Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (28 ऑक्टोबर 2018)


माझ्या प्रिय देशवासियांनो, सर्वाना नमस्कार! 31 ऑक्टोबरला  आपल्या सर्वांचे लाडके सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही `रन फॉर युनिटी’ साठी देशातील तरुण वर्ग ऐक्यासाठी धावण्यास सज्ज झाला आहे. आता तर हवामानही अत्यंत सुखद असते. हे हवामान `रन फॉर युनिटी’ साठीचा  उत्साह वाढवणारे असते. आपण सर्व जण खूप मोठ्या संख्येने ऐक्यासाठीच्या या धावण्याच्या स्पर्धेत जरूर सहभाग घ्याच, असा माझा आग्रह आहे. स्वातंत्र्यापूर्वी  जवळपास सहा महिने अगोदर, 27 जानेवारी 1947 ला जगातले प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मासिक `टाईम’ मासिकानं जी आवृत्ती प्रकाशित केली होती, त्याच्या मुखपृष्ठावर सरदार पटेल यांच छायाचित्र छापलं होतं. आपल्या आवरण कथेत त्यांनी भारताचा एक नकाशा छापला होता आणि तो नकाशा जसा आज आम्ही पाहतो, तसा नव्हता. हा अशा भारताचा नकाशा होता, जो अनेक भागांमध्ये खंडित झाला होता. तेव्हा 550 हून अधिक संस्थाने देशात होती. भारतातील इंग्रजांचा रस संपला होता तरीही ते या देशाला अनेक भागांत तोडून, छिन्नविच्छिन्न करून मग देश सोडून जाऊ पाहत होते. `टाईम’ मासिकानं लिहिलं होतं की, भारतावर फाळणी, हिंसाचार,अन्नधान्य टंचाई, महागाई आणि सत्तेचे राजकारण यांसारख्या धोक्याचे ढग घोंघावत आहेत. पुढे `टाईम’ मासिकानं लिहिलं की, या सर्वांमध्ये देशाला ऐक्याच्या धाग्यात गुंफण्याची आणि जखमा भरून आणण्याची क्षमता जर कुणात असेल तर ते आहेत सरदार वल्लभभाई पटेल. `टाईम’ मासिकाचा हा वृत्तांत लोहपुरुषाच्या जीवनातील इतरही अनेक पैलू उघड करणारा होता. 1920 च्या दशकात अहमदाबादमध्ये आलेल्या पुरानंतर बचाव कार्याची कशी व्यवस्था त्यांनी केली, बारडोली सत्याग्रहाला त्यांनी कशी दिशा दिली. देशाप्रती त्यांचा प्रामाणिकपणा आणि कटीबद्धता अशी होती की, शेतकरी, मजुरांपासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वच जणांचा त्यांच्यावर विश्वास होता. गांधीजींनी सरदार पटेल यांना म्हटले की, राज्यांच्या समस्या इतक्या अवघड आहेत की, फक्त आपणच त्यावर तोडगा काढू शकता आणि सरदार पटेल यांनी एक एक करून सर्व समस्यांवर तोडगा काढला आणि देशाला ऐक्याच्या धाग्यात गुंफण्याचं अशक्यप्राय कार्य पूर्ण करून दाखवलं. त्यांनी सर्व संस्थानांचं भारतात विलीनीकरण घडवून आणलं. जुनागढ असो की हैदराबाद, त्रावणकोर असो की राजस्थानातील राजवटी- सरदार पटेल यांची वैचारिक परिपक्वता आणि धोरणात्मक कौशल्य यामुळेच आज आपण एकसंध भारत पाहू शकत आहोत. ऐक्याच्या बंधनात बांधल्या गेलेल्या या राष्ट्राला, आमच्या भारतमातेला पाहून आम्ही स्वाभाविकच सरदार वल्लभभाई पटेल यांचे पुण्यस्मरण करतो. यंदाच्या 31 ऑक्टोबरला साजरी होणारी सरदार पटेल यांची जयंती तर आणखीच विशेष असेल- त्या दिवशी सरदार पटेल यांना खरीखुरी श्रद्धांजली देताना आपण ऐक्याचा पुतळा स्टॅच्यु ऑफ युनिटी  राष्ट्राला समर्पित करू. गुजरातेतल्या नर्मदा नदीच्या किनार्यावर उभारलेल्या गेलेल्या या पुतळ्याची उंची अमेरिकेतल्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टी पुतळ्याच्या उंचीपेक्षा दुप्पट आहे. हा पुतळा जगातला  सर्वात उंच गगनचुंबी पुतळा आहे. प्रत्येक भारतीयाला  आता याचा अभिमान वाटेल की, जगातला सर्वात उंच पुतळा भारतभूमीवर आहे. सरदार पटेल, ज्यांचे नाते जमिनीशी होते, ते आता आकाशाची शोभाही वाढवतील. मला आशा आहे की, देशातला प्रत्येक नागरिक भारतमातेच्या या महान यशाप्रती जगासमोर गर्वाने छाती पुढे कडून, मान ताठ करून याचे गौरवगीत गाईल आणि स्वाभाविकपणे प्रत्येक भारतीयाला स्टॅच्यु ऑफ युनिटी  पहावा वाटेल.  आणि मला असा विश्वास आहे की, भारताच्या प्रत्येक कानाकोपर्यातले लोक, आता या स्थानालाही एक लाडकं पर्यटन स्थळ म्हणून पसंत करतील.

