Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरु गोविंद सिंगजी यांच्या जयंतीनिमित्त 350 रुपयांच्या स्मृती नाण्याचे पंतप्रधानांकडून प्रकाशन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त 350 रुपयांच्या एका स्मृती नाण्याचे प्रकाशन केले. गुरु गोविंद सिंगजी यांच्या उदात्त, आदर्श आणि मूल्य तसेच मानवता, समर्पण,शौर्य आणि बलिदानप्रती नि:स्वार्थ सेवेची प्रशंसा केली आणि लोकांना त्यांच्या मार्गावरुन चालण्याचे आवाहन केले.

गुरु गोविंद सिंगजी यांच्या जयंतीनिमित्त स्मृती नाण्याचे प्रकाशन केल्यानंतर सात लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी उपस्थितांना पंतप्रधान संबोधित करत होते. गुरु गोविंद सिंगजी हे महान योद्धे, तत्वज्ञानी कवी आणि गुरु होते असे मोदी म्हणाले. त्यांनी शोषण आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांनी लोकांना दिलेली शिकवण धर्म आणि जातीचे पाश तोडण्यावर केंद्रीत होती. प्रेम, शांती आणि बलिदानाचा त्यांचा संदेश आजही तेवढाच प्रासंगिक आहे.

गुरु गोविंद सिंग यांची मूल्ये आणि शिकवण यापुढे अनेक वर्ष मानवजातीसाठी प्रेरणा स्रोत आणि मार्गदर्शक ठरेल असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या प्रती आपला आदर आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी हे स्मृती नाणं हा एक छोटासा प्रयत्न आहे असे ते म्हणाले. गुरु गोविंद सिंगजी महाराज यांनी दाखवलेल्या 11 सूत्री मार्गावर चालण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.

यावेळी त्यांनी लोहरीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी, पंतप्रधानांनी 30 डिसेंबर 2018 रोजी आकाशवाणीवरुन प्रसारीत झालेल्या त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात गुरु गोविंद सिंगजी यांनी दाखवलेल्या समर्पण आणि बलिदानाच्या मार्गावरुन चालण्याचे आवाहन जनतेला केले होते. 5 जानेवारी 2017 रोजी पाटणा येथे गुरु गोविंद सिंगजी यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभाला ते उपस्थित होते आणि या निमित्त एका स्मृती टपाल तिकिटाचे प्रकाशन त्यांनी केले होते. 15 ऑगस्ट 2016 रोजी स्वातंत्र्य दिनी केलेल्या आपल्या भाषणात आणि 18 ऑक्टोबर 2016 रोजी लुधियाना येथे राष्ट्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधानांनी गुरु गोविंद सिंगजी यांच्या आदर्श आणि मूल्यांचे स्मरण केले होते.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar