पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कोची सागर किनाऱ्यावरील आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर संयुक्त कमांडर परिषदेचे आयोजन करण्यात आले.
विमानवाहू युद्धनौकेवर अशा प्रकारे संयुक्त कमांडर परिषद आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तिन्ही सैन्यदल प्रमुखांनी आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवर पंतप्रधानांचे स्वागत केले. तत्पूर्वी पंतप्रधानांनी कोची येथील आयएनएस गरूड येथे तिन्ही सेवांच्या गार्ड ऑफ ऑनरच्या सलामीचे निरीक्षण केले.
परिषदेनंतर पंतप्रधानांनी भारताच्या नौदल आणि सागरी-हवाई क्षमतेच्या संचलनपर सादरीकरण पाहिले. यात आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवरून नौदलाच्या लढाऊ विमानाचे उड्डाण आणि ते खाली उतरवणे, युद्धनौकेवरून क्षेपणास्त्रांचा मारा, हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानाचे उड्डाण, सागरी कमांडर्सची प्रात्यक्षिके तसेच आयएनएस विराट सह युद्धनौकांची स्टीम पास्ट यांचा समावेश होता. पंतप्रधानांनी आयएनएस विक्रमादित्यवर उपस्थित सैनिक, खलाशी आणि वायूसेनेतील जवानांशी संवाद साधला.
पंतप्रधानांच्या भाषणाचा सारांश पुढीलप्रमाणे –
संरक्षण मंत्री श्री. मनोहर पर्रीकरजी,
वायूसेना, लष्कर आणि नौदल प्रमुख,
आणि आमचे कमांडर,
आपल्या लष्करी अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा भेट होणे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. दिल्लीच्या बाहेर असलेल्या या सैन्यदलाच्या तळावर आपली भेट घेताना मला अतिशय आनंद होतो आहे.
केवळ भारतीय नौदलाच्या आदरातिथ्यामुळेच नाही तर अन्य काही बाबींमुळेही आपणास हा फरक जाणवत असेल.
कोची हे हिंदी महासागराच्या शीर्षस्थानी आहे आणि आपल्या सागरी इतिहासाच्या दृष्टीनेही केंद्रस्थानी आहे.
भारताच्या इतिहासावर सागराचा प्रभाव आहे. त्याच बरोबर हा महासागरच आमच्या भावी समृद्धीचा आणि सुरक्षेचा राजमार्गही आहे.
तसेच जगाच्या भवितव्याची गुरूकिल्लीही त्यातच आहे.
या विमानवाहू नौका, आमचे सागरी सामर्थ्य आहेत आणि आमच्या सागरी जबाबदारीचे ते एक प्रतीक आहे.
भारतीय सशस्त्र सेनादले नेहमीच, ती प्रतिनिधित्व करीत असलेल्या शक्तीबरोबरच त्या शक्तीचा यथायोग्य वापर करण्याची परिपक्वता आणि जबाबदारीसाठी ओळखल्या गेल्या आहेत.
या सेना आमच्या समुद्राचे रक्षण करतात आणि आमच्या सीमांनाही सुरक्षा पुरवितात. त्या आमच्या देशाला सुरक्षित ठेवतात आणि आमच्या नागरिकांचे संरक्षण करतात.
देशाच्या संकटकाळात या सेना नागरिकांना मदतीबरोबरच नवी आशा देण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. आपल्या कृतीतून ते देशाचे मनोधैर्य उंचावतात आणि अवघ्या जगाचा विश्वास जिंकून घेतात.
चेन्नईमध्ये आपण सर्वांनी कोसळणारा पाऊस आणि पूर आलेल्या नद्यांशी लढा देत अनेकांचे प्राण वाचवले. नेपाळमध्ये आपण सर्वांनी धैर्य, नम्रता आणि करूणा बाळगत सेवा केली. नेपाळ बरोबरच येमेन मध्येही केवळ आपल्या देशाच्या नागरिकांनाच नाही तर संकटात असलेल्या सर्वांना मदतीचा हात दिलात.
