Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी दिकोया येथे रुग्णालयाचे उदघाटन केले, नॉरवूड येथील भारतीय वंशाच्या तामिळ समुदायाला संबोधित केले

पंतप्रधानांनी दिकोया येथे रुग्णालयाचे उदघाटन केले, नॉरवूड येथील भारतीय वंशाच्या तामिळ समुदायाला संबोधित केले

पंतप्रधानांनी दिकोया येथे रुग्णालयाचे उदघाटन केले, नॉरवूड येथील भारतीय वंशाच्या तामिळ समुदायाला संबोधित केले

पंतप्रधानांनी दिकोया येथे रुग्णालयाचे उदघाटन केले, नॉरवूड येथील भारतीय वंशाच्या तामिळ समुदायाला संबोधित केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेच्या  मध्य प्रांतातील दिकोया येथे भारताच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या एका रुग्णालयाचे उदघाटन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती, श्रीलंकेचे पंतप्रधान आणि अनेक समुदाय नेत्यांच्या उपस्थितीत नॉरवूड येथे मोठ्या संख्येने जमलेल्या भारतीय वंशाच्या तामिळ समुदायाला संबोधित केले. भाषणादरम्यान, पंतप्रधानांनी भारतीय वंशाच्या तामिळ समुदायाने श्रीलंकेसाठी दिलेल्या योगदानाचा तसेच भारत आणि श्रीलंका यांच्यातील दीर्घकालीन वारशाचा उल्लेख केला.

 

पंतप्रधान सिलोन वर्कर्स काँग्रेस आणि तामिळ पुरोगामी आघाडीच्या प्रतिनिधींनाही भेटले.

 

मध्य श्रीलंकेतील बहुतांश भारतीय वंशाच्या सुमारे 3० हजार तामिळ लोकांना पंतप्रधानांनी संबोधित केले, त्या भाषणातील काही प्रमुख भाग पुढीलप्रमाणे-

 

आज इथे उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होत आहे.

 

आणि तुम्ही केलेल्या उत्साहपूर्ण स्वागतासाठी मी तुमचा खूप आभारी आहे.

 

श्रीलंकेच्या या सुंदर प्रांताला भेट देणारा पहिला भारतीय पंतप्रधान बनण्याचा बहुमान मला लाभला.

 

मात्र, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली हा माझा मोठा सन्मान आहे.

 

या सुपीक जमिनीतील सुप्रसिद्ध सिलोन चहाशी जगभरातील लोक परिचित आहेत.

 

मात्र एक गोष्ट अपरिचित आहे आणि ती आहे तुम्ही गाळत असलेला घाम आणि मेहनत ज्याने सिलोन चहाला जगभरातील लाखो लोकांचे पसंतीचे पेय बनवले आहे.

 

आज श्रीलंका जगातील तिसरा सर्वात मोठा चहाचा निर्यातदार आहे, तो केवळ तुमच्या कठोर परिश्रमांमुळे.

 

हे तुमचे प्रेमाने केलेले श्रम आहेत, जे जगाची जवळपास 17% चहाची मागणी पूर्ण करण्यात आणि दीड अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक परकीय चलन मिळवण्यात महत्वपूर्ण ठरले आहे.

 

श्रीलंकेच्या समृद्ध चहा उद्योगाचा, जो आज यशाच्या शिखरावर आहे, तुम्ही अपरिहार्य कणा आहात.

 

तुमच्या योगदानाची  श्रीलंकेत आणि त्या बाहेरही प्रशंसा केली जाते.

 

मी तर मनापासून तुमच्या कठोर परिश्रमाची प्रशंसा करतो.

 

तुमच्यात आणि माझ्यात थोडे साम्य आहे.

 

तुमच्यापैकी काही जणांनी ऐकले असेल की माझे चहाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

 

चाय पे चर्चा किंवा चहाबरोबर चर्चा हे केवळ घोषवाक्य नाही.

 

तर प्रामाणिक श्रमांच्या प्रतिष्ठा आणि अखंडेप्रति आदराचे प्रतीक आहे.

 

आज, तुमच्या पूर्वजांची आठवण येते.

 

प्रखर इच्छाशक्ती आणि धैर्याच्या जोरावर त्यांनी भारतातून तत्कालीन सिलोनकडे आपल्या आयुष्याचा प्रवास केला.

 

त्यांच्या प्रवासात खाचखळगे आले असतील, आणि त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असेल, मात्र त्यांनी हार मानली नाही.     

 

आज, आपण त्याचे स्मरण करतो आणि त्यांच्या वृत्तीला सलाम करतो.

 

तुमच्या पिढीला देखील खूप त्रास सहन करावा लागला.

 

मात्र, तुम्ही धीराने त्यांचा सामना केला, तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढलात, मात्र हे तुम्ही शांततेच्या मार्गाने केले.

