Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

71 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण

71 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण

71 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण

71 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण


माझ्या प्रिय देशवासीयांनो, स्वातंत्र्याच्या या पवित्र पर्वाच्या निमित्ताने देशवासीयांना कोटी कोटी शुभेच्छा. आज संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाबरोबरच जन्माष्टमीचा उत्सव साजरा करत आहे. माझ्या समोर मी पाहत आहे, मोठ्या संख्येने बालकृष्ण देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सुदर्शनचक्रधारी मोहन पासून चरखाधारी मोहनपर्यंतच्या आपल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक वारशाचे आपण वारसदार आहोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाचा मानसन्मान, प्रतिष्ठा यांसाठी, देशाच्या गौरवासाठी ज्या ज्या लोकांनी आपले योगदान दिले आहे, हालअपेष्टा सहन केल्या, बलिदान दिले, त्याग आणि तपस्येची पराकाष्ठा केली आहे, अशा सर्व महान लोकांना, माताभगिनींना मी लाल किल्याच्या तटावरून सव्वाशे कोटी देशवासीयांच्या वतीने शतशः प्रणाम करत आहे. त्यांचा आदर करत आहे. काही वेळा नैसर्गिक आपत्ती आपल्यासाठी फार मोठी आव्हाने ठरतात. चांगला पाऊस देशाच्या भरभराटीसाठी, समृद्धीसाठी मोठे योगदान देतो. मात्र, हवामानबदलाच्या परिणामामुळे काही वेळा या नैसर्गिक आपत्ती संकटे निर्माण करतात. गेल्या काही दिवसात देशाच्या अनेक भागात या नैसर्गिक आपत्तीची संकटे आली. गेल्या काही दिवसात रुग्णालयात आपल्या निरागस बालकांचा मृत्यू झाला. या सा-या संकटाच्या काळात, दुःखाच्या काळात सव्वाशे कोटी देशवासीयांच्या संवेदना या आपत्तींमध्ये सर्वांच्या सोबत आहेत आणि मी देशवासीयांना याची हमी देतो की अशा संकटाच्या काळात पूर्ण संवेदनशीलतेने सर्वसामान्यांच्या सुखी आयुष्यासाठी, सुरक्षिततेसाठी काही करण्यामध्ये आम्ही कोणतीही उणीव ठेवणार नाही. माझ्या प्रिय देशवासीयांनो, हे वर्ष स्वतंत्र भारतासाठी एक विशेष वर्ष आहे. गेल्या आठवड्यातच आपण भारत छोडो चळवळीच्या 75 वर्षांचे स्मरण केले. याच वर्षात आपण चंपारण्य चळवळीची शतकपूर्ती साजरी करत आहोत. साबरमती आश्रमाच्या शताब्दीचे देखील हे वर्ष आहे. हे वर्ष लोकमान्य टिळक, ज्यांनी म्हटले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि लोकांमध्ये चेतना निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली त्याचे देखील हे 125 वे वर्ष आहे. एका प्रकारे इतिहासातली अशी तारीख आहे जिचे स्मरण, ज्याचा बोध आपल्या देशासाठी काही ना काही करण्याची प्रेरणा देतो. देशाच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे आणि 2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्षे, 1942 पासून 1947 या काळात देशाने एका सामूहिक सामर्थ्याचे दर्शन घडवले, इंग्रजांच्या नाकी नऊ आणले आणि पाच वर्षांच्या आत इंग्रजांना हा देश सोडून जाणे भाग पडले. स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे साजरी करण्यासाठी आपल्या हातात अजून पाच वर्षे आहेत. आपली सामूहिक संकल्पशक्ती, आपला सामूहिक पुरुषार्थ, आपली सामूहिक वचनबद्धता, त्या महान देशभक्तांचे स्मरण करताना, प्रयत्नांची पराकाष्ठा, 2022 मध्ये स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्यांच्या स्वप्नांना अनुरूप भारताची निर्मिती करण्यामध्ये उपयुक्त ठरू शकते आणि म्हणूनच नव्या भारताचा एक संकल्प करून आपल्याला देशाला पुढे न्यायचे आहे. सव्वाशे कोटी देशवासीयांच्या संकल्पाने, सव्वाशे कोटी देशवासीयांच्या पुरुषार्थाने, सव्वाशे कोटी देशवासीयांच्या त्याग आणि तपश्चर्येने आणि आपल्याला माहित आहेच की सामूहिकतेचे सामर्थ्य काय असते ते. भगवान श्रीकृष्ण कितीतरी ताकदवान होते पण जेव्हा सर्व गवळी आपल्या काठ्या घेऊन उभे राहिले तेव्हा एक सामूहिक शक्ती निर्माण झाली आणि गोवर्धन पर्वत उचलला गेला. प्रभू रामचंद्रांना लंकेत जायचे होते. वानरसेनेतले लहान लहान लोक कामाला लागले, रामसेतू तयार झाला आणि प्रभू रामचंद्र लंकेत पोहोचले. एक मोहनदास करमचंद गांधी होते. त्यावेळी लोक हातात टाकळी घेऊन, कापूस घेऊन स्वातंत्र्याचे धागेदोरे गुंफत होते, एक सामूहिक शक्ती होती ज्यामुळे देश स्वतंत्र झाला. कोणीही लहान असत नाही, कोणी मोठा असत नाही. एका लहानशा खारुताईचे उदाहरण आपल्याला ठाऊक आहे. एक लहानशी खार देखील परिवर्तनाच्या प्रक्रियेचा भागीदार बनते, ती गोष्ट आपल्या सर्वांना ठाऊक आहे. यासाठीच सव्वाशे कोटी देशवासीयांमध्ये ना कोणी लहान आहे ना कोणी मोठा आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने, 2022 मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे पूर्ण होताना, एक नवा संकल्प, एक नवा भारत, नवी उर्जा, नवा पुरुषार्थ, सामूहिक शक्तीद्वारे आपण देशात परिवर्तन आणू शकतो. नवभारत जो सुरक्षित असावा, समृद्ध असावा, शक्तिशाली असावा, नवभारत ज्या ठिकाणी ज्या कोणासाठी समान संधी उपलब्ध व्हाव्या, नवभारत ज्या ठिकाणी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा जगात दबदबा असेल. स्वातंत्र्य संग्राम आपल्या भावनांशी अधिक जास्त जोडला गेलेला आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे की स्वातंत्र्याची चळवळ जेव्हा सुरू होती तेव्हा एक शिक्षक देखील मुलांना शिकवत होता, एक शेतकरी शेतात काम करत होता, एक मजूर मजुरीचे काम करत होता. पण तेव्हा ते जे काही करत होते, त्यांच्या मनमंदिरात, त्यांच्या हृदयात एकच भावना होती आणि ती भावना म्हणजे आपण जे काही करत आहोत ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी करत आहोत. मनामध्ये असलेला हा भाव एक अतिशय महत्त्वाची ताकद असते. कुटुंबात देखील नेहमीच जेवण शिजवले जाते, विविध पदार्थ तयार केले जातात पण जेव्हा हे पदार्थ देवाच्या समोर ठेवले जातात, तेव्हा त्या पदार्थाचे रूपांतर प्रसादामध्ये होते. आपण कष्ट करतो पण माता भारतीच्या भव्यतेसाठी, दिव्यतेसाठी, देशवासीयांना गरिबीतून मुक्त करण्यासाठी, सामाजिक धाग्यादो-यांना योग्य प्रकारे गुंफण्यासाठी, आपल्या प्रत्येक कर्तव्याला राष्ट्रभावनेने, देशभक्तीने देशाला समर्पित करण्यासाठी केले तर त्याच्या परिणामांची ताकद अनेक पटीने वाढते आणि यासाठीच आपण सर्व ही बाब विचारात घेऊन पुढे चालले पाहिजे. हे वर्ष 2018 चे येणा-या 2018चे एक जानेवारी, या एक जानेवारीला मी सामान्य एक जानेवारी मानत नाही. ज्या लोकांनी एकविसाव्या शतकात जन्म घेतला आहे, त्यांच्यासाठी हे वर्ष महत्त्वाचे आहे. एकविसाव्या शतकात जन्माला आलेल्या युवकांसाठी हे वर्ष त्यांच्या जीवनातील निर्णायक वर्ष आहे. ते ज्या ज्या वेळी 18 वर्षांचे होतील, त्या वेळी ते एकविसाव्या शतकाचे भाग्यविधाते होणार आहेत.

