माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना नमस्कार, 2015 या वर्षातला “मन की बात”चा हा शेवटचा भाग. यानंतर “मन की बात”मध्ये आपण भेटणार आहोत 2016 मध्ये. नुकताच आपण ख्रिसमसचा सण साजरा केला आणि आता नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु केली आहे. भारत विविधतेने नटला आहे. सण उत्सवांची रेलचेल असते. एक सण साजरा होतो न होतो तोच दुसरा येतो, साजरा होणारा प्रत्येक सण, पुढच्या सणाची वाट पाहायला लावणारा ठरतो. कधी कधी वाटते की भारत असा देश आहे जिथली अर्थव्यवस्था सणांवर आधारित आहे. समाजातील गरीब घटकासाठी आर्थिक घडामोडींचे निमित्त म्हणजे सण असतात.
साऱ्या देशवासियांना ख्रिसमच्या आणि 2016 या नवीन वर्षांच्या माझ्याकडून अनेक शुभेच्छा. 2016 हे नववर्ष आपणा सर्वांसाठी आनंददायी ठरावे, नवा उत्साह, नवा संकल्प, नवी प्रेरण आपल्याला यशाच्या नव्या शिखरावर नेणारे ठरोत. सारे जग संकटमुक्त व्हावे, दहशतवाद असो, जागतिक तापमान वाढ असो, नैसर्गिक संकट असोत किंवा मानवनिर्मित, सारी मानवजात सुखाने आणि शांततेत राहावी यापेक्षा मोठा आनंद तो कोणता ? मी तंत्रज्ञानाचा पुष्कळ वापर करतो हे आपल्याला माहित आहे त्यातून विविध विषयांची विपुल माहिती मला मिळते. ‘MyGov.’ हे पोर्टल मी नेहमी बघतो. पुण्याहून श्रीमान गणेश व्ही. सावलेशवारकर यांनी लिहिलंय की हा हंगाम पर्यटनाचा आहे, या काळात देशी आणि परदेशी पर्यटकही येतात. ख्रिसमसची सुट्टी साजरी करण्यासाठी लोक वेगवेगळया ठिकाणी जातात. पर्यटन क्षेत्रात पर्यटकांना सर्व सोयी सुविधा मिळतील याकडे विशेष लक्ष दिले जाते. मात्र सावलेशवारकर म्हणतात की जिथे जिथे पर्यटनस्थळे आहेत, धर्मशाळा आहेत, धार्मिक ठिकाणे आहेत तिथे स्वच्छतेच्या बाबतीत विशेष लक्ष दयायला हवे. अधिक लक्ष द्यायला हवे. आमची पर्यटन स्थळे जितकी स्वच्छ आणि नीटनेटकी असतील तितकी आमच्या देशाची प्रतिमा जगभर उजळेल. गणेशजींच्या विचारांचे मी स्वागत करतो. गणेशजींचे विचार मी देशवासियांपर्यंत पोहच आणि नीटनेटकी असतील तितकी आमच्या देशाची प्रतिमा जगभर उजळेल. गणेशजींच्या विचारांचे मी स्वागत करतो. गणेशजींचे विचार मी देशवासियापर्यंत पोहचवत आहे. आणि तसेही “अतिथी देवो भव” असे आपण म्हणतोच की आपल्या घरी पाहुणे येणार असतात त्यावेळी आपण घराची साफसफाई करतो, घर सजवतो. म्हणून आमची पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे या ठिकाणी स्वच्छता राखण्याबद्दल आपण विशेष लक्ष द्यायला हवे. देशभरातून स्वच्छता राखण्याबद्दल आपण विशेष लक्ष द्यायला हवे. देशभरातून स्वच्छता मोहिमेबद्दल नेहमी बातम्या येतात याचा मला आनंद वाटतो. या बातम्या देणाऱ्या माध्यमांमधल्या मित्रांचे मी विशेष आभार मानतो. कारण अशा छोटया छोटया गोष्टी शोधून ते लोकांसमोर हे मध्यकर्मी आणतात.