आपल्या सैन्यदलात आपल्या देशाची विविधता आणि विविधतेतील एकतेचे प्रतिबिंब दिसून येते. आपली सैन्यदले, देशाची शाश्वत संस्कृती आणि लष्कराच्या महान परंपरेचे प्रतीक आहेत. आपण सर्वांनी बहाल केलेल्या नेतृत्वातून त्यांचे यश साकार होते.
आज मी आपल्या देशातर्फे सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
भारताची आगेकूच कायम राहावी, यासाठी शांततेच्या काळात तसेच कर्तव्य बजावताना बलिदान करणाऱ्यांना मी अभिवादन करतो.
जगात प्रतिकूल ठिकाणी सतर्क राहून निगराणी करणारे, परतीची धूसर शक्यता मागे ठेवून आपल्या कुटुंबियांचा निरोप घेणारे सैनिक आणि केव्हातरी या सैनिकांचे पार्थीव वाहून न्यावे लागणारे त्यांचे आप्त, यांच्या प्रती आम्ही संवेदनशील आहोत.
सर्व प्रकारे पात्र आणि असामान्य असतानासुद्धा केवळ वरच्या श्रेणीत जागा नसल्यामुळे ऐन तारूण्यात असलेल्या एखाद्या जवानाला जेव्हा वरचा हुद्दा प्राप्त होत नाही, तेव्हा त्याच्या काय भावना असतील, ते मी समजू शकतो.
त्यामुळे आपल्या सेवेचा सन्मान करणे आणि कल्याणाची खबरदारी घेणे, हे नेहमीच आमचे आद्य कर्तव्य राहील.
याच कारणामुळे कित्येक दशके अपूर्ण राहिलेले ‘वन रँक वन पेन्शन’ चे वचन पूर्ण करण्याचे काम आम्ही वेगाने केले. देशाच्या राजधानीत राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि संग्रहालय असणे, हा हक्क आहे आणि आम्ही ते निश्चितच निर्माण करू.
आपल्या सेवाकालापश्चातही अभिमान आणि सन्मानाने देशाची सेवा करता यावी, यासाठी, आम्ही आमच्या माजी सैनिकांसाठीच्या कौशल्य आणि संधीत सुधारणा घडवून आणू.
आपल्या अंतर्गत सुरक्षा दलांनाही माझा सलाम. त्यांच्या शौर्य आणि बलीदानाने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा पराभव झाला, डाव्या विचारसरणीच्या अतिरेकींचा हिंसाचार कमी झाला आणि ईशान्य भाग अधिक शांत झाला.
दीर्घकालीन प्रलंबित नागा समस्या सोडवण्याची नवी आशा निर्माण करणार्या मध्यस्थांनाही मी शुभेच्छा देतो.
भारत सध्या बदलाचे उत्कंठापूर्ण क्षण अनुभवित आहे. देशात आशेची आणि आशावादाची एक उंच लाट निर्माण झाली आहे. भारतामधले स्वारस्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आत्मविश्वासाने वरचा स्तर गाठला आहे. जगातील सर्वात वेगात वाढणाऱ्या मुख्य अर्थव्यवस्थांमध्ये आपला समावेश झाला आहे आणि आपली अर्थव्यवस्था अधिक स्थिर मार्गावर आहे.
आपले कारखाने पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. आपण भविष्यावर नजर ठेवून जलद वेगाने पुढच्या पिढीतील पायाभूत सुविधा उभारत आहोत. विदेशी गुंतवणूकीत चांगली वाढ होते आहे आणि उद्योगासाठीचे स्थान म्हणून भारताची क्रमवारी सुधारत आहे.