एकविसाव्या शतकाचे भाग्य हे युवक निश्चित करणार आहेत. ज्यांचा जन्म एकविसाव्या शतकात झाला आहे आणि ते लवकरच 18 वर्षांचे होणार आहेत अशा सर्व युवकांचे मी मनापासून खूप खूप स्वागत करतो, त्यांचा सन्मान करतो आणि त्यांचे अभिनंदन करत आहे आणि त्यांना सांगतो की या, तुम्ही 18 वर्षांच्या उंबरठ्यावर उभे आहात, देशाच्या भाग्यनिर्मितीची संधी तुम्हाला मिळत आहे, देशाच्या विकासयात्रेतून अतिशय जलद गतीने तुम्ही भागीदार बना, देश तुम्हाला निमंत्रण देत आहे. माझ्या प्रिय देशवासीयांनो, जेव्हा कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाने श्रीकृष्णाला अनेक प्रश्न विचारले होते, तेव्हा कृष्णाने अर्जुनाला सांगितले होते, मनात ज्या प्रकारची भावना असते, त्याच प्रकारचा परिणाम कार्यावर होत असतो आणि त्यांनी सांगितले आहे, मनुष्य ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, तोच परिणाम त्याला दिसून येतो, तीच दिशा त्याला दिसू लागते. आपल्या देखील मनात ठाम दृढनिश्चय असेल, उज्वल भारतासाठी आपण वचनबद्ध असलो, तर मला असे अजिबात वाटत नाही, यापूर्वी आपण वारंवार निराशात्मक भावनेच्या वातावरणात वाटचाल केली. मात्र आता आपल्या आत्मविश्वासाने पुढे जायचे आहे, निराशेचा त्याग करायचा आहे. चालेल, ठीक आहे, अरे जाऊ दे, मला असे वाटते की चालतंय या भावनेचा काळ आता निघून गेला आहे. आता तर केवळ एकच आवाज येईल आणि तो असेल बदल होत आहे, बदलले आहे, बदल होऊ शकतो हाच विश्वास आपल्या अंतर्मनात असेल तर आपणही त्या विश्वासाला अनुरूप साधक असू, साधन असू, सामर्थ्य असू, संसाधन असू. पण ज्या वेळी हे सर्व त्याग आणि तपश्चर्येशी जोडले जातात, काही तरी करायच्या भावनेने तयार होतात, तेव्हा आपोआपच एक फार मोठे परिवर्तन घडून येते. संकल्प सिद्धीमध्ये रुपांतरित होतो. बंधुभगिनींनो स्वतंत्र भारतात प्रत्येक देशवासीयाच्या मनात देशाचे रक्षण, संरक्षणाची भावना एक नैसर्गिक बाब आहे. आपला देश, आपले सैन्य, आपले वीरपुरुष, आपली सर्व गणवेशधारी दले, मग ती कोणीही असोत, मग ते केवळ लष्कर, नौदल आणि हवाईदल नव्हे तर सर्व गणवेशधारी दले असतील, ज्या ज्या वेळी त्यांना संधी मिळाली त्यांनी आपली चुणूक दाखवली आहे, आपले सामर्थ्य दाखवले आहे. बलिदानाची पराकाष्ठा करताना आपले हे वीर कधीही मागे हटले नाहीत. मग तो डाव्या विचारसरणीचा कट्टरवाद असो, घुसखोरी असो, दहशतवाद असो, आपल्या देशात अंतर्गत समस्या निर्माण करणारे घटक असोत. आपल्या देशात गणवेशात असलेल्या या लोकांनी बलिदानाची पराकष्ठा केली आहे. जेव्हा सर्जिकल स्ट्राइकची कारवाई करण्यात आली तेव्हा जगाला आपल्या सामर्थ्याची दखल घ्यावी लागली. आपल्या लोकांचे सामर्थ्य मान्य करावे लागले.