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, कालच आपण सर्व देशवासीयांनी इन्फंट्री डे साजरा केला. जे भारतीय सैन्याचे सदस्य आहेत, त्या सर्वाना मी वंदन करतो. मी आपल्या सैनिकांच्या परिवारातल्या सदस्यांनाही त्यांच्या धाडसाबद्दल सॅल्युट करतो, पण आपल्याला ठाऊक आहे का, आम्ही सर्व भारतीय नागरिक हा इन्फंट्री डे का मानतो? हा तोच दिवस आहे, ज्या दिवशी भारतीय सैन्यातले जवान काश्मीरच्या धरतीवर उतरले आणि घुसखोरांपासून खोर्याचे संरक्षण केले. या ऐतिहासिक घटनेचा सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी थेट संबंध आहे. मी भारताचे महान लष्करी अधिकारी सॅम माणिकशॉ यांची एक  जुनी मुलाखत वाचत होतो. त्या मुलाखतीत फिल्ड मार्शल माणिकशॉ ते कर्नल असतानाच्या  काळातील आठवणी सांगत होते. याच दरम्यान, 1947 च्या ऑक्टोबरमध्ये, काश्मीरमध्ये लष्करी मोहीम सुरु झाली होती. एका बैठकीत त्या वेळी काश्मिरात सैन्य पाठवायला उशीर होत असलेला पाहून पटेल कसे नाराज झाले होते, ते फिल्ड मार्शल माणिकशॉंनी सांगितलं. सरदार पटेल यांनी आपल्या खास करड्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि काश्मीरमध्ये सैन्य पाठवायला जराही उशीर केला जाऊ नये आणि लवकरात लवकर यावर तोडगा निघाला पाहिजे, असं सांगितलं. त्यानंतरच सैनिकांनी काश्मीरसाठी उड्डाण केले आणि सेनेला कसे यश मिळाले, ते आपण पाहिलेच. 31 ऑक्टोबरला आपल्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीही आहे. इंदिराजींना आदरपूर्वक श्रद्धांजली.