प्रत्येक नागरिकाला भविष्यातील संधी दिसू लागल्या आहेत आणि ते आत्मविश्वासाने मूलभूत गरजा पूर्ण करू शकत आहेत. हे भारताच्या भरभराटीसाठी आणि सुरक्षेसाठी महत्वाचे आहे.
सध्याच्या परस्परावलंबी जगात भारतातील हे परिवर्तन, आपल्या आंतरराष्ट्रीय भागीदारीशी आणि त्याचप्रमाणे आपल्या सुरक्षेशी निगडीत आहे.
त्यामुळे, आता आपल्या परराष्ट्र धोरणात नवीन उत्साह आणि नवे हेतू आहेत. पूर्व भागात आपण जपान, कोरिया आणि ‘आसियान’ बरोबरची आपली पारंपरिक भागीदारी बळकट केली आहे. ऑस्ट्रेलिया, मंगोलिया आणि पॅसिफिक बेटांशी आपण नव्याने संबंध प्रस्थापित केले आहेत.
हिंदी महासागर क्षेत्रातही आपण विस्तार क्षेत्र वाढविले असून प्रथमच आपल्या सागरी प्रदेशाबाबत एक स्पष्ट धोरण निश्चित केले आहे. एका नवीन पातळीवर आफ्रिकेबरोबरचे आपले संबंधसुद्धा आपण वृद्धिंगत केले आहेत.
मध्य आशियाबरोबर असणारे प्राचीन दुवे आपण नव्याने जुळविले आहेत. पश्चिम आशिया आणि आखाती देशांबरोबर आपण संरक्षण सहकार्यासह जवळचे संबंध प्रस्थापित केले आहेत; तसेच इराण बरोबरच्या संबंधानाही आपण नवचैतन्य दिले आहे.
रशिया हा आपल्यासाठी नेहमीच शक्तीचा स्रोत राहिला आहे. आपल्यासाठी भविष्यातही त्याची साथ मोलाची राहणार आहे.
संरक्षण क्षेत्राच्या समावेशासह आपली अमेरिकेबरोबरची भागीदारी प्रगतीपथावर आहे. युरोप मधील आपली धोरणात्मक भागीदारीही जास्त सखोल झाली आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेतील एक नवा कवडसा, इतकीच भारताची ओळख राहिलेली नाही. तर प्रादेशिक आणि जागतिक शांती, सुरक्षा आणि स्थैर्याचा नायक, या दृष्टीने भारताकडे पाहिले जात आहे.
जगात दहशतवाद आणि अतिरेकी विचारप्रणालीशी लढा सुरू असताना इस्लामिक जगासह सर्वच देश भारताचे सहकार्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जगातील आपले स्थान आणि आपले भवितव्य यादृष्टीने आपला शेजार ही बाब सर्वात गंभीर आहे.
आपण दहशतवाद आणि युद्धबंदीचे उल्लंघन पाहिले; बेपर्वा आण्विक निर्माण आणि धोके अनुभवले; सीमाभागातील छुप्या कारवाया पाहिल्या. त्याचबरोबर लष्करी आधुनिकीकरण आणि विस्ताराही पाहिला. पश्चिम आशियातील अस्थिरतेच्या सावल्याही आता लांबत चालल्या आहेत.
त्याचबरोबर, आपल्या प्रांतात अनिश्चित राजकीय संक्रमणे, कमकुवत संस्था आणि अंतर्गत संघर्षही उद्भवत राहिले. महत्वाच्या शक्तींनीही या प्रातांत आणि शेजारच्या सागरी क्षेत्रात सहभाग वाढवला आहे.
सागरी क्षेत्रात मालदीव आणि श्रीलंकेपासून, पर्वतीय क्षेत्रात नेपाळ आणि भूतानपर्यंत आपण आपले हित आणि संबंध सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
जमीन सीमा करारामुळे बांगलादेशबरोबरचे आपले संबंध आणि सुरक्षा विषयक सहकार्य वाढले आहे.