माझ्या प्रिय देशवासीयांनो हे स्पष्ट आहे की देशाची सुरक्षितता ही आपली प्राधान्यक्रमाची बाब आहे. अंतर्गत सुरक्षा आपली प्राधान्याची बाब आहे. समुद्र असो वा सीमा असो, सायबर असो वा अंतराळ असो, प्रत्येक प्रकारच्या सुरक्षिततेमध्ये भारत सामर्थ्यशाली आहे आणि देशाच्या विरोधात काहीही करणा-यांचे मनसुबे उधळण्यामध्ये आम्ही सक्षम आहोत.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, गरीबांना लुबाडून तिजोरी भरणारे लोक आजही सुखाने झोपू शकत नाहीत आणि त्यामुळे कष्ट करणा-या लोकांचा विश्वास वाढत जातो. प्रामाणिक लोकांना वाटते की मी प्रामाणिकपणाच्या या मार्गावर चालत असताना माझ्या या प्रामाणिकपणाचे देखील काही मोल आहे. आज असे वातावरण तयार झाले आहे की प्रामाणिकपणाचा महोत्सव साजरा होत आहे, प्रामाणिकपणाचा उत्सव साजरा केला जात आहे आणि बेईमान लोकांना तोंड लपवण्यासाठी देखील जागा उरलेली नाही. हे काम एक नवा विश्वास निर्माण करते. बेनामी संपत्ती बाळगणारे, किती वर्षांपासून कायदे प्रलंबित होते. अगदी अलीकडेच आम्ही या कायद्यांची प्रक्रिया सुविहित पद्धतीने पुढे नेली. इतक्या कमी कालावधीत 800 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती सरकारने जप्त केली. जेव्हा या गोष्टी होतात तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या मनात एक विश्वासाची भावना निर्माण होते. हा देश प्रामाणिक लोकांसाठी आहे हा विश्वास सामान्य माणसाच्या मनात निर्माण होतो. 30-40 वर्षांपासून आपल्या लष्करासाठी वन रँक वन पेन्शनचा मुद्दा प्रलंबित होता. वन रँक वन पेन्शनचा प्रलंबित असलेला मुद्दा ज्या वेळी सरकार निकाली काढते, आपल्या सैनिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने योग्य पाऊल उचलते त्या वेळी देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावण्याचे त्यांचे सामर्थ्य आणखी वाढते. देशात अनेक राज्ये आहेत. केंद्र सरकार आहे आणि आपण पाहिले आहे की जीएसटीच्या माध्यमातून देशाने सहकार्यकारी संघराज्यवाद, स्पर्धात्मक सहकार्यकारी संघराज्यवादाला एक नवी ताकद प्रदान केली आहे. एक नवा परिणाम दिसून आला आहे आणि जीएसटी प्रणाली ज्या प्रकारे यशस्वी झाली आहे, त्यामागे कोटी कोटी मानवी प्रयत्न आहेत, तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. जगभरातील लोकांना याचे आश्चर्य वाटते की इतक्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या देशात जीएसटीची अंमलबजावणी सुरू होते ही बाब स्वतःच भारतामध्ये किती सामर्थ्य आहे याचा विश्वास देशाच्या नव्या पिढीमध्ये निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरते. नव्या व्यवस्थांची निर्मिती होते. आज दुप्पट वेगाने रस्ते तयार होत आहेत, आज दुप्पट वेगाने विविध मार्गांवर रेल्वे रुळ घातले जात आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे उलटल्यानंतरही अंधारात राहणा-या 14हजार गावांमध्ये वीज पोहोचवण्यात आली आहे आणि देश प्रकाशाच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहे हे आपल्याला अगदी स्पष्ट दिसत आहे. गरिबांची, 29 कोटी गरिबांची बँक खाती जेव्हा सुरू होतात, नऊ कोटींहून जास्त शेतक-यांना मृदा आरोग्य पत्रिका मिळतात, अडीच कोटींहून अधिक माताभगिनींना लाकडाच्या चुलीपासून मुक्ती मिळून गॅसची शेगडी मिळते तेव्हा गरीब आणि दीनदुबळ्या आदिवासींचे मनोबल उंचावते, गरीब व्यक्ती मुख्य प्रवाहाशी जोडली जाते आणि देश प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे. कोणत्याही तारणाविना स्वयंरोजगारासाठी युवकांना 8 कोटींहून जास्त कर्ज मंजूर होते, बँकेतून मिळणा-या कर्जाच्या व्याजदरात कपात होते, महागाईवर नियंत्रण राहते, मध्यमवर्गीय माणसाला जर स्वतःच्या मालकीचे घर हवे असेल तर त्याला कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यावेळी या देशासाठी काही तरी करायचे आहे या भावनेने देशातील सामान्य नागरिक या कार्यात सहभागी होऊ लागतो.

काळ बदलला आहे. आज सरकार जे बोलते ते करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे दिसत आहे. मग ती नोक-यांमधल्या मुलाखती बंद करण्याची बाब असेल, आम्ही प्रक्रिया बंद करण्याचे सांगितले असेल, एकट्या कामगार क्षेत्रातही एका लहानशा उद्योजकाला पन्नास साठ अर्ज भरावे लागत होते, त्याच्यात आम्ही कपात करून ती संख्या केवळ पाच अर्जांवर आणली. सांगण्याचे तात्पर्य हे आहे, मी अनेक उदाहरणे देऊ शकतो, पण सांगण्याचे तात्पर्य हे आहे की चांगले प्रशासन, प्रशासनाची प्रक्रिया सोपी करणे या दिशेवर भर देण्याचा हा परिणाम आहे की आज गती वाढली आहे, निर्णयप्रक्रियेत गती वाढली आहे आणि त्यामुळेच सव्वाशे कोटी देशवासी या विश्वासाने पुढे वाटचाल करत आहेत.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, आज भारताची पत वाढत चालली आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत, माझ्या देशवासीयांनो तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की दहशतावादाविरुद्धच्या लढाईत भारत एकटा नाही, जगातील अनेक देश आपल्याला अतिशय सक्रिय होत मदत करत आहेत, हवाला व्यवहार होत असले तर त्याची माहिती आपल्याला जगभरातील देश देत आहेत, दहशतवाद्यांच्या कारवायांविषयीची माहिती आपल्याला जग देत आहे. आपण संपूर्ण जगाच्या खांद्याला खांदा लावून दहशतवादाविरुद्धची लढाई लढत आहोत. या कामामध्ये जगभरातील जे देश आपल्याला साथ देत आहेत, भारताची प्रतिष्ठा वाढवायला मदत करत आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानत आहे आणि हेच जागतिक संबंध भारताच्या शांततेला, सुरक्षिततेला एक नवा आयाम प्रदान करत आहेत, नवे बळ देत आहेत.

