पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लक्षद्विप, तामीळनाडू आणि केरळला भेट देणार आहेत. ‘ओखी’ चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा आणि कवरत्ती, कन्याकुमारी आणि तिरुवनंतपुरम इथल्या मदतकार्याच्या स्थितीचा ते आढावा घेणार आहेत. अधिकाऱ्यांना तसेच जनतेच्या प्रतिनिधींना, चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मच्छिमार, शेतकरी आणि नागरिकांना पंतप्रधान भेटणार आहेत.
अरबी समुद्रात 30 नोव्हेंबरला उद्भवलेल्या चक्रीवादळात 88 जणांचा बळी गेला असून, यात केरळमधल्या 70 जणांचा तर तामीळनाडूमधल्या 18 जणांचा समावेश आहे. अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत.
तीव्र कमी दाबाचा पट्टा समुद्रात निर्माण झाल्याबद्दलची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने जारी करताच 29 नोव्हेंबरला केंद्रीय गृह मंत्रालयाने केरळच्या मुख्य सचिवांना याबाबत माहिती दिली.
केंद्रातल्या तसेच प्रभावित क्षेत्रातल्या सरकारी संस्था तात्काळ सक्रिय झाल्या. परिस्थितीवर सातत्याने देखरेख ठेवून बचाव आणि मदतकार्य हाती घेण्यात आले. तटरक्षक दल, हवाई दल, नौदल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि स्थानिक सरकारी संस्था शोध आणि बचाव कार्यात सहभागी झाल्या. शोध आणि बचाव कार्यात तामीळनाडू आणि केरळला साहाय्य करण्यासाठी दोन्ही राज्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची प्रत्येकी दोन पथके तैनात करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 7 पथके तर महाराष्ट्रात 3 पथके तैनात करण्यात आली.
आतापर्यंत तामीळनाडूतल्या 220, केरळमधल्या 309, तर लक्षद्विपमधल्या 367 व्यक्तींची सुटका करण्यात आली आहे. वादळप्रभावित क्षेत्रातल्या सुमारे 12 हजार व्यक्तींना सुखरुप स्थळी हलवण्यात आले. तामीळनाडू, केरळ आणि कर्नाटकातल्या 250 मच्छिमारांनी 3 डिसेंबरला लक्षद्विपमध्ये सुखरुप आसरा घेतला. 68 बोटींसह केरळमधल्या 66, तर तामीळनाडूतल्या 2, 809 मच्छिमार सिंधुदुर्गमधल्या देवगड बंदरात सुखरुप पोहोचले. हे मच्छिमार आपापल्या राज्यात परतले आहेत.
‘ओखी’चा फटका बसलेल्या नागरिकांसाठी तामीळनाडूमध्ये 29, केरळात 52 आणि लक्षद्विपमध्ये 31 अशी 112 मदत शिबिरे सरकारने उभारली. सरकारी संस्थांनी या शिबिरांमध्ये आवश्यक ती सर्व मदत सामुग्री उभारली. परिस्थितीचा सामना करण्यासाठी तामीळनाडू आणि केरळमधल्या राज्य सरकारांनी आणि लक्षद्विप प्रशासनाने तत्परतेने पावले उचलली.
मदत आणि बचाव कार्यासाठी केंद्र सरकारने तटरक्षक दलाची 13 जहाजे, 4 विमान आणि 1 हेलिकॉप्टर. नौदलाची 10 जहाजे, 4 विमाने आणि 5 हेलिकॉप्टर्स. हवाई दलाचे 1 विमान व 3 हेलिकॉप्टर्स तैनात केली. लक्षद्विपमधल्या ओखी प्रभावित क्षेत्रातल्या नागरिकांना नौदलाने साहाय्य केले. नौदलाच्या जहाजांनी मिनिकॉय, कवरत्ती आणि कल्पेनी या बेटांवर मदत सामग्री पोहोचवली.
नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना हात देण्याकरिता 2017-18 या चालू आर्थिक वर्षात केंद्राने राज्य आपत्ती मदत निधी दुसरा हप्ता केरळ आणि तामीळनाडू सरकारला दिला. 2017-18 या आर्थिक वर्षात राज्य आपत्ती मदत निधीअंतर्गत केंद्राकडून केरळला 153 कोटी, तर तामीळनाडूला 561 कोटी रुपये देण्यात आले.
चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कन्याकुमारी आणि तिरुवनंतपुरमला संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी 3 व 4 डिसेंबरला भेट दिली. केंद्रीय सचिव पी.के.सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली 4 डिसेंबरला झालेल्या राष्ट्रीय संकट व्यवस्थापन समितीच्या बैठकीत मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यात आला.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
Leaving for Mangaluru, Karnataka. Tomorrow, I will visit Lakshadweep, Tamil Nadu, and Kerala and extensively review the situation that has arisen due to #CycloneOckhi. I will meet cyclone victims, fishermen, farmers, officials and public representatives. https://t.co/XaANfnWrr4
— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2017