माझ्या प्रिय देशवासियांनो, खेळ कुणाला आवडत नाही? खेळांच्या जगात स्पिरीट, स्ट्रेंग्थ, स्किल, स्टॅमीना- या साऱ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या एखाद्या खेळाडूच्या यशस्वीतेच्या कसोट्या असतात आणि हेच चारही गुण एखाद्या राष्ट्राच्या निर्माणात महत्वपूर्ण असतात. ज्या देशाच्या युवकांमध्ये हे गुण असतात तो देश केवळ अर्थव्यवस्था, विज्ञान आणि टेक्नॉलॉजी यासारख्या क्षेत्रांतच प्रगती करेल असे नाही तर स्पोर्ट्समध्येही आपला झेंडा फडकवेल. नुकत्याच माझ्या आठवणीत राहतील अशा दोन भेटी झाल्या. पहिली जकार्तात झाली. आशियाई पॅरा गेम्स 2018 मध्ये सहभागी झालेल्या आमच्या पॅरा अॅथलिट्सना भेटायची संधी मिळाली. या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 72 पदकं जिंकून नवा विक्रम रचला आणि भारताचा सन्मान वाढवला. या सर्व प्रतिभाशाली पॅरा अॅथलिट्सना व्यक्तीशः भेटायचं भाग्य मला लाभलं आणि मी त्यांचं अभिनंदन केलं. त्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि कोणत्याही विपरीत परिस्थितीशी लढून पुढे जाण्याची त्यांची जिद्द सर्व देशवासियांना प्रेरणा देणारी आहे. याच प्रकारे अर्जेंटिनामध्ये झालेल्या समर युथ ऑलिम्पिक्स 2018 च्या विजेत्यांना भेटायची संधी मिळाली. आपल्याला हे ऐकून आनंद वाटेल की,  युथ ऑलिम्पिक्स 2018 मध्ये आपल्या युवकांनी आतापर्यंतची सर्वात उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत आम्ही 13 पदकांशिवाय मिक्स प्रकारांमध्ये आणखी तीन पदके मिळवली. आपल्याला आठवत असेलच की, यंदाच्या आशियाई गेम्समध्येही भारताची कामगिरी उत्तम राहिली. पहा, काही मिनिटांपासून बोलताना मी किती वेळा आतापर्यंतची सर्वात चांगली, सर्वात शानदार असे शब्द वापरले. ही भारतीय खेळांची कहाणी आहे, जी दिवसेंदिवस नवनवी उंची गाठत आहे. भारत केवळ खेळांमध्येच नाही तर अशा क्षेत्रांमध्येही विक्रम रचतोय ज्यांच्या बाबत कधी विचारही केला गेला नव्हता. उदाहरण म्हणून मी आपल्याला पॅरा अॅथलिट नारायण ठाकूर यांच्याबाबतीत सांगू इच्छितो. त्यांनी 2018 च्या आशियाई पॅरा गेम्स मध्ये देशासाठी अॅथलेटीक्समध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. ते जन्मापासून दिव्यांग आहेत. ते आठ वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील वारले. नंतर आठ वर्षे एका अनाथाश्रमात काढली.  