पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 2017-18 या आर्थिक वर्षासाठी सर्व पात्र अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना (आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचारी वगळून) 78 दिवसांच्या वेतनाएवढा उत्पादकता संलग्न बोनस द्यायला मंजुरी दिली. यामुळे बोनस म्हणून 2044.31 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. पात्र अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकता संलग्न बोनस देण्यासाठी वेतन गणना मर्यादा मासिक 7,000 रुपये निर्धारित आहेत. प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला 17,951 रुपये कमाल रक्कम मिळेल. सुमारे 11.91 लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल.
देशभरातील सर्व अराजपत्रित रेल्वे अधिकाऱ्यांना (आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचारी वगळून) उत्पादकता संलग्न बोनस मिळणार आहे. दरवर्षी दसऱ्यापूर्वी उत्पादकता संलग्न बोनस पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना दिला जातो. यावर्षीही दसऱ्यापूर्वी या निर्णयाची अंमलबजावणी होईल. या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वेचे कामकाज सुधारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
N.Sapre/S.Kane/P.Kor