एका वर्तमानपत्रात मी नुकतीच एक बातमी वाचली, ती तुमच्यापर्यंत पोहोचावी असे मला वाटते. मध्य प्रदेशातल्या सिहोर जिल्हयात भोजपुरा गावात दिलीपसिंह मालविया हे एक वयाने ज्येष्ठ कारागीर राहतात. तसे पाहिले तर गंवडीकाम करणारे, मजुरी करणारे एक साधे कारागीर आहेत ते. त्यांनी असे एक आगळे वेगळे काम केले की त्याची बातमी वर्तमानपत्रातून छापून आली. माझ्या वाचण्यात ती आली आणि तुमच्यापर्यंत पोहचावी असे मला वाटले. छोटयाश्या गावात राहणाऱ्या दिलीप सिंह मालविया यांनी ठरवले की गावात शौचालय बांधण्यासाठी लागणारे सामान जर कुणी उपलब्ध करुन दिले तर बांधकामाची मजुरी ते घेणार नाहीत, शौचालयाचे बांधकाम ते विनामूल्य करुन देतील. शौचालयाचे बांधकाम हे एक पवित्र काम आहे असे मानून भोजपुरा गावात दिलीपसिंह यांनी शंभर शौचालये बांधून दिली. दिलीपसिंह मालवीया यांचे मी अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो. नैराश्य आणणाऱ्या बातम्या कधी कधी कानावर येतात परंतु आपल्या देशात आजही असे अनेक दिलीप सिंह आहेत जे आपआपल्या परीने काही ना काही चांगले काम करत आहेत. हीच तर आपल्या देशाची शक्ती आहे, हीच तर आपल्या देशाची आशा आहे, याच तर गोष्टींमुळे आपला देश पुढे जातो आणि म्हणूनच “मन की बात”मधून दिलीप सिंह यांच्याबद्दल अभिमानाने सांगणे, त्यांचा गौरव करणे हे मला साहजिकच वाटते. अनेक जणांच्या अविश्रांत परिश्रमांमुळेच हा देश वेगाने प्रगती करतो आहे. पावलाला पाऊल जोडून सव्वाशे कोटी देशवासिय एक एक पाऊल स्वत: तर पुढे जात आहेतच, आणि देशालाही पुढे नेत आहेत. उत्तम शिक्षण, उत्तम कौशल्य आणि रोजगाराच्या नवनव्या संधी. नागरिकांना विमा संरक्षण देण्यापासून बँकिंग सुविधा पुरवणे, जागतिक पातळीवर व्यवसाय सुलभीकरणासाठी सुधारणा, व्यापार आणि नवा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा देणे, सर्वसामान्य कुटुंबातील लोक जे बँकेच्या दारापर्यंतही पोहचु शकत नव्हते, त्यांच्यासाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून सुलभ रितीने कर्ज उपलब्ध करुन देणे.
प्रत्येक भारतीयाला जेव्हा हे कळते की सारे जण “योग” या गोष्टीकडे आकर्षित झाले आहे, आणि साऱ्या जगाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला आणि सारे जग जोडले गेले तेव्हा आमच्या मनात विश्वास निर्माण होतो की हाच आमचा “हिंदुस्थान”. जेव्हा आपल्याला विराट रुपाचे दर्शन होते तेव्हाच तर हा विश्वास, हा भाव आपल्या मनात निर्माण होतो. यशोदा माता आणि कृष्णाची ती कथा कोण बरे विसरेल जेव्हा बालकृष्णाने तोंड उघडले आणि यशोदामातेला त्यात साऱ्या ब्रम्हांडाचे दर्शन घडवले तेव्हा यशोदेला कृष्णाच्या सामर्थ्यांचा प्रत्यय आला. योगदिनाच्या निमित्ताने हाच प्रत्यय भारताला आला आहे. स्वच्छतेचा विषय आता घरोघरी एक प्रकारे चर्चिला जातोय. त्यांच्यातला नागरिकांचा सहभाग वाढतोय. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या वर्षांनी जेव्हा एखाद्या गावात विजेचे खांब उभे राहतात. काळोख संपतो तेव्हा त्या गावकऱ्यांना होणारा आनंद, त्यांना वाटणारा उत्साह कसा अमर्याद असतो याची आपल्यासारख्या शहरी भागात राहणाऱ्यांना विजेचा वापर करणाऱ्यांना कल्पानाही येणार नाही.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांचे ऊर्जा विभाग हे काम यापूर्वीही करत होते. पण गावागावात एक हजार दिवसात वीज पोहचवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आज या गावात वीज पोहचली, आज त्या गावात पोहचली अशा बातम्या येतात तेव्हा त्यात असतो आनंद आणि उत्साह.
