Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मुंबईतल्या बॉम्बे आर्ट सोसायटीत पंतप्रधानांचे वक्तव्य

मुंबईतल्या बॉम्बे आर्ट सोसायटीत पंतप्रधानांचे वक्तव्य

मुंबईतल्या बॉम्बे आर्ट सोसायटीत पंतप्रधानांचे वक्तव्य


कला प्रेमी बंधू-भगिनींनो, काही दिवसांपूर्वी वासुदेवजी माझ्या निवासस्थानी आले होते आणि हक्काने मला सांगून गेले, आपल्याला यावेच लागेल आणि त्याचाच परिणाम म्हणून मी आज आपल्यात आलो आहे.

फार कमी व्यवस्था असतात ज्या तीन शतकांवर प्रभाव टाकतात, आपल्या बॉम्बे आर्ट सोसायटीने तीन शतकांना प्रभावित केले आहे. 19व्या शतकात प्रारंभ झाला आणि 21व्या शतकापर्यंत, आणि त्याचे मूळ कारण आहे, कलेची आपली स्वत:ची ताकद असते. कलेचा आपला एक संदेश असतो, कलेमधे इतिहासाची सफर असते, कला संवेदनांची अभिव्यक्ती असते, तेव्हा ती तीन शतकांपर्यंत आपलं स्थान अबाधित राखते.

हिंदुस्तानात विशेषकरुन महाराष्ट्र आणि मुंबईत असं श्रीमंत घराणे नसेल की ज्यांचे दिवाणखाने कलाकृतींनी सजले नसतील, मात्र दुर्दैवाची बाब आहे की जे कलेचं उगमस्थान असते त्याला जागा मिळविण्यासाठी सव्वाशे वर्ष गेली.

म्हणूनच समाज म्हणून हा विचार करण्याची गरज आहे की कलाकृती, आपल्या घराची शोभा आहे. आपल्या समाजाची शक्ती आहे. कलाकृती ही केवळ आपली घराची शोभा वाढविण्याचे एक माध्यम आहे, असे आपण मानत असू तर आपण कलेपासून खूप दूर आहोत, मैलोन मैल दूर आहोत, आणि ही स्थिती बदलण्यासाठी एक अविरत शिक्षण, अविरत संस्काराची आवश्यकता असते.

हाच एक देश आहे, जिथे मंदिर स्थापत्यकलेची वैशिष्ट्ये बारकाईने पाहिली तर जिथे ईश्वराचे स्थान आहे तिथे अनिवार्यपणे कलेचे स्थान असल्याचं दिसेल. प्रत्येक मंदिरात आपल्याला नृत्यमंडप दिसेल. प्रत्येक मंदिरात आपल्याला इतिहास आणि परंपरेला उजाळा देणाऱ्या कलाकृती दिसतील. आपल्या सांस्कृतिक जीवनात कलेचे किती मानाचे स्थान आहे. याचं द्योतक ही व्यवस्था आहे. अन्यथा ईश्वराबरोबर ही कला यात्रा नसती. जगात असा एक चेहरा कदाचित नसेल, ज्याची इतक्या रुपात कलाकारांनी साधना केली असेल. कदाचित गणपती अशी एक देवता असेल, ज्याला प्रत्येक कलाकाराने साकारले असेल, आपल्या पद्धतीने साकारले असेल. कदाचित गणपती अशी देवता आहे, जी कोट्यवधी रुपयांच्या कलाकृतीच्या रुपात आपल्यासमोर आहे.

कलाकार कोणत्या स्वरुपात या वटवृक्षाला विकसित करतो. वासुदेवजी यांनी एक बाब सांगितली. मात्र माझं मत थोडे वेगळे आहे. त्यांनी सांगितले कला राजाश्रीत असावी. नाही, कला कधी राजाश्रीत असू नये, कला राज्य पुरस्कृत असावी.

कलेला कोणती मर्यादा असता कामा नये, कोणतं बंधन असता कामा नये राज्यांची जबाबदारी आहे की कलेचा पुरस्कार करण्याची. मी शरद पवार यांचं अभिनंदन करतो की जमीन देण्याचा निर्णय त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात झाला. कला राज्य पुरस्कृत असायला हवी आणि कला ही समाजाच्या शक्तीचा भाग असायला हवी. तेव्हाच कला परिणामकारक ठरते.

