Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-दक्षिण आफ्रिका व्यापार मंचामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

भारत-दक्षिण आफ्रिका व्यापार मंचामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

भारत-दक्षिण आफ्रिका व्यापार मंचामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण


दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष महामहीम श्रीयुत सिरिल रामाफोसा, भारताच्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्पोरेट विश्वातील नेते; उपस्थित स्त्री-पुरुष

नमस्कार!

तुमच्यासोबत भारत-दक्षिण आफ्रिका व्यापार मंचावर उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होत आहे. आमच्या सोबत महामहीम राष्ट्राध्यक्ष तुम्ही असल्याने आमचा मोठा सन्मान झाला आहे. आमच्या सत्तराव्या प्रजासत्ताक दिनी उद्या तुम्ही सन्माननीय अतिथी म्हणून आम्हाला लाभणे आमच्यासाठी अतिशय बहुमानाची बाब आहे.आपली भागीदारी इतिहासातील त्या अतूट बंधांनी जुळलेली आहे  जे बंध भारताची राष्ट्रीय चळवळ आणि दक्षिण आफ्रिकेची चळवळ यांना जोडणारे आहेत. आता, आपली भागीदारी मदिबा आणि महात्मा यांनी आपल्या जनतेसाठी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करणाऱ्या एका सामाईक आणि समृद्ध भवितव्याशी संबंधित आहे. आपल्या जनतेच्या  आणि सर्व जगाच्याही अधिक चांगल्या भवितव्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याची आणि परस्परांना सहकार्य करण्याची इच्छा आपण व्यक्त करतो. 22 वर्षांपूर्वी लाल किल्ला जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपण एका धोरणात्मक भागीदारीचा स्वीकार केला.दोन जुने मित्र आणि भागीदार म्हणून आपल्यातील सातत्यपूर्ण संवादाने प्रत्येक प्रकारे आपल्याला जवळ आणले आहे. आपण दृढ सहकार्याबाबत द्विपक्षीय त्याच बरोबर बहुपक्षीय बांधिलकीबाबत ठाम आहोत. अलीकडच्या काळात दोन जुन्या मित्रांच्या अनेक नव्या गोष्टींची आणि मनोंरजक विकासगाथांची भर पडली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील व्यापार झपाट्याने वाढत आहे आणि 2017-18 या वर्षात या व्यापाराने 10 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. 2018 मध्ये दोन महत्त्वाच्या व्यापार उपक्रमांनी त्याला आणखी चालना दिली आहे. एप्रिल 2018 मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेली भारत- दक्षिण आफ्रिका व्यापार परिषद हा एक उपक्रम होता तर  दुसरा उपक्रम म्हणजे नोव्हेंबर 2018 मध्ये जोहान्सबर्ग येथेच आयोजन करण्यात आलेला भारतात गुंतवणूक करण्यासाठीचा मंच. मात्र, तरीदेखील गुंतवणूक वाढवण्यासाठी अद्यापही खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. मी सर्व भारतीय आणि दक्षिण आफ्रिकी सरकारी संस्था, गुंतवणूक प्रोत्साहन संघटना त्याचबरोबर दोन्ही देशांच्या उद्योगपतींना दोन्ही देशांची ही क्षमता ओळखून त्यानुसार काम करण्याचे मी आवाहन करतो. आमच्या देशात आफ्रिकी देशांचा प्रमुख सहभाग आणि उपस्थिती राहिली असल्याचे पाहून मला अतिशय आनंद झाला होता. यापूर्वी गुजरातचा मुख्यमंत्री या माझ्या भूमिकेतून मी दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख सहभागकर्त्यांचे आनंदाने स्वागत केले होते. गेल्या आठवड्यात व्हायब्रंट गुजरातने पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेतील माझ्या मित्रांचे आणि भागीदारांचे केलेले स्वागत अतिशय समाधान देणारे होते. या परिषदेतील एक दिवस आफ्रिका दिवस म्हणून विशेषत्वाने साजरा करण्यात आला.आम्ही जेवढे मानतो त्यापेक्षा आमचे संबंध किती दृढ आहेत हे यातून दिसून येते. आमच्या द्विपक्षीय आर्थिक भागीदारीसाठी देखील ते पोषक आहे. उपस्थित स्त्री-पुरुषहो भारतीय अर्थव्यवस्था सध्या 2.6ट्रिलियन ड़ॉलरची अर्थव्यवस्था असून ती जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमधील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था आहे आणि आता आम्ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहोत. जागतिक बँकेच्या ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात  व्यवसायानुकूल वातावरणासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या ताज्या अहवालात भारताने 77व्या स्थानावर झेप घेतली आहे, गेल्या चार वर्षात भारताच्या क्रमवारीत  तब्बल 65 स्थानांची सुधारणा झाली आहे. यूएनसीटीएडीने जारी केलेल्या यादीत आम्ही थेट परदेशी गुंतवणूकीसाठी सर्वोत्तम असलेल्या स्थानांपैकी एक आहोत. आम्ही नियमित तत्वावर अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आवश्यक बदल आणि सुधारणा करत आहोत. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया यांच्यासारख्या आमच्या विशेष कार्यक्रमांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आमच्या उद्योग क्षेत्राने इंडस्ट्री फोर पॉइंट झिरो अर्थात चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे आणि त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता,थ्री डी प्रिंटिंग, रोबोटिक्स यांसारख्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश आहे. आमचे सरकार जगातील एकूण लोकसंख्येचा सहावा भाग असलेल्या आमच्या  एकशे तीस कोटी लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत आहे.आम्ही अतिशय आधुनिक पायाभूत सुविधा आणि वेगावर भर देत न्यू इंडियाची उभारणी करण्यासाठी वचनबद्ध आहोत. या निमित्ताने मी तुमचे देखील अभिनंदन करत आहे.