या घटनेची प्रसार माध्यमांमध्ये म्हणावी तशी चर्चा होताना अजून दिसत नाही. पण मला खात्री आहे, वीज पोहचलेल्या या गावांपर्यंत प्रसार माध्यमे पोहचतील आणि तिथल्या उत्साहाने भरलेले वातावरण, वीज आल्यामुळे त्या गावकऱ्यांना झालेला आनंद या गोष्टी ही प्रसार माध्यमे साऱ्या देशातील जनतेपर्यंत पोहचवतील. याचा सगळयात मोठा फायदा म्हणजे जे सरकारी कर्मचारी गावागावात वीज पोहचवण्याचे हे काम करताहेत त्यांना समाधान मिळेल, एखाद्या गावाचे जीवन आमूलाग्र बदलून टाकण्याचे काम त्यांनी केलेय यांची दखल प्रसार माध्यमे घेत आहेत याचा त्यांना आनंद मिळेल शेतकरी असो, गरीब असो, महिला असोत, व तरुण या सगळयांपर्यंत या गोष्टी पोहचवायला हव्यात हे नक्की ? कोणत्या सरकारने कोणते काम केले आणि कोणत्या सरकाने कोणते काम नाही केले यासाठी हे पोहचायला नको तर त्या गोष्टी मिळणे हा त्यांचा अधिकार आहे आणि तो त्यांनी गमावू नये यासाठी पोहचायला हवे. योग्य गोष्टी, चांगल्या गोष्टी, सामान्य माणसाच्या उपयोगी पडणाऱ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहचत आहेत आणि पोहचतील यासाठी आपण सगळयांनी प्रयत्न करायला हवेत. असे करणे म्हणजे एक प्रकारे सेवाच आहे. माझ्या परीने हा एक छोटासा प्रयत्न मी केला आहे. मी एकटा हे सारे करु शकत नाही, पण जेव्हा मी सांगतो तेव्हा मला काहीतरी केलेच पाहिजे ना.
आपल्या मोबाईल फोनवर नरेंद्र मोदी ॲप डाऊनलोड करुन त्या ॲपच्या माध्यमातून सामान्य नागरिक माझ्यापर्यंत पोहचू शकतो. अनेक छोटया छोटया गोष्टी मी ॲपद्वारे आपल्यापर्यंत पोहचवत असतो, लोकसुध्दा अनेक गोष्टी त्याच ॲपच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहचवत असतात याचा मला आनंद होतो. तुम्ही सुध्दा या प्रयत्नात सहभागी व्हा. सव्वाशे कोटी देशवासियांपर्यंत आपल्याला पोहचायचे आहे. तुमच्या मदतीशिवाय मी कसा पोहोचणार ? सामान्य माणसाच्या भाषेत आपण त्यांच्यापर्यंत पोहचवूया आणि त्यांच्या हक्काच्या गोष्टी त्यांना मिळतील यासाठी त्यांना प्रेरित करु.
