पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात गाझियाबादला भेट देऊन विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला. त्यांनी हिंडन विमानतळाच्या नागरी टर्मिनलचेउदघाटन केले. त्यानंतर त्यांनी सिकंदरपूरला भेट दिली आणि दिल्ली-गाजियाबाद-मेरठ प्रादेशिक जलद वाहतूक प्रणालीची पायाभरणी केली. तसेच त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचे उदघाटन केले आणि सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित केली.
पंतप्रधानांनी गाझियाबाद येथे शहीद स्थळ (नवीन बस अड्डा) मेट्रो स्टेशनलाही भेट दिली आणि तिथून दिलशाद गार्डनला जाणाऱ्या नव्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी या मेट्रोतून प्रवासही केला.
गाझियाबाद मधील सिंकदरपुर येथे एका विशाल सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की आज गाझियाबाद कनेक्टिविटी, क्लीनलिनेस आणि कैपिटल या तीन ‘सी’ ने ओळखला जातो. यासंदर्भात त्यांनी गाजियाबाद मधील सुधारित रस्ते आणि मेट्रो संपर्क सेवा, स्वच्छ सर्वेक्षणात मिळालेले १३ वे मानांकन आणि उत्तर प्रदेशचे एक मोठे व्यापारी केंद्र म्हणून गाझियाबाद विकसित झाल्याचा उल्लेख केला.
पंतप्रधान म्हणाले की हिंडन विमानतळावर नवीन नागरी टर्मिनल तयार झाल्यावर गाझियाबादच्या लोकांना विमान प्रवासासाठी दिल्लीला जावे लागणार नाही, ते गाझियाबादहून अन्य शहरात विमानाने जाऊ शकतील. ज्या वेगाने नागरी टर्मिनल बांधण्यात आले, त्यातून केंद्र सरकारचा निर्धार आणि कार्यशैली दिसून येते असे तें म्हणाले. शहीद स्थळाहून मेट्रोचा नवीन मार्ग उत्तर प्रदेश आणि दिल्ली दरम्यान प्रवास करणाऱ्यांचा त्रास कमी करेल असे ते म्हणाले.
30हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली दिल्ली–मेरठ वेगवान प्रादेशिक रेल्वे वाहतूक व्यवस्था देशातील अशा प्रकारची पहिलीच व्यवस्था असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ही व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर दिल्ली आणि मेरठ दरम्यान प्रवासाचा वेळ खूप कमी होईल असे ते म्हणाले. गाजियाबाद मध्ये विकसित केल्या जात असलेल्या आधुनिक पायाभूत सुविधांमुळे गाजियाबाद आणि आसपास राहणाऱ्या लोकांचे जीवन सुलभ होईल. देशभरात अशा पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत असे ते म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेच्या लाभांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की या योजनेमुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा मिळेल. प्रधानमंत्री किसान सम्मान निधि अंतर्गत दोन कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आपले सरकार प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री श्रम योगी मानधन सारख्या सुयोग्य योजनांच्या माध्यमातून अशक्य शक्य करून दाखवत आहे असे पंतप्रधान म्हणाले. देशाच्या नागरिकांकडून हे शक्य करण्याचे सामर्थ्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
*****
DJM/MC/SK