Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमध्ये ‘पणिकर वाचन महिना’ कार्यक्रमामध्ये केलेले भाषण

s20170617107706


वाचन महिन्याच्या उद्‌घाटन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहतांना मला अतीव आनंद होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पी.एन. पणिकर प्रतिष्ठानचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. वाचना इतका आनंद दुसऱ्‍या कशानेही मिळत नाही आणि ज्ञानापेक्षा मोठी कोणतीही शक्ती असू शकत नाही.

मित्रांनो,

केरळने साक्षरता क्षेत्रामध्ये केलेले कार्य संपूर्ण देशाला प्रेरणा देणारे आहे. साक्षरतेच्या क्षेत्रात केरळ जणू मशाल वाहक आहे.

शंभर टक्के साक्षर शहर आणि शंभर टक्के साक्षर राज्य बनण्याचा मान सर्वात प्रथम केरळने मिळवला. त्याचबरोबर शंभर टक्के प्राथमिक शिक्षण घेणारे राज्यही केरळच होते. प्राचीन काळातील काही महाविद्यालये, शाळा आणि ग्रंथालये केरळमध्ये आहेत.

शंभर टक्के साक्षरतेसारखे कार्य काही एकटे सरकार करू शकत नाही. त्यासाठी नागरिक, सामाजिक संघटना महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. यामध्ये असलेला लोकसहभाग पाहिला तर, केरळने एक आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. कैलासवासी पी.एन.पणिकर यांच्यासारख्या लोकांनी आणि त्यांच्या प्रतिष्ठानने केलेल्या उत्तुंग कामगिरीचे म्हणूनच मला अतिशय कौतुक वाटते. केरळमध्ये ग्रंथालयांचे जाळे निर्माण करण्यामागे पी. एन. पणिकर एक प्रेरणास्त्रोत बनले. 1945 मध्ये त्यांनी ‘केरळ ग्रंथशाळा संगम’च्या माध्यमातून ग्रामीण भागांमध्ये 47 ग्रंथालये स्थापन केली. 

वाचन करणे आणि ज्ञान मिळवणे हे केवळ कामापुरतेच मर्यादित असावे, असे मला वाटत नाही. वाचन, ज्ञान यांना मर्यादा नसतात यावर माझा विश्वास आहे. यामुळे सामाजिक जबाबदारी घेणे, देश आणि मानवतेची सेवा करणे या सवयी आपल्यामध्ये विकसित होतात. शांततेचा विचार प्रसारित करणे आणि एकोप्याने राहण्याबरोबरच देशाच्या एकात्मतेचा आदर करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे, ती वाचनामुळे होते.

घरातली एक महिला साक्षर झाली की, ती दोन कुटुंबांना शिकवते, असे म्हटले जाते. या संदर्भात केरळने अतिशय अनुकरणीय उदाहरण सगळयांसमोर सादर केले आहे.

वाचन संस्कृती बळकट होण्यासाठी पी.एन. पणिकर प्रतिष्ठानबरोबर अनेक सरकारी संस्था, खाजगी क्षेत्रातील विविध संघटना, आणि नागरिक संघटना कार्यरत आहेत, याची मला माहिती आहे.

सन 2022 पर्यंत 300 दशलक्ष वंचित लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. विकास आणि समृद्धी यांच्यासाठी वाचनाला प्रोत्साहन देण्याचे अभियान या प्रतिष्ठानने सुरू केले आहे.

वाचनामुळे माणसाच्या विचार करण्याच्या कक्षा रुंदावतात. समृद्ध वाचक असणाऱ्‍या लोकांमुळे वैश्विक पातळीवर सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी भारताला मदत होणार आहे.  

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्य करताना मी, अशाच पद्धतीची ‘वांचे गुजरात’ नावाने एक मोहीम राज्यात सुरू केली होती. याचा अर्थ आहे, ‘गुजरात वाचतोय’!  लोकांना वाचण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी मी राज्यातल्या सार्वजनिक ग्रंथालयांना भेटी दिल्या होत्या. युवावर्गाला डोळयासमोर ठेवून ही विशेष मोहीम सुरू केली होती. आपले गाव ‘ग्रंथ मंदिर’ म्हणजेच पुस्तकांचे मंदिर बनविण्याचा विचार करावा,  असे आवाहन मी नागरिकांना केले आहे. याचा  प्रारंभ अगदी 50 किंवा 100 पुस्तकांनीही होवू शकतो.

लोकांनी एकमेकांना शुभेच्छास्वरूप भेट म्हणून पुष्पगुच्छ देण्याऐवजी पुस्तके द्यावीत, असे आवाहन मी केले आहे. अशा प्रकारांनीच खूप मोठा बदल घडू शकतो.

मित्रांनो,

उपनिषदासारख्या अगदी प्राचीन काळापासून, अनेक पिढ्यांपासून ज्ञानवंतांचा सन्मान केला जातो. आज आता आपण माहिती – तंत्रज्ञानाच्या युगात पोहोचलो आहोत. तरीही आजही ज्ञान आपला सर्वाधिक उत्तम मार्गदर्शक आहे.

पणिकर प्रतिष्ठानच्यावतीने, डिजिटल ग्रंथालयाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याची तयारी केली आहे, अशी माहिती मला देण्यात आली.  भारतीय सार्वजनिक ग्रंथालय चळवळ नवी दिल्लीच्या  सहकार्याने  राज्यातल्या 18 सार्वजनिक वाचनालयांमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत असल्याचेही मला सांगण्यात आले.

संपूर्ण देशभरामध्ये याच पद्धतीने वाचनाचे आणि ग्रंथालयाचे ‘आंदोलन झालेले’ पाहण्याची माझी इच्छा आहे. ही चळवळ  फक्त लोकांना साक्षर करण्यापुरती मर्यादित राहून चालणार नाही. उलटपक्षी या चळवळीमुळे सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्याचे वास्तविक लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. चांगल्या ज्ञानाची मजबूत पायाभरणी करूनच चांगल्या समाज निर्मितीचा एक  विस्तृत आराखडा तयार केला गेला पाहिजे.

राज्य सरकारने 19 जून हा दिवस ‘वाचन दिन’ म्हणून जाहीर केला आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे. मोठ्या प्रमाणावर हा वाचन दिन लोकप्रिय करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत.

भारत सरकारने या प्रतिष्ठानच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये पणिकर प्रतिष्ठानला 1.20 कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती मला दिली गेली.

काळाची पावले ओळखून , आवश्यकता लक्षात घेवून प्रतिष्ठान आता डिजिटल साक्षरतेकडे आपले लक्ष्य केंद्रित करत असल्याचे पाहून मला आनंद झाला.

मित्रांनो,

माझा लोकांच्या क्षमतेवर विश्वास आहे. लोकांमध्ये एक खूप चांगला समाज आणि राष्ट्र बनविण्याची क्षमता आहे.

आज येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक युवकाने वाचण्याची प्रतिज्ञा करावी, असा माझा आग्रह आहे. आणि असे करण्यासाठी सगळयांना समर्थ बनवावे.

आपण सगळेजण मिळून भारताला पुन्हा एकदा ज्ञान आणि बुद्धीची भूमी बनवू शकतो.

धन्यवाद !

B.Gokhale/S. Bedekar/D.Rane