पाकिस्तानने इतिहासाच्या पुढे पावले टाकत दहशतवादाचा अंत करावा, शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करावेत, सहकार्य वाढवावे आणि आपल्या क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धीला प्रोत्साहन द्यावे, यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.
आपल्या मार्गावर अनेक आव्हाने आणि अडथळे आहेत. मात्र शांततेमुळे प्राप्त होणारे लाभ मोलाचे आहेत आणि आपल्या बालकांचे भविष्य त्यावरच निर्भर आहे, त्यामुळे हे प्रयत्नही गरजेचे आहेत.
त्यामुळे आपण पुढचा मार्ग निश्चित करण्यासाठी त्यांचे हेतू पारखून घेऊ. या पार्श्वभूमीवर आम्ही सुरक्षा तज्ञांना परस्परांशी समोरासमोर बोलता यावे, यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर एक नवीन चर्चा सुरू केली आहे.
मात्र सुरक्षेच्या बाबतीत आम्ही कधीही तडजोड करणार नाही आणि दहशतवादाबाबत त्यांनी दिलेल्या वचनांच्या पूर्ततेचा मागोवा घेत राहू.
संयुक्त, शांत, समृद्ध आणि लोकशाही राष्ट्र निर्माण करण्यासाठी आम्ही अफगाण जनतेप्रती वचनबद्ध आहोत.
पूर्ण क्षमतेने आपल्या आर्थिक भागीदारीचा लाभ घेत आपण चीन बरोबरचे संबंध दृढ करीत आहोत. प्रलंबित बाबींकडे लक्ष देणे, सीमेवर स्थैर्य राखणे आणि आपल्या या शेजारी देशाबरोबर परस्पर समन्वय आणि विश्वास विकसित करण्याचे आपले ध्येय असेल.
भारत आणि चीन हे स्वत:बद्दल खात्री बाळगणारे, आत्मविश्वासाने परिपूर्ण असे दोन देश असून, ते, आपले हित आणि जबाबदाऱ्यांचे भान राखत आपल्या संबंधांतील अवघडलेपणा दूर ठेवत भरीव योगदान देऊ शकतात, असा विश्वास मला वाटतो.
आपण आपल्या संरक्षण क्षमता आणि पायाभूत सुविधा मजबूत करत राहू, व सागरी सुरक्षेबरोबरच आपल्या प्रादेशिक आणि जागतिक भागिदाऱ्या बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवू.
जलदगतीने बदलणाऱ्या आजच्या जगात भारतही परिचित आणि नवीन संकटांचा सामना करीत आहे. सागरी आणि हवाई अशा तीनही ठिकाणी आपल्यासमोर आव्हाने उभी आहेत. यात दहशतवादासह आण्विक पर्यावरणाचाही समावेश आहे.
आता आपल्या जबाबदाऱ्या आपल्या सीमा आणि समुद्र किनाऱ्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. या जबाबदाऱ्यांची मर्यादा जगभरात पसरलेले आपले नागरिकपर्यंत आहे.
आपल्या जगातही बदल घडून येत आहेत, अर्थव्यवस्थांचे स्वरूप बदलत आहे, तंत्रज्ञान प्रगत होत आहे, वादाचे स्वरूप आणि युद्धाची कारणेही बदलतील.
आमचे जुने प्रतिस्पर्धी अवकाश आणि सायबर अशा नव्या क्षेत्रात आम्हाला आव्हान देऊ शकतात, हे आम्हाला माहिती आहे. पारंपारिक आणि नवीन आव्हानांविरूद्ध प्रभावी लढा देण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाने आम्हाला नवीन मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.
त्यामुळे, भारतातील आपण सर्वांनीच वर्तमानासाठी तयार आणि भविष्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे.
भारतीय सैन्य कोणत्याही प्रकारची आगळीकीला सडेतोड उत्तर घ्यायला आणि तिचा नि:पात करण्यासाठी तयार सज्ज आहे, असा मला विश्वास वाटतो.