जम्मू काश्मीरचा विकास, जम्मू काश्मीरची उन्नती, जम्मू काश्मीरच्या सामान्य नागरिकाच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रयत्न हा जम्मू काश्मीरच्या सरकारबरोबरच आपल्या सर्व देशवासीयांचा देखील संकल्प आहे. या स्वर्गाला पुन्हा एकदा त्या पूर्वीच्या स्थितीमध्ये नेण्याचा अनुभव आपण घेऊया आणि त्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत. यासाठी मला हे सांगायचे आहे की काश्मीरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली जातात, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप केले जातात, प्रत्येकजण दुस-याची निंदा करण्यामध्ये गुंतलेला आहे. मात्र, मला स्पष्टपणे असे वाटते की काश्मीरमध्ये ज्या काही घटना घडतात, त्या घटनांमध्ये फुटीरतावादी, हे मूठभर फुटीरतावादी नव्या नव्या प्रकारांचा वापर करत असतात. या लढाईला जिंकण्यासाठी माझ्या मनात अगदी स्पष्ट योजना आहे. निंदा करून ही समस्या सुटणार नाही किंवा बंदुकीच्या गोळ्यांनी समस्येचे निराकरण होणार नाही. ही समस्या सुटेल ती प्रत्येक काश्मीरी व्यक्तीला आपलेसे करून. याच परंपरेमध्ये सव्वाशे कोटी देशवासीयांची जडणघडण झाली आहे. म्हणूनच ना निंदानालस्ती करून, ना बंदुकीच्या गोळ्या झाडून, परिवर्तन होईल ते आपलेसे करणा-या आलिंगनातून, हा निर्धार करून आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. दहशतवादाविरोधात कोणत्याही प्रकारे नरमाईच्या धोरणाचा अवलंब केला जाणार नाही. दहशतवाद्यांना आम्ही वारंवार आवाहन केले आहे की तुम्ही मुख्य प्रवाहात सामील व्हा. भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये तुमचे म्हणणे मांडण्याचा तुम्हाला संपूर्ण अधिकार आहे. पूर्ण व्यवस्था आहे आणि मुख्य प्रवाहच कोणाच्याही जीवनात नवी उर्जा निर्माण करू शकतो. यासाठीच मला आनंद वाटतो की आमच्या सुरक्षा दलांच्या प्रयत्नांमुळे विशेषकरून डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादाच्या प्रभावाखाली असलेल्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात युवक परतले आहेत, त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. मुख्य प्रवाहामध्ये येण्याच्या दिशेने त्यांनी प्रयत्न केले आहेत. सीमेच्या रक्षणासाठी आपले जवान तैनात आहेत. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आज भारत सरकार एक असे संकेतस्थळ सुरू करत आहे. जे शौर्य पुरस्कार विजेते आहेत, आपल्या देशाचा सन्मान वाढवणारे लोक आहेत, त्यांच्या संपूर्ण माहितीसह आज शौर्य पुरस्कार विजेत्यांचे एक पोर्टल सुरू केले जात आहे. ज्यामुळे आपल्या नव्या पिढीला या बलिदान करणा-या वीरांची बरीचशी माहिती मिळू शकेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने देशात प्रामाणिकपणाला पाठबळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. काळ्या पैशाच्या विरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आमचा संघर्ष सुरू राहील आणि आम्ही हळूहळू तंत्रज्ञानाचा वापर वाढवत नेत आधारच्या व्यवस्थेची जोड देत पारदर्शकता आणण्याच्या दिशेने अनेकविध यशस्वी प्रयत्न केले आहेत. जगातील अनेक लोक भारताच्या या मॉडेलची चर्चा करत आहेत आणि त्याचा अभ्यासही करत आहेत. सरकारमध्येही, खरेदी करण्यासाठी आता एक साधा माणूस, हजारो किलोमीटर दूर असलेला गावातील एक माणूस देखील सरकारला आपल्या मालाचा पुरवठा करू शकतो, आपल्या उत्पादनांचा पुरवठा करू शकतो. त्याला आता कोणत्याही दुस-या व्यक्तीची गरज नाही, मध्यस्थाची गरज नाही. जीएम नावाचे एक पोर्टल तयार करण्यात आले आहे, जीएम या पोर्टलद्वारे सरकार माल खरेदी करत आहे. खूप मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आणण्यात यश मिळाले आहे.

बंधु भगिनींनो, सरकारच्या योजनांची गती वाढली आहे. ज्यावेळी कोणत्याही कामामध्ये विलंब होतो तेव्हा केवळ त्या योजनेला विलंब होत नाही, हा केवळ निधीच्या खर्चाशी संबंधित विषय नाही. कोणतेही काम जेव्हा थांबून राहते, तेव्हा सर्वात जास्त हानी माझ्या गरीब कुटुंबांची होते. माझ्या गरीब बंधुभगिनींची होते. नऊ महिन्यांच्या आत मंगळयान पोहोचवू शकतो हे आपले सामर्थ्य आहे, नऊ महिन्यांच्या आत इथून मंगळयान पोहोचू शकते. मात्र, मी एकदा पाहिले, सरकारच्या कामाचा आढावा मी दर महिन्याला घेत असतो. एकदा अशीच एक बाब माझ्या लक्षात आली. 42 वर्ष जुना एक प्रकल्प, 70-72 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प होता रेल्वेचा, 42 वर्षांपासून अडकून पडला होता, रखडला होता. बंधुभगिनींनो नऊ महिन्यात मंगळयान पोहोचवण्याचे सामर्थ्य असलेला माझा देश 42 वर्षांपर्यंत 70-72 किलोमीटर लांबीचे रेल्वेचे रूळ त्या भागात टाकू शकत नाही. अशा वेळी गरिबाच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की माझ्या या देशाचे काय होणार? आणि अशाच गोष्टींवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. या गोष्टींमध्ये बदल आणण्यासाठी आम्ही नव्या नव्या तंत्रज्ञानावर, जिओ टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी अशा प्रकारच्या तंत्रज्ञानांना एकत्र करून परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्ही पाहिले असेल एक काळ असा होता ज्या काळात युरियासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये तणाव निर्माण व्हायचा. केरोसीनसाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये तणाव असायचा. एक असे वातावरण असायचे जसे केंद्र मोठा भाऊ आहे आणि राज्य लहान भाऊ आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून या दिशेने काम सुरू केले. कारण मी दीर्घ काळ मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे देशाच्या विकासात राज्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे याची मला जाणीव आहे. मुख्यमंत्र्यांचे किती महत्त्व आहे, राज्यांच्या सरकारांचे किती महत्त्व आहे, याची मला अतिशय चांगल्या प्रकारे जाणीव आहे. म्हणूनच आता आम्ही सहकार्यकारी संघराज्यवादावर, स्पर्धात्मक सहकार्यकारी संघवादावर भर दिला आहे आणि त्यामुळे तुम्ही पाहिले असेल की आम्ही सर्व निर्णय एकत्र घेत आहोत. तुम्हाला आठवत असेल याच लाल किल्ल्याच्या तटावरून देशातल्या राज्यांमधल्या वीज कंपन्यांच्या दुर्दशेची चर्चा एका पंतप्रधानाने केली होती. लाल किल्यावरून चिंता व्यक्त करावी लागली होती. आज आम्ही राज्यांना सोबत घेऊन उदय योजनेच्या माध्यमातून या वीज कारखान्यांच्या ज्या अडचणी होत्या त्यावर तोडगे काढण्याचे प्रयत्न एकत्रित रित्या केले आहेत. संघराज्यवादाचा एक सर्वात मोठा पुरावा आहे. जीएसटीबरोबरच स्मार्ट सिटीच्या निर्मितीचा विषय असेल, स्वच्छता मोहिमेचा विषय असेल, टॉयलेटची चर्चा असेल, व्यवसाय करण्यातील सुलभतेचा विषय असेल, हे सर्व विषय असे आहेत की ज्यासंदर्भात सर्व राज्ये खांद्याला खांदा लावून, भारतासोबत, भारत सरकार राज्यांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करत आहेत आणि त्यात यशस्वी होत आहेत.

माझ्या प्रिय देशवासीयांनो ‘न्यू इंडिया’ आपले सर्वात मोठे सामर्थ्य आहे, लोकशाही आहे. मात्र, आपल्याला माहित आहे की आपण आपल्या लोकशाहीला मतपत्रिकेपर्यंत मर्यादित केले आहे. लोकशाही मतपत्रिकेपुरती मर्यादित असू शकत नाही आणि म्हणूनच ‘न्यू इंडिया’ मध्ये आम्हाला त्या लोकशाहीवर भर द्यायचा आहे ज्यामध्ये एखाद्या राजवटीने लोक नव्हे तर लोकांच्या पद्धतीने राजवट चालेल अशी लोकशाहीची ओळख ‘न्यू इंडिया’मध्ये बनावी,या दिशेने वाटचाल करण्याची आमची इच्छा आहे.