माझ्या तरुण मित्रांनो, 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात मी स्टार्ट अप इंडिया स्टॅण्ड अप इंडिया या संकल्पनेबद्दल प्राथमिक चर्चा केली होती. त्यानंतर सरकारच्या प्रत्येक खात्यात, प्रत्येक विभागात ते काम सुरु झाले. “स्टार्ट अप या बाबतीत भारत जागतिक राजधानी होऊ शकतो का ? नवनव्या प्रकारे, नव्या संशोधनासह स्टार्ट अप म्हणजे आमच्या राज्यांमधल्या युवकांसाठी एक उत्तम संधी ठरेल. उत्पादन क्षेत्र असो, सेवा क्षेत्र असो, शेती क्षेत्र असो. प्रत्येक बाबतीत नवीन विचार, नवीन प्रयोग, नवीन प्रयत्न नवीन शोध यांची गरज आहे, त्याशिवाय जग पुढे जाणार नाही. स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया योजना आमच्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. माझ्या युवा मित्रांनो, 16 जानेवारी या दिवशी स्टार्ट अप इंडिया स्टॅण्ड अप इंडया या योजनेचा पूर्ण कृती आराखडा भारत सरकार सादर करणार आहे. कसे होणार, काय होणार ? या सगळयाचे एक प्रारुप आपल्यासमोर मांडले जाईल. आणि या कार्यक्रमात देशभरातील आयआयटी, आयआयएम, केंद्रीय विद्यापीठ, एनआयटी, जिथे जिथे तरुण पिढी आहे त्या सर्वांना थेट संपर्क, लाइव्ह कनेक्टीव्हीटीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी करुन घेतले जाईल.
स्टार्ट अपच्या बाबतीत आमच्याकडे एक धारणा तयार झाली आहे. जसे की डिजीटल क्षेत्र किंवा आयटी क्षेत्र, यांच्यासाठीच स्टार्टअप आहे.
पण असे अजिबात नाही. भारताच्या गरजेप्रमाणे आपल्याला त्यात बदल करायचे आहेत. एखादी गरीब व्यक्ती मोलमजुरी करते, अंगमेहनत करते, या व्यक्तीचे श्रम हलके व्हावेत, कष्ट कमी व्हावेत असा एखादा शोध आमच्या तरुण मित्राने लावावा अशी अपेक्षा आहे. यालाही मी स्टार्ट अपच मानतो असे काम करणाऱ्या तरुणाला मदत करावी असे मी बँकेला सुचवेन. धैर्याने पुढे जा, बाजारपेठ मिळेल असे मी या तरुणाला सुचवेन. केवळ शहरी भागातच आमच्या युवा पिढीची बुध्दीमत्ता एकवटली आहे हा गैरसमज आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक भागातल्या तरुणाकडे प्रतिभा आहे. त्यांना गरज आहे ती संधी मिळण्याची. स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया ही योजना केवळ काही शहरांपुरती मर्यादित राहता कामा नये, हिंदुस्थानच्या कोना-कोपऱ्यापर्यंत पोहोचायला हवी. राज्य सरकारांनीही या बाबतीत पुढाकार घ्यावा असा मी त्यांना आग्रह करतो. या विषयावर 16 जानेवारीला मी आपल्याशी अधिक सविस्तर बोलेन. तुमच्या सूचनांचे मी नेहमीच स्वागत करेन.
प्रिय युवा मित्रांनो, 12 जानेवारी, स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. माझ्याप्रमाणेच या देशातल्या कोटयावधी लोकांनी स्वामी विवेकानंदापासून प्रेरणा घेतली आहे. त्यांची जयंती राष्ट्रीय युवा उत्सवाच्या स्वरुपात 12 जानेवारी 1995 पासून साजरी केली जाते. यावर्षी हा कार्यक्रम छत्तीसगडमध्ये रायपूर येथे होणार आहे. विशिष्ट संकल्पनेवर आधारित हा युवा महोत्सव. मला असे कळतेय की यंदाची संकल्पना आहे “इंडियन यूथ ऑफ डेव्हलपमेन्ट, स्किल अँड हार्मोनी. सर्व राज्यांमधून हिंदुस्थानातील प्रत्येक भागातून दहा हजारांहून अधिक युवक तिथे जमणार आहेत अशी मला माहिती मिळाली आहे. जणू काही एक लघुभारत तिथे अवतरणार आहे. युवा भारताचे दृश्य अवतरणार आहे. जणू काही स्वप्नांचा, आशा, आकांक्षांचा महापूर लोटणार आहे. संकल्पाची प्रचिती येणार आहे. या राष्ट्रीय युवा महोत्सवाबद्दल तुमच्या सूचना, तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहचवाल का ? विशेषत: माझ्या तरुण मित्रांना मी सुचवेन की “नरेंद्र मोदी ॲप”च्या माध्यमातून तुमचे विचार थेट माझ्यापर्यंत पोहचवा. तुमच्या मनात काय आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. ते विचार या युवा महोत्सवात प्रकट व्हावेत, प्रतिबिंबित व्हावेत असे मला वाटते. त्यासाठी आवश्क त्या सूचना आवश्यक सल्ला मी सरकारी विभागांना देईल. राष्ट्रीय युवा महोत्सवाविषयी नरेंद्र मोदी ॲप वरुन तुमची मते जाणून घ्यायला, तुमचे विचार जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.