अध्यात्माशी संबंध असणारे लोक, सोप्या भाषेत जाणत असतील की, देहाला आकार प्राप्त होण्यापूर्वी अध्यात्म मनात आणि हृदयात स्थान प्राप्त करते आणि त्यानंतर देहाला आकार प्राप्त होतो. शरीराचा एक साधन म्हणून उपयोग करतो. अध्यात्माच्या अनुभूतीचं माध्यम शरीर ठरु शकते. तसंच कला पाषाणात नसते, त्या मातीत नसते. त्या कॅनव्हासमधे नसते. कला ही कलाकाराच्या हृदय आणि विचारात पहिल्यांदा आध्यात्माप्रमाणे निर्माण होते.

जेव्हा एखादा कलाकार पाषाण तासत असतो, आपल्याला वाटते की तो दगड तासतोय, आपण त्याला विचारतो की तु दगड तासतो आहेस का तो सांगतो मी मूर्ती घडवतो आहे. दृष्टीकोनात केवढा फरक असतो. आपल्यासाठी तो दगड असतो, कलाकार म्हणतो मी मूर्ती घडवतो तर आपण म्हणतो की तू दगड तासतोय का?

या आपल्या सामाजिक विचारात बदल घडवायला हवा तेव्हा कलाजीवनाचे महात्म्य वाढेल. आपल्याकडे लहानलहान मुले पाठ केलेल्या कविता “ट्विंकल-ट्विंकल लिटल स्टार”, तुम्ही कोणत्याही घरात जाल तर आपले लहान मुलं घेऊन आई येईल आणि त्याला सांगेल गाणे म्हण आणि ते म्हणेल “ट्विंकल-ट्विंकल लिटल स्टार”.

अशी खूप कमी घरं असतील जिथे आई म्हणेल बेटा तु काल चित्र दाखवलं होतंस हे बघ काका आलेत त्यांना दाखव ते. असं चित्र फारच कमी आहे. यात बदल घडवणे गरजेचं आहे. त्या बालकाच्या अंर्तमनाची विकास यात्रा त्या केवळ पाठ केलेल्या शब्दात नव्हे तर त्याच्या अंतर्मनातून निघालेल्या अभिव्यक्तीतून म्हणजे त्याने त्या कागदावर जे काही रेखाटले आहे, त्यात आहे.

व्यक्तीमत्व विकासासाठी कला अनिवार्य असते.

