मात्र कोणी सरकार चुकीचे काम करीत आहे, असे म्हणत नाही. याचाच अर्थ जी काही टीका होत आहे, तिचा स्वीकार करून आपण सादरीकरणामध्ये आणखी कसे उत्कृष्ट करू शकतो हे पाहिले पाहिजे, म्हणजे आपला परिवर्तन घडविण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकेल.
सुधारणा काही खूप कठीण काम नाही. कठीण काम कोणते आहे, तर ते म्हणजे सादरीकरण! आणि सादरीकरण चांगले झाले तर परिवर्तन झाले की नाही हे पाहण्यासाठी मोजपट्टी घेवून बसण्याची आवश्यकता नाही. कारण परिवर्तन आपोआपच दृष्टीस पडते. घडलेले बदल लगेच दिसून येतात. आणि बदल घडतोय हे मी पाहतोय. विशिष्ट समय-सीमेमध्ये एखादे काम करण्याची आता सरकारला सवय लागली आहे. प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण भ्रमणध्वनीवरून आणि ‘अॅप’ वरून केले जातेय. ही एक चांगली गोष्ट आहे, आणि तिचा स्वीकार आपण स्वतःहून केला आहे. कोणी ती थोपवली नाही. इतक्या दिवसात ही कामे पूर्ण करणार, अमूक इतक्या दिवसात ती गोष्ट संपवणार असे विभागानेच निश्चित केले. आम्ही इतक्या प्रमाणावर सौरउर्जेची निर्मिती करणार, इतकं पाणी पोहोचवणार, इतक्या गावांमध्ये वीज पोहोचवणार, आम्ही इतके जन-धन खाती उघडणार….हे सगळे काही आपणच निश्चित केले. कोणी हे तुमच्यावर थोपवले नाही.
आणि आपण जे काही ठरवलं ते अतिशय सशक्त आहे, प्रेरणादायी आहे. त्यामुळे देशात कोणतीच कमतरता राहणार नाही, असं मला वाटतं. फक्त आपण सादर करून दाखवलं पाहिजे. इथं सादरीकरण महत्वाचे आहे. काम करायला असा समूह मिळणं कठीण असतं. मला असा अनुभवी समूह मिळाला हे, मी माझे भाग्य मानतो. देशभर विखुरलेले ऊर्जावान नवयुवक आता कार्यालयीन व्यवस्थेमध्ये सहभागी होत आहेत. तेसुद्धा आपली पूर्ण क्षमता उपयोगात आणत आहेत. प्रत्येकाला गावांची अवस्था, तिथली परिस्थिती बदलावी असं वाटतेय.
मागच्यावेळेस मी आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं की, ज्या गावी आपण पहिल्यांदा नोकरीवर रूजू झालो त्या गावाला तुम्ही भेट देवून या. आणि सगळे अधिकारी जावून आले. त्यांचा अनुभव फारच प्रेरणादायक आहे. काहीसुद्धा बोलायला लागलं नाही. 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा नोकरीला लागलो, त्या गावाला आत्ता गेल्यावर लक्षात आलं की, अरेच्या या गावामध्ये तर काहीच बदल झालेला नाही. नोकरीतल्या 30 वर्षांत माझ्यामध्ये तर खूप मोठा बदल झाला आहे. मी कुठल्या कुठे पोहचलो आहे. पण ज्या गावाला मी सोडून गेलो, ते तर आहे तसेच आहे. हा विचारच मला वाटतं आपल्याला काही करण्याची प्रेरणा देणार आहे. यासाठी कोणत्याही भाषणाची गरज नाही. कोणत्याही पुस्तकातील सुविचार वाचण्याची आवश्यकता नाही. विचारच प्रेरक ठरतात. 30 वर्षांपूर्वी याच गावात मी राहिलो होतो? या कार्यालयात मी काम केलं होतं? इथल्या लोकांची अवस्था अशीच होती? मी तर कुठे जाऊन पोहोचलो. हे लोक तर इथेच राहिले. माझी यात्रा चालू राहिली, खूप दूरवर गेली…त्यांची नाही. हा विचार मनात आला तर, त्या लोकांचे स्मरण करा. आपल्या उमेदीच्या, प्रारंभाच्या काळातील लोक,गाव आठवा. तो परिसर आठवा त्या लोकांची आठवण काढा. आता सेवानिवृत्तीला थोडा अवधी आहे. मग तो दोन, चार, पाच वर्षांचा काळ असो, काहीतरी करून जावं, असं तुम्हाला नक्की वाटेल. आता हे काहीतरी करावेसे वाटणे हीच सर्वात मोठी ताकद आहे. आणि ही ताकदच देशाला नवीन शक्ती देत असते. या समुहाव्दारे आणखी विश्व स्तरावरच काम आपण करू शकतो, असा माझा विश्वास आहे. आता आपण विभागाच्या ‘सिलो’ मध्ये राहू शकत नाही की देशाच्या ‘सिलो’ मध्ये! संपूर्ण जगच एक आंतरविभाग बनला आहे. आणि म्हणूनच आपण लोकांनी आपल्या-आपल्या एकत्रित होण्याची आवश्यकता आहे. बदललेल्या प्रत्येक गोष्टीला आव्हान समजून तिचा स्वीकार केला पाहिजे, आणि तीचं संधीमध्ये रूपांतर करण्याचा संकल्प केला पाहिजे.
‘मनरेगा’मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निधी जमा होतो. देशात दुष्काळी परिस्थिती आहे, मला माहीत आहे., पाण्याची कमतरता आहे. परंतु पुढच्यावर्षी चांगला पाऊस येईल असा अंदाज व्यक्त झाला आहे. आपल्याजवळ एप्रिल, मे, जून असा जेवढा काळ हातात आहे, त्या काळात ‘मनरेगा’च्या माध्यमातून जलसाठे निर्माण करण्याची मोहीम यशस्वी करू शकतो का? याचा विचार केला पाहिजे. जर जल साठवणुकीची माझ्याकडे किती, कशी व्यवस्था आहे हे पाहून नवी तळी खोदणे, कालवे स्वच्छ करणे अशी कामे करून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब कसा संचयित करता येईल, याचा विचार केला जावा. जर पाऊस कमी झाला तरी साठवलेल्या पाण्यात काम कसे भागवता येईल, हे पाहिले पाहिजे. अर्थात हे सगळे जनतेच्या सहभागीतेमुळेच शक्य होणार आहे, असे मी मानतो. जनतेचे सहकार्य घेतले तर सगळं काही करणं शक्य होणार आहे, फक्त आपण संकल्प केला पाहिजे.
ज्या जिल्ह्यांनी हे यश मिळवले , त्या जिल्ह्यांच्या सगळ्या समुहाचे मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. आणि मी देशभरातल्या सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना आग्रहाने सांगतो, आता प्रत्येक जिल्ह्याने कोणत्या ना कोणत्या योजनेत सहभागी झाले पाहिजे. थोड्या लोकांनीच सहभागी व्हावे असे मला अजिबात वाटत नाही. आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे. जिल्ह्याचं एखादे स्वप्न साकार होईल, अशी योजना बनविण्याचा ती पूर्ण करण्याचा संकल्प करावा. अशी एक अपेक्षा बाळगून आपल्या सर्वांना नागरी सेवादिनाच्या अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपण जे काम केलं आहे, त्याचा देशाला अभिमान वाटतो. आणखीही आपण खूप काही करू शकता. देश अगदी ताठपणे पुढे वाटचाल करणारच आहे, या विश्वासासह आपल्याला खूप खूप धन्यवाद..!!
S.Bedekar/BG