हॅम्बुर्ग येथे जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी कोरियाचे राष्ट्रपति मून जाई इन यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील यशाबद्दल राष्ट्रपति मून यांचे व्यक्तिशः अभिनंदन केले. पंतप्रधानांनी केलेला अभिनंदनपर दूरध्वनी आणि कोरियन भाषेतील ट्विट याची राष्ट्रपतींनी आठवण करून दिली. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया यांसारख्या कार्यक्रमांच्या सहभागातून भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील विशेष धोरणात्मक भागीदारी आणखी विकसित करण्याबाबत उभय नेत्यांनी कटिबद्धता दर्शवली. पंतप्रधानांनी राष्ट्रपति मून यांना लवकरच भारत भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण स्वीकारण्यात आले.
इटलीचे पंतप्रधान पाओलो जेंटोलीनी यांच्याबरोबरच्या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी द्विपक्षीय संबंध विशेषतः व्यापार आणि गुंतवणूक आणि जनतेमधील परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यावर भर दिला. यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या ‘वर्ल्ड फूड इंडिया ‘ या अन्न प्रक्रिया प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी इटलीला निमंत्रित केले. द्विपक्षीय आर्थिक सहकार्य दृढ करण्यासाठी दोन्ही देशांच्या मध्यम उद्योगांमध्ये संवाद वाढवण्याच्या महत्वावर उभय नेत्यांनी भर दिला. औद्योगिक क्षेत्रासह इटलीतील भारतीय गुंतवणुकीची इटलीच्या पंतप्रधानांनी प्रशंसा केली. आफ्रिकेतील विकासाला चालना देण्यासाठी आणि हवामान बदलाच्या समस्येवर शाश्वत तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या पद्धतींबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
पंतप्रधान मोदी आणि नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग यांनी द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः आर्थिक संबंध मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत विकास निधीत नॉर्वेच्या निवृत्तीवेतन निधीचा सहभाग वाढवण्यासाठी आमंत्रित केले. नॉर्वेच्या पंतप्रधानांनी उंगा अर्थात संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर ओशन्स परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताला निमंत्रित केले. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सहकार्याचे प्रतीक म्हणून पंतप्रधान सोलबर्ग यांनी पंतप्रधान मोदी यांना बैठकीच्या शेवटी शाश्वत विकास उद्दिष्टे अंकित केलेला फुटबॉल भेट म्हणून दिला.
बी गोखले /एस. काणे