अनाथाश्रम सोडल्यानंतर जीवनाची गाडी चालवण्याकरता डीटीसीच्या बसची सफाई करण्याचे आणि दिल्लीतल्या रस्त्यांवरील ढाब्यांमध्ये वेटर म्हणून काम केले. आज तेच नारायण आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकत आहेत. इतकंच नाही तर, खेळांमधील भारताच्या उत्तम कामगिरीचा वाढता आवाका पहा, भारताने जुडोमध्ये कधीही सिनियर किंवा ज्युनियर स्तरावर कोणतेही ऑलिम्पिक पदक जिंकलेले नाही. परंतु, तबाबी देवीने युवा ऑलिम्पिक्समध्ये जुडोत रजत पदक जिंकून इतिहास रचलाय. 16 वर्षांची युवा खेळाडू तबाबी देवी मणिपूरच्या एका गावातली राहणारी आहे. त्यांचे वडील मजूर आहेत तर आई मासे विकण्याचे काम करते. अनेक वेळा त्यांच्या कुटुंबावर अशी वेळ आली की, त्यांच्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते. अशा परिस्थितीतही तबाबी देवीचे मनोबल ढासळले नाही. आणि त्यांनी देशासाठी पदक जिंकून इतिहास घडवला. अशा तर असंख्य कहाण्या आहेत. प्रत्येक आयुष्य एक प्रेरणा स्त्रोत आहे. प्रत्येक युवा खेळाडू आणि त्याची जिद्द नव्या भारताची ओळख आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण 2017 मध्ये फिफा 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचं  यशस्वी आयोजन केलं.  संपूर्ण जगानं अत्यंत यशस्वी क्रीडास्पर्धा घेतल्याबद्दल त्याची प्रशंसा केली होती. फिफा अंडर सेव्हनटीन वर्ल्ड कपमध्ये प्रेक्षकांच्या संख्येच्या बाबतीत एक नवीन विक्रम रचला गेला होता. देशातल्या वेगवेगळ्या स्टेडीयममध्ये 12 लाखाहून अधिक लोकांनी फुटबॉल सामन्यांचा आनंद लुटला आणि युवक खेळाडूंचा उत्साह वाढवला. यंदाच्या वर्षी भारताला भुवनेश्वरमध्ये पुरुष हॉकी कप 2018 चं आयोजन करायचं भाग्य प्राप्त झालं आहे. हॉकी वर्ल्ड कप 2018 नोव्हेंबरमध्ये सुरु होत असून 16 डिसेंबरपर्यंत चालेल. प्रत्येक भारतीय कोणताही खेळ खेळत असो किंवा कोणत्याही खेळत त्याला रस असो, हॉकी प्रती त्याच्या मनात एक आत्मीयता असतेच. हॉकीमध्ये  भारताचा इतिहास सुवर्णाने लिहिण्यासारखा राहिला आहे. पूर्वी भारताला अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकं मिळाली आहेत आणि एका वेळेस तर भारत विश्व चषक विजेताही राहिला आहे. भारताने हॉकीला अनेक महान खेळाडूही दिले आहेत. जगात जेव्हा जेव्हा हॉकीची चर्चा होईल, तेव्हा भारताच्या या महान खेळाडूंशिवाय हॉकीची कथा अपुरी राहील. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना तर संपूर्ण जग ओळखते. त्यांच्यानंतर बलविंदर सिंग सिनियर, लेस्ली ग्लोडीयस, मोहम्मद शाहीद, उधम सिंग यांच्यापासून ते धनराज पिल्लेपर्यंत हॉकीने मोठा प्रवास केला आहे. आजही टीम इंडियाचे खेळाडू आपले श्रम आणि निष्ठेमुळे मिळणार्या यशातून हॉकीच्या  नव्या पिढीला प्रेरित करत आहेत. क्रीडा प्रेमींसाठी रोमांचक