Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

व्हायब्रंट गुजरात परिषद 2019 साठी (17-19 जानेवारी 2019) आलेल्या चेक प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांचा दौरा


चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान अँड्रेज बाबिज, 17-19 जानेवारी 2019 दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासोबत व्यापार आणि उद्योग मंत्री माटी नोवाकोवा आणि उद्योजकांचे मोठे शिष्टमंडळ आले असून, सहयोगी देश म्हणून चेक प्रजासत्ताक व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद 2019 मध्ये सहभागी झाला आहे. पंतप्रधान बाबीज चेक या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करत आहेत.

परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान बाबीज यांची द्विपक्षीय बैठक झाली. परस्पर हिताच्या क्षेत्रीय मुद्यांवर आणि महत्वाच्या जागतिक मुद्यांसह द्विपक्षीय संबंधांचा संपूर्ण आढावा या चर्चेत घेण्यात आला.

पंतप्रधान मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे कौतुक चेक प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांनी केले. भारतीय अर्थव्यवस्थेचा वेगाने होणारा विकास आणि द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वृद्धिंगत करण्याबाबतच्या प्रचंड संधी यांची नोंद चेक पंतप्रधानांनी घेतली. भारताच्या राष्ट्रपतींनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात चेक प्रजासत्ताकला भेट दिली असतांना द्विपक्षीय सहकार्यासाठी अनेक सामंजस्य करारांवर झालेल्या स्वाक्षऱ्यांसंदर्भातील आठवणींना पंतप्रधान बाबीज यांनी उजाळा दिला.

अवजड यंत्र आणि परिशुद्ध अभियांत्रिकीमध्ये चेक प्रजासत्ताककडे अत्याधुनिक निर्माण तंत्रज्ञान आहे. भारतातील निर्माण क्षेत्रात विशेषत: संरक्षण, मोटार वाहन आणि रेल्वे या क्षेत्रात भारतीय बाजारपेठेतील प्रचंड संधीचा लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी चेक कंपन्यांना केले.

चेकमधील प्रतिष्ठेच्या संशोधन आणि विकास परिषदेत भारतीय शास्त्रज्ञांना नामांकनासाठी चेक पंतप्रधानांनी आमंत्रित केले. या अत्यंत प्रतिष्ठेच्या संस्थेत अनेक आंतरराष्ट्रीय संशोधक असून, त्याचे अध्यक्षपद स्वत: पंतप्रधानांकडे आहे.

अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये असलेल्या उत्तम संबंधांचे दोन्ही पंतप्रधानांनी कौतुक केले आणि हे बंध अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे ठरवले.

आपल्या दौऱ्यादरम्यान नवी दिल्ली येथे 19 जानेवारीला पंतप्रधान बाबीज भारताच्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. तसेच पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठात युरोपिअन अभ्यास केंद्राच्या उद्‌घाटनासाठी आणि चेक कंपन्यांना भेट देण्यासाठी ते पुण्याला जाणार आहेत.

B.Gokhale/S.Kakade/D. Rane