महामहीम, 2018 मध्ये तुम्ही नव्या दक्षिण आफ्रिकेच्या तुमच्या दृष्टीकोनाच्या पूर्ततेसाठी अनेक आघाड्यांवर विविध उपक्रम सुरू केले आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या, त्याचबरोबर पुढील तीन वर्षात तुमच्या देशातील युवकांसाठी दहा लाख रोजगार निर्माण करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना आम्ही शुभेच्छा देत आहोत. या उद्दिष्टांमध्ये भारत योगदान देत असल्याबद्दल मला समाधान वाटत आहे. आमची दक्षिण आफ्रिकेतील गुंतवणूक सातत्याने वाढत आहे.तिचे प्रमाण सुमारे 10 अब्ज डॉलरपर्यंत गेले असून स्थानिक पातळीवर 20 हजार रोजगार निर्माण झाले आहेत. एक भ्रातृराष्ट्र म्हणून धोरणातील सुधारणा आणि अगदी निम्न स्तरावरील संस्थांच्या उभारणीत आपल्या अनुभवाचा फायदा करून द्यायला भारताला नेहमीच आनंद वाटेल. आम्ही दक्षिण आफ्रिकेत आणखी जास्त गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत आणि भारतीय बाजारपेठेत देखील जास्तीत जास्त आफ्रिकन कंपन्या प्रवेश करतील अशी अपेक्षा व्यक्त करत आहोत.उपलब्ध असलेल्या, विशेषतः अन्न आणि कृषी प्रक्रिया, जास्त खोलीवरील खाणकाम, संरक्षण, फिन-टेक, विमा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये असलेल्या सर्व संधींचा, लाभ घेण्यासाठी न्यू इंडिया तुमचे स्वागत करेल याची मी ग्वाही देतो.त्याचप्रकारे स्टार्ट अप्समध्ये, आरोग्यनिगा आणि औषधनिर्माण, जैव-तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रातही भारत दक्षिण आफ्रिकेशी भागीदारी करू शकतो. अलीकडेच सुरू झालेल्या गांधी मंडेला कौशल्य संस्थेच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेच्या कौशल्य गाथेचा एक भाग बनण्यात भारताला अतिशय आनंद होत आहे. या उपक्रमामुळे युवकांचे सक्षमीकरण होणार आहे. या दोन्ही देशांमध्ये रत्ने व आभूषणे या आणखी एका महत्त्वाच्या क्षेत्रातही सहकार्य होऊ शकते. हिऱ्यांचे थेट उत्खनन करण्याच्या क्षेत्रातील संधींचा शोध दोन्ही देश एकत्रितपणे घेऊ शकतात. त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेते या दोघांचा खर्च कमी होईल आणि दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना त्याचा फायदा होईल. आमच्या नूतन आणि नवीकरणीय उर्जा क्षेत्राच्या प्रसाराच्या मोहिमेत विशेषतः आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेला भारताचा भागीदार बनता येईल. उद्योगपती आणि पर्यटकांसाठी सध्याच्या व्हिसा नियमावलीला आणखी सोपे करण्यामुळे आणि थेट संपर्कव्यवस्था निर्माण करून दिल्यामुळे उद्योगासाठी आणि दोन्ही देशांच्या जनतेच्या परस्परांशी होणाऱ्या व्यवहारासाठी आणखी सुलभता निर्माण होईल.

उपस्थित स्त्री-पुरुषहो, भारत- दक्षिण आफ्रिका भागीदारीमध्ये खूप जास्त प्रमाणात क्षमता असून तिचा पुरेपूर वापर करण्यासाठी आणखी बराच वाव आहे. आपण दोन्ही देशांचा आणि तेथील जनतेचा फायदा करून देणारा सामाईक विकास आणि समृद्धीसाठी एकत्र काम केलेच पाहिजे. दोन्ही देशांचे हे संबंध आणखी बळकट करण्याची ही संधी तुमच्या या भेटीच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. महामहीम, या सामाईक प्रयत्नांमध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

धन्यवाद,

खूप खूप धन्यवाद.