सामने पाहण्याची एक चांगली संधी आहे. भुवनेश्वरला त्यांनी जावं आणि केवळ भारतीयच नव्हे तर इतर संघांनाही प्रोत्साहन द्यावं. ओडिशा असं राज्य आहे,  ज्याचा गौरवशाली इतिहास आहे, समृद्ध, सांस्कृतिक परंपरा आहे आणि तिथले लोकही उत्साहाने भरलेले असतात. क्रीडाप्रेमींसाठी ही ओडिशा दर्शनाची खूप मोठी संधी आहे. या दरम्यान तुम्ही खेळाचा आनंद लुटण्याबरोबरच कोणार्कचे सूर्य मंदिर, पुरीमधले भगवान जगन्नाथ मंदिर आणि चिलका सरोवरासह अनेक जगप्रसिद्ध प्रेक्षणीय आणि पवित्र स्थळंही पाहू शकता. मी या स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा देतो आणि सव्वाशे कोटी भारतीय त्यांच्याबरोबर आणि समर्थनासाठी उभे आहेत, अशी खात्री देतो. भारतात येणाऱ्या सर्व जगातल्या संघानाही मी खूप खूप शुभेच्छा देतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, सामाजिक कार्यासाठी ज्या प्रकारचे लोक पुढे येत आहेत, त्यासाठी स्वयंसेवा करत आहेत, ते सर्व देशवासीयांसाठी प्रेरणादायक आणि उत्साह भरणारे आहे. सेवा परमो धर्म: ही भारताची परंपरा आहे. अनेक शतकं जुनी आमची परंपरा आहे आणि समाजाच्या प्रत्येक कोपर्यात, प्रत्येक क्षेत्रात त्याचा सुगंध आपल्याला आजही जाणवतो. परंतु नव्या युगात, नव्या पद्धतीने, नवी पिढी, नव्या आशेने, नव्या उत्साहाने, नवीन स्वप्नं घेऊन हे कार्य करण्यासाठी आज पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, जिथे एक पोर्टल सुरु करण्यात आली आहे, तिचे नाव आहे सेल्फ फोर सोसायटी. ‘Mygov’ आणि देशाच्या आयटी तसेच इलेक्ट्रॉनिक उद्योगाने आपल्या कर्मचार्यांना सामाजिक उपक्रमांसाठी उत्साहित करून त्यांना अशी संधी उपलब्ध करून द्यायला, हे पोर्टल सुरू केले आहे. या कार्यासाठी त्यांच्यात जो उत्साह आणि आत्मीयता आहे, ते पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. आयटी ते सोसायटी, मी नाही आम्ही, अहं नाही वयं, स्व ते समष्टीच्या प्रवासाचा सुगंध यात आहे. कुणी मुलांना शिकवीत आहे तर कुणी ज्येष्ठ नागरिकांना शिकवत आहे, कुणी स्वच्छतेच्या कार्यात लागला आहे तर कुणी शेतकर्यांना मदत करतोय आणि हे सर्व करण्यामागे कोणती लालसा नाही तर समर्पण आणि संकल्पाची नि:स्वार्थी भावना आहे. एक तरुणाने तर दिव्यांगांच्या व्हील चेअर बास्केटबॉल संघाला मदत करायला स्वतः व्हील चेअर बास्केटबॉल शिकला. ही जी भावना आहे, समर्पण आहे, हे विशिष्ट कार्यासाठी झपाटून केलेला उपक्रम आहे. कोणत्याही भारतीयाला याचा अभिमान वाटणार नाही काय? निश्चितच वाटणार. `मी नाही आम्ही’ ही भावना आम्हाला सर्वाना प्रेरित करेल.