लोकमान्य टिळकांनी म्हटले होते, ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’. स्वतंत्र भारतामध्ये आपल्या सर्वांचा मंत्र असला पाहिजे, ‘ सुराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’. सुराज्य आपल्या सर्वांचे उत्तरदायित्व असले पाहिजे. नागरिकांना आपल्या जबाबदा-या पार पाडता आल्या पाहिजेत. सरकारांना आपल्या जबाबदा-या पार पाडता आल्या पाहिजेत.

स्वराज्यापासून सुराज्याच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर देशवासी मागे राहत नाहीत. ज्या वेळी मी गॅस अनुदानाचा त्याग करण्याचे आवाहन केले होते, तेव्हा देश पुढे आला. स्वच्छतेचा विषय उपस्थित केला, तर देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात आजही स्वच्छतेची मोहिम राबवली जात आहे. ज्यावेळी नोटाबंदीचा विषय निघाला तेव्हा जगाला आश्चर्य वाटले होते. लोकांनी तर इथपर्यंत देखील म्हटले की आता मोदी संपले. पण नोटाबंदीच्या काळात सव्वाशे कोटी लोकांनी जे धैर्य दाखवले, जो विश्वास व्यक्त केला आणि त्याचाच परिणाम आहे की आज भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही एकापाठोपाठ एक उचलत असलेल्या पावलांना यश मिळत आहे. आपल्या देशासाठी या नव्या लोकसहभागाच्या परंपरेने, जनभागीदारीनेच देशाला पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता. आपल्या देशातील शेतक-यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही, विक्रमी उत्पादन आज आपले शेतकरी पिकवत आहेत. नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊनही नवनवीन कौशल्ये आत्मसात करत आहेत. डाळींचे विक्रमी उत्पादन झाले आहे आणि माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, माझ्या शेतकरी बांधवांनो, भारतात कधीही सरकारने डाळ खरेदी करण्याची परंपरा नव्हती आणि कधी तरी एखाद्या वेळेला केली असेल तरी हजारातही हजारो टनांच्या हिशोबाने हिशोब होत असायचा. यावेळी जेव्हा माझ्या देशाच्या शेतक-यांनी डाळींचे उत्पादन करून गरिबांना पौष्टिक आहार देण्याचे काम केले तेव्हा सरकारने 16 लाख टन डाळ खरेदी करण्याची ऐतिहासिक कामगिरी करून या कार्याला प्रोत्साहन दिले.

माझ्या शेतकरी बांधवांना पंतप्रधान पीक विमा योजनेचे सुरक्षा कवच मिळाले आहे. तीन वर्षांपूर्वी केवळ सव्वा तीन कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते आणि ती पूर्वी दुस-या नावाने चालवली जात होती. आज पंतप्रधान पीक विमा योजनेत इतक्या कमी कालावधीत इतके शेतकरी या योजनेचे सदस्य झाले आहेत आणि जवळ जवळ ही संख्या पावणे सहा कोटींपर्यंत पोहोचली आहे.

पंतप्रधान कृषी सिंचन योजना, शेतक-यांना जर पाणी मिळाले तर मातीमधून सोने पिकवण्याचे त्यांच्यात सामर्थ्य आहे आणि यासाठीच शेतक-यांना पाणी मिळवून देण्यासाठी मी गेल्या वेळी लाल किल्ल्यावरून सांगितले होते या योजनांपैकी 21 योजना आपण पूर्ण केल्या आहेत आणि बाकी 50 योजना आगामी काळात काही दिवसातच पूर्ण होतील आणि एकूण 99 योजनांचा माझा संकल्प आहे. 2019 पूर्वी त्या 99 मोठ्या मोठ्या योजनांना परिपूर्ण करून शेतक-यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम आम्ही पूर्ण करणार आहोत आणि शेतक-यांना बियाण्यापासून ते बाजारपेठेपर्यंतची व्यवस्था जोपर्यंत आपण उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आपल्या शेतक-याचे भाग्य आपण बदलू शकणार नाही आणि यासाठी आपल्याला पायाभूत सुविधा हव्यात, पुरवठा साखळीची गरज आहे. दरवर्षी लाखो-करोडो रुपयांची भाजी, आपली फळे, आपली शेती यांची नासाडी होते आणि यासाठी त्यात बदल करण्यासाठी एकतर परदेशी थेट गुंतवणुकीला आम्ही प्रोत्साहन दिले जेणेकरून अन्न प्रक्रियेच्या संदर्भात आपण जगाशी जोडले जाऊ.

पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आणि भारत सरकारने पंतप्रधान शेतकरी संपदा योजना लागू केली आहे. ज्यामुळे या व्यवस्थांना निर्माण करण्यात आले तर बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत शेतक-यांना सर्व व्यवस्था सहज उपलब्ध होतील, व्यवस्था विकसित करण्यात येतील आणि आपल्या कोट्यवधी शेतक-यांच्या आयुष्यात नवे परिवर्तन आणण्यात आपण यशस्वी होऊ.

मागणी आणि तंत्रज्ञानामुळे आपल्या देशातील रोजगाराच्या स्वरुपात देखील मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागले आहेत. रोजगाराशी संबंधित योजनांमध्ये, प्रशिक्षणाच्या पद्धतींमध्ये 21व्या शतकाच्या गरजांनुसार, मानव संसाधनाच्या विकासासाठी भारत सरकारने अनेक योजना हाती घेतल्या आहेत. युवकांना विनातारण कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी खूप मोठी मोहीम राबवण्यात येत आहे. आपला युवक आपल्या पायावर उभा राहावा, तो रोजगार मिळवणारा बनण्यापेक्षा रोजगार देणारा बनला पाहिजे आणि गेल्या तीन वर्षात पंतप्रधान मुद्रा योजनेमुळे कोट्यवधी युवक आपल्या पायावर उभे राहिले असल्याचे मी पाहिले आहे. केवळ इतकेच नाही तर एक युवक एक किंवा दोन तीन लोकांना रोजगार देऊ लागला आहे.

शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक दर्जाची विद्यापीठे बनवण्यासाठी आम्ही बंधनातून मुक्ती देणारे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 20 विद्यापीठांना आवाहन केले आहे की तुम्ही तुमच्या भविष्याचा निर्णय स्वतःच घ्या. सरकार त्यात हस्तक्षेप करणार नाही. वरून 1000 कोटी रुपयांची मदत देण्याची तयारी देखील दर्शवली आहे. आवाहन केले आहे, माझ्या देशातील शिक्षण संस्था या कामात पुढाकार घेतील, या योजनेला यशस्वी बनवतील असा ठाम विश्वास मला वाटत आहे.

गेल्या तीन वर्षात सहा आयआयटी, सात आयआयएम, आठ नव्या आयआयआयटींची निर्मिती केली आहे आणि शिक्षणाला रोजगार संधींची जोड देण्याचे काम आम्ही केले आहे.