आमच्या आण्विक सज्जतेसह आमचे धोरणात्मक संतुलन मजबूत आणि विश्वसनीय आहे, आणि आमच्या राजकीय इच्छाशक्ती स्पष्ट आहेत.
आम्ही संरक्षणविषयक खरेदीची प्रक्रिया वेगवान केली आहे. अनेक प्रलंबित अधिग्रहणांना आम्ही मंजूरी दिली आहे.
कमतरता भरून काढण्यासाठी आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलत आहोत.
आपल्या सैन्याच्या आणि उपकरणांच्या हालचालींचा वेग सुधारण्यासाठी आणि सीमेवरील पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी आम्ही वेगाने हालचाली करीत आहोत. यात सीमा भागापर्यंत धोरणात्मक रेल्वेमार्गाचा समावेश आहे.
नवीन धोरणे आणि उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही भारतातील संरक्षण उत्पादनांचा कायापालट करीत आहोत.
आमचे सार्वजनिक क्षेत्रही आव्हानांसाठी सज्ज झाले आहे. खाजगी क्षेत्रानेही मोठया उत्साहात प्रतिसाद दिला आहे.
मेक इन इंडिया अभियानांतर्गत अनेक परकीय संरक्षण कंपन्या, अत्याधुनिक साहित्यापासून हवाई वाहतूक विज्ञानापर्यंत, लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरपासून वाहतुकीची विमाने आणि युएव्ही सारखे नवे महत्वाकांक्षी प्रकल्प घेऊन भारतात येत आहेत.
देशांतर्गत क्षमता विकसित करत नाही, तोपर्यंत आपण स्वत:ला एक सुरक्षित देश आणि मजबूत लष्करी सामर्थ्य म्हणवून घेऊ शकत नाही. यामुळे भांडवली खर्च सुद्धा कमी होईल. तसेच भारताच्या उद्योग, रोजगार आणि आर्थिक वाढीसाठीही ते प्रचंड प्रेरक ठरेल.
आपण लवकरच आपली खरेदी धोरणे आणि प्रक्रिया यांच्यात सुधारणा करणार आहोत. त्यामुळे संरक्षण तंत्रज्ञानातील आपल्या क्षमता सुधारण्याच्या दृष्टीने आपली धोरणे, धोरणात्मक साधनाची भूमिका बजावतील. संरक्षण तंत्रज्ञान आता आमच्या देशातील सर्व संस्थांच्या क्षमतांना वेग देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे.
मेक इन इंडिया अभियानाच्या यशात सशस्त्र सेनेचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नौदल आणि हवाई दलाच्या स्थानिकीकरण योजनेमुळे मी प्रोत्साहित आहे.
देशांतर्गत संपादनाच्या बाबतीत अधिक स्पष्टपणे आपले लक्ष्य पाहताना, आपल्या सैन्यदलातील संबंधित क्षेत्रातील तज्ञांकडून नावीन्य, रचना आणि विकासाबाबत जास्त सहभाग, वैशिष्ट्यांमधील सुस्पष्टता आम्हाला अपेक्षित आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सैन्यदलाच्या भविष्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. मात्र त्याच त्या गोष्टी करून किंवा कालबाह्य सिद्धान्त आणि आर्थिक वास्तवाशी फारकतीवर आधारित योजना आखून ते साध्य करणे शक्य नाही.
गेल्या वर्षभराच्या कालावधीत मी प्रगती पाहिली आहे, मात्र सरकारने आपल्या समजुती, सिद्धान्त, उद्दिष्टे आणि धोरणे यांच्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते. बदलत्या जगाप्रमाणे आपणही आपली उद्दिष्ट्ये आणि साधने सुनिश्चित केलीच पाहिजेत.
आज घडीला जगातील प्रमुख सत्ता आपले सैन्य कमी करून तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून राहत असताना आपण मात्र सातत्याने आपल्या सैन्यदलाचा आकार वाढविण्याच्या प्रयत्नात आहोत.