गुजरातच्या अहमदाबादचे दिलीप चौहान, दृष्टीहीन शिक्षक आहेत ते. त्यांच्या शाळेत एक्सेसेबल इंडिया डे, सुलभसंचार भारत दिवस साजरा केला. दूरध्वनीवरुन त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
दिलीपजी तुमवे मी मन:पूर्वक आभार मानतो तुम्ही स्वत: या क्षेत्रात काम करत आहात, यात येणाऱ्या अडचणींचा तुम्ही सामना केला आहे. समाजात काम करणाऱ्या अशा व्यक्तींना भेटण्याचा योग जेव्हा येतो, तेव्हा मनात अनेक विचार येतात. आपल्या विचारसरणीप्रमाणे आपला त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन काही जणांना अवयव गमवावे लागतात, काही जणांमध्ये जन्मत:च काही त्रुटी असते आणि अशा व्यक्तींकरता आजवर पूर्ण जगभरात अनेकविध शब्दप्रयोग, संज्ञा वापरल्या गेल्या आहेत. या संज्ञांविषयी, शब्द प्रयोगांविषयी विचार विनिमय होत असतो. प्रत्येकवेळी असे मत मांडले गेले की अशा व्यक्तींकरता या शब्दाचा वापर, उल्लेख योग्य नाही, सन्मान व्यक्त करणारा नाही. आपण हे पाहिले असेल की अनेक शब्द प्रचलित झाले आहेत. कधी अपंग , कधी विकलांग, तर कधी “भिन्न रुपाने सक्षम” असे शब्द येत राहिले. आता हे खरं आहे की प्रत्येक शब्दाचे आपले असे वेगळे महत्त्व आहे. भारत सरकारने यावर्षी सुगम्य भारत अभियान सुरु केले त्या कार्यक्रमाला मी जाणार होतो पण तामिळनाडूत काही जिल्हयांमध्ये विशेषत: चेन्नईत आलेल्या महापुरामुळे मी तिकडे गेलो त्यामुळे सुगम्य भारत अभियानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही. पण त्या कार्यक्रमाला जायचे म्हणून माझ्या मनात विचार येत होते. त्यावेळी मला असे वाटले की परमात्म्यानेने एखाद्या व्यक्तीच्या शरीरात काही उणीव ठेवली आहे, त्रुटी आहे, त्या व्यक्तीचा एखादा अवयव सक्षम नाही अशा व्यक्तींना आपण विकलांग म्हणतो, अपंग म्हणतो पण त्यांच्या जवळ गेल्यावर लक्षात येते की आपल्याला केवळ त्या व्यक्तीमधल्या उणीवा दिसल्या. मात्र परमेश्वराने त्या व्यक्तीला विशेष शक्ती बहाल केली आहे. परमात्म्याने प्रदान केलेली ही देणगी आपण बघू शकत नाही. पण जेव्हा या व्यक्ती काम करतात, स्वत:ला सिध्द करतात तेव्हा आपले लक्ष जाते आणि मनात प्रश्न येतो अरे वा, हा कसे करत असेल हे ? आणि मग माझ्या, मनात विचार आला की तो विकलांग आहे हे दिसते पण त्याच्या जवळ असणारी असाधारण क्षमता अनुभवाने कळते. म्हणून मला असे वाटले की आपल्या देशात विकलांग या शब्दाऐवजी “दिव्यांग” या संज्ञेचा वापर करावा. या अशा व्यक्ती आहेत ज्यांच्यापाशी मात्र किंवा त्याहून अधिक असे भाग आहेत ज्यात दिव्यता आहे, दिव्यशक्तीचा संचार आहे जो आपल्या सारख्या धडधाकट लोकांपाशी नाही. मला हा शब्द फार आवडला. माझ्या देशातले नागरिक आता “विकलांग” ऐवजी “दिव्यांग” हा शब्द प्रचलित करतील काय ? मला आशा आहे की, हा विचार आपण पुढे न्याल.