माझ्या माता, भगिनी आज मोठ्या संख्येने नोकरीसाठी बाहेर पडतात. आणि म्हणूनच रात्री देखील त्यांना नोकरीची संधी मिळावी, कारखान्यांमध्ये काम करण्याची संधी मिळावी, यासाठी कामगार कायद्यात सुधारणा करण्याचे खूप मोठे पाऊल उचलले आहे.

आपल्या माता, भगिनी कुटुंबाचा एक महत्वपूर्ण घटक आहेत. आपले भवितव्य घडवण्यात आपल्या माता, भगिनींचे खूप मोठे योगदान आहे. आणि म्हणूनच प्रसूती रजा जी पूर्वी 12 आठवड्यांची होती, ती 26 आठवड्यांची करण्याचे, त्याकाळात वेतन चालू राहील, अशा प्रकारे देण्याचे काम केले आहे.

मी आज आपल्या महिलांच्या सशक्तीकरणाच्या कामासंदर्भात, विशेषतः, मी त्या भगिनींचे अभिनंदन करू इच्छितो, ज्यांना तीन तलाकमुळे अतिशय दुर्दैवी आयुष्य जगावे लागत आहे. कुठेही आश्रय राहिला नाही, आणि अशा पीडित, तीन-तलाकमुळे पीडित भगिनींनी संपूर्ण देशात एक आंदोलन सुरु केले आहे. देशाच्या बुद्धिजीवी वर्गाला हादरवले, देशाच्या प्रसारमाध्यमांनीही त्यांची मदत केली, संपूर्ण देशात तीन-तलाकविरोधात एक वातावरण निर्माण झाले आहे. हे आंदोलन चालवणाऱ्या त्या माझ्या भगिनींचे, ज्या तीन-तलाकविरोधात लढाई लढत आहेत, मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे कि माता-भगिनींना त्यांचे अधिकार मिळवून देण्यात , त्यांच्या या लढाईत भारत त्यांची सर्वतोपरी मदत करेल. भारत त्यांची मदत करेल आणि महिला सक्षमीकरणाच्या या महत्वपूर्ण कार्यात त्या यशस्वी होतील असा मला पूर्ण विश्वास वाटतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, कधी कधी श्रद्धेच्या नावाखाली धैर्याच्या अभावी, काही जण अशा गोष्टी करून बसतात, ज्या समाजातील शांततेला धक्का पोहचवतात. देश शांतता, सद्भावना आणि एकतेने चालतो. जातीयवादाचे विष, सांप्रदायिकतेचे विष, देशाचे कधीही भले करू शकत नाही. ही तर गांधीजींची भूमी आहे, बुद्धाची भूमी आहे, सर्वाना बरोबर घेऊन जायचे हा या देशाच्या संस्कृती आणि परंपरेचा भाग आहे. आपल्याला ते यशस्वीपणे पुढे न्यायचे आहे, आणि म्हणूनच श्रद्धेच्या नावाखाली हिंसाचारावर भर दिला जाऊ शकत नाही.

रुग्णालयात जर रुग्णाला काही झाले, तर रुग्णालयात जाळपोळ करणे, अकस्मात काही घडले, तर गाड्या जाळणे, आंदोलन करणे, सरकारी संपत्ती जाळणे, स्वतंत्र भारतात हे कुणाचे आहे? आपल्या सव्वाशे कोटी देशबांधवांची संपत्ती आहे. हा सांस्कृतिक वारसा कुणाचा आहे? हा आपल्या सव्वाशे कोटी देशबांधवांचा सांस्कृतिक वारसा आहे. ही श्रद्धा कुणाची आहे? आपल्या सव्वाशे कोटी देशबांधवांची ही श्रद्धा आहे. आणि म्हणूनच, श्रद्धेच्या नावाखाली हिंसेचा मार्ग, या देशात कधीही खपवून घेतला जाणार नाही, हे देश कधी स्वीकारूच शकत नाही. आणि म्हणूनच मी देशबांधवांना आवाहन करतो, त्याकाळी ‘भारत छोडो’चा नारा होता, आज नारा आहे ‘भारत जोडो’. व्यक्ती-व्यक्तीला आपल्याला बरोबर घ्यायचे आहे, माणसा-माणसाला बरोबर घ्यायचे आहे, समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घ्यायचे आहे, आणि त्यातूनच आपल्याला देश पुढे न्यायचा आहे.

समृद्ध भारत बनवण्यासाठी आपली अर्थव्यवस्था मजबूत असायला हवी. समतोल विकास हवा, पुढील पिढीचा पायाभूत विकास हवा, तेव्हा कुठे आपल्या स्वप्नातील भारत आपण आपल्या डोळ्यांसमोर पाहू शकू.

बंधू-भगिनींनो, तीन वर्षात आम्ही अगणित निर्णय घेतले. काही बाबी आढळल्या आहेत, आणि काही बाबी बहुधा नजरेस पडल्या नाहीत. मात्र एक गोष्ट महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही एवढा मोठा बदल करता, तेव्हा अडथळे येतात, वेग मंदावतो. मात्र या सरकारची कार्यशैली पहा, जेव्हा रेल्वेगाडी एखाद्या रेल्वे स्थानकाजवळून जाते, जेव्हा रूळ बदलते, तेव्हा 60 चा वेग तिला 30 पर्यंत कमी करावा लागतो. रेल्वेमार्ग बदलल्यावर गाडीचा वेग कमी होतो. आम्ही संपूर्ण देशाला एका नव्या मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र आम्ही त्याचा वेग कमी केलेला नाही, आम्ही त्याचा वेग कायम राखला आहे. मग ती वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी असेल किंवा अन्य कुठला कायदा आणायचा असेल, कुठली नवी व्यवस्था आणायची असेल, आम्ही ते करण्यात यशस्वी झालो आहोत आणि यापुढेही आम्ही ते करून दाखवू.

आम्ही पायाभूत विकासावर भर दिला आहे. पायाभूत विकासासाठी अभूतपूर्व तरतूद केली जात आहे. रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण असेल, छोट्या शहरांमध्ये विमानतळ बांधायचा असेल, जल मार्गांची व्यवस्था करायची असेल, रस्तेमार्गाची व्यवस्था करायची असेल, गॅस ग्रीड उभारायचे असेल, पाण्याचे ग्रीड करायचे असेल, ऑप्टिकल फायबर नेटवर्क उभारायचे असेल, हर तऱ्हेच्या आधुनिक पायाभूत विकासावर आम्ही संपूर्ण भर देत आहोत.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, 21 व्या शतकात, भारताला पुढे नेण्याचे सर्वात उर्जावान क्षेत्र आहे आपला पूर्वेकडील भारत. इतकी क्षमता आहे, सामर्थ्यवान मनुष्यबळ आहे, अमाप नैसर्गिक संपत्ती आहे, परिश्रम करण्याची तयारी आहे, संकल्प करून आयुष्य बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. आपले संपूर्ण लक्ष पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, आसाम, ईशान्य भारत, ओदिशा, ही आपली अशी सामर्थ्यवान राज्ये आहेत, जिथे नैसर्गिक संपत्ती प्रचंड आहे, तिला चालना देऊन देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्न करत आहोत.

