पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत-नेपाळ सीमेवर मेची नदीवर नवीन पुलाच्या बांधकामासाठी खर्चाची विभागणी, वेळापत्रक आणि सुरक्षा मुद्द्यांबाबत अंमलबजावणी व्यवस्था आखण्यासाठी उभय देशांमधील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला मंजुरी दिली आहे.
या पुलाचा अंदाजे खर्च १५८. ६५ कोटी रुपये असून आशिया विकास बँकेच्या कर्जाच्या माध्यमातून भारत सरकार हा निधी पुरवणार आहे. काकारविता (नेपाळ) ते पाणीटंकी बायपास (भारत) या राष्ट्रीय महामार्ग ३२७ बी वरील मार्गाच्या अद्ययावतीकरणाचा हा नवीन पूल एक भाग आहे. नेपाळकडे जाणाऱ्या आशियाई महार्गाचे मेची पूल हे शेवटचे टोक असून नेपाळकडे जाणारा महत्वपूर्ण मार्ग आहे.
या पुलाच्या बांधकामामुळे प्रादेशिक संपर्क व्यवस्था सुधारेल उभय देशांमधील सीमेपलीकडील व्यापार अधिक वृद्धिंगत होईल आणि औद्योगिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ होण्यास मदत होईल.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत विकास महामंडळाकडे या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
N.Sapre/S.Kane/P.Kor