सुगम्य भारत अभियानाची आम्ही त्या दिवशी सुरुवात केली आहे. आवश्यक त्या पायाभूत सुधारणा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षही, अंमलात आणून या दिव्यांग लोकांसाठी सुगम्य परिसर प्रत्यक्षात घडवूया. शाळा, रुग्णालय, सरकारी कार्यालये, बस डेपो, रेल्वे स्थानकात रॅम्प असावेत, सुलभ पार्किंग, सुलभ उद्वाहन, ब्रेललिपी, कितीतरी गोष्टी आहेत. या साऱ्या गोष्टी सुगम्य बनवण्यासाठी नवीन संशोधन हवे, तंत्रज्ञाने हवे, संवेदनशीलता हवी, व्यवस्था हवी. हे करायचे असा आम्ही निर्धार केला आहे. लोकांचा सहभाग वाढतो आहे. त्यांना हे आवडले आहे. आपणही आपल्या पध्दतीने यात सहभागी व्हा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सरकारी योजना सतत येत असतात, चालत राहतात पण या योजना केवळ कृत्रिम नकोत, त्यात चेतना हवी. शेवटच्या घटकापर्यंत ती चांगल्या रुपात पोहचायला हवी. फाईलींमध्ये त्यांचा श्वास गुदमरता कामा नये. कारण या योजना आखल्या जातात सामान्य माणसाकरता, गरीब माणसा करता खऱ्या आणि गरजू व्यक्तीपर्यंत योजनेचे लाभ पोहोचवण्यासाठी काही दिवसांपूर्वी भारत सरकारने एक प्रयत्न केला. आपल्या देशात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरला अनुदान दिले जाते. ही रक्कम कोटी रुपयांची असते, पण लाभार्थ्यांपर्यंत योग्य वेळेत ती पोहोचली नाही याची खातरजमा करणारी यंत्रणा आपल्याकडे नव्हती. सरकारने त्यात थोडा बदल केला. जनधन बँक खाते, आधार कार्ड यांच्या सहाय्याने जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम थेट लाभ हस्तांतरण योजना राबवली गेली आणि अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागली. जगातील सर्वात मोठी आणि यशस्वी ठरलेली थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणून या उपक्रमाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे हे आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो. “पहल” या नावाने ही योजना ओळखली जाते. नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत जवळ जवळ पंधरा कोटी एलपीजीधारक “पहल” योजनेचे लाभार्थी ठरले आहेत. 15 कोटी लोकांच्या बँक खात्यात हे अनुदान थेट जमा होऊ लागले आहे. दलाल नाही, कोणाच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही, भ्रष्टाचाराची शक्यता नाही. एकीकडे आधार कार्ड, दुसरीकडे जनधन खाते उघडणे आणि तिसऱ्या बाजूला राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्यांना आधार क्रमांक आणि खाते क्रमांकाशी जोडणे हा उपक्रम सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी मनरेगा ज्याद्वारे गावात रोजगाराच्या संधी उपलबध होतात. त्याबद्दल अनेक तक्रारी येत होत्या. पण आता अनेक ठिकाणी मजुरी करणाऱ्या व्यक्तींच्या खात्यात पैसे थेट जमा होतात विद्यार्यिांना स्कॉलरशिपमध्येही अनेक अडचणी येत होत्या. त्याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्याही आता दूर होत आहेत. भविष्यात त्याबाबत आणखी प्रगती होईल. आतापर्यंत सुमारे 40 हजार कोटी रुपये विविध योजनांच्या माध्यमातून थेट लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जवळपास 35 ते 40 योजना आता “डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर” अंतर्गत समाविष्ट