बंधू-भगिनींनो, भ्रष्टाचार-मुक्त भारत एक खूप महत्वपूर्ण काम आहे, त्यावर आम्ही भर देण्याचा प्रयत्न करत आहोत. सरकार बनल्यानंतर पहिले काम केले होते एसआयटी स्थापन करण्याचे. आज तीन वर्षांनंतर मी देशबांधवांना सांगू इच्छितो, अभिमानाने सांगू इच्छितो कि तीन वर्षांच्या आत, जवळपास सवा लाख कोटी रुपयांहून अधिक काळा पैसा आम्ही शोधून काढला आहे, तो पकडला आहे आणि शरण येण्यासाठी प्रवृत्त केले आहे.

त्यांनतर आम्ही विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला. विमुद्रीकरणाच्या माध्यमातून आम्ही अनेक महत्वपूर्ण यश प्राप्त केले आहे. जो काळा पैसा दडलेला होता, त्याला मुख्य प्रवाहात यावे लागले. तुम्ही पाहिले असेल कि आम्ही कधी 7 दिवस, 10 दिवस-15 दिवस मुदत वाढवत होतो, कधी पेट्रोल पंपावर, कधी औषधांच्या दुकानात, कधी रेल्वे स्थानकावर जुन्या नोटा स्वीकारणे सुरु ठेवत होतो, कारण आमचा प्रयत्न होता कि एकदा जे धन जमा होईल, ते बँकांमध्ये अर्थव्यवस्थेचा भाग बनेल आणि ते काम आम्ही यशस्वीपणे पार पाडले आहे. आणि यामुळे असे झाले कि अलिकडेच जे संशोधन झाले आहे, अंदाजे तीन लाख कोटी रुपये… हे संशोधन सरकारने केलेले नाही, बाहेरच्या तज्ञ मंडळींनी केले आहे. नोटबंदीनंतर तीन लाख कोटी रुपये, जे अतिरिक्त, जे कधी बँकिंग व्यवस्थेत पुन्हा येत नव्हते, ते आले आहेत.

बँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या रकमेपैकी पावणे दोन लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम संशयाच्या फेऱ्यात आहे. कमीत कमी दोन लाख कोटी रुपयांहून अधिक काळा पैसा बँकांपर्यंत पोहचला आहे आणि आता व्यवस्थेबरोबर त्यांना स्पष्टीकरण देण्यास भाग पाडण्यात आले आहे. नवीन काळ्या पैशावर देखील खूप संकटे आली. या वर्षी, याचा परिणाम पहा, 1 एप्रिल ते 5 ऑगस्ट पर्यंत प्राप्तिकर परतावे दाखल करणाऱ्या नव्या वैयक्तिक करदात्यांची संख्या 56 लाख एवढी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हि संख्या केवळ 22 लाख होती. दुपटीहून अधिक. काळ्या पैशाविरोधातील आमच्या लढाईचा हा परिणाम आहे.

18 लाखांहून अधिक अशा लोकांची ओळख पटवण्यात आली आहे, ज्यांचे उत्पन्न त्यांच्या हिशेबापेक्षा थोडे जास्त आहे, बेसुमार जास्त आहे आणि म्हणूनच या तफावतीबाबत त्यांना उत्तर द्यावे लागत आहे. यापैकी साडे चार लाख लोक आता मैदानात उतरले आहेत, आपली चूक मान्य करून मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहेत. एक लाख लोक असे आढळले आहेत, ज्यांनी कधी आयुष्यात प्राप्तिकराचे नाव देखील ऐकले नव्हते, कधी प्राप्तिकर भरला नव्हता, कधी त्यांनी याबाबत विचार केला नव्हता, मात्र आज त्यांना ते करावे लागत आहे.

बंधू भगिनींनो, आपल्या देशात जर दोन चार कंपन्या देखील कधी बंद पडल्या, तर चोवीस तास त्यावर चर्चा होत राहते, त्यावर वादविवाद होतो. अर्थनीती संपली… असे झाले, आणखी काय काय होते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, काळ्या पैशाचे कारभारी शेल कंपन्या चालवत होते, आणि नोटबंदी नंतर जेव्हा माहितीचे विश्लेषण करण्यात आले, तेव्हा तीन लाख अशा कंपन्या आढळल्या, ज्या केवळ आणि केवळ शेल कंपन्या आहेत. हवाला उद्योग करायच्या. तीन लाख, कुणी कल्पना करू शकते. आणि त्यापैकी दोन लाखाची नोंदणी आम्ही रद्द केली आहे. पाच कंपन्या बंद झाल्या तर भारतात वादळ येते. पावणे दोन लाख कंपन्यांना टाळे लावण्यात आले. देशाचा माल लुटलेल्यांना उत्तर द्यावे लागेल, हे काम आम्ही करून दाखवले. पावणे दोन लाख कंपन्यांना टाळे लावले. देशाची लूट करणाऱ्यांना जबाब द्यावा लागेल, आम्ही हे काम केले आहे.

आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की काही बनावट कंपन्या,एकाच पत्त्यावर चार -चारशे कंपन्या चालवत होत्या, बंधू-भगिनींनो, चारशे कंपन्या चालवल्या जात होत्या.कोणी विचारणारे नव्हते, कोणी पाहणारे नव्हते.सगळे एकमेकांना सामील. म्हणूनच,बंधू-भगिनींनो, मी भ्रष्टाचार आणि काळ्यापैशाविरुद्ध लढा पुकारला आहे, देशाच्या भल्यासाठी, देशातल्या गरिबांच्या कल्याणासाठी, देशाच्या युवकांचे भवितव्य घडवण्यासाठी.

बंधू-भगिनींनो,एकापाठोपाठ एक पाऊले उचलली जात आहेत.मला विश्वास आहे की वस्तू आणि सेवा करानंतर यात वाढच होणार आहे. अधिक पारदर्शकता येणार आहे. केवळ वाहतुकीचे पाहाल तर, एक वाहतूक चालक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असे, वस्तू आणि सेवा करानंतर त्याच्या वेळेची तीस टक्के बचत झाली आहे. चेक नाके काढण्यात आल्याने हजारो कोटी रुपयांची बचत तर झाली आहेच. सगळ्यात मोठी बचत झाली आहे ती वेळेची. एका प्रकारे तीस टक्के कार्यक्षमता वाढली आहे. हिंदुस्थानमध्ये वाहतुकीत तीस टक्के बचत म्हणजे काय याचा अर्थ काय असतो याची आपण कल्पना करू शकता. एका वस्तू आणि सेवा करामुळे हे परिवर्तन घडले आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नोटबंदी मुळे बँकांकडे धन आले आहे. बँक आपले व्याजदर कमी करत आहेत. मुद्राद्वारे सर्व सामान्याला, बँकांकडून पैसे मिळत आहेत. सर्व सामान्याला आपल्या पायावर उभे होण्याची संधी मिळत आहे. गरीब असो, मध्यमवर्गीय असो, त्यांना घर बांधायचे असेल तर बँका मदतीसाठी पुढे येत आहेत, कमी व्याज दर लावून पुढे येत आहेत.देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दिशेने हे सर्व कामी येत आहे.

