पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवकाश वापराबाबत सहकार्य करण्यासाठी भारत आणि ओमान यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. फेब्रुवारी 2018 मध्ये मस्कत इथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि ओमानच्या दळणवळण आणि संवाद मंत्रालयातर्फे ओमानशी हा करार करण्यात आला होता.
ह्या करारानुसार, अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान, पृथ्वीचे दूरस्थ मापन-परीक्षण, उपग्रह आधारित दिशादर्शन, अवकाश विज्ञान आणि ग्रहीय परीक्षण, अवकाशयान आणि अवकाश यंत्रणेचा वापर, अवकाश तंत्रज्ञानाचा वापर या सर्व क्षेत्रात दोन्ही देश परस्पर सहकार्य करू शकतील.
या सहकार्यासाठी, दोन्ही देशांचा संयुक्त कृती गट तयार केला जाईल. यात दोन्हीकडील अवकाश संशोधन संस्थांचे पदाधिकारी आणि दळणवळण व संवाद मंत्रालयाचे सदस्य असतील. हा कृतीगट, कराराची कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करेल.
पृथ्वीचे दूरस्थ मापन-परीक्षण, दिशादर्शन, अवकाश विज्ञान अशा क्षेत्रात, अधिकाधिक संशोधन करण्यास या करारामुळे प्रोत्साहन आणि वाव मिळेल.
अवकाश तंत्रज्ञानाचा मानवतेच्या कल्याणासाठी अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशात संयुक्त प्रयत्न होण्याच्या कार्यक्रमाला ह्या करारामुळे गती मिळेल.
ओमानच्या राज्यकर्त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोसोबत अवाक्ष संशोधन क्षेत्रात काम करण्याची इच्छा दर्शवली होती. यासाठी 2011 साली ओमानच्या शिष्टमंडळाने भारतात येऊन इस्रोच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. त्याचाच, पुढचा टप्पा म्हणून हा करार करण्यात आला आहे.
***
B.Gokhale/R.Aghor/D.Rane