पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि सिंगापूर दरम्यान फिनटेक म्हणजेच वित्तीय तंत्रज्ञानविषयक संयुक्त कृती गट स्थापन करण्याविषयी झालेल्या सामंजस्य कराराला आज मंजुरी देण्यात आली. जून 2018 मध्ये हा करार करण्यात आला होता.
लाभ
या करारामुळे वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढेल. विशेषत: ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग, रेग्युलेटरी सॅण्ड बॉक्स, पेमेंट आणि डिजिटल व्यवहारातील सुरक्षितता, इलेक्ट्रॉनिक व्यवहारांशी रूपे कार्ड जोडणे, यूपीआय आधारीत पेमेंट लिंक, केवायसी आणि आधार संबंधित मुद्यांवर नियमन आणि समस्या निराकरण करण्यासाठी या कराराचा उपयोग होईल.
या संयुक्त कृती गटामुळे दोन्ही देशांमध्ये नियमित संपर्क राहील. धोरणे आणि नियमनांची माहिती तसेच अनुभवांचे अदानप्रदान होईल. फिनटेक कंपन्या वापरत असलेल्या डाटाचा काहीही भेदभाव न होता वापर करण्याबाबत नवी मानके स्थापन करण्यात येतील.
सहकार्याला प्रोत्साहन
सायबर सुरक्षा, वित्तीय घोटाळे यांच्यावर आळा घालण्यासाठी नियामक संस्थांच्या संबंधित अधिकाऱ्यांची क्षमता बांधणी यातून शक्य होईल.
भारत आणि सिंगापूर दरम्यान वित्तीय तंत्रज्ञान उद्योगाला चालना देण्यासाठी फिनटेक क्षेत्राला विविध कंपन्यांनी सहकार्य वाढवण्यासाठी व्यापारी आणि वित्तीय क्षेत्रात फिनटेकच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण करण्यासाठी या कराराचा लाभ होईल.
फिनटेक क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये असलेल्या युवा कौशल्याला प्रोत्साहन मिळेल. दोन्ही देशातली धोरणे परस्पर पूरक असलेला लाभ फिनटेक क्षेत्राला होईल.
N.Sapre/R.Aghor/P.Kor