त्याच वेळी सैन्याचे आधुनिकीकरण आणि विस्तार, हे एक कठीण ध्येय आहे.
आपल्याला केवळ मानवी शौर्य नको, तर त्याचबरोबर चपळ, वहनशील आणि तंत्रज्ञानाची उत्तम जाण असणारे सैन्य हवे आहे.
दीर्घ काळ चालणारे युद्ध आपल्याला परवडणार नाही, त्यामुळे जलद गतीने युद्ध जिंकण्याच्या क्षमता आवश्यक आहेत. तिजोरीमध्ये मोठा निधी राखून ठेवण्यास भाग पाडणाऱ्या शक्यतांचा आपण फेर विचार केला पाहिजे.
आपल्या संरक्षण आणि जबाबदाऱ्यांची व्याप्ती आपले सागरी किनारे आणि सीमांच्या पलिकडे वाढल्यामुळे आपण आपल्या सैन्यदलाच्या पल्ला आणि गतिशीलतेत वाढ करणे आवश्यक आहे.
आपण आपल्या क्षमतेनुसार डिजिटल नेटवर्क आणि अवकाशातील शक्तीस्थळांच्या ताकतीचा पूर्ण क्षमतेने वापर केला पाहिजे. त्याचबरोबर या बाबी, आमच्या शत्रूंचे पहिले लक्ष्य असेल, ही शक्यता लक्षात घेऊन त्यांचा प्रतिकार करण्यासही सज्ज असले पाहिजे.
नेटवर्क एकसंध तसेच सर्व संस्था आणि सैन्यासाठी एकात्मिक असले पाहिजे. ते सुस्पष्ट, नेमके आणि प्रतिसादक्षम असले पाहिजे.
आपल्या सशस्त्र सेना दलाच्या संरचनेतील सुधारणांच्या बाबतीत आपली गती संथ राहिली आहे. नेमक्या सुधारणांवर आपण भर दिला पाहिजे.
तसेच आपण आपल्या सशस्त्र सेनादलाच्या प्रत्येक स्तरावरील संलग्नतेला प्रोत्साहन दिले पाहिजे. आपण विविध रंगाचे गणवेश परिधान करीत असलो तरी एकाच ध्वजाचे वाहक आहोत आणि आपल्या सेवेचे ध्येयही समान आहे. उच्च स्तरापर्यंत संलग्नता ही दीर्घकाळापासून प्रलंबित गरज आहे.
वरिष्ठ लष्करी नेत्यांना तिन्ही सेवादले, तंत्रज्ञानाधारीत पर्यावरण आणि दहशतवादापासून ते धोरणात्मक अशा अनेकविध आव्हानांचा मुकाबला करण्याचा अनुभव निश्चितच हवा.
मैदानात उत्तम कामगिरी बजावत नेतृत्व करणाऱ्या लष्करी कमांडरबरोबरच आम्हाला भविष्यात आमच्या सैन्यदल आणि सुरक्षा प्रणालीला मार्गदर्शन करणाऱ्या विचारी कमांडरची आवश्यकता आहे.
आपण इतरांच्या अनुभवातून शिकले पाहिजे, मात्र त्याचबरोबर आपण स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपली प्रणाली व आदेश विकसित करणे आवश्यक आहे. आपले राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाचे स्वप्नंही लवकरच पूर्ण होईल.
आपल्या वरिष्ठ संरक्षण व्यवस्थापन यंत्रणेतही सुधारणांची आवश्यकता आहे. गेल्या काही काळातील अनेक प्रस्तावित संरक्षण सुधारणा लागू करण्यात आल्या नाहीत, ही खेदाची बाब आहे. माझ्यासाठी हे प्राधान्याचे क्षेत्र आहे.
