Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची चेन्नईला भेट


संपूर्ण जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असून, दिवसेंदिवस या अपेक्षा वाढत असल्याचे आपल्याला अमेरिका भेटीत जाणवले. भारत हे महान राष्ट्र रहावे याबरोबरच जागतिक समुदायाच्या अपेक्षांची पूर्तता करणे ही आपली जबाबदारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई इथे सांगितले. आयआयटी मद्रासच्या 56 व्या पदवीदान समारंभात भाग घेण्यासाठी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते आज पत्रकारांशी बोलत होते. केवळ केंद्र सरकार नव्हे, तर 130 कोटी भारतीयांच्या सहभागानेच ही जबाबदारी पार पाडता येईल. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येकांना गरीब-श्रीमंत, ग्रामीण, शहरी, युवा-ज्येष्ठ अशा प्रत्येकाच्या प्रयत्नातूनच हे साध्य होईल.

लोक सहभागातून आपण अनेक बाबीत यश मिळवले आहे, त्याचप्रमाणे एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकपासून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे. काही जणांनी मला भारत प्लास्टिकमुक्त करायचा आहे, असा चुकीचा अर्थ लावला आहे. मात्र मी एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टीकपासून मुक्तीबाबत बोलतो आहे. या प्लास्टीकमुळे अनेक समस्या निर्माण होतात, असेही पंतप्रधान म्हणाले.

नुकत्याच झालेल्या अमेरिका भेटीदरम्यान भारतीय समुदायासमोर आपण तामिळीत बोललो. तमिळ ही जगातली प्राचीन भाषा आहे, असे आपण सांगितले आणि अमेरिकेतल्या माध्यमात त्याला व्यापक प्रसिद्धी मिळाल्याचे ते म्हणाले.

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर चेन्नईला आपली ही पहिली भेट आहे. आयआयटी मद्रासच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमानिमित्त आपण इथे आलो आहोत. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीदिनी पदयात्रेद्वारे गांधीजींच्या विचारांचा प्रसार करणार आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.

आपल्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने आल्याबद्दल त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आयआयटी-एमच्या रिसर्च पार्क इथे सिंगापूर इंडिया हॅकेथॉन 2019 ला पंतप्रधान संबोधित करणार असून, तिथल्या स्टार्ट अपला ते भेट देणार आहेत. संस्थेमध्ये पदवीदान समारंभातही पंतप्रधान संबोधित करणार आहेत.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane