रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. यावेळी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले. दहशतवादा विरुद्धच्या लढ्यात रशियाची जनता भारतीयांसोबत असल्याचे सांगितले.
सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांविरुद्ध आपले हित सांभाळण्याच्या भारताच्या प्रयत्नांना रशिया कायम देत असलेल्या ठाम पाठिंब्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे आभार मानले तसेच विशेष महत्वाच्या सामरीक भागीदार म्हणून दहशतवादाचा सामना करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याकरता भारताच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केली. संबंधितांनी दहशतवादाला दिला जाणारा सर्व पाठिंबा पूर्णपणे थांबवावा, यासंदर्भात दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
दोन्ही देशांमधील वृद्धिंगत होणारे सहकार्य विशेष महत्वाच्या सामरीक भागीदारीला अधिक बळ देईल याबाबतही दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
यावर्षी व्लाडीवोस्टोक इथे होणाऱ्या पूर्व आर्थिक परिषदेला पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित राहण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पुन्हा निमंत्रण दिले. पंतप्रधान मोदी यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि रशियाच्या अति पूर्वेसह दोन्ही देशातल्या वाढत्या आर्थिक सहकार्याचे महत्व अधोरेखित केले.
B.Gokhale/J.Patankar/D. Rane