 

सौमियामुर्थी यांच्यासारख्या नेत्यांना आपण कधीच विसरू शकणार नाही,ज्यांनी तुमच्या हक्कांसाठी, तुमच्या उत्थानासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी खूप मेहनत घेतली.

 

कनियन पंगूनरनार या तामिळ विद्वानाने दोनशे वर्षांपूर्वी जाहीर केले होते की, याथुम ऊरे, यावरम केलीर, म्हणजे प्रत्येक शहर हे मूळ गाव आहे आणि सर्व लोक आपले नातलग आहेत.

 

आणि, तुम्ही त्या म्हणण्यातील खरा आत्मा उचललात.

 

तुम्ही श्रीलंकेला तुमचे घर बनवलंत.

 

या सुंदर देशाच्या सामाजिक जीवनातील धाग्यांचे तुम्ही अंतर्निहित घटक आहात.

 

तुम्ही तामिळ थाईची लेकरे आहात.

 

जगातील सर्वात प्राचीन रूढ भाषांपैकी एक असलेली भाषा तुम्ही बोलता.

 

तुमच्यापैकी अनेकजण सिंहली भाषाही बोलता ही अभिमानाची बाब आहे.

 

आणि, भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही त्यापेक्षा बरेच काही आहे. 

 

ती  एक संस्कृती परिभाषित करते, नातेसंबंध जोडते, समुदायांमध्ये सामील होते आणि एक मजबूत एकत्रित शक्ती म्हणून कार्य करते.

 

शांती आणि एकोप्यामध्ये राहणा-या बहुभाषिक समाजापेक्षा अधिक चांगले दृश्य दुसरे काही नाही.

 

विविधता उत्सव साजरे करायला सांगते, विरोधाभास नाही.

 

आपला भूतकाळ नेहमीच एकमेकांशी जोडलेला आहे.

 

जातक कथांसह अनेक बौद्ध ग्रंथ संत अगस्त्याचा उल्लेख करतात, ज्यांना अनेक जण तमिळ भाषेचे जनक मानतात.

 

कँडीच्या सिंहली नायक राजाचे मदुराई आणि तंजोरच्या नायक राजघराण्याशी विवाहसंबंध जुळले.

 

सिंहली आणि तामिळ या दरबारी भाषा होत्या.

 

हिंदू आणि बौद्ध अशा दोन्ही धार्मिक स्थळांचा आदर आणि सन्मान राखला जायचा.

 

ऐक्य आणि अखंडतेचे हे धागे आपल्याला अधिक मजबूत करायचे आहेत, वेगळे करायचे नाहीत.  

 

आणि, कदाचित  या प्रयत्नांचे नेतृत्व करण्याची  व आपले योगदान देण्याची सर्वोत्तम संधी तुमच्याकडे आहे.

 

मी महात्मा गांधींचे जन्मस्थळ असलेल्या भारतातील गुजरात राज्यातील आहे.

 

जवळपास 9० वर्षांपूर्वी, त्यांनी कॅंडी, नुवारा इलिया, मटाले, बदुल्ला, बंदरावेला आणि हत्तोन सह श्रीलंकेच्या या सुंदर भागाला भेट दिली होती.

 

गांधीजींचा पहिला आणि एकमेव श्रीलंकेचा दौरा सामाजिक-आर्थिक विकासाचा संदेश प्रसारित करण्यासाठी होता.

 

त्या ऐतिहासिक भेटीच्या स्मृतिप्रीत्यर्थ मटाले येथे 2015मध्ये भारत सरकारच्या सहकार्याने महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन करण्यात आले.

 

नंतरच्या काळात, भारतातील दुसरे राष्ट्रीय व्यक्तिमत्व पुरातची थलाईवर एमजीआर या भूमीत जन्माला आले, ज्यामुळे आयुष्यभराचे स्नेहसंबंध जोडले गेले.

 

आणि, अगदी अलिकडच्या काळात, तुम्ही जगाला क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेला मुथैया मुरलीधरन भेट दिलात.

 

तुमच्या प्रगतीचा आम्हाला अभिमान वाटतो.

 

आयुष्याच्या विविध वळणावरील तुमची कामगिरी आम्हाला आनंद देते.

 

जगभरात आपला ठसा उमटवणाऱ्या भारतीय वंशाच्या समुदायाच्या यशात आम्ही सहभागी होतो.

 

अशा अनेक नेत्रदीपक यशाची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे.

 

भारतीय आणि श्रीलंकन सरकार आणि जनतेतील तुम्ही एक महत्वाचा दुवा आहात.

 

या सुंदर देशाबरोबरच्या आमच्या संबंधांच्या परिवर्तनाचा एक भाग म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो.

 

हे संबंध अधिक फुलवण्याला माझ्या सरकारचे प्राधान्य आहे.

 

आणि, आपली भागीदारी आणि संबंध यांना अशा प्रकारे आकार देणे, ज्यामुळे भारतीय आणि श्रीलंकन लोकांच्या प्रगतीला चालना मिळेल आणि तुमच्या आयुष्यावरही त्याची छाप पडेल.