आपल्या विस्तारित सागरी क्षेत्रासह बाह्य संरक्षण प्रतिबद्धतेसाठी, आपल्या क्षमता विकसित करण्यासाठी तसेच शांतता आणि स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी एक सर्वंकष धोरण आवश्यक आहे.
संयुक्त राष्ट्रसंघात आम्ही शांततेचे धोरण बाळगले आहे. आणि दुर्गम भागातील बेटांवरील देशांमध्ये वैद्यकीय मदतीची जहाजे नेऊन, अन्य सैन्यदलांशी संबंध प्रस्थापित करून आपले सैन्यदल शांती आणि आशेचे संदेशवाहक ठरू शकतात.
सरते शेवटी , आपल्या देशात परिवर्तन घडवून आणण्यासाठी, प्रत्येक संस्थेने स्वतःमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. आपण सर्व एकाच वेळी पुढे पाऊल टाकू, तेव्हाच आपला देश प्रगती करू लागेल.
आपण स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता किंवा खर्चातील सुधारणेच्या बाबतीत नेतृत्वाची भूमिका स्वीकाराल, अशी आमची अपेक्षा आहे.
आपण सुधारणा घडवून आणाल आणि आम्ही आपल्या गरजा पूर्ण करण्याचा आणि आपणांस सुसज्ज राखण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करू.
आपली अर्थव्यवस्था विकसित होत राहिल आणि आपण स्वत:ला सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने सक्षम होऊ.
त्याचबरोबर आपण सुरक्षित हाती असल्याचे समाधान बाळगण्याचे स्वप्न भारत पाहत आहे.
आमच्या लष्करी अधिकारी,
दोन्ही जागतिक महायुद्ध आणि 1965 सालच्या युध्दसमापनाचे हे वर्धापन वर्ष आहे.
याच वर्षी गरिबी आणि हवामानातील बदलांना सामोरे जाण्यासाठी संयुक्त राष्ट्रामध्ये मानवता एकत्र आली.
भूतकाळातील महान शोकांतिकांच्या स्मरणार्थ आणि एक उत्तम जग घडविण्याच्या आपल्या एकत्रित प्रयत्नात आपल्याला प्रगती आणि संकटाच्या मानवी कहाणीची आठवण करून दिली जात आहे.
वर्दीधारी स्त्री-पुरुषांवर जबाबदाऱ्या असतात. शांततेसाठी कार्य करणे, पगतीचे नेतृत्व करणेध्
आपले सैन्य आपल्या देशासाठी, आपल्या मित्रांसाठी आणि आपल्या जगासाठी याच ध्येयाने प्रेरित आहे, हे मला माहीती आहे.
आणि तुम्ही सारे भारताला त्याचे वचन पूर्ण करण्यासाठी आणि जगात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी मदत कराल.
धन्यवाद….
M.Pange/M.Desai
With defence personnel at INS Vikramaditya. PM @narendramodi is in Kerala for a 2-day visit. pic.twitter.com/CUQzEGa8ex
— PMO India (@PMOIndia) December 15, 2015
Chaired Combined Commanders Conference on board INS Vikramaditya. Last year we had mooted the idea of holding the conference outside Delhi.
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2015
Elaborated on the changes in India. Our factories are humming with activity, next-gen infrastructure is being built & investment is rising.
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2015
Spoke about the changes in the defence sector. Impetus is being given to manufacturing, process of procurements is being quickened.
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2015
To transform India, every institution must reform itself. Together we will work towards India's overall progress. https://t.co/perYxUmYeA
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2015
Some pictures from earlier today. pic.twitter.com/AUlK3uUA8n
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2015
Our Armed Forces defend our seas, protect our borders & keep India safe. We are extremely proud of them. pic.twitter.com/g0qfkBIQca
— NarendraModi(@narendramodi) December 15, 2015
Our Armed Forces defend our seas, protect our borders & keep India safe. We are extremely proud of them. pic.twitter.com/g0qfkBIQca
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2015