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, या वेळी मी जेव्हा `मन की बात’ साठी लोकांच्या आलेल्या सूचना पाहत होतो, तेव्हा मला पुद्दुचेरीहून श्री मनीष महापात्र यांची एक मनोरंजक टिप्पणी पाहायला मिळाली. त्यांनी Mygov वर लिहिलं आहे की, कृपया आपण `मन की बात’ मध्ये भारतातल्या अनेक जमातीचे रितीरिवाज आणि परंपरा निसर्गाशी असलेल्या सहअस्तित्वाचं  सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे, यावर बोलावं. शाश्वत विकासाकरता कशा प्रकारे आम्ही त्यांच्या परंपरा आम्ही आपल्या जीवनात स्वीकारायची गरज आहे, त्यांच्याकडून काही शिकायची आवश्यकता आहे. मनीषजी, हा विषय `मन की बात’ च्या श्रोत्यापुढे ठेवण्यासाठी मी आपले कौतुक करतो. हा असा विषय आहे की जो आम्हाला आमची गौरवशाली इतिहास आणि संस्कृतीकडे पाहायला प्रेरित करतो. आज सारे जग विशेषत: पाश्चात्त्य देश पर्यावरण संरक्षणावर चर्चा करत आहेत आणि संतुलित जीवनशैलीसाठी नवीन मार्ग शोधत आहेत. तसे आमचे भारतवर्षही या समस्येपासून सुटलेले नाही, परंतु यावर तोडगा काढायला आम्हाला केवळ आमचा अंतर्शोध घ्यायचा आहे, आमचा समृद्ध इतिहास,परंपरा पहायच्या आहेत आणि खास करून आपल्या आदिवासी समुदायांची जीवनशैली समजून घ्यायची आहे. निसर्गाशी सहकार करार करून राहणे  आमच्या आदिवासी संस्कृतीचा भाग राहिला आहे. आमचे आदिवासी बंधू भगिनी वृक्षवेली आणि फुलांची पूजा देवी देवतांप्रमाणे करतात. मध्य भारतातल्या भिल आदिवासी जमातीत विशेषतः मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ मध्ये लोक पिंपळ आणि अर्जुन अशा वृक्षांची श्रद्धेने पूजा करतात. राजस्थानसारख्या मरूभूमीत विश्नोई समाजाने पर्यावरण संरक्षणाचा मार्ग आम्हाला दाखवलाय. विशेष करून वृक्षांच्या संरक्षणाबाबत त्यांना आपल्या जीवनाचा त्याग करणे मान्य आहे परंतु एकही झाडाला नुकसान व्हावे, हे त्यांना मंजूर नाही. अरुणाचल प्रदेशात मिशमी वाघांशी आपले नाते असल्याचा दावा करतात. त्यांना ते भाऊ-बहिणही मानतात. नागालँड मध्ये वाघांकडे  वनांचे रक्षक म्हणून पाहिले जाते. महाराष्ट्रातले वारली समुदायातले लोक वाघाला पाहुणे म्हणून मानतात आणि त्यांच्यासाठी वाघांचे अस्तित्व समृद्धी आणणारे असे असते. मध्य भारतातले कोल समुदायात अशी समजूत आहे की, त्यांचे स्वतःचे भाग्य वाघाशी जोडले आहे, वाघाला अन्न मिळाले नाही तर ग्रामस्थांना उपाशी राहावे लागेल- अशी त्यांची श्रद्धा आहे. मध्य भारतातली गोंड आदिवासी माशांच्या प्रजनन हंगामात केथान नदीच्या काही भागात मासेमारी बंद करतात. ही क्षेत्रे माशांची आश्रयस्थाने आहेत, असे ते मानतात. हीच प्रथा पाळल्याने त्यांना चांगली आणि भरपूर प्रमाणात मासळी मिळते. आदिवासी समुदाय आपली घरे नैसर्गिक साहित्याने बनवतात. ती मजबूत असतात आणि पर्यावरणाला अनुकूलही असतात. दक्षिण भारतात निलगिरी पठारावर दुर्गम भागात एक छोटा भटका समुदाय तोडा, पारंपरिक दृष्ट्या त्यांची वस्ती स्थानिक स्तरावर उपलब्ध वस्तूंनी बनवलेल्या असतात.

