Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जर्मनी, स्पेन आणि रशिया व फ्रांस दौऱ्यावर निघण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रांस देशांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन


२९ आणि ३० मे २०१७ रोजी मी जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या निमंत्रणावरून चौथ्या भारत-जर्मनी अंतर सरकार चर्चेसाठी(IGC) जर्मनीला भेट देत आहे.

भारत आणि जर्मनी मोठे लोकशाही देश असून प्रमुख अर्थव्यवस्था तसेच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींमध्ये महत्वाचे घटक देश आहेत. आमची डावपेचात्मक भागीदारी ही लोकशाही मूल्ये आणि खुल्या, समावेशक आणि नियमांवर आधारित अशा जागतिक व्यवस्थेप्रती कटीबद्धतेवर आधारलेली आहे. आमच्या विकासात्मक उपायांमध्ये जर्मनी हा अत्यंत मौल्यवान असा भागीदार असून भारताच्या परिवर्तनासंबंधी माझा जो दृष्टीकोन आहे त्याच्याशी जर्मन क्षमता अगदी चपखल बसते.

जर्मनीतील बर्लिनजवळ मेसेबर्ग येथील भेटीपासून मी दौरा सुरु करणार असून तिथे प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी चॅन्सेलर मर्केल यांनी मला अत्यंत स्नेहभावाने निमंत्रण दिले आहे.

३० मे रोजी चॅन्सेलर मर्केल आणि मी आमच्या द्विपक्षीय संबंधांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी ४ थी IGC करणार आहोत. व्यापार आणि गुंतवणूक, सुरक्षा आणि दहशतवादाशी लढा, नाविन्यपूर्ण संशोधन आणि विज्ञान व तंत्रज्ञान, कौशल्य विकास, शहरी पायाभूत सुविधा, रेल्वे आणि नागरी उड्डयन, स्वच्छ उर्जा, विकासात सहकार्य, आरोग्य आणि पर्यायी औषधे या क्षेत्रांवर भर देत भविष्यातील सहकार्याचा आराखडा आम्ही तयार करू.

फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे अध्यक्ष महामहीम डॉ. फ्रँक-वॉल्टर स्टेनमायर यांचीही मी भेट घेणार आहे.

व्यापार, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीत जर्मनी हा आमची अग्रगण्य भागीदार आहे. बर्लिनमध्ये आमचे व्यापार आणि गुंतवणूक संबंध आणखी मजबूत करण्यासाठी मी आणि चॅन्सेलर मर्केल दोन्ही देशांतील आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधणार आहोत.

जर्मनीशी द्विपक्षीय सहकार्याचा नवा अध्याय या भेटीने सुरु होणार आहे याचा मला विश्वास असून आमची धोरणात्मक भागीदारी आणखी सखोल होणार आहे.

३०-३१ मे २०१७ या रोजी मी स्पेनला अधिकृत भेट देणार आहे. तीन दशकांत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने स्पेनला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या भेटीदरम्यान महामहिम राजे फिलीप सहावे यांची भेट घेण्याचा सन्मान मला मिळेल.

३१ मे रोजी अध्यक्ष मारीयानो रॅजॉय यांच्याशी होणाऱ्या भेटीकडे मी आशेने पाहत आहे. विशेषतः आर्थिक वर्तुळात द्विपक्षीय सहभाग आणि सामायिक चिंतेच्या विशेषतः दहशतवादाचा मुकाबला या आंतरराष्ट्रीय मुद्यांवर सहकार्य वाढवण्यासाठी मार्गांवर आम्ही चर्चा करू.

द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्यासाठी लक्षणीय संभावना आहे. पायाभूत सुविधा, स्मार्ट शहरे, डिजिटल अर्थव्यवस्था, अपारंपरिक उर्जा, संरक्षण आणि पर्यटन यासह विविध भारतीय प्रकल्पात स्पॅनिश उद्योग जगताच्या सक्रीय सहभाग मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

मी स्पॅनिश उद्योग जगताच्या सर्वोच्च मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणार असून मेक इन इंडिया या आमच्या कार्यक्रमात भागीदार होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणार आहोत.