 

तुम्ही भारताबरोबरचे तुमचे संबंध जिवंत ठेवले आहेत.

 

भारतात तुमची मित्रमंडळी आणि नातेवाईक आहेत.

 

तुम्ही भारतीय उत्सव तुमचे समजून साजरे करता.

 

तुम्ही आमची संस्कृती आत्मसात केली आहे आणि ती अंगिकारली आहे.

 

भारत तुमच्या हृदयात आहे.

 

आणि, मी तुम्हाला इथे सांगतो की तुमच्या भावनांचा भारत आदर करतो.

 

तुमच्या सामाजिक-आर्थिक उत्थानासाठी आम्ही सर्वतोपरी अखंडपणे काम करत राहू.

 

मला माहित आहे की श्रीलंकेचे सरकार तुमचे राहणीमान सुधारण्यासाठी पंचवार्षिक राष्ट्रीय कृती आराखड्यासह अनेक उपाययोजना करत आहे.

 

या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांना भारताचा नेहमीच पूर्ण पाठिंबा राहील.

 

भारताने श्रीलंकन सरकारबरोबर तुमच्या कल्याणासाठी प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि समाज विकास क्षेत्रांमध्ये अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत.

 

प्रतिभावान विद्यार्थ्यांना त्याचे शिक्षण सुरु ठेवायला प्रोत्साहन देण्यासाठी 1947 मध्ये सिलोन इस्टेट वर्कर्स एज्युकेशन ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती.

 

या अंतर्गत, आम्ही विद्यार्थ्यांना श्रीलंकेत आणि भारतात शिक्षण घेण्यासाठी सुमारे 7०० वार्षिक शिष्यवृत्त्या देतो.

 

तुमच्या मुलांना याचा लाभ मिळाला आहे.

 

उदरनिर्वाह आणि क्षमता विकास क्षेत्रात, योग्य कौशल्य उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे आणि 1० इंग्रजी भाषा प्रशिक्षण केंद्रांची स्थापन केली आहे.

 

त्याचप्रमाणे, आम्ही शाळांमध्ये संगणक आणि विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यास मदत केली आहे.

 

अनेक प्राथमिक शाळांच्या श्रेणीत आम्ही सुधारणा करत आहोत.

 

आता नुकतेच, राष्ट्रपती सिरीसेना, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे आणि मी दिकोया येथे भारताच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या 15० खाटांच्या रुग्णालय संकुलाचे लोकार्पण केले.

 

येथील अद्ययावत सुविधांमुळे या भागातील लोकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण होतील.

 

सध्या पश्चिम आणि दक्षिण प्रांतात कार्यरत असलेली 1990 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा अन्य प्रांतांमध्येही विस्तारित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे हे जाहीर करताना मला देखील आनंद होत आहे.

 

योग आणि आयुर्वेद यांसारख्या भारताच्या सर्वांगीण आरोग्य परंपरांचे आदान-प्रदान करताना आम्हाला देखील आनंद होत आहे.

 

पुढील महिन्यात आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत, याचे अनेक लाभ लोकप्रिय करण्यासाठी तुमच्या सक्रिय सहभागाची मी उत्कटतेने वाट पाहत आहे.

 

मला आनंद होत आहे, की प्रथमच लाभार्थ्यांच्या ज्या जमिनीवर घरे बांधण्यात आली त्याचा मालकी हक्क त्यांना देण्यात येत आहे.

 

या क्षेत्रातील आमची कटिबद्धता सुरु ठेवण्याच्या दृष्टीने मला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की आणखी दहा हजार घरे या प्रकल्पांतर्गत शहरी भागात बांधली जातील.

 

आज सकाळी, मी कोलंबो ते वाराणसी दरम्यान थेट एअर इंडिया विमानसेवेची घोषणा केली.

 

यामुळे, तुम्हाला सहजपणे वाराणसीला भेट देता येईल आणि भगवान शंकराचे आशीर्वाद घेता येतील.

 

शांतता आणि समृद्धीच्या दिशेने तुमच्या प्रवासात भारत सरकार आणि येथील जनता तुमच्याबरोबर आहे.

 

भविष्यातील आश्वासने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी भूतकाळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू.

 

महान कवी थिरुवल्लुवर यांनी म्हटले आहे,” अमाप ऊर्जा असलेल्या आणि अतोनात प्रयत्न करणाऱ्या माणसाचा मार्ग  संपत्ती स्वतः शोधून काढते.”

 

मला विश्वास वाटतो की, तुमच्या मुलांची स्वप्ने आणि क्षमता आणि तुमचा वारसा यांचा मेळ घालणारा उज्वल भविष्यकाळ असेल.

 

धन्यवाद, नांदरी. खूप खूप धन्यवाद.

 

B.Gokhale/S.Kane/Anagha