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, हे खरं आहे की, आदिवासी समुदाय खूप शांततापूर्ण आणि आपसात मिळून मिसळून राहण्यावर भर देतात, पण कुणी त्यांच्या नैसर्गिक स्त्रोतांचे नुकसान करत असेल तर आपल्या अधिकारांसाठी ते लढायला घाबरत नाहीत. आमचे सर्वात पहिले स्वातंत्र्य सैनिक आदिवासी समुदायातले होते, यात काहीच आश्चर्य नाही. भगवान बिरसा मुंडा यांना कोण विसरू शकेल ज्यांनी आपल्या वन्य भूमीचे रक्षण करायला ब्रिटीश सरकारविरोधात जोरदार लढा दिला. मी जी नावे घेतली आहेत त्यांची यादी खूप मोठी आहे. आदिवासी समुदायाची अशी अनेक उदाहरणे आहेत जी आम्हाला निसर्गाशी सहकार्य करून कसे राहता येते, याची शिकवण देतात आणि आज आमच्याकडे जी काही वन्य संपदा उरली आहे, त्यासाठी देश आमच्या आदिवासींचा ऋणी आहे. या. आपण त्यांच्या प्रती आदर व्यक्त करू या.

माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातमध्ये आपण त्या व्यक्ती आणि संस्था यांच्याबाबतीत बोलतो ज्यांनी समाजासाठी काही तरी अद्वितीय कार्य केले आहे. असे कार्य किरकोळ वाटते, परंतु वास्तवात त्यांचा आमची मानसिकता बदलण्यात, समाजाची दिशा बदलण्यात फार गहन प्रभाव पडतो.  काही दिवसांपूर्वी मी पंजाबातले शेतकरी भाई गुरबचन सिंग यांच्याविषयक वाचत होतो. एक सामान्य आणि कष्टाळू शेतकरी गुरबचन सिंगजी यांच्या मुलाचे लग्न होते. लग्नाच्या अगोदर गुरबचन जी यांनी वधूच्या आई वडलाना लग्न आम्ही साध्या पद्धतीने करणार आहोत, असे सांगितले होते. वरात आणि इतर गोष्टी असतील, खर्च फार जास्त करायची गरज नाही. आपल्याला हा प्रसंग साध्या पद्धतीने साजरा करायचा आहे. परंतु त्यांनी अचानक म्हटले, परंतु माझी एक अट आहे. आजकाल लग्न प्रसंगी अटींचा विषय येतो तेव्हा साधारण असे वाटते की,समोरचा काही तरी मोठी मागणी करणार आहे. अशी काही तरी वस्तू मागेल जी वधूच्या कुटुंबियांना अवघड जाईल. परंतु आपल्याला याचे आश्चर्य वाटेल की, हे तर भाई गुरबचन सिंग होते सरळ साधे शेतकरी. त्यांनी जे म्हटले, वधूच्या  वडिलांसमोर जी अट ठेवली, ती आमच्या समाजाची खरी शक्ती आहे. गुरबचन सिंगजीने त्याचा म्हटले की, आपण आपल्या शेतात पराली कधी जाळणार नाहीत, असे मला वचन द्या. यात किती मोठी सामाजिक शक्ती आहे, याची आपण कल्पना करु शकतो. गुरबचन सिंग जी यांची ही मागणी वाटते खूप किरकोळ आहे. परंतु त्यांचे व्यक्तिमत्व किती विशाल आहे हे यातून दिसते. आणि आम्ही पाहिले आहे की, आमच्या समाजात असे अनेक परिवार आहेत जे व्यक्तिगत प्रसंगाचे रुपांतर सामाजिक हिताच्या प्रसंगात करतात. श्रीमान गुरबचन सिंग जी यांच्या कुटुंबाने असेच एक उदाहरण आमच्या समोर ठेवले आहे. मी पंजाबातल्या आणखी एक गाव कल्लर माजरा बाबतीत वाचले आहे जे नाभाजवळ आहे. कल्लर माजरा यासाठी चर्चेत आहे की, धान्याची पराली जाळण्याऐवजी ते नांगरून मातीत मिसळतात आणि त्यासाठी जे तंत्रज्ञान जे वापरात आणायला हवे ते आणले जाते. भाई गुरबचन सिंग जी यांचे अभिनंदन. वातावरण स्वच्छ ठेवायला जे आपल्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत त्या सर्वाना आणि कल्लर माजराच्या लोकांचे अभिनंदन. तुम्ही सुदृढ जीवनशैलीची भारतीय परंपरा एक खर्या वारसदाराप्रमाणे पुढे नेत आहात. ज्या प्रमाणे थेंबा-थेम्बाने सागर बनतो, त्या प्रमाणे लहान लहान सक्रियता आणि जागरूकता तसेच सकारात्मक कार्य सकारात्मक वातावरण तयार करण्यात खूप मोठी भूमिका निभावतात.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आमच्या ग्रंथांमध्ये म्हटले आहे :-

ॐ द्यौः शान्तिः अन्तरिक्षं शान्तिः,

पृथिवी शान्तिः आपः शान्तिः औषधयः शान्तिः |

वनस्पतयः शान्तिः विश्वेदेवाः शान्तिः  ब्रह्म शान्तिः,

वनस्पतयः शान्तिः विश्वेदेवाः शान्तिः  ब्रह्म शान्तिः,

सर्वं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि ||

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ||

याचा अर्थ असा आहे की, हे ईश्वर, तिन्ही लोकांत सर्वत्र शांतता असू दे, जलामध्ये, पृथ्वीवर, आकाशात, अंतरिक्षात, अग्नीमध्ये, वायूमध्ये, औषधीमध्ये, वनस्पतीमध्ये, उपवनात, अवचेतनात, संपूर्ण ब्रह्मांडात शांतता स्थापित करावीस. जीवात, हृदयात, माझ्यात, तुझ्यात, जगताच्या प्रत्येक कणात, प्रत्येक स्थानी शांतता स्थापित कर.

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ||

जेव्हा विश्व शांतीची चर्चा होईल तेव्हा त्यासाठी भारताचे नाव आणि योगदान सुवर्णाक्षरात झळाळताना दिसेल. भारतासाठी यंदाच्या 11 नोव्हेम्बरचे विशेष महत्व आहे कारण 11 नोव्हेंबरला आजपासून 100 वर्षांपूर्वी पहिले महायुद्ध संपले. त्या घटनेस 100 वर्षे पूर्ण होत आहेत म्हणजे त्या काळात झालेला प्रचंड विध्वंस आणि मनुष्य  हानीला एक शतक पूर्ण होईल. भारतासाठी पहिले महायुद्ध एक महत्वपूर्ण घटना होती. खर्या अर्थाने सांगायचं तर, आम्हाला त्या युद्धाशी थेट काही देणे घेणे नव्हते. तरीही आमची सैनिक शौर्याने लढले आणि खूप मोठी भूमिका बजावली, सर्वोच्च बलिदान दिले. भारतीय सैनिकांनी जगाला दाखवून दिलं की, युद्ध होते तेव्हा ते  कुणाच्या पेक्षा कमी नाहीत. आमच्या सैनिकांनी दुर्गम भागांमध्ये, विपरीत परिस्थितींत शौर्य दाखवलं आहे. या सर्वामागे एकच उद्देश्य होता- शांततेची पुनर्स्थापना. पहिल्या महायुद्धात जगाने सर्वनाशाचं तांडव पाहिलं. अंदाजानुसार, जवळपास एक कोटी सैनिक आणि तितक्याच नागरिकांनी जीव गमावले. यामुळे सर्व जगाने शांतीचं महत्व जाणलं. गेल्या 100 वर्षांत शांततेची व्याख्या बदलली आहे. आज शांतता आणि सौहार्द्र यांचा अर्थ केवळ युद्ध न होणे इतकाच नाही. दहशतवादापासून ते जलवायू परिवर्तन, आर्थिक विकासापासून ते सामाजिक न्याय, या सर्वासाठी जागतिक सहकार्य आणि समन्वयाने काम करायची गरज आहे. गरीबातल्या गरिब व्यक्तीचा विकास हाच शांततेचे खरे प्रतिक आहे.

 माझ्या प्रिय देशवासियांनो, आमच्या ईशान्य भारताची गोष्ट काही वेगळीच आहे. ईशान्येतले नैसर्गिक सौंदर्य अनुपम आहे आणि इथले लोक अत्यंत प्रतिभाशाली आहेत. आमचा ईशान्य भारत सर्वोत्तम कार्यासाठी ओळखला जातो. ईशान्य भारत असे क्षेत्र आहे, ज्याने सेंद्रिय शेतीत खूप प्रगती केली आहे. काही दिवसांपूर्वी सिक्कीमने शाश्वत अन्न व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी असलेले 2018 चे फ्युचर पॉलिसी गोल्ड अवार्ड  जिंकले आहे. हा पुरस्कार संयुक्त राष्ट्रांशी संलग्न अन्न आणि  कृषी संघटना (एफ ए ओ) यांच्या वतीनं दिला जातो. आपल्याला हे ऐकून आनंद वाटेल की, सर्वोत्कृष्ट धोरण बनवण्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार त्या क्षेत्रात ऑस्करच्या बरोबरीने आहे. इतकच नाही तर, आमच्या सिक्किमने 25 देशांच्या 51 नामांकन लाभलेल्या धोरणांना मागे टाकून  हा पुरस्कार पटकावला, यासाठी मी सिक्कीमच्या लोकांचे अभिनंदन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑक्टोबर संपत आला आहे. हवामानात खूप मोठा बदल होत असल्याचा अनुभव  येत आहे. आता थंडीचे दिवस सुरु झाले आहेत आणि हवामान बदलण्याबरोबर सणांचा हंगाम आला आहे. धनतेरस, दिवाळी, भाऊबीज, छट.. एक प्रकारे नोव्हेंबर महिना हा सणांचा महिना आहे. सर्व देशवासियांना या सणांसाठी भरपूर शुभेच्छा.

मी आपल्याला आवाहन करतो की, या सणांच्या काळात आपली काळजी घ्या, आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि समाजहिताचेही भान ठेवा. सण नव्या संकल्पाची संधी आहे, असा मला विश्वास आहे. हा सण नवे निर्णय घ्यायची संधी आहे. हा सण निर्धाराने मिशन मोडमध्ये पुढे जायची, दृढ संकल्प करायची आपल्या आयुष्यातली एक संधी व्हावी. तुमची प्रगती देशाच्या प्रगतीतला महत्वपूर्ण हिस्सा आहे. तुमची जेवढी जास्त प्रगती होईल तेवढी देशाची प्रगती होईल. माझ्या तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.

 

 

B. Gokhale/AIR/D. Rane