Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय पोलीस सेवेच्या 2018 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींनी घेतली पंतप्रधानांची भेट


भारतीय पोलीस सेवेच्या 2018 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधताना राष्ट्रकल्याणासाठी समर्पित वृत्तीने, अथक काम करण्याकरिता पंतप्रधानांनी युवा अधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले.

आपले दैनंदिन कामकाज सेवाभाव आणि समर्पित वृत्तीने करावे, असे पंतप्रधानांनी सांगितले. पोलीस सर्वसामान्य नागरिकांसोबत जोडलेले असणे महत्वाचे आहे. पोलीस दलाबाबत असलेला नागरिकांचा दृष्टीकोन प्रत्येक अधिकाऱ्याने समजून घेतला पाहिजे आणि पोलीस दल अधिकाधिक नागरिकाभिमुख करण्यासाठी काम केले पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले.

गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यावर पोलिसांनी लक्ष्य केंद्रित केले पाहिजे असे पंतप्रधानांनी प्रशिक्षणार्थींना सांगितले. आधुनिक पोलीस दलाच्या निर्मितीत तंत्रज्ञानाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.

आकांक्षित जिल्ह्यांमध्ये परिवर्तन आणि सामाजिक बदलाचे माध्यम म्हणून पोलीस कशा प्रकारे भूमिका निभावू शकतात, याबाबत पंतप्रधानांनी चर्चा केली. 2018 च्या तुकडीत महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने असल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले. पोलीस दलात महिला अधिक संख्येने असल्यास पोलीस व्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव पडण्याबरोबरच राष्ट्र निर्माणालाही नवे बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.

स्वत:वर विश्वास ठेवण्याचा सल्ला देत पंतप्रधानांनी प्रशिक्षणार्थींना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणासोबतच आत्मविश्वास आणि अंतर्शक्ती यामुळे दैनंदिन आव्हानांचा सामना अधिकारी सक्षमपणे करतील, असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar