Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नेताजींबाबतच्या फाईल्स खुल्या करण्यामध्ये महत्त्वाचा टप्पा

नेताजींबाबतच्या फाईल्स खुल्या करण्यामध्ये महत्त्वाचा टप्पा


नेताजींबाबतच्या फाईल्स 23 जानेवारी 2016 पासून खुल्या करण्यातल्या प्रक्रियेत आज महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी नेताजींसंदर्भातल्या फाईल्सचा पहिला संच आज अधिकृतरित्या नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडियाच्या महासंचालकांकडे सोपवल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑक्टोबर 2015 रोजी 7 रेसकोर्स या आपल्या निवासस्थानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबाचे अत्यानंदाने स्वागत, आदरातिथ्य केले. नेताजींच्या कुटुंबाचे पंतप्रधान निवासस्थानी अशा प्रकारे आदरातिथ्य करणारे पहिलेच पंतप्रधान ठरण्याचा मान त्यांना मिळाला. नेताजींच्या कुटुंबाच्या भावनांचा आणि इच्छेचा आपण आणि आपले सरकार आदर करत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वत:चा इतिहास विसरणाऱ्यांकडून इतिहास निर्माण होत नाही यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की इतिहास दडवण्यावर आपले सरकार विश्वास ठेवत नाही. भारतीय जनतेसाठी नेताजींची माहिती खुली करायला आपले सरकार प्रतिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात सर्वतोपरी पावले उचलली जातील असे आश्वासन त्यांनी नेताजींच्या कुटुंबाला दिले. यासाठी इतर देशांशीही संपर्क साधला जाईल. नेताजींच्या फाईल्स नेताजींच्या येत्या जयंतीपासून 23 जानेवारी 2016 पासून खुल्या करायला सुरुवात होईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान कार्यालयातल्या 33 फाईल्सचा पहिला संच पुढील प्रक्रिया, जतन आणि डिजिटाइजेशन यासाठी आज नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडियाकडे सोपवण्यात आला. पंतप्रधान कार्यालयातल्या याबाबतच्या सर्व 58 फाईल्स देशासाठी खुल्या करण्यात येणार आहेत. आपापल्या अखत्यारीतील फाईल्स खुल्या करण्यासाठी गृह मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय स्वतंत्रपणे काम करत आहेत.
नेताजींशी संबंधित फाईल्स खुल्या करण्यासंबंधीची भारतीय जनतेची प्रदीर्घ काळापासूनची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने आजचे पाऊल महत्त्वपूर्ण आहे.

S. Kulkarni/S.Tupe/M.Desai