महामहिम,पंतप्रधान,प्रविंद जगन्नाथ,
प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी,
उपस्थित महिला आणि पुरुषवर्ग,
पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आणि त्यांच्यासमवेत आलेल्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात स्वागत करताना मला आनंद होत आहे.या वर्षाच्या सुरवातीला मॉरिशसचे पंतप्रधान म्हणून नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर, भेट देण्यासाठी पहिला देश म्हणून आपण भारताची निवड केलीत हा आमचा सन्मान आहे. उभय देशातल्या दोन शतकाहून अधिक सुरु असलेल्या आणि वृद्धिंगत होणाऱ्या संबंधांचे हे द्योतक आहे.उभय देशातले संबंध केवळ सरकारपुरतेच सीमित नसून आपली जनता आणि समाजातही या संबंधाची मूळे रुजली आहेत आणि बहरलीही आहेत.विविध क्षेत्रात या मैत्रीचे उत्तम वस्त्र विणले गेले आहे.
मित्रहो,
पंतप्रधान जगन्नाथ यांच्यासमवेत स्नेहपूर्ण आणि फलदायी चर्चा झाली.मार्च 2015 मध्ये मी मॉरिशसला दिलेल्या भेटीचे स्मरण मला आमच्या चर्चेदरम्यान झाले.त्या भेटीने सहकार्याची नवी दालने खुली झाली.दोन्ही देशात सामायिक असलेली मूल्ये,प्रयत्न यामुळे अधोरेखित झाले.
मित्रहो,
द्विपक्षीय संबंधात आज आम्ही झेप घेतली.हिंदी महासागरातील आघाडीची राष्ट्रे म्हणून, आपल्या किनारपट्ट्या आणि विशेष आर्थिक क्षेत्राच्या सामूहिक सागरी सुरक्षेची खातरजमा करणे ही आपली जबाबदारी आहे यावर आम्हा उभय नेत्यांचे एकमत झाले.आर्थिक संधीचा लाभ घेण्यासाठी, आपल्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी,त्यांच्या उदरनिर्वाहाच्या रक्षणा साठी, हिंदी महासागरात असलेल्या पारंपरिक आणि बिगरपारंपरिक धोक्यांचे प्रभावी व्यवस्थापन आवश्यक आहे यावर एकमान्यता झाली. आणि म्हणूनच भारत-मॉरिशस सहकार्य अतिशय महत्वाचे आहे.
आपण याबाबत दक्ष राहिले पाहिजे:
व्यापार आणि पर्यटनावर परिणाम करणारी चाचेगिरी
मानवी आणि अंमली पदार्थांची तस्करी
बेकायदेशीर मासेमारी
सागरी संसाधनाचे इतर कोणत्याही मार्गाने होणारे शोषण
आज झालेल्या द्विपक्षीय सागरी सुरक्षा करारामुळे उभय देशांचे सहकार्य आणि क्षमता दृढ होतील.सुरक्षित आणि शांततापूर्ण सागरी क्षेत्रासाठी हायड्रोग्राफी मधले विस्तृत सहकार्य आणखी मजबूत करण्यालाही आम्ही मान्यता दिली आहे. ट्रायडन्ट प्रकल्पाअंतर्गत,मॉरिशसच्या राष्ट्रीय तटरक्षक दलाची क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी भारत सहकार्य करत आहे. मॉरिशसला देण्यात आलेल्या कोस्ट गार्ड शिप गार्डीयन विषयक नूतनीकरणाचा निर्णयही आम्ही घेतला आहे.
मित्रहो,
मॉरिशसबरोबर असलेली मजबूत विकासात्मक भागीदारी ही आपल्या संबंधांचे प्रमाण आहे.मॉरिशसमध्ये सुरु असलेल्या विकासात्मक कार्यात सक्रिय सहभागी असल्याचा भारताला अभिमान आहे. मॉरिशसला 500 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा पतपुरवठा करण्यासाठी आज झालेला करार म्हणजे मॉरिशसच्या विकासाप्रती भारताच्या दृढ कटिबद्धतेचे द्योतक आहे.महत्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठीही याचा उपयोग होणार आहे. सध्याच्या प्रकल्पांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून आम्ही त्यांचे स्वागत केले आहे. उभय देशांनी निश्चित केलेल्या प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी व्हावी यासाठी भारत पूर्ण सहकार्य देईल.हे प्रकल्प मॉरिशसच्या अर्थव्यवस्थेला नवी उभारी देण्याबरोबरच दोन्ही देशातल्या संबंधात दर्जात्मक परिवर्तनही घडवतील.मॉरिशसबरोबर कौशल्य विकास वाढविण्याच्या मुद्द्यावरही आम्ही चर्चेदरम्यान भर दिला. भारताच्या, मॉरिशसबरोबर विविधांगी क्षमता वृद्धी कार्यक्रमाचा हा एक भाग आहे.या क्षेत्रात आदान प्रदान अधिक प्रगाढ करण्याबाबत आम्ही आनंद व्यक्त केला आहे.
मित्रहो,
नवीकरणीय ऊर्जेच्या महत्वाकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान जगन्नाथ यांनी घेतलेल्या पुढाकाराची आम्ही प्रशंसा करतो. मॉरिशसने,आंतरराष्ट्रीय सौर युतीसंदर्भातल्या कराराच्या आराखड्याला मंजुरी दिल्यामुळे आणि स्वाक्षरी केल्यामुळे या क्षेत्रात,दोन्ही देशांसाठी प्रादेशिक भागीदाराची नवी दालने खुली झाली आहेत.
मित्रहो,
मॉरिशसच्या राष्ट्र कार्यात भारतीय मूळ असलेल्या समुदायाच्या योगदानाचा आम्हाला अभिमान आहे.मॉरिशसमधल्या प्रवासी भारतीयांसमवेत असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी, भारताने, या वर्षीच्या जानेवारीत, मॉरिशसमधल्या भारतीय मूळ असलेल्या नागरिकांसाठी ओसीआय कार्ड जाहीर केले. आपल्या राष्ट्रीय विमान कंपनीने नव्या ठिकाणांसाठी इतर कंपन्यांबरोबर असलेला कोड शेअरिंग करार वृद्धिंगत करण्याला मान्यता दर्शवली आहे.यामुळेही आपल्या देशातल्या पर्यटनाला त्याचबरोबर उभय देशातल्या जनतेमधल्या संबंधाना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
मित्रहो,
द्विपक्षीय मुद्द्यांबरोबरच, पंतप्रधान जगन्नाथ आणि मी अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली.उभय देशांसमोरच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सहकार्य करण्याचा तसेच बहू आयामी जागतिक मंचावर एकमेकांना सहकार्य सुरूच ठेवण्याला आम्ही संमती दिली आहे.पंतप्रधान जगन्नाथ यांच्या या भेटीने आपल्या पारंपरिक संबंधांवर आधारित असलेल्या संबंधांना नवी उंची गाठण्यासाठी मोठे योगदान मिळेल. पंतप्रधान जगन्नाथ यांच्या दूरदृष्टीबद्दल आणि उभय देशातले संबंध जोपासत असल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.आज घेतलेल्या निर्णयांची आगामी काळात कार्यवाही करण्याबाबत त्यांच्यासमवेत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. पंतप्रधान जगन्नाथ यांचे मी पुन्हा स्नेहपूर्ण स्वागत करतो आणि भारतातले त्यांचे वास्तव्य फलदायी ठरावे यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो.
धन्यवाद.
अनेक अनेक धन्यवाद. .!
B.Gokhale/N.Chitale/P. Kor