आजचं युग तंत्रज्ञानाचे आहे. संपूर्ण शिक्षण अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानानं प्रभावित आहे. जीवनावर जास्तीतजास्त तंत्रज्ञानाचा प्रभाव राहिला आहे. मात्र भावी पिढ्यांमधे आपण माणूसपणा कसा कायम ठेऊ याबाबत आपण सजग राहून प्रयत्न करायला हवा. तो यंत्रमानव तर होणार नाही ना याची भीती आहे. हा स्विच दाबला तर हे काम होईल, तो स्विच दाबला तर ते काम होईल आणि त्यामुळे आपल्यातला माणूस जिवंत ठेवायचा असेल, तर कला हे एकच माध्यम आहे, जे त्याचे जीवन जिवित राखू शकते. त्याच्यातील माणूस जिवंत ठेवू शकते. आणि याच अर्थाने जेव्हा, आपण Art असे म्हणतो, तेव्हा ART म्हणजे A म्हणजे ते एजलेस, R म्हणजे रेस, रिजन, रिलिजन लेस, T म्हणजे टाईमलेस. कला ही अनंताची अभिव्यक्ती आहे. याच अर्थाने आपण ते महत्त्व स्वीकारुन ते सजवलं पाहिले. मी शाळांना आग्रह करु इच्छितो, की जेव्हां ते आपल्या सहलीचा कार्यक्रम आखतात, तेव्हा त्या सहलींमध्ये वर्षभरात एक तरी कार्यक्रम “कला दालन”ला भेट देण्याचा ठेवा. बाकी सर्व बघायला जाल, समुद्रकिनारा बघायला जाल, पण कला दालन बघायला नाही जाणार. शाळेप्रमाणेच मी रेल्वे विभागाला सांगितलंय की, मधे रेल्वे प्लॅटफॉर्म असतो, दोन्ही बाजूंनी रेल्वे गाड्या येत असतात आणि प्लॅटफॉर्मवर खांब असतात; मी सांगितलं की रेल्वे प्लॅटफॉर्म वर दुभाजकाच्या रुपात उत्तमातील उत्तम कला दालन का असू शकत नाही? त्या शहरातील कलाकारांना, नवोदित कलाकारांना तिथे जागा मिळावी. हे कसे होऊ शकेल? म्हणजे, तिथे येणारी व्यक्ती ते पाहू शकेल. त्या शहरातल्या कलाकाराला अनुभव येईल, की 15 दिवसांनंतर माझी एक नवी कलाकृती तिथे सांगण्याची संधी मिळणार आहे. तर मग मी आणखी चांगले काम करीन. पुढल्या महिन्यात मला संधी मिळू शकते. मी अधिक चांगले काम करीन. आपण आपल्या इथली व्यवस्था अधिक सुंदर कशी करु शकतो? मी गेल्या वेळी “मन की बात” मध्ये सांगितले होते की, आपल्या देशातील कलाकार रेल्वे स्थानकांवर स्वत:चा वेळ खर्च करुन या रेल्वे स्थानकांचे रंगरुप बदलत आहेत. ही सरकारी योजना नव्हती, ना या योजनेसाठी कोणती तरतूद होती. हे लोक आपल्या मर्जीने हे काम करत आहेत. आणि याचा एवढा प्रभाव पडतो आहे. एका प्रकारे, ते संस्कारच करत आहेत, जे स्वच्छतेवर एक भाषण देण्यापेक्षा अधिक आहे. एका कलाकाराचे चित्र लोकांना स्वच्छता राखण्यासाठी प्रेरीत करत आहे.

मला माहिती नाही की माझे कलाकार मित्र इथे कुठे बसलेले आहेत? याकडे कसे पाहतील? येणारं युग लक्षात घेऊन आपण आपल्या ज्या कलाकृती आहेत, त्यांना डिजिटल जगातील एक हायब्रिड विकास म्हणून विकसित करु शकतो का? जसे कलाकारानं कलाकृती कशी तयार केली? त्याच्या मनात प्रथम कोणता विचार आला? तो विचार कागदावर कसा उतरवत गेला? तीन महिने, सहा महिने त्यात कसा रंगून गेला? या सर्व प्रवासाचं / प्रक्रियेचं तीन किंवा चार मिनिटांचं डिजिटल संस्करण जेव्हां कोणी व्यक्ती त्या कलाकाराची कलाकृती पाहिल, तेव्हां त्याच्या सोबतच या प्रक्रियेचे डिजिटल संस्करण पहावं आणि ते ही संगीताच्या साथीने. आज अशी समस्या आहे की प्रत्येकवेळी कोणीतरी कलेचा जाणकार बरोबर असतोच असे नाही, असा जाणकार जो त्याला समजावेल की पहा याचा अर्थ असा आहे. लाल रंग या साठी लावलाय, पिवळा रंग त्या साठी लावलाय.

हा बदल घडवून आणण्यासाठी डिजिटल युगात हे एकत्रित कसे आणायचे? सॉफ्टवेअर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित लोकांनी यात रुची दाखवावी, असे मला वाटते. आणि कलाकारांना एका नव्या शक्तीसाठी युगाशी अनुरुप अशी नवी ताकद कशी देता येईल या विषयी प्रयत्न व्हावेत.

मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार, शरद पवार यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. वासुदेव कामत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचेही अभिनंदन करतो. आणि आता कलाकृतींना खूप मोठी जागा मिळाली आहे. कलेचे जिथे उगमस्थान आहे, तिथे तिला जागा मिळाली आहे. यापुढे नवचेतना निर्माण होईल. खूप-खूप शुभेच्छा.

N. Chitale / J. Patankar / S. Tupe / M. Desai