करण्यात येत आहेत, असा माझा ढोबळ मनाने अंदाज आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 26 जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे एक सोनेरी क्षण आहे. योगायोगाने यंदाचे वर्ष आपल्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. संसदेत यानिमित्ताने संविधानावर दोन दिवस विशेष चर्चा ठेवण्यात आली होती आणि ती अतिशय उत्तम प्रकारे झाली. सर्व पक्षांनी सर्व खासदारांनी घटनेचे पावित्र्य, घटनेचे महत्त्व, घटनेचा मूळ गाभा समजणे याविषयी खूप चांगली चर्चा केली हा उपक्रम आपण पुढे ही चालू ठेवायला हवा. जनतेला सत्तेसोबत आणि सत्तेला जनतेसोबत जोडण्याचे काम प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करता येईल काय ? घटनेने आपल्याला खूप अधिकार दिले आहेत त्याबद्दल नेहमी चर्चा होते आणि झाली ही पाहिजे. त्याचे महत्त्व आहे परंतु घटनेने काही कर्तव्यांवरही भर दिलेला आहे. त्याची चर्चा मात्र फार कमी होते असे दिसून येते. निवडणूकांच्या वेळेला चहुबाजूला जाहिराती होतात, भिंतींवर लिहिले जाते मोठ मोठे फलक लागतात की, “मतदान करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे.” मतदानाच्या वेळी आपल्या कर्तव्याची जशी चर्चा होते तशी नेहमीच्या जीवनात का होत नाही ? बाबासाहेब आंबेडकरांचे 125 वे जयंती वर्ष साजरे करत असताना 26 जानेवारीच्या निमित्ताने शाळा, कॉलेज, गावोगावी तसेच शहरातल्या सोसायटया संस्थांमध्ये “कर्तव्य” या विषयावर निबंध स्पर्धा, काव्य स्पर्धा, तसेच वक्तृत्व स्पर्धा आयोजित करायला काय हरकत आहे. सव्वाशे कोटी भारतीयांनी कर्तव्य भावनेने एका पाठोपाठ एक पाऊल उचलत पुढे वाटचाल केली तर मोठा इतिहास घडू शकेल. पण कुठेतरी सुरुवात करायला हवी माझ्या मनात एक विचार आलाय आपण 26 जानेवारीच्या आत आपले कर्तव्य-डयूटी याबद्दल आपल्या मातृभाषेत किंवा हिंदीत किंवा इंग्रजीत लिहायचे असेल, तर इंग्रजीत “कर्तव्य” या विषयावर कविता किंवा निबंध असेल, तो लिहून माझ्याकडे पाठवू शकाल का ? मला तुमचे विचार जाणून घ्यायचे आहेत. आपले लेखन ‘MyGov.’ या माझ्या पोर्टलवर पाठवा. माझ्या देशातील युवा पिढी कर्तव्यांबद्दल काय विचार करते हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे.
एक छोटा प्रस्ताव द्यावासा वाटतो. 26 जानेवारीला जेव्हा आपण प्रजासत्ताक दिन साजरा करणार तेव्हा आपल्या शहरात महापुरुषांचे जे पुतळे उभारलेले आहेत त्यांची स्वच्छता. त्याच्या आसपासच्या परिसराची स्वच्छता आणि सुशोभीकरण, आपल्या नागरिकांद्वारे, शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांद्वारे करता येईल का ? आणि मी हे सरकारी पातळीवरुन बोलत नाहीये. महापुरुषांचे पुतळे उभारतांना आपण मोठया श्रध्देने ते उभारतो पण नंतर त्यांची देखभाल करण्याच्या बाबतीत मात्र आपण कमालीची उदासीन असतो. समाजासाठी, देशासाठी आपण हे सहजतेने करु शकतो का येत्या 26 जानेवारीनिमित्त आपण सर्वांनी मिळून या महापुरुषांच्या प्रतिमांची स्वच्छता, तिथल्या परिसराची स्वच्छता जनता जर्नादनाद्वारे नागरिकांद्वारे करुन त्यांच्या प्रति आदर व्यक्त करु शकतो.
प्रिय देशवासियांनो, पुन्हा एकदा आपल्याला 2016 या नववर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा ! धन्यवाद ! ! !
B.Gokhale