माझ्या भेटीच्या दरम्यानच भारत-स्पेन सीईओ मंचाची पहिली बैठक होत आहे. भारत-स्पेन आर्थिक भागीदारी मजबूत करण्यासाठी त्यांच्या मौल्यवान शिफारशीकडे मी आशेने पाहत आहे.

३१ मे पासून ते २ जून दरम्यान मी १८ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला सेंट पीटर्सबर्ग येथे असेन.

१ जूनला मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भेटणार असून गेल्या ऑक्टोबर २०१६ मध्ये गोवा येथे झालेल्या शिखर परिषदेतील संवाद पुढे नेण्यासाठी विस्तृत चर्चा करणार आहे. आर्थिक संबंधांवर प्रकाशझोत ठेवत राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि मी दोन्ही देशांच्या सीईओबरोबर संवाद साधणार आहोत.

दुसऱ्या दिवशी सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचाच्या (SPIEF) बैठकीला मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासमवेत संबोधित करणार आहे. या वर्षीच्या मंचात मला सन्माननीय पाहुणा म्हणून दिलेल्या निमंत्रणाला मी दाद देतो. भारत यंदाच्या SPIEF साठी आमंत्रित देश आहे.

अशा प्रकारच्या होणाऱ्या या पहिल्याच बैठकीत द्विपक्षीय सहकार्याचा पाया व्यापक करण्यासाठी विविध रशियन प्रांतांच्या राज्यपालांना तसेच रशियन राज्ये/प्रदेश व इतर विभिन्न भागधारक यांना अधिक सक्रीय सहभागी करून घेण्याची ही संधी मला मिळणार आहे.
माझ्या भेटीच्या सुरुवातीलाच मी लेनिनग्राड वेढ्यादरम्यान धारातीर्थी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिस्कारोव्स्कोये दफनभूमीत जाणार आहे. जगप्रसिद्ध स्टेट हर्मिटेज संग्रहालय आणि इन्स्टिट्यूट ऑफ ऑरिएन्टल मॅन्युस्क्रिप्ट येथे भेट देण्याचीही संधी मला मिळेल.
दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांचा ७० वा वर्धापनदिन साजरा करत असताना द्विपक्षीय संबंधांसाठी विशेष वर्ष असल्याने सेंट पीटर्सबर्ग भेटीकडे मी अत्यंत आतुरतेने पाहत आहे.

२-३ जून २०१७ रोजी मी फ्रान्सला भेट देईन. त्या भेटीदरम्यान नवनिर्वाचित फ्रेंच अध्यक्ष महामहीम श्री. ईमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी माझी अधिकृत भेट ३ जूनला होणार आहे.

फ्रांस हा आमच्या अत्यंत महत्वाच्या डावपेचात्मक भागीदारांपैकी एक आहे.

अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी होणाऱ्या भेटीकडे मी उत्सुकतेने पाहत असून दोघांच्याही हिताच्या मुद्यांवर चर्चा केली जाईल. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेतील सुधारणा आणि संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यासह विविध बहुआयामी निर्यात नियंत्रण करार, दहशतवादविरोधी सहकार्य, हवामान बदल मुद्यावर सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी या महत्वाच्या जागतिक मुद्यांवर मी फ्रेंच अध्यक्षांशी मतांची देवाणघेवाण करणार आहे.

फ्रांस हा आमचा ९ वा मोठा गुंतवणूक भागीदार असून संरक्षण, अंतराळ, आण्विक आणि अपारंपरिक उर्जा, नागरी विकास आणि रेल्वे या क्षेत्रातील आमच्या विकासात्मक पुढाकारासाठी अत्यंत महत्वाचा भागीदार आहे. फ्रान्सबरोबर अनेकविध पैलू असलेल्या आमची भागीदारी लक्षणीयरित्या मजबूत करून ती आणखी पुढे नेण्यासाठी मी वचनबद्ध आहे.

B.Gokhale/U.Kulkarni/P.Kor