Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कच्छ येथे आयोजित पोलिस महासंचालकांच्या परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन

कच्छ येथे आयोजित पोलिस महासंचालकांच्या परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन

कच्छ येथे आयोजित पोलिस महासंचालकांच्या परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन


कच्छ मध्ये धोरडो येथे आयोजित पोलिस महासंचालकांच्या परिषदेच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या परिषदेला संबोधित केले.

परिषदेदरम्यान झालेल्या चर्चांचा दर्जा आणि सखोलतेबाबत पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या चर्चा म्हणजे पोलीस दलाचे समर्पण आणि व्यावसायिक योग्यतेचे द्योतक आहे, असे सांगत, या परिषदेद्वारे प्राप्त शिफारशींनुसार अंमलबजावणी करण्यासाठी एक स्पष्ट प्रारूप तयार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

परिषदेला उपस्थित ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही स्तरांवरील अधिकाऱ्यांच्या चर्चेत सहकार्य दिसून आले आणि त्यामुळे तयार झालेला मजबूत आधार, हे महत्वाचे फलित असल्याचे मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केले.

संवेदनशीलता हा पोलिस विभागातील महत्वाचा घटक असला पाहिजे आणि पोलिसांना नागरिकांप्रती संवेदनशील वागणुकीला प्रोत्साहन देता यावे, यासाठी एक लवचिक संस्थागत आराखडा तयार केला जावा, असे पंतप्रधानांनी सांगितले. पोलिस बलांनी स्थानिक समुदायाशी संपर्क प्रस्थापित केला पाहिजे आणि त्यासाठी त्या समुदायातील लोकांचे यश आणि चांगली कामगिरी यांचा आनंद त्यांच्यासोबत साजरा केला पाहिजे. आपल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी लोक पोलीस ठाण्यात जातील तेव्हा त्यांच्या मनात पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याबाबत सन्मान आणि व्यापक समंजस भावना निर्माण होईल, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. पोलिस ठाण्यांवरून समुदायातील लोकांची ओळख पटावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सायबर सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया अशा विषयांचा उल्लेख करत, पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कामात प्रगत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. आंतरराज्य सीमाभागातील शेजारी जिल्ह्यांच्या पोलिस बलांमध्ये संवाद आणि व्यापक सहकार्य असावे, असे आवाहन त्यांनी केले.

पर्यटन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस प्रशिक्षण अशा विषयांबाबतही पंतप्रधानांनी आपले विचार मांडले.

पोलीस अधिकाऱ्यांचे समर्पण आणि निःस्वार्थ सेवा तसेच कर्तव्यनिष्ठेबाबतही पंतप्रधानांनी गौरवोद्गार काढले. या भावना, देशाच्या संरक्षणाचे मूलभूत घटक आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आय बी च्या अधिकाऱ्यांना त्यांच्या विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदके प्रदान करण्यात आली.

तत्पूर्वी, परिषदेत सहभागी सदस्यांनी पोलीस विद्यापीठे आणि न्यायवैद्यक विद्यापिठांविषयीही चर्चा केली.

यावेळी गृह मंत्री राजनाथ सिंग, गृह राज्य मंत्री किरण रीजीजू आणि हरिभाई पार्थीभाई चौधरी सुद्धा उपस्थित होते.

M.Pange/S.Tupe/M.Desai