आम्ही नेतृत्व करू, आम्ही जबाबदारी घेऊ, आम्ही डिजिटल व्यवहार करू. आम्ही भीम अँपचा वापर करू, त्याला आर्थिक कारभाराचा भाग बनवू. आम्ही प्रीपेड द्वारा काम करू. मला आनंद आहे की डिजिटल देवाणघेवाण वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 34 टक्के वाढ झाली आहे आणि प्रीपेड पद्धती मध्ये 44 टक्के वाढ झाली आहे. म्हणूनच रोखीचे व्यवहार कमी राखणारी अर्थव्यवस्था, त्या दृष्टीने आपल्याला आगेकूच करायची आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,सरकारच्या काही योजना अशा आहेत ज्या हिंदुस्तानच्या सामान्य जनतेच्या पैशाची बचत करू शकतात. आपण एल ई डी ब्लबचा वापर केला तर वर्षभराची हजार, दोन हजार,पाच हजार रुपयांची बचत होणार आहे. स्वच्छ भारत अभियानात आपण सफल ठरलात तर गरीबाचा औषधावरचा सात हजार रुपयांचा खर्च बंद होतो . महागाईवर नियंत्रण, आपला वाढता खर्च रोखण्यावर नियंत्रण आणणे म्हणजे एका प्रकारे बचतच आहे. जन औषधी केंद्राद्वारे स्वस्त औषधांची दुकाने, गरिबांसाठी आशीर्वादच ठरली आहेत. आपल्याकडे शस्त्रक्रियेवर, स्टेंटवर जो खर्च होत असे तो कमी झाला आहे. येत्या काही दिवसात गुढघ्यावरच्या शस्त्रक्रियेसाठीही सर्व सुविधा मिळणार आहेत. गरीब आणि मध्यमवर्गाचा खर्च कमी व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत आणि त्यासाठी आम्ही एकामागोमाग एक पाऊले उचलत आहोत.

याआधी आपल्या देशात राज्यांच्या मुख्यालयात डायलिसिस होत असे. आम्ही निश्चय केला की हिंदुस्तानच्या जिल्हा केंद्रापर्यंत डायलिसिस केंद्र पोचवण्याचा . सुमारे तीनशे, चारशे जिल्ह्यापर्यंत पोहोचवली आणि मोफत डायलिसिस करून गरिबांचे जीवन वाचवण्याचे काम आम्ही करत आहोत. आज देश अभिमानाने सांगू शकतो की जगासमोर आम्ही आपली व्यवस्था विकसित केली आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे नॅव्हिक नेव्हिगेशन व्यवस्था करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. सार्क उपग्रहाद्वारे शेजारी राष्ट्रांबरोबर मदत करण्याचे सफल अभियान चालवत आहोत.

तेजस विमानाद्वारे जगाला आपले महत्व जाणवून देत आहोत. भीम – आधार अँप, जगभरात डिजिटल व्यवहारांसाठी एक आश्चर्य ठरले आहे. रूपे कार्ड , हिंदुस्तानमध्ये रूपे कार्ड करोडोच्या संख्येने आहेत. ती कार्यान्वित झाली आणि गरीबाच्या खिशात असतील तर ते जगभरात सर्वात मोठे ठरेल.

आणि म्हणूनच माझ्या प्रिय देशवासियांनो, माझा आग्रह आहे की आपण सर्व न्यू इंडिया अर्थात नव भारताचा संकल्प करूनच पुढे वाटचाल करूया. आपल्या पुराणात म्हटले आहे, अनियत काल:, अनियत कालः प्रभुतयो विप्लवन्ते, प्रभुतयो विप्लवन्ते. योग्य वेळी एखादे काम पूर्ण केले नाही तर त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. म्हणूनच टीम इंडियासाठी, सव्वाशे कोटी देशवासीयांच्या टीम इंडियासाठी आज आपल्याला, 2022 पर्यंत नव भारत बनवण्याचा संकल्प करायला हवा, आणि हे काम आपण स्वतःच करणार आहोत, कोणी करेल असे नव्हे आपण स्वतःच करू, पहिल्यापेक्षा अधिक करू, समर्पण भावाने करू आणि 2022 मध्ये भव्य-दिव्य हिंदुस्थान पाहण्यासाठी करू.

आपण सर्व एकत्र येऊन एक असा भारत घडवू, जिथे गरिबाकडे पक्के घर असेल, वीज असेल,पाणी असेल.

आपण सर्व मिळून एक असा भारत घडवूया जिथे,शेतकऱ्याला विवंचना नसतील, तो सुखाची झोप घेऊ शकेल. 2022 मध्ये त्याचे उत्पन्न आजच्यापेक्षा दुप्पट असेल.

आपण सर्व मिळून एक असा भारत घडवूया जिथे,युवकांना, महिलांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संधी उपलब्ध असेल.

आपण सर्व मिळून एक असा भारत घडवूया जो, दहशतवाद, जातीयवादापासून मुक्त असेल.

आपण सर्व मिळून एक असा भारत घडवूया जिथे, भ्रष्टाचाराला थारा नसेल.

आपण सर्व मिळून एक असा भारत घडवूया जो,स्वच्छ, तंदुरुस्त असेल आणि स्वराजाचे स्वप्न पूर्ण करेल.

म्हणूनच माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण सगळे मिळून या विकासाच्या वाटचालीत पुढे राहण्याचा प्रयत्न करूया.

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर, स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या प्रतिक्षेच्या या पाच वर्षाच्या महत्वपूर्ण काळात एका भव्य-दिव्य भारताचे स्वप्न घेऊन आपण सर्व देशवासीय वाटचाल करूया, हा भाव मनात बाळगून स्वातंत्र्यासाठी झपाटलेल्या,त्यासाठी योगदान देणाऱ्यांना मी पुन्हा एकदा प्रणाम करतो.

सव्वाशे कोटी देशवासीयांच्या नवा विश्वास,नव्या उत्साहाला नमन करतो. त्याचबरोबर नवा संकल्प घेऊन बरोबरीने वाटचाल करण्याचे टीम इंडियाला आवाहन करतो.

या भावनेबरोबरच, आपणा सर्वाना माझ्या मनःपूर्वक खूप-खूप शुभेच्छा.

भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद.

जय हिंद, जय हिंद, जय हिंद.

भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय,

वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम

सर्वाना अनेक अनेक धन्यवाद.

******

APS/S.Tupe/N.Chitale/